Saturday, October 8, 2022

उपसंहार / सिंहावलोकन / रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे:

 आधी आपण बघूया प्रोजेक्टच्या सुरुवातीला सेट केलेले अजेंडे आणि नियम किती साध्य झाले वगैरे:

( पहा उपोद्घात: https://kalyapivalyanavasachigosht.blogspot.com/2020/02/blog-post_8.html )

१. मन्नत:

नवस तर फिटलाच असं म्हणता यावा. सो इकडे मी स्वतःला १०० % मार्क दिल्यास कोणाची हरकत नसावी. 

२. मुंबूड्या:

मुंबईत जन्मलो आणि वाढलो तरी गेली १५ वर्षं पोटापाण्यासाठी पुण्यात राहून काम करतोय. 

आई आणि बहिणीसाठी मुंबईला येणं होत रहायचं पण एकंदरीत धबडग्यात मुंबईचा टच सुटल्यासारखाच झालेला. 

ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने तो काही दशांशाने का होईना परत मिळाला हे छानच. 

मुंबईच्या बेसिक रस्त्यांची थोडीफार आयड्या आली. 

चुकत माकत, कधी पाशिंजरांच्या शिव्या खात,

चर्चगेट ते व्ही टी स्टेशन, चर्चगेट ते कुलाबा, व्ही टी ते माझगाव, हाजीअली ते महालक्ष्मी आणि पुढे परेल भोईवाडा

वगैरे वगैरे महत्त्वाचे रस्ते कळून आले. 

गूगल मॅप्सची मदत अर्थातच झाली. 

पण बहुतेक वेळा पाशिंजरांनी न रागावता माहीत नसलेले रस्ते दाखवले. 

खास करून मध्य आणि दक्षिण मुंबईचा ब्लू प्रिंट समजून आला. 

तीन महत्त्वाचे रूट्स म्हणता यावेत. 

जे एकमेकांना समांतर जातात. (पुण्यातल्या जे एम / एफ सी / आणि एस बी रोडसारखे पण त्यापेक्षा मोठया स्केलमध्ये )

पश्चिमेला समुद्रालगत जाणारा कॅडल रोड - वरळी - हाजीअली - पेडर रोड - चौपाटी हा एक: तिघांतला सगळ्यात पॉश

सायन - दादर टी टी - नायगाव - परेल - के ए एम - भायखळा - जे जे - व्ही टी ला जाणार दुसरा: बराचसा कनिष्ठ मध्यमवर्गीय

वडाळा - शिवडी - रे रोड - डॉकयार्ड - बी पी टी वाला तिसरा: हा तर साक्षात इंडस्ट्रीयल. ह्याचा चेहेरामोहरा हातावर पोट असलेल्यांचा.   

हे झालं भूगोलाविषयी. 

शिवाय थोडी खवैय्येगिरी करता आली. 

प्रकाश, सरदार पावभाजी, बॉम्बे कॉफी हाऊस, सुरती भोजनालय अशा काही आवडत्या जागांना भेट देता आली. 

रविवार दुपारची निवांत दक्षिण मुंबई चाखता आली. 

काही सुंदर पण भण्ण, भग्न, खिन्न जागा बघितल्या. 

चिंचोळ्या किचाट गर्दीच्या रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन गाडी चालवली. 

ठिकठिकाणचे सी एन जी पंप वाले, खास टॅक्सीवाल्यांसाठीचा अति गोड चहा बनवणारे चहावाले आणि बरेच टॅक्सीवालेसुध्दा ओळखीचे झाले.  

आणि बरंच काही... 

मुंबई अर्थातच कॉम्प्लेक्स, जगड्व्याळ, कधीच हातात न येणारी निसरडी म्यूझ आहे. 

तिला पूर्ण जाणणं अजिबातच अशक्य आहे हे मला नीटच कळलं. 

सो ह्या कॅटेगरीत मी मला ५५ % मार्क देईन. 

३. पर्स्पेक्टिव्ह:

आधीच म्हटल्याप्रमाणे हा रस्त्यावर उतरून जगण्याचा प्रयत्न होता तो सफल झाला का?

निर्दयपणे म्हणायचं तर बऱ्याच अंशी नाही!

पण त्याला माझी मानसिक तयारी होतीच. 

केवळ तीस सेशन्समध्ये मी स्कॉर्सेसीच्या "ट्रॅव्हीस बिकल"सारखा हार्ड कोअर टॅक्सीवाला होईन ह्याची शक्यता कमीच होती आणि ते झालंही नाही. 

पण एक वेगळ्याच जगाची तोंडओळख का होईना करून घेता आली. 

बऱ्याच लोकांचं आयुष्य उबदार, सुरक्षित, जमाडी जमतीनं भरलेलं नसतं हे कळलं. 

आपण होंडा सिटी चालवताना रस्त्यावरच्या बाकीच्या इतर ड्रायव्हर्समध्ये जी क्षमाशीलता आणि दिलदारपण असतो तो आपण टॅक्सी ड्रायव्हर असल्यास एकदम घटतो असा अनुभव आला :) 

रोड रेज अनुभवले, अरेला कारे केलं, शिव्या खाल्ल्या शिव्या दिल्या... 

टॅक्सीवालेच टॅक्सीवाल्यांची मारताना पाहिले. 

बंधुभावाला जागून मदतही करताना पाहीले. 

बरेचसे ड्रायव्हर आयुष्यभर टॅक्सीतच रहातात झोपतात त्यांना आपल्यासारखं घट्टंमुट्टं घरच नसतं हेही बघितलं. 

थोडक्यात सांगायचं तर पॅरासाईट किंवा भाऊबळी पिक्चरचा पॉईंट अजून थोडा नीट कळला. 

चालवायला टॅक्सी शोधताना एक ड्रायव्हर बोललेला भाई आप एक दिन भी नाही टिकोगे ते आठवलं. 

(तीस दिवस का होईना पण टिकलो) 

हे आयुष्य मी त्यांच्यासारखं जगू शकेन का? तर नाही.

आपण असं जगू शकणार नाही पण लोक काही पर्याय नसल्याने असं जगतात हे भान आलं. 

हेही किंचित यशच. 

म्हणजे कसं आहे ना संगीत शिकताना आपण ऑफ बीट जातोय ही समजणं सुद्धा मोठी गोष्ट असते... 

ऑन बीट वाजवणं ही तर पुढची पायरी. 

तर ती पहिली पायरी नीटच समजली इथे: You know that you don't know!

इकडे मी मला काठावर पास होण्यापुरते ३५ % देईन. 

आता आपण उपोद्घातातील नियम किती पाळले ते बघूया:

नियम: इमानदारीत टॅक्सी चालवायची. कुठेही नियम वळवा-वाकवायचे नाहीत. 

हा नियम चांगलाच पाळला. प्रसंगी पाशिंजरांच्या शिव्या खाऊनही सिग्नल तोडले नाहीत किंवा नो एंट्रीत कोणी बघत नसतानाही गाडी घातली नाही. 

टॅक्सीचा बॅजही थ्रू प्रॉपर चॅनेल जाऊनच मिळवला. 

थोडा नेट लावला तर सरळ मार्गाने झोलझाल न करता कामं होतात, सिस्टीमचे लोकंही मदत करतात हे पाहून छान वाटलं  

नियम : पाशिंजरला होईल तितकी मदत करायची. 

हे ही बऱ्याच अंशी पाळलं. 

होता होईल तो मदत केली. 

पैशासाठी अडवलं नाही. 

रस्ता चुकवल्यास सरळ पाशिंजरांची क्षमा मागून टाकली. 

नियम: नाही बोलणारे टॅक्सी-रिक्षावाले असंख्यवेळा आपल्या डोक्यात तिरके गेलेयत सो कुणालाही नाही म्हणायचं नाही. येईल ते भाडं स्वीकारत जायचं. 

हा मात्र काहीवेळा मोडला. दुसऱ्या शिफ्टचा ड्रायव्हर आपली वाट पहात असताना शेवटच्या क्षणी भाडं घेणं शक्य नसतं. 

अशा वेळी अपराधीपणे सॉरी पुटपुटून निघून गेलो. 

टॅक्सीवाले बरेचदा उगीच नाही म्हणत असले तरी बरेचदा त्यांची जेन्युईन अडचण असते हे समजलं. 

आधी रिक्षावाल्यांशी बरेचदा तावातावाने भांडायचो ते (अर्थातच) आता अजिबातच करावंसं वाटत नाही :)

गम्मत म्हणजे आत्ताशा सिव्हिल कपड्यांतही मला रिक्षा टॅक्सीवाले कुठे जायचं असेल तर पटकन हो म्हणतात. 

त्यांना भावकीतले लोक ओळखू येण्याचा सेन्स असावा बहुतेक. 

हे अजून काही बोनस फायदे:

इन जनरल बरेच टॅक्सीवाले चांगले मित्र झालेत. दिनेशभाई, राजकुमार इत्यादी. 

फेसबुक, ऐसी अक्षरे, सहकारी, मित्र, शेजारी आणि बऱ्याच जणांनी ह्या प्रोजेक्टचं भरभरून कौतुक केलं आणि माझी कॉलर टाईट केली. 

लिहिण्यात नोंदी करण्यात काही एक शिस्त आली. 

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही एक संकल्प आरंभापासून अंतापर्यंत तडीस नेण्याचं निखळ समाधान लाभलं. 

शेवटी ह्या ऍब्सर्ड, व्यर्थ, बरेचदा भंजाळून टाकणाऱ्या आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही प्रोजेक्ट लागतोच. 

मग कोणी वारीला जातो, कोणी सचिनच्या प्रत्येक मॅचला हजेरी लावतो, कोणी नवीन ऑपरेटींग सिस्टीम लिहितो, कोणी लोकांना व्याकरण शिकवतो आणि कोणी कबुतरं पाळतो. 

तसंच हे ही... 

पुढे काय?

काही तरी नवीन!

बघूया कसं जमतंय ते!!


------- समाप्त -------- 


Friday, September 23, 2022

टॅक्सी दिवस ३० (उद्यापन): ३ एप्रिल २०२२:

शेवटचा दिवस... 

खरं सांगायचं तर मीही आता ह्यातून बाहेर पडायला आतुरलेलो. 

ह्यानंतर रविवारी दुसरं काय काय करता येईल ह्याचे प्लॅन्स ऑलरेडी डोक्यात चालू झालेले. 

शनिवारी रात्री पार्ट्या करणं, रविवारी आधी पोहे आणि मग मटण खाऊन लोळत पडणं, किंवा वीकेंड गेटवेजचे प्लान्स करणं हे सगळं राहून जात होतं. 

अर्थात हे साक्षात भेंचोत फर्स्ट वर्ल्ड आहे आणि खऱ्या टॅक्सी ड्रायव्हर्सना ही डाव सोडता येण्याची लक्झरी अजिबात नाहीये हे मान्यच!

पण प्रांजळ असलेलंच बरं! 

फारसा इव्हेंटफुल न होता आजचा दिवस मंडेन जावा असं आतून वाटत होतं आणि तसंच झालं. 

गव्हर्नमेंट कॉलनी ते बी डी डी चाळीत एका यंगीश कपल आणि त्यांच्या लहान मुलाला सोडलं 

रविवार साधून दामोदर / रवींद्र किंवा जवळपास कुठेतरी नाटक गाठायचे प्लान्स चाललेले होते त्यांचे. 

अगदी ठाणे (गडकरी) किंवा कल्याणला (आचार्य अत्रे नाट्यगृह) जायचीही तयारी होती त्यांची. 

हाच हाच तो रसिक उत्साही मायबाप प्रेक्षक असं म्हणत मी समाधानाने मराठीची काळजी काळजावरुन उतरवून टाकली आणि हलका हलका झालो :) 

नवरा गंभीर बायको उत्फुल्ल आणि मुलगा माफक आगाऊ होता.  

बायकोला प्रशांत दामलेचं "सारखं काहीतरी होतंय" बघायचं होतं. 

तिनं तेवढ्यात चान्स मारला, "तुलाही सारखं काहीतरी होतच असतं ना!"

आणि ती शरद पोंक्षेसारखं खिक खिक हसली. 

कॉल मी एम. सी. पी. पण बायकांचे टॉण्टस आणि टायमिंग वेगळीच लेव्हल असतेय. 

लेझर सर्जरीसारखी प्रीसाईज जखम करू शकतात त्या. 

पुरुष एकतर ओव्हर जाऊन समोरच्याला रक्तबंबाळ करतो नाहीतर अंडर जाऊन काहीतरी फदुकल्यासारखं बोलून वार फुकट घालवतो. 

असो. 

मग एका छान स्त्रीला आणि तिच्या लहान मुलीला सिद्धिविनायक वरून आस्वादला सोडलं. 

ती "सिंगल मदर" असावी असं मला का कोण जाणे उगीचच वाटलं. 

मग आणखी थोडी भाडी मारून लंच ब्रेक घ्यायला माझ्या आवडत्या जागी आलो: बॅलार्ड इस्टेट. 

आज शेवटचा दिवस असल्यामुळे थोडी चैन करायची ठरवली. 

ग्रँड हॉटेलच्याच बाजूला "बॉम्बे कॉफी हाऊस" आहे. 

शांत, प्रकाशात न्हायलेली निवांत जागा आहे ही. 

त्यांचं क्रॉसाँ क्लब सँडविच आणि कोल्ड कॉफी सुंदर असते. 

आता तिकडचा स्टाफ थोडा ओळखीचाही झालाय. 

आठवणीनी क्रॉसाँ सॅन्डविच मधून फ्राईड एग वगळतात माझ्या ऑर्डरला.

का कोण जाणे मला माझ्या बर्गर सँडविच किंवा रस्त्यावरच्या चायनीजमध्ये वरतून टाकलेलं फ्राईड एग डोक्यात जातं. 

हे ते शेजवान ट्रिपल वर फ्राईड एग टाकायची आयडिया कोणी आणली कोण जाणे च्या मारी. 


 





ब्रेकनंतर बॉम्बे हॉस्पिटलच्या जवळपास आणि काही भाडी मारली आणि धाडकन सहाच वाजले. 

पॅकअप करायचं ठरवलं. 

मुकेश चौकाजवळच्या पंपावर टॅक्सीचा गॅस फुल्ल केला. 

ये SSS य सुट्टी!!!

पण टॅक्सी द्यायला जाता जाता मुच्छड पानवाल्याजवळच्या सिग्नलवर तीन छान टीन एजर पोरींनी मला डेस्परेट हातवारे करून थांबवलंच. 

जवळच रमाबाई रोडवर जायचं होतं त्यांना बाबुलनाथजवळ. 

इतक्या गोड मुलींना काही मला नाही म्हणवेना.

दिल्लीच्या होत्या बहुधा त्या.  

दिल्लीच्या ठाशीव अक्सेंटमध्ये चिवचिव करत, भारी परफ्युमचा घमघमाट सोडत आणि थँक्यू भैया बोलत गोड हसून त्या छू झाल्या. 

मी जरा सुन्न झालो. प्रॅक्टिकली शेवटचं भाडं होतं प्रोजेक्टचं!

सुसाट टॅक्सी मारत राजकुमारला भेटलो. 

तो पुढच्या शिफ्टसाठी तयारीतच होता. 

त्यालाच घेऊन सी-लिंक वरून मस्त गप्पा मारत घरी आलो. 

मोठ्ठं काहीतरी संपल्यासारखं हलकं हलकं वाटत होतं. 

नाही म्हटलं तरी २०१६ पासून जवळ जवळ साडेपाच वर्षं ह्या सगळ्या पाठी मी हात धुवून लागलो होतो. 

आज ३० सेशन्स झाली फायनली. 

आज आणि हा आठवडाभर जरा चिल. 

उपसंहाराचा लेख लवकरच!

आजची कमाई: ५२० रुपये





  








   




 


 

 

 

   

  

Friday, June 17, 2022

टॅक्सी दिवस २९ (सेकंड लास्ट): २ एप्रिल २०२२:

आज सेकंड लास्ट दिवस उद्या प्रोजेक्ट संपणार म्हणून रात्रीच टॅक्सी काढली. 

वार्डन रोडजवळच्या अप्सरा आईस्क्रीम जवळून चार टिपिकल नवसारीचे गुजराती मुस्लीम उचलले. 

बाय द वे. हे वाळकेश्वरचं ओरिजिनल अप्सरा आईस्क्रीम!

आता त्यांच्या मुंबई पुणे आणि इतरही सगळीकडे १०० च्या वर चिक्कार ब्रॅंचेस आहेत. 

पण माझ्या माहितीप्रमाणे पान-मसाला आईस्क्रीमचे जनक हेच. 

मला स्वतःला हयांचं(च) पान-मसाला आईस्क्रीम भारी आवडतं.  

तर नवसारीवाले पॅसेंजर्स:
सैलसर कुर्ते, पांढरे पायजमे, सुरमा, छान मेंदीवाली वगैरे दाढी, डोक्यात नक्षीदार टोप्या आणि अत्तराचा घमघमाट!

रमजानचे दिवस असल्याने उद्या पहाटेच्या खाण्याची बेगमी करायला चाललेले. 

सात-रस्त्याला काही खास दुकानं आहेत तिकडे रमजानसाठी सुका मेवा, फळं वगैरे चांगली आणि स्वस्त मिळतात. 

सात रस्त्यावरून चिंचपोकळी ब्रिजचं भाडं मिळालं. 

आज पुन्हा हटकून जी. के. ऐनपुरेंचा "चिंचपोकळी" कथासंग्रह आठवला. 

मिल्स लयाला जायच्या शेवटाची सुरुवात आणि त्याच्या थोडा आधीचा त्या ऐन भरात असतानाच काळ... 

करीरोड, चिंचपोकळी, बी डी डी चाळ आणि आसपासचा एरिया...  

हे सगळं त्यांच्या कांदाचिर, अधुरा (हे वाचलं नाहीये मी अजून), रिबोट, चिंचपोकळी आणि धापकीर्तन (आगामी) ह्या पंचकात वरतून, खालतून, साईडनी, पिळवटून, कुस्करून, सोलवटून, चहात टाकलेल्या भुश्यासारखं फुगून, रटमटून, गुदमरून, गांड फाडून, घशात आवंढे गिळून येत राहतं.       

कॅरम, पतंग, कबड्डी, क्रिकेट, लावण्या आणि वग, रामसेचे हॉरर (एखादा "गेम"चा सीन असलेले) पिच्चर, न उतरता सायकल चालवायचे विक्रम: 
सगळ्या कथा ह्यातला एखादा विषयाच्या नी पात्राच्या साधारण मुख्य फोकसवर चालू होऊन बाकी विषय आणि पात्रांत मनोहारी आणि भयकारी क्रॉसओव्हर्स मारत रहातात.   

त्यांची ती पात्र: अयम्मा, साधू, मास्तर, खोलीवाली, बटल्या कबड्डी प्लेयर रमेश जाकटकर, जंपर बापू, 
आणि एकशेवीस तास सायकलवर बसणारा(?) फगऱ्या. 

त्यांची "जंतू" ही कथा माझ्या पहिल्या चार-पाच आवडत्या दीर्घकथांत राप्पकन येऊन बसलीय. कथासंग्रह "कांदाचिर"  
(इतर काही: "परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष" व हजार वेळा शोले पाहिलेला माणूस - दोन्ही ऋषिकेश गुप्ते आणि "रवळेकरची बहीण पॉ आहे" - पंकज भोसले) 

 तर आज बराच वेळ ऐनपुरेंच्या लालबाग परळ युनिव्हर्समध्ये फिरत त्यांची आठवण काढत माटुंग्याला आलो. 

दमलो होतो खरं तर घरी जाऊन बेडवर कधी एकदा अंग टाकतो असं झालेलं पण माटुंग्याला दोन गुज्जू पोरींनी हात केला डायरेक्ट बॉम्बे सेन्ट्रल... 

तिकडून कुठले कुठले नवीन ब्रिज पार करत वांद्र्याच्या दिशेनी निघालो आणि गोष्टी थोड्या सरिअल व्हायला लागल्या. 

परळ एरियातले आधी कधीच न बघितलेले ब्रिज दिसल्यासारखे वाटू लागले. 

किंवा खरं तर आधी बघितलेले स्वप्नात? कदाचित? नॉट शुअर. 

त्यातच एका कुटुंबाला एका मुतारीजवळ घेतलं त्यांना काळाचौकीला जायचं होतं. 

मिंट कॉलनीमार्गे काळा चौकीच्या एका ब्रिजखाली त्यांना सोडलं. 

पण त्यांनी सांगितलं तसं आलो मला झाट काय रस्ता कळाला नाही. 

आणि ते निघून गेल्यावर अचानक त्या रात्रीच्या पिवळ्या प्रकाशात माझा स्थळाचा (जास्त रसभरीत करायला "स्थळ-काळा"चा असं बोलता येईल पण ते खोटं ठरेल) रेफरन्स  नाहीसा झाला.  

म्हणजे मॅप चालू होता. 

पण मॅप दाखवतोय तो घरचा रस्ता आणि मला इंट्यूशननी वाटणारा घरचा रस्ता ह्यांच्यात काही मेळच लागेना. 

मग सगळेच रस्ते अनोळखी वाटू लागले का कोण जाणे.

काळा चौकीतल्या एका ब्रिजखाली मग मी टॅक्सी थांबवून टाकली. 

वर ब्रिजला मध्येच पायी जॉईन व्हायला टेकाडावरून चढत गेलेल्या पायऱ्या होत्या. 

त्या उगीचच चढून आलो. 

आजूबाजूला सामसूम.. लांबवर फक्त दोन माणसं गप्पा मारत उभी होती. 

पण मला काहीच सुधरेना. 

म्हणजे किमान मुंबईत आपल्याला अगदी डिटेल्ड एरिया माहिती जरी नसला साधारण डोक्यात काही रेफरन्स पॉईंट्स असतात. कुठून कुठे जाता येईल ह्याचा साधारण अंदाज असतो 

ते सगळंच विरघळल्यासारखं झालं. 

चकव्यासारखं झालेलं किंवा भूल पडल्यासारखं. झपुर्झा गडे झपुर्झाच एकदम च्यामारी!!! 

पण गंमत म्हणजे मला काहीतरी अनैसर्गिक वाटत होतं खरं पण भीती मात्र वाटत नव्हती. 

जणू जगड्व्याळ मुंबई वेगळीच मिती दाखवून माझी गंमत करतेय असं काहीतरी वाटलेलं. 

पिकासोच्या क्युबिक चेहेऱ्यांसारखं काहीतरी. 



किंवा लहान बाबूला आपण वेडंवाकडं तोंड करून भेवडावतो आणि ते एकाच वेळी किंचाळत रडतं-हसतं तसं काहीतरी. 

मग ट्रान्स थोडा कमी झाल्यासारखा झाला आणि मी शिस्तीत मॅप फॉलो करत गाडी चालू केली. 

गूगल वॉज राईट माय इंट्यूशन वॉज रॉंग. मी घरापासून लांब लांब चाललो होतो आधी. 

के ई एमच्या ब्रिजजवळ आल्यावर थोडी थोडी टोटल लागू लागली आणि मग सुसाट बांद्रा. 

उद्या शेवटचा दिवस... व्रताचं उद्यापन :)

म्हणूनच कदाचित मुंबईनी "ना जाओ सैंया" म्हणत आज रात्री हलकेच थांबवलं असेल? असेलही!!! 

आजची कमाई: ३३४ रुपये 

टीप: पेंटिंगची लिंक पिकासोच्या हार्लेक्वीन सिरीज मधून साभार!   










 



 


   

Sunday, May 8, 2022

टॅक्सी दिवस २८: २७ मार्च २०२२:

आज दादर टी. टी., वडाळा बस डेपोच्या आसपासच्या परिसरात बरीच भाडी मारली. 

राजा शिवाजी (आमची जुनी किंग जॉर्ज) शाळेजवळून दादर पूर्व स्टेशनकडे जाताना अचानक ही देखणी इमारत दिसली. 

बाबासाहेब आंबेडकर इकडे राह्यचे बहुतेक. 

इकडून असंख्य वेळा जाऊनही आधी कधी लक्षातच नाही आलं... 



हिंदू कॉलनीतलं एक भाडं मिळालं आणि मग तिथल्या शांत रस्त्यांवर उगीच निरुद्देश फिरत राहीलो. 


हे फाईव्ह गार्डनच्या पाचमधलं कुठलं तरी एक गार्डन. 

गणेश मतकरीच्या बऱ्याच कथा इथे घडतात. 

त्याचा तो खिशात "नकल्टस" (ह्याला आम्ही कॉलनीत "फाईट" म्हणायचो) बाळगणारा राडेबाज पारशी पोरगा इथे कुठेतरी दिसेल असं मला उगीचच वाटत राह्यलं. 

पण आता मात्र कुठल्यातरी (बहुतेक) कामगार मंडळाची निवांत मिटींग चालू होती तिकडे. 

मुंबईत बऱ्याच गार्डन्समध्ये दुपारी तुम्हाला बरेचदा असे ग्रुप एकत्र येऊन मिटींग घेताना दिसतात. 

  1. लबाड विकासकांनी वर्षानुवर्षं थकवलेली त्यांची रिडेव्हलपमेंटची घरं, 
  2. एखादी बंद पडलेली कंपनी आणि मालकाने त्यांचे बुडवलेले कष्टाचे पैसे, 
  3. एकत्र चालणारी महिन्याच्या पहिल्या रविवारची भिशी,
  4. किंवा गावातल्या सुंदर हेमाडपंथी मंदिराला पॉप कलर्स मारून विरूप करायचे प्लान 

विषय बहुतेक ह्यातलाच  एक असतो. 

पण तो पहिल्या दोनपैकी नसून दुसऱ्या दोनपैकी असावा अशी इच्छा करत घेतलेले काही फोटो:





वडाळा बस डेपोजवळून एक मस्त मालवणी कुटुंब उचललं. 

कोरलेल्या मिश्या आणि केसांना काळा कुळकुळीत कलप केलेले, कुरकुरीत पांढरीफेक टाईट पॅण्ट मारलेले,  शिडशिडीत पण हलकंसं पोट असलेले बाबा.

सुस्वरूप, डोक्यात घसघशीत गजरा घातलेली, थोडी स्थूल, एकाचवेळी खाष्ट आणि प्रेमळ वाटणारी आई. 

आणि त्यांच्या दोन सुस्वरूप टीन-एज सुरु व्हायच्या बेतातल्या  मुली.    

म्हणजे त्या एक नंबर डान्सर असणार आणि कॉलनी / वाडीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत "चिक्क मोत्याची माळ" वर हमखास प्राईज उचलत असणार ह्याची मला खात्रीच!

बहुतेक कुठे ठाणा भांडुप साईडला ते लग्नाला निघाले होते. वडाळा स्टेशनवरून हार्बरनी कुर्ल्याला जाऊन ट्रेन बदलणार होते बहुतेक.  

"पपा मला टेशनला गेल्यावर खायला पायजेल", दोघींतली एक कुर्र्यात बोलली. 

(आमच्या सगळ्या मालवणी पोरांना लहानपणापासूनच बाबांना "पपा"च म्हणायला शिकवलं जातं.) 

"आरे घॅवया ना", बाबानी गुटका आणि सेंटचा मिश्र वास सोडत प्रॉमिस दिलं. (आवाजाचा पोत: डिट्टो उपेंद्र लिमये) 

"काय नको, तुमी दोघीपण ज्यास्ती श्यान्या झाल्याय, तुमाला शिक्षा!", आईनं व्हेटो बजावला. 

"उम्म्म", मुलगी लाडीक चंबू करत रुसली वगैरे. 

"लग्नाला बँकर (त्यांना बहुतेक बँक्वेट म्हणायचं होतं) मध्ये जेवायचाच हाय", आईनं बिनतोड मुद्दा काढला. 

त्यांचं बँटर, कॅमराड्री, फॅमिलीतला पावर प्ले वगैरे अजून ऐकायला मला अर्थातच आवडलं असतं पण तितक्यात वडाळा स्टेशनच आल्याने माझा नाईलाज झाला. 

मला ती फॅमिली साक्षात जयंत पवारांच्या "वरणभात लोंचा"  किंवा जी. के. ऐनापुरेंच्या "कांदाचिर" नाहीतर "रिबोट" नाहीतर "चिंचपोकळी" कथासंग्रहामधून उठून आल्यासारखी वाटली. 

बाय द वे: जी. के. ऐनापुरे हा भारी लेखक एवढा अंडररेटेड का आहे?

आजची कमाई: ३१४ रुपये


 






Friday, April 8, 2022

टॅक्सी दिवस २५ ते २७: २३ जानेवारी ते २० मार्च २०२२:

टॅक्सी दिवस २५: २३ जानेवारी ते २०२२:

एका छान शुभ्र पांढऱ्या केसांच्या देखण्या म्हातारीला केम्प्स कॉर्नरच्या पारसी पंचायतीत सोडलं. 

फार छान एरिया आहे खरं तर पण फोटो काढायला मनाई असल्याने आणि वॉचमन रोखून बघत असल्याने फोटो काढू शकलो नाही. बाकी आज नोंद करण्यासारखं काही नाही. 

आजची कमाई: ११५ रुपये. 

-----------------

टॅक्सी दिवस रात्र  २६: १९ फेब्रुवारी २०२२:

आजही रात्रीच टॅक्सी घेतली. 

पेडर रोड वरून दोन टिप्पिकल साऊथ बॉम्बेच्या पोरांना उचललं. 

त्यांना विलिंग्डन जिमखान्याला सोडायचं होतं. 

हाच तो जिमखाना जिकडच्या एका देवीप्रसाद केजरीवालच्या नावे "एग्ज केजरीवाल" ही डिश ओळखली जाते. 

मला स्वतःला इतकं ओलसर अंडं शक्यतो मनापासून नाही आवडत पण ज्याचा त्याचा चॉईस वगैरे... 

पोरं त्यांच्या खास "सोबो" लिंगोत इंग्लिश बोलत होती. 

"अरे डोन्ट हॅव चेंज तो पे धिस पुअर डूड (म्हणजे मी) या SSS"

दुसरा बोल्ला, "अरे डोण वरी या SSS माय डॅड गेव्ह मी फुल्ल ऑन 'हंडो'का थप्पी टुडे!"

आणि ते सुळ्ळकन शंभरची नोट मला टेकवून चेंज न घेता भारी परफ्यूमचा दरवळ सोडत ते जिमखान्यात शिरले. 

मी काही क्षण त्या एंटायटल्ड पण एकंदरीत सालस मुलाच्या "हंडोच्या थप्पी"ला फॅन्टसाईझ केलं. 

हे असं माझं रोल्स अलट-पलट होणं भारी मजेशीर आहे. 

मीही शनिवारी रात्री चर्नीरोडच्या कॅथलिक जिमखान्याला असाच भसाभस परफ्युम मारून जायचो. 

तिकडच्या देखण्या कॅथलिक "साठो"त्तरी मैत्रीणींबरोबर नाचायला. 

आता थोडा टॅक्सीत बिझी आहे ते संपलं की पुन्हा जाईनच. 

तसंही तीस दिवस जवळ जवळ होत आलेत. 

शनिवार रात्रीची व्हाईब काही और असते हेच खरं. 

आजची कमाई: १८९ रुपये. 

-----------------

टॅक्सी दिवस २७: २० मार्च २०२२:

कालही रात्रीच टॅक्सी उचलली असल्यामुळे आजही आरामात गाडी काढली. 

आणि वांद्रे माहीम माटुंगा सिटीलाईट असा रमत गमत जात होतो. 

सिटीलाईटला दोन कारवारी बहिणींना उचललं. 

केवड्यासारखा छान पिवळसर गोरा रंग होता त्यांचा. 

त्यांना हिंदमाताला जायचं होतं. 

बहुतेक चांगले स्पोर्ट्स शूज थोडे स्वस्तात घ्यायचे होते त्यांना. 

आजकाल सगळीकडेच फॅक्टरी आउटलेट्स आलीयेत जिकडे ब्रॅण्डेड वस्तू घसघशीत डिस्काउंटमध्ये मिळतात. 

पण ह्या फंड्याची सुरुवात साधारण १५ - २० वर्षांपूर्वी मुंबईतल्या हिंदमातापासूनच झाली. 

तिकडून फिरत फिरत माझगाव ब्रिजजवळ पोचलो तिकडे एका मुस्लिम कुटुंबाची टॅक्सी बंद पडली होती. 

मग टॅक्सीवाल्यांच्या ब्रदरहूडला जागून त्या ड्रायव्हरला बॅकअप दिला आणि त्या कुटुंबाला माझ्या टॅक्सीत घेतलं. 

त्यांना नाखुदा मोहल्ला (इंटरेस्टिंग नाव) ला सोडलं. 

आणि तसाच मोहम्मदअली रोडवरून पुढे निघालो. 

मनीष मार्केट व्ही. टी. करत हुक्की आली म्हणून पी. डिमेलो रोड क्रॉस करून सरळ आत घुसलो. 

जोरात लघवीला आलेली. 

चाळीसनंतर बऱ्याच पुरषांना हा प्रॉब्लेम चालू होतोच. 

माझे बाबा आम्ही कुठेही शॉपिंगला / फिरायला वगैरे गेलो की मध्येच पाच मिनिटांत येतो सांगून गायब व्हायचे ते ह्याचसाठी. 

आई वैतागलेली, मी आणि बहीण बावचळलेले. 

तेव्हा एवढ्या संख्येने 'सुलभ'पण नव्हती आत्तासारखी.

पण अट्टल बेवड्याला जसे सगळीकडचे अड्डे माहीत असतात तसेच बाबांना सगळ्या मुंबईतल्या मुताऱ्या पाठ होत्या. 

बाबांची उगीचच आठवण आली तीही अशा वियर्ड विषयावरून . 

हवाही चिकचिक मळभवाली हुरहूर लागेलशी. 

समोरच एक 'सुलभ' होतं सो आधी हलका झालो आणि मग आजूबाजूला बघितलं. 

इकडे तिकडे सोन्याचे कण खरवडत बसणाऱ्या खाण मजुराला अचानक मदर-लोड मिळावी तसं काहीतरी झालं. 

समोर निवांत प्रशस्त सुंदर रस्ता, त्याच्या उजव्या कडेला सुंदर दगडी इमारती.

डावीकडे बॉम्बे पोर्ट ट्रस्टची मोठ्ठाली भिंत,   

दोन्ही बाजूंना झुलणारी अगणित पुरातन अज्रस्त्र झाडं आणि रविवारच्या निवांत रस्त्यांवर पोरांचं रंगलेलं क्रिकेट. 

बॅलार्ड इस्टेटला आधी फारसा कधी आलो नव्हतो बहुतेक पण आज मी वेडाच झालो. 




हे राजबिंडं दिसणारं कॅरेक्टरदार "ग्रँड हॉटेल" 




आणि हा थेट "पॅन्स लॅबरिन्थ्" मधून आल्यासारखा वाटणारा  वृक्ष-पितामह  



काळ्या पिवळ्या नवसाचे काहीच दिवस राहिलेयत आता. 
शेवटच्या त्या मोजक्या सेशन्समध्ये ब्रेक घ्यायला बॅलार्ड इस्टेट फिक्स! 
आजची कमाई: २३० रुपये.  

     

  

  


Saturday, March 5, 2022

टॅक्सी दिवस २४: १९ डिसेंबर २०२१

झालं असं की मी जी चालवतो त्या टॅक्सीचा प्रायमरी ड्रायव्हर राजकुमार नॉर्थला आपल्या गावी गेलेला. 

टॅक्सी उभी ठेवणं परवडत नाही त्यामुळे मालक दिनेश-भाईंनी दुसऱ्या एका बदली ड्रायव्हरला महिनाभर टॅक्सी चालवायला दिली होती. त्याला आपण 'राकेश' म्हणूया. 

तर राकेशनी मागच्या आठवड्यात दारूच्या नशेत टॅक्सी ब्यक्कार ठोकली. 

नशीबाने (टॅक्सीची) बॉडी चेपण्यावरच निभावलं. 

पण गाडीचं मजबूत काम निघालं. 

आता पुरुषाला गाडीचं काम निघालं की नुस्ती उलघाल उलघाल होते.इट'स अ बॉय थिंग! 

सो दिनेशभाई प्रचंड स्ट्रेसमध्येच होते. त्यांना किमान मॉरल तरी सपोर्ट द्यायला मी टॅक्सीच्या हॉस्पीटलमध्ये पोचलो. 

 दिनेशभाईंनी महालक्ष्मीच्या "घास गल्ली"त बोलवलं. 

ही आख्खी लेन टॅक्स्यांचं स्वस्त काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे हे मला आजच कळलं. 

थोडा लवकरच पोचलो. 

दिनेशभाई यायचे होते. 

सो आख्ख्या गल्लीत एक राउंड मारला. 

रविवार सकाळ धंद्याच्या दृष्टीने निवांत असल्याने बरेच टॅक्सीवाले इथे गाडीच्या छोट्या मोठ्या तक्रारी सॉल्व्ह करायला आलेले. 

मी हे काही फोटो काढले. 





आणि लाडात इकडे तिकडे फिरत राह्यलो. 

हे सगळं थोडं संशयास्पदच झालं असणार.   

आणि म्हणूनच एक धिप्पाड सरदारजी आला आणि मला विचारायला लागला की, "भाई (येस भाईच "पाई" नव्हे मुंबईच्या सरदारजीचा ऍक्सेंट थोडासाच पंजाबी असतो. अमृतसरच्या सरदारजीसारखा फुल्लऑन नव्हे.) कौन हो तुम? यहां क्या कर राहे हो??"

सु. शीं. च्या भाषेत "माहौलमध्ये गढूळ सुम्म ताण" वगैरे. 

मग त्याला सांगितलं की मीही आधा-अधुरा का होईना टॅक्सीवालाच आहे वगैरे. बॅजही दाखवला. 

मग तो थोडा  निवळला. 

त्याला वाटलेलं की मी आडव्या तिडव्या लावलेल्या गाड्यांचे फोटो काढून आर. टी. ओ. ला पाठवतोय की काय?

म्हणून तो मला घाबरलेला आणि मी त्याला...  हीहीही. 

म्हणजे नॅशनल पार्कात अवचित समोर आलेला बिबट्या आणि माणूस दोघंही एकेमकांना घाबरतात तसं काहीसं :)

आता त्यादिवशी मी लेपर्ड प्रिंटची अंडरवेअर (आतमध्ये (आता खरं तर ती अंडरवेअर असल्याने "आतमध्ये" हे रिडंडंट आहे पण सुपरमनने सगळा गोंधळ घातलाय. आतला कंस पूर्ण) बाहेरचा कंस पूर्ण) घातली असल्याकारणाने बिबट्याचा रोल इथे मी घेऊ इच्छितो म्हणजे कोणाची हरकत नसेल तर.  

माझा प्रोजेक्ट समजावून सांगितल्यावर सरदारजी एकदमच फ्री झाला. 

चहा वगैरे मागवत त्यानं त्याच्या खालसा कॉलेजच्या आठवणी वगैरे सांगितल्या.

अशा रीतीने आमचा मॅन-ऍनिमल आपलं मॅन-मॅन कॉन्फ्लिक्ट सुरळीतपणे सुटला. 

पण मला फेसबुकवरील अवलिया फोटोग्राफर मित्र अमित कुंभार ह्याचं कोट आठवलं: 



>>>>>>>
भारतात स्ट्रीट फोटोग्राफी करण्यासाठी तुमच्याकडे खालील गुण असलेच पाहिजेत :
1. प्रचंड कोडगेपणा रोमारोमात
बाणवने / णे
2. जो आडवा येईल त्याला फाट्यावर मारणे
3. बाचा बा~ची झालीच तरं नम्रतेत स्थितप्रज्ञ् होणे
4. नडायला आलेल्याचं खडे कडे ब्रेन म्यॅपिंग करणे.
5.साळसूद पणे फोटो काढुंन मी नाय त्या गावचा असा भास निर्माण करणे
...
...
वगैरे वगैरे

>>>>>>>

तेवढ्यात दिनेशभाई  आलेच आणि तो सरदारजी त्यांचा मित्रही निघाला.  

मग दुपार जवळपास संपेपर्यंत आम्ही गाडीचं कामच करत राह्यलो. 

माझ्या पोनी बांधलेल्या रुपेरी केसांना आणि सुखवस्तू कपड्यांना आसपासचे लोक आधी थोड्या संशयाने बघत राह्यले पण मग नंतर सरावले. 

समोरच्या पत्र्यांच्या घरांतून मिश्रीचे, कालवणाचे वास येत राह्यले. 

आणि घासगल्लीच्या वामकुक्षीची वेळ होईपर्यंत मीही तिकडचाच होऊन गेलो. 

अशी अडनिड गल्ल्यांतून मुंबई भेटत रहाते आणि आमची इंटिमसी वाढत जाते. 

प्रिय व्यक्तीच्या रँडम ऍब्सर्ड गोष्टीही प्रिय होत जाव्यात. रुपेरी केस, भरडा आवाज, वेडावाकडा दात किंवा तर्जनी जाईल एवढं भोक पडलेली पॅंटी सुद्धा. 

माझं आणि मुंबईचं ही तसंच चाल्लंय... 

घासगल्लीतल्या एका अफलातून घराचा हा आणखी एक फोटो. 



दुपारनंतर दिनेशभाईंची दुसरी टॅक्सी घेऊन थोडीफार भाडी मारली. 

पण ही गाडी माझ्या सवयीची नव्हती.  

तिचा ब्रेक मध्येच मिस व्हायचा. 

म्हणजे ब्रेक पॅडल दाबलं की मध्येच पुचकट लूज पडायचं मग थोडं पम्प करून पुन्हा मारलं की ब्रेक बसायचा. जरा डेंजरच प्रकार. 

आदल्या दिवशी प्रपोज मारल्यावर निकरानी नाही म्हणलेल्या कॉलनीतल्या पोरी दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडा नेट केल्यावर अवचित हो म्हणायच्या... एका दिवसात कुठलाही पॅरामीटर अजिबात बदललेला नसताना. 

तसंच काहीसं हेही.  

हे कॉलनी/ प्रपोज/ पोरींवरून पंकज भोसलेचं "विश्वामित्र सिंड्रोम" आठवलं. 

जरूर वाचा. टॉप पुस्तक आहे. 

https://www.loksatta.com/lokrang/book-review-vishwamitra-syndrome-by-pankaj-bhosale-zws-70-2820680/


आजची कमाई:   

२२० रुपये. 




    




 

 

  

 





Sunday, January 30, 2022

टॅक्सी दिवस २३: २८ नोव्हेंबर २०२१

आज प्रभादेवीवरून एका साध्याश्या बाईंना घेतलं त्यांना सिटीलाईटला सोडायचं होतं.

बहुतेक गोपी-टॅंक मंडईत मासे घ्यायला. 

ताजे फडफडीत मासे खाणाऱ्यांसाठी हे मार्केट म्हणजे मक्का मदिना काशी व्हॅटिकन सगळंच आहे. 

शिरीष कणेकरांनी त्यांच्या बऱ्याच लेखांत गोपी-टॅंक फेमस करून ठेवलंय. बाय द वे कणेकरांनी मला एकदा त्यांच्या खास भाषेत रॉयल स्नब दिलेला पण मीच तेव्हा तरुण आणि थोडा दीडशहाणा होता सो ते ओके वगैरेच. तो किस्सा पुन्हा केव्हातरी... 

तर प्रभादेवीवरून निघून कॅडल रोडवरून सुसाट आलो हे ठीकच. 

पण शिवाजी पार्कला समर्थ व्यायाम मंदिराजवळ राईट मारून लेडी जमशेदजी रोडला लागायला हवं होतं. 

च्यायला नादात तो राईट विसरलो आणि पुढच्या बऱ्याचश्या छोट्या छोट्या गल्ल्यांत राईटला नो एंट्री आहे. 

मग कसाबसा बऱ्याच पुढे यु टर्न मारून राजा बढे चौकातून सिटीलाईटला आलो. 

नेहमीप्रमाणे पापक्षालनार्थ भाड्यापेक्षा पैसे कमी घ्यायची ऑफर बाईंना दिली पण बाई म्हणाल्या, "जाऊद्या हो काय वीस रुपयांनी मी पण नाय पैशेवाली होणार नी तुमीपण नाय होणार."

देव बरें करो. 

सिटीलाईटच्या सिग्नलवर हा गजरा घेतला. 

मला गाडीला गजरा बांधायला फार म्हणजे फारच आवडतो. 

लगेच त्या गाडीला आपल्या खास जवळच्या बाईचं कॅरॅक्टर येतं. 

गाडी आणि आपलं कनेक्शन अजून घट्टंमुट्टं होतं असं मला वाटत राहतं. 



आणि मग मोगऱ्याच्या वासानी अजून भळाभळा आठवणी व्हायलाच लागल्या. 

नात्यातल्या लग्नांतल्या आई / मावश्या / काक्या / आत्या / आणि माम्यांच्या चंदेरी जरवाल्या घसघशीत वेण्या आठवल्या. 

रात्री लग्न संपता संपता थकलेल्या बायका त्यांचे विस्कटलेले हेअर बन्स, सरकलेल्या वेण्या, मध्येच आलेली केसांची बट... 

थोड्या वेडू , किंचित व्हल्नरेबल आणि प्रचंड गोड दिसायच्या त्या सगळ्या. 

आमच्या आईच्या दाट कुरळ्या आणि अनमॅनेजेबल केसांचं तर साक्षात घरटंच व्हायचं. 

आणि तिला तशी बघून मला प्रचंड माया दाटून यायची. 

मेसी-बन वाल्या बायका हा माझा वीकपॉइंट तेव्हापासूनच असावा कदाचित. 

(इडिपस वगैरे... )

सायली, मोगरा, जाई-जुई, लाल-कवठी-सोनचाफा, गुलछडी, बकुळी, अबोली काय काय घालायची माझी आई डोक्यात.

तिच्या डोक्यांतली माझी सगळ्यांत आवडती तीन फुलं खालील चढत्या क्रमाने:

दवणा: 

दिसायला नाजूक बारीक फुलं पण काय ह्यांचा वास असतो. 

सटल-बिटल घंटा. इन युअर फकिंग फेस घमघमाट. 


सुरंगी:
हिचा गजरा अंमळ दुर्मिळच. 

बाबा पगार झाला की किंवा खास स्पेशल दिवशी आईला आणायचे हा गजरा. 

ह्याचा वास म्हणजे स्ट्रेट सुखानी गुदमरून जायचं काम.

तेव्हा काही समजायचं नाही पण प्रचंड कामुक सुगंध असतो सुरंगीचा. 

ह्याचा गजरा दिसतोही एखाद्या तांबूस मऊशार सुरवंटासारखा. 

काय वेगळाच प्रकार आहे हा. 

(सुरंगीचे छायाचित्र मिसळपाव.कॉम वरील "जागु" प्राजक्ता म्हात्रे यांच्या ब्लॉगवरून साभार)



करवंदं:  

येस आपली करवंदं!   

ही काळी करंद व्हायच्या आधी टीन-एजर असताना ह्यांना असा सुंदर कुसुम्बी रंग येतो की लिहितानाही मी त्या रंगाच्या आठवणीने थरथरतोय. 

काही इतकं सुंदर, टवटवीत आणि प्रसन्न फार कमी वेळा बघितलंय मी.

आई व्ही टी वरून डोंबिवलीला संध्याकाळी ऑफीसवरून यायची आणि तिला आणायला मी आणि बाबा स्टेशनवर जायचो. 

(हो तेव्हा ८०-८२ साली डोंबिवली स्टेशनावर हे शक्य होतं.)

तिचा घामेजलेला पण आम्हाला बघून फुललेला चेहेरा, केसांचं अर्थातच झालेलं टोपलं, पर्सच्या चामड्याचा येणारा एक वेगळाच वास, 

(हा असा वास लोकल ट्रेननी प्रवास करणाऱ्या बायकांच्या पर्सला हटकून येतो.)   

आणि गाडीतच घेऊन डोक्यात घातलेली ती सुंदर फुलं... टेक्निकली खरं तर फळं!

मी बक्कन तिच्या केसांतूनच एक दोन करवंद तोडायचो आणि ती तुरट आंबट रसरशीत देखणी फळं तशीच खायचो. 

सिंपलर टाईम्स!

भारी सुंदर दिसतात करवंदं मुलींच्या डोक्यात. 

आजकाल कोणीच घालत नाही... का कोण जाणे.  



---------


आज फुलांच्या आणि कच्च्या करवंदांच्या आठवणीतच थोडीफार भाडी मारली. 
(फुलांची छायाचित्रे जालावरून साभार)

आजची कमाई: 

५५० रुपये