Sunday, July 26, 2020

टॅक्सी दिवस ४: २९ डिसेंबर २०१९

सकाळी दिनेशभाईंनी लवकरच बोलावलं होतं.
शार्प ९ ला पोचलो.
ह्या वेळीस सुशीलभाईची टॅक्सी होती.
सिमला हाऊसला.
हा मलबार हिलच्या अल्ट्रा पॉश लोकवस्तीतला एक थोडा गरीब घेट्टो.
सुशीलभाई गोरा घारा गुटगुटीत बाळासारखा प्रेमळ माणूस.
त्यानी आपल्या टॅक्सीच्या खोडी आणि टिपा निगुतीनं समजावून सांगितल्या.

सकाळी साधारण अशी  भाडी मारली.

मलबार हिल ते ग्रॅण्टरोड स्टेशन: 
इकडे कंबाला हिलच्या फ्लायओव्हरखाली सिग्नलवर थोडा कन्फ्युज होऊन गाडी पुढे लावली.
गवालिया टॅंकवरून येऊन पेडर रोडला राईट मारणारी लोकं माझ्यामुळे थोडी ब्लॉक झाली.
हेन्स दोनतीन धनिक बाळांच्या शिव्या खाल्ल्या. सॉरी रिच किड्स!

ग्रॅण्ट रोड स्टेशन ते बाणगंगा:
हा चौपाटीवरून वळणारा माझा खास आवडता रोड.
बाणगंगेला लागूनच राजभवनची एंट्री आहे हे आजच कळालं च्यायला.
राजभवनच्या एंट्रीचा हा फोटो:

महिन्याभरापूर्वी इकडे सिंहासन २.० चा खराखुरा फार्स चालू होता.
'सक्काळ सक्काळ' कोण कोण लोक्स आले असणार तेव्हा इथं ;)


राजभवनाच्या बाजूलाच तिकडच्या कर्मचाऱ्यांची छोटीशी कॉलनी आहे तिकडून सी. एस. टी. चं भाडं मिळालं:
छान पुण्याची मुस्लिम फॅमिली होती.
"भोत सालों बाद सभी लोगां मिले.  
अच्छा लगा. 
अंजुम तू बेटा कब्बी कर्रा शादी? 
अगले सालां  वापस आयेंगे फिर!"

असं  काय  काय  छान  बोलत होते  ते. 

फातिमानगर - वानवडीचे  असणार ते  असं  जाम  वाटलं मला. 
माझा पुण्यातला आवडता एरिया... फुल्ल कॉस्मो. 
आत्ता  बाणेरला शिफ्टलो तरी  एक  टाइम खूप  धमाल केलेली  वानवडीला!    
असो...
त्यांना सी. एस. टी. च्या लॉन्ग रूटच्या गेटवर ड्रॉप केलं.
फिरत फिरत तिकडून बॅलार्ड इस्टेटच्या भिंतीला लागून येताना एक मराठी सी-मन भेटला.
त्याला फॅमिलीसकट चर्चगेटला ड्रॉप केला.

लगेच स्टेशनवर एक काकू भेटल्या त्यांना जवळच आकाशवाणी आमदार-निवासला जायचं होतं.
समोरचे दोन टॅक्सीवाले फ्लॅट नाय बोलले पण मी त्यांना हाका मार मारून आपल्या टॅक्सीत बसवलं.
(पहा नियम २-ब)

ओव्हल मैदानालगतच्या रस्त्याच्या उजव्या बाजूची ही गल्ली मी थोडी हुकवली आणि मग अन-डू  करायला पुढून सुसाट यु टर्न मारला.
काकू थोड्या किंचाळल्या पण टर्न सेक्सी बसला!
सॉरी काकू :)

इकडेच जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आहे.
खूप शांत सुंदर लीफी गल्ली आहे ही.
एका तोंडावर रस्त्यापलीकडे ओव्हल मैदानातला पोरांचा क्षीण कल्लोळ
जे. बी. च्या गेट पुढची शांत गार सावलीतली झाडं...
इकडे टॅक्सी लावून थोडा ब्रेक घेतला...
तितक्यात आमदार निवासातलं कार्यकर्त्यांचं भाडं मिळालं.
धनंजय मुडेंच्या गाववाले होते.
माझं मराठी ऐकून थोडे सरप्राईझ झाल्यासारखे वाटले.
माझं गाव नि आडनाव विचारलंन
माझ्या जातीचा आणि अर्गो पॉलिटिकल ओरिएंटेशनचा अंदाज घेत असावेत असा मला संशय आला थोडा.
चालायचंच ...
जात गेस करणं हा आपल्या भारतीय लोकांचा आवडता टाईमपास आहे.
त्यांना कुलाब्याला ऑलिम्पिया हॉटेलला सोडलं.

थोडं पुढे लगेच एक आई बाबा आणि टीन एजर पोराला उचलला.
त्यांना जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला जायचं होतं.
हे च्यायला चर्चगेट ते व्ही. टी. आणि व्हाईस-अ-व्हर्सा जाताना अजून गोंधळायला होतं.
फकिंग एम्बॅरसिंग!
त्या मुलालाच फोन दिला आणि मॅप दाखवायची विनंती केली.
(च्यायची मॅप होल्डर पण तुटलेला)
बहुतेक त्याला जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्टला ऍडमिशन मिळाली असावी आणि आज जस्ट कॉलेज बघायला आले असावेत बहुधा.
त्याचे डोळे जे. जे. चा गेट बघितल्यावर नुसते चमचमायला लागले होते.
माझी बहीण सोनाचं हे कॉलेज...
आज बिग शॉट आर्किटेक्ट आहे ती.

मग जे जे वरून रमत गंमत भेंडी बाजार वरून निघालो.
सरळच जाणार होतो पण अचानक काय झटका आला आणि एका सिग्नलला लेफ्ट मारला.
तो मौलाना शौकत अली रोड निघाला.
तिकडे एक भाडं उचललं बॉम्बे सेंट्रलचं.
कामाठी-पुरा शुक्ला जी स्ट्रीट वरून जाताना डेढ गल्ली दिसली.
इकडे सकाळी चार वाजता जुन्या (बहुतेक चोरीच्या) शूजचा बाजार भरतो.

आम्हीही वांद्र्यावरून सुमडीत यायचो पहाटे पहाटे उठून स्वस्त सेकंडहँड शूज घ्यायला.
बऱ्याचदा त्या शूजना विचित्र ओलसर वास यायचा. पण ब्रॅन्डचं आकर्षण होतंच
तिकडून साठ रुपयांत उचलेले एक वुडलॅंड्स शूज घालून मी कॉलेजमध्ये बरेच दिवस चमकलो होतो.
आमचं ३-४ जणांचं सिक्रेट होतं खरंतर ते.
पण ग्रुपमधल्या अमल्यानी शो ऑफसाठी कोणालातरी सांगितलं आणि बबाल झाला!
मग कॉलनीतल्या अवली पोरांचे घरी लँडलाईन वर फोन यायचे,
"निलेश भाय है क्या? उनसे शूज का डील  करेन का है."
बाबा शिव्या देत फोन आपटायचे...
गम्मतच सगळी!



 (हे छायाचित्र मिड-डे साईट वरून साभार
https://www.mid-day.com/articles/mumbais-big-secret-a-night-market-for-stolen-shoes-at-dedh-gully/16850198)

कामाठी-पुऱ्यातून बॉम्बे सेंट्रलला भाडं ड्रॉप केलं.
आणि बेलासिस रोड वरून ताडदेवच्या दिशेला निघालो.
हा बॉम्बे सेंट्रलचा गजबजलेला मेन रोड.
दोन्ही बाजूंना असंख्य दुकानं रस्त्यावरचे फेरीवाले.

डावीकडे सिटी-सेंटर होलसेल मार्केटची गर्दी...

हळूहळू टॅक्सी चालवताना एका साध्याशाच मुलीचं परफेक्ट टूश दिसलं पाठून.
अप्रतिम गोलाई होती...
टॅक्सी दोनच सेकंद स्लो झाली...
पण बस्स तेवढंच..
भक्तीभावाने त्या दैवी देणगीला मनात हात जोडले आणि पुढे निघालो...
सॉरी बायको!

दीड वाजलेला जवळजवळ सो सी लिंकवरून वांद्र्याला जावं म्हणून ताडदेव-हाजीअली करत
तिकडे एका काकांना वरळी पोलीस चौकीला सोडून वरळी सीफेसला आलो.
जाता जाता सी-लिंकच्या बॅकड्रॉपवरचं हे निवांत कपल.
त्यांच्या स्ट्रोलर बॅगवरून मुंबई बाहेरचं असावं असं वाटतंय.

ते एकमेकांशी काही न बोलता मुंबईचा समुद्र आपापल्या परीनं पितायत...
पिऊ देत...
सायलेंस इज दी बेस्ट कॉन्व्हर्सेशन वगैरे :)











Saturday, July 18, 2020

टॅक्सी दिवस ३: २२ डिसेंबर २०१९

आज टॅक्सी घेतली आणि जवळच हँगिंग गार्डनला थांबलो.
लहान बाबू असताना गेलेलो म्हातारीच्या बूटाजवळ ते कैक वर्षांनी आज गेलो.

एका साध्याश्या म्हातारबाबांना फोटो काढायला सांगितला त्यामुळे त्यांची फिगर... आपलं सॉरी फिंगर किंचित दिसतेय.
काइंडली ऍडजस्ट!

मग हँगिंग गार्डन वरून आमच्या संजूदादा सारख्या एका टकलू माणसाला क्रॉफर्ड मार्केटला सोडला.
संजूदादा ब्रूस विलीस सारखा दिसतो पण हा मात्र ब्रूस विलीस सारखा दिसत नव्हता.
पण संजूदादासारखं मात्र दिसत होता :)


तिकडे क्रॉफर्ड मार्केटला एक खु SSS पच आदबशीर टिपिकल खोजा (की बोहरी? की फर्क पैंदा!) व्यापारी भेटला.
"मझगांव जायेंगे?" हेच त्यानं इतकं पोलाइटली विचारलं की त्या आवाजात मी तर त्याला मझगांवला पाठुंगळी नेलं असतं.
बाय द वे माझगावचा उच्चार खरे कॉस्मो मुंबईकर "मझगांव " असाच करतात...
सो प्युरिटन्स कॅन फक ऑफ!

मझगांवच्याच एका गल्लीतून लग्नाला जायला छान नटलेल्या एका हँडसम आईला आणि तिच्या दोन सुंदर मुलींना उचललं आणि परेलच्या चिवडा गल्लीत सोडलं.
आई हँडसम असली तरी वरच्या दोन रुपयांसाठी बरीच कटकट केली.
पण चालसे... तिनी का सोडावेत?  फेअरच आहे तसं ते.

(अवांतर सिडक्शन टीप: तुमच्या आवडत्या मुलीला तिची आई खूप सुंदर दिसते असं जरूर सांगा. मुलींना आवडतं ते)

मग परेलवरून एका तरुणाला फिनिक्स मॉलला सोडलं.
बाहेरचा असावा, किती पैसे घेणार विचारत होता.
मीटरनीच जाईन सांगितल्यावर त्याचा सुखावलेला चेहरा बघून लोकांपर्यंत किंचित का होईना सेवा पोचतेय असं वाटून मीही सुखावलो.
भेंडी असं मकरंद साठेसारखं लांबलचक वाक्य ल्ह्यायची बरीच वर्षं तमन्ना होती... हे हे हे :)

ओ फक: जयंत पवारांची "फिनिक्सच्या राखेतून उठला मोर"  फिनिक्स मॉलवरचाच शब्दखेळ आहे हे आत्ता मला स्ट्राईक झालं!
भारी कथा आहेय ती.
"टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन"सुद्धा.
दॅट रिमाइंड्स मी: त्यांचं "वरनभात लोंचा नी कोन नाय कोंचा" वाचायचंय.

मग एल्फिन्स्टनवरून एका तेलगू कुटुंबाला माटुंगा लेबर कॅम्पला सोडलं.
त्यातल्या म्हाताऱ्या बोळक्या आजी पुढे बसल्या पण एकदा दोनदा अर्जंट ब्रेक मारल्यावर काचेवर आपटता आपटता वाचल्या.
मग  मीच जरा काळजीपूर्वक गाडी चालवली.

माटुंगा लेबर कॅम्प माझ्या एका "मैत्रीणीच्या" "मित्राचा" एरिया.
तिच्या पाठी मी सहा-सात वर्षं हात धुवून लागलेलो.
म्हणजे "हां बोले तो शादी करू"च्याच तयारीत.
पण तिनी शेवटपर्यंत मला फ्रेंडझोनमध्येच ठेवलान.
आणि माटुंग्याच्या "मित्रा"शी फायनली लग्न केलं.
आता सगळे आपापल्या परीनी सुखी आहेत पण ह्या एरियात आल्यावर मला तो सगळा मॅडनेस आठवल्यासारखा झाला.

मग माटुंग्यावरूनच दोन-तीन बायकांना कुठल्यातरी मशिदीत जायचं होतं...
आधी किंग्ज सर्कल सांगितलं आणि ऐन वेळीस अँटॉप हिल अँटॉप हिल ओरडू लागल्या.
मी बावचळलो त्यात बॅटरी संपल्यामुळे मॅप ऑफ झाला!
त्यांच्या बऱ्याच शिव्या खात अँटॉप हिलच्या कुठच्यातरी कोपच्यात कसाबसा पोचलो.
आता मला टॅक्सीवाल्यांच्या गोच्या आणि अडचणी थोड्या थोड्या समजायला लागल्यायत बहुधा.

 मग तिकडून एका सालस मुलाला प्लाझाला सोडला.
आणि शिवाजीपार्क वरून एका मध्यमवयीन काका काकूंना लकी हॉटेलला सोडलं.
ते नवरा-बायको नसून बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असावेत असं मला हलकं इंट्युशन झालं...
बट नॉट जजींग ऑफकोर्स!

तिकडून तडक घरी जाऊन थोडा ब्रेक घेतला...

ब्रेकनंतरही संध्याकाळी बरीच भाडी मारली.

एका मुलाला गुरु तेग बहादूर नगर ला सोडताना बऱ्याच गप्पा मारल्या.
त्याला नं राहवून मी एक प्रोजेक्ट म्हणून टॅक्सी चालवतोय ते सांगितलं.
त्यानंही त्याच्या लाईफमधलं बरंच काय काय सांगितलं...
तो गे असावा असं मला हलकं इंट्युशन झालं...
बट नॉट जजींग ऑफकोर्स!

तिकडून दोघांना वडाळ्याच्या लोढा कॉम्प्लेक्सला सोडला.
बहुतेक इस्टेट एजंट होते ते.
नेहमी प्रमाणे रस्ता दाखवायची त्यांनाच निर्लज्ज विनंती केली.
एकानी स्वस्त स्ट्रॉंग पण मस्त परफ्यूम मारला होता.
मला आवडला.
कधी कधी स्ट्रॉंग परफ्यूमनी डोकं उठतं पण हा आवडला.

तिकडे लोढाच्या गेटवरच तीन टिनेजर्सना बी. के. सी. च्या फ्ली-मार्केटला जायचं होतं
चिकार श्रीमंत असाव्यात.
त्यातल्या एकीनी पण क्लास परफ्यूम मारला होता.
थिये मायगेल ह्या डिझायनरचा चा 'एंजल ' बहुतेक.
असो...
वडाळ्यावरून बी. के. सी. ला नवीन कनेक्टरमार्गे जायचा रस्ता चक्क मला माहिती होता.

बी. के. सी. वरून एक तरुण नवरा बायको आणि त्यांच्या बाबूला उचललं.
वांद्र्याच्या खाडीतल्या मच्छरांनी पाय फोडले नुसते.
त्यांना (म्हणजे कुटुंबाला ... मच्छर माहिमपर्यंत आले की नाही माहीत नाही) माहीम दर्ग्याला सोडलं.

आता खरं तर टॅक्सी परत द्यायचा टाइम झालेला तरी तुलसी पाईप रोडवर एक गरीब फॅमिली आणि एक मॅट्रेसवाला ह्यांना एकत्र सोडलं.
तेवढाच थोडा अजून कर्मा +
दादर  फूल मार्केटला दोन बायका डेस्परेटली टॅक्सी शोधात होत्या.
त्यातली एक आमच्या जग्याची बहीण शोभासारखी होती.
शिडशिडीत आणि प्रेमळ डोळयांची...
त्यांना परेल सिग्नललाच जायचं होतं...
ऑन द वेच होतं... सोडलं.

आता टाईमपास न करता सुसाट मलबार-हिलला जायचं म्हणून दोन तीन जणांना नाही म्हणालो.

पण मोरवाल्या फिनिक्सजवळ एक अंकल सरळ टॅक्सीत घुसलाच.
लागली का आता...
इकडे दिनेशभाईचे फोनवर फोन.
टॅक्सीवाले जेव्हा कळवळून सांगतात "भाई टॅक्सी देने का है" ते बऱ्याचदा खरं असतं हे आज मला नीटच कळून चुकलेलं.

खरं तर फार लांब नव्हतं भाडं.
आम्हाला पोदार हॉस्पिटलजवळ जायचं होतं.
पण दादर साईड वरून येऊन यु  टर्न मारून मोरवाल्या फिनिक्सला जाणाऱ्या गाडीवाल्यांनी रस्ता जाम करून टाकलेला.
तब्बल एक तास तिकडेच अडकलो.

ते चालत गेले असते तरी १५ मिनिटांत पोदारला पोचले असते...
असो.

त्यांना कसंबसं सोडलं आणि मग मात्र सुसाट...



आजची कमाई: ९५० रुपये


















  
















Saturday, July 11, 2020

टॅक्सी दिवस २: १५ डिसेंबर २०१९

आज दिनेशभाईंनी त्यांची स्वतःचीच टॅक्सी दिली.
ह्या वॅगन-आर बाई कचकावून साडे-पाच लाख किलोमीटर चाललेल्या.
इकडे आपण च्यायला गाडी एक लाख किलोमीटर चालली की रेस्टलेस व्हायला लागतो.
पर्स्पेक्टीव्ह पर्स्पेक्टीव्ह म्हणतात ते हेच असावं बहुधा!

तर आधी दिनेशभाईंनाच ग्रॅण्ट रोड स्टेशनला सोडलं.
लगेचच एका कपलचं भाडं मिळालं.
गाडी जुनी तिला पॉवर स्टिअरींग नव्हतं.
स्टेशनवर टर्न  मारता मारता हात भरून आले.
माझ्या मस्का व्हेन्टोची फार याद आली.
कपलला भारतीय विद्याभवनला जायचं होतं.
ही लोकेशन्स पहिल्या दिवसासारखीच.

मग चौपाटीवरून माझ्या आवडत्या स्पॉटला जाऊन थांबलो...
तारापोरवाला ऍक्वेरियमला. हे ही पहिल्या दिवसासारखंच!
आज चक्क थोडा वेळ मिळाला तेव्हढ्यात थोडं "अचंब्याच्या गोष्टी" वाचलं.
सुबोध जावडेकर आणि मधुकर धर्मापुरीकर ह्यांनी संपादित केलेला हा संग्रह.
किशोरवयीन मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितलेल्या गोष्टी हे सगळ्या कथांतील कॉमन सूत्र.
"पतंग" नावाची मिलिंद बोकिलांची अप्रतिम गोष्टं आहे ह्या संग्रहात.
टॅक्सी थांबवून मिलिंद बोकील वाचायचं स्वप्न पूर्ण झालं माझं फायनली :)

तेव्हढ्यात एक चटपटीत तरुण मुलगी आली तिला मेट्रो सिनेमाला जायचं होतं.
सिम्पल रस्ता: मरीन ड्राइव्हवरून पुढे जाऊन फ्लायओव्हर खाली पेट्रोल पंपावरून लेफ्ट मारला की सरळ मेट्रो.
पण काहीतरी हुशारी दाखवण्याच्या नादात तो लेफ्ट मिस केला आणि नंतर कुठला तरी लेफ्ट-राईट-लेफ्ट मारून कसे कोण जाणे आम्ही चर्चगेट स्टेशनला पोचलो.
शी SSS फकिंग एम्बॅरसिंग!
ती वैतागलीच शिवाय घाईत असावी.
चर्चगेट स्टेशनला पोचल्यावर बोलली, "जाऊ दे आता मी ट्रेननीच परत उलटी मरीन लाईन्सला जाते."
साधी सिम्पल केस कॉम्प्लिकेटेड करून ठेवणाऱ्या एखाद्या रेम्याडोक्या सरकारी नोकरासारखं वाटलं मला!
मग तिच्याकडून पैसे नाही घेतले.
चुकीचं क्षालन वगैरे...

मग अजून एका जोडप्याला सँडहर्स्ट-रोड स्टेशनला सोडलं.
लहानपणी डोंबिवलीवरून आईबरोबर तिच्या ऑफीसला व्ही. टी. ला यायचो.
तेव्हा हे स्टेशन नेहमी वाचायचो.

समहाऊ कांजूरमार्ग आणि सँडहर्स्ट रोड मला सेंट्रलवरची भारी दुर्लक्षित स्टेशनं वाटायची.
म्हणजे भरपूर भावंडांच्या गोतावळ्यात एखादा मधला इन- सिग्निफिकंट भाऊ असावा तशी.
लोकं विक्रोळीला -भांडुपला रहातात पण कांजूरमार्गला कोणी राह्यल्याच कधी ऐकलं नाही.
लोकं भायखळा-मस्जिद व्ही. टी. ला कामाधंद्याला जातात पण सँडहर्स्ट रोड... नेव्हर.

ह्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाहेर काहीच नसेल नुसती फसवी पोकळी असेल असं काहीतरी वाटायचं मला.
पण आज ते स्टेशन बाहेरून बघितलं आणि ते खरंखुरं असल्याची खात्री पटली.

आता एकदा कांजूरमार्गपण बघायला पाहिजे... हे हे हे! 

सँडहर्स्ट रोड वरून एका मारवाडी जोडप्याला सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये सोडलं.

हे हॉस्पीटलपण छान प्रशस्त मोठं असूनही थोडं दुर्लक्षितच म्हणता यावं.
म्हणजे के ई एम, जे. जे., नायर वगैरे गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा दरारा ह्याला नाही.
पण पी. डिमेलो रोडवरचा छान शांत एरिया ह्याला लाभलाय.
किंवा कदाचित एरवी गर्दी असेल आणि रविवार सकाळ म्हणून शांत असेल.
पण हा (आजतरी) शांत थोडा खंडहर टाईप्स कॅम्पस आवडला मला.
इकडे थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलं.

कॅंटीनमध्ये शांतपणे बसून मिसळपाव नी चहा मारला.
ही अशी शेट्टीटाइप पांढऱ्या वाटाण्याची उसळवाली पोटभरू मिसळ बऱ्याच दिवसांनी खाल्ली.
आमचा दोस्त पप्या कॉलनीतल्या उडप्याकडे एक मिसळ - पाचदा एक्स्ट्रा उसळ (जी कॉम्प्लिमेंटरी असते) आणि वीस पाव खायचा त्याची आठवण आली...

मग आरामात बाहेर पडून एका माणसाला क्रॉफर्ड मार्केटला सोडला.
त्या भल्या माणसाने काढलेला आमचा हा टॅक्सी ताईंबरोबरचा फटुआ!
एखाद्या सीझन्ड बॉक्सरसारखं टोणपे खाल्लेलं तिचं नाक बघा!


मी हा फोटो निरखून बघत असतानाच खिडकीवर टकटक झाली.
एक टीन एजर (बहुतेक "आस्कर") पोरगी शेम्बड्या बाळाला टेंगण्यावर घेऊन माझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती.
मी सुट्टे पैसे द्यायचे की निगरगट्ट इग्नोर मारायचा ह्यातला एक ऑप्शन निवडणार,
इतक्यात ती बोल्ली,
"क्या अंकल कबसे आवाज दे रैले तुमको... बाबुलनाथ चलोगे क्या?"
मी मनातल्या मनात तिला सॉरी बोलत गडबडीनी बसवलं आणि आपली रस्ता सांगण्याची पेटन्ट रिक्वेस्ट टाकली.

तिनीसुद्धा कॉन्फिडन्टली हो सांगितलं, "ये मेरा रोजका रस्ता है"... वगैरे...
आणि ऑलमोस्ट मला नो एंट्रीत गाडी घालायला लावली.
समोरून राप राप येणाऱ्या गाड्या बघून मी रन टाईमला तिची डायरेक्शन्स ओव्हरराईड केली.
तो लेफ्ट सोडून पुढे गेलो.
(प्रत्येक देश, जहाज, विमान आणि टॅक्सीच्या कप्तानाला असे स्प्लिट-सेकंड हार्ड-डिसीजन्स कधी कधी घ्यावे लागतात उदाहरणार्थ नोटबंदी! )
मग तिची चिडचिड इग्नोर मारत शिस्तीत मॅप चालू केला.


ती आणि तिचा छोटा बाबू डोळे विस्फारून मॅपकडे नवलाईनी बघत राह्यली.
मग त्यांना मी गूगल मॅपचा झटपट क्रॅश कोर्स दिला.
बाबुलनाथ आल्यावर मीटरचे साठ रुपये झाले.

खूप गरीब, खूप फाईट माराव्या लागणाऱ्या लोकांत एक स्ट्रीट-स्मार्टपणा असतो.
बेरकी आणि करुण झळा आलटून पालटून घेत राहतो तो
तिच्यातला तो स्मार्टनेस आता जागा झाला.
"क्या अंकल रोज मै इधरसे पच्चास रुपयेमे आती हूँ! आपने आज घुमाके लाया" वगैरे बोलू लागली"

मी बोल्लो, "दीदी जो देना है दे दो नो प्रॉब्लेम"
"मेरे पास इतना ही है", चाळीसच्या नोटा पुढे करत ती म्हणाली.
तिच्या कोवळ्या चेहऱ्यावरचं टफ कुकीचं क्युट आवरण बघून मला हसू यायला लागलं.
(अवांतर: "क्युट" हा शब्द मुलाच्या तोंडी कोणत्याही वेळी शोभत नाही हे माझं स्ट्रॉंग मत आहे. सो हे वाक्य असं वाचा:)
तिच्या कोवळ्या चेहऱ्यावरचं टफ कुकीचं लोभस (की बेरकी की करुण?) बेअरींग बघून मला हसू यायला लागलं.

तिच्याच वयाच्या बँकर इंटर्न्स बी. के. सी. च्या स्टारबक्समध्ये चाळीस हजाराचं महिन्याचं फक्त कॉफीचं बिल करतात...
त्याची उगीचच आठवण झाली.
  
"ये भी नही दिया तो चलेंगा दीदी", तिला म्हटलं.

हे ऐकून तर फुललीच ती,
"आपको बहोत दूरका अच्छा भाडा मिलेगा..." वगैरे तोंड भरून आशीर्वाद देत गेली.
कडेवरचा बाबू पण बोळकं पसरून हसत होता.

...
...
...

ठीक आहे ना आपल्या नियमावलीत टॅक्सी फायद्यात चालवायची असा नियम कुठे आहे?
हे हे हे हे :)

लगेच हॅंगिंग गार्डनचं भाडं मिळालं:
बाबुलनाथ वरून सिग्नल नी चौपाटीला राईट मारला की वाळकेश्वरवरून हँगिंग गार्डन: नो ब्रेनर!
तरीपण मॅपवर टाकलं जरा कॉन्फिडन्स नसल्यामुळे.
मॅप च्यायला चौपाटीवर न जाता आतून पेडर रोडवरून जायला सांगत होता.
मला वाटलं असेल बेटर रास्ता म्हणून उलटी टॅक्सी फिरवली आणि बाबुलनाथ पुन्हा क्रॉस करताना मॅपवर "डन!"
आलं.

च्यायची म्हणजे आधीचं बाबुलनाथ डेस्टिनेशन बदललंच नव्हतं.
परत त्या शेट्टी कुटुंबाच्या शिव्या खात कसाबसा यु टर्न मारून परत चौपाटीवरूनच गेलो.
त्यांच्याकडूनही चुकीचं क्षालन म्हणून वीस रुपये कमी घेतले.
स्प्लिट-सेकंड हार्ड-डिसीजन्स कधी कधी असे सडकून चुकतात उदाहरणार्थ नोटबंदी :))

आज म्हणजे एकंदरीत शिव्या खायचाच दिवस आहे!

हँगिंग गार्डनला फोटोग्राफी करायला आलेली तीन पोरं-पोरी त्यांच्या ट्रायपॉडसकट उचलली.
बिचारी सकाळी लवकर आली असावीत. डिलाईल रोडपर्यंत पेंगत होती.

डिलाईल रोड म्हणजे परळ टिपिकल मराठी मालवणी बहुल एरिया.
एक मालवणी आई आणि तिची दोन तरुण मुलं उचलली.
पुरुषांच्या बाबतीत अजून एक मिथ-बस्टर:
पुरुष पण सडकून गॉसिप करतात.

कोण्या तरी लहान बाळाच्या बारशावरून प्रेमळ उणी दुणी काढणं चालू होतं.
"काय तां टाईट ड्रेस.
बाबू नुसतो घामाघूम (हे मालवणी लोकं बाळाला "बाबू" भारी गोड स्टायलीत बोलतात)
ह्यांका कळूक नांय?..."
वगैरे फुल्ल ऑन चालू होतं!

त्यांना वरळी नाक्याला सोडून तडक घरी आलो.

दुपारची झोप काढून पुन्हा टॅक्सी काढणार तर टॅक्सी स्टार्ट व्हायलाच तयार नाही.
दिनेशभाईंना बोलावून घेतलं... इग्निशनचा प्रॉब्लेम होता.
रिपेअर व्हायला सोमवार उजाडणार.

सो आजचा दिवस अर्धाच पकडता येईल. 
आजची कमाई:  ३८१ रुपये







   











    

Sunday, July 5, 2020

टॅक्सी दिवस १: ८ डिसेंबर २०१९

टॅक्सी मिळत नसल्याने माझा मोजो जरा ढिला पडत चालला होता.

वीकेंड्स फ्री ठेवले होते टॅक्सी चालवायची म्हणून...
पण टॅक्सी मिळत नसल्याने वैतागून साल्साचा क्लास लावून टाकला.
केतकीचा पुण्यात बचाता क्लास आणि माझा मुंबईत साल्सा असं थोडे शनिवार-रविवार चालू होतं.

तशाच एका शनिवारी रात्री केतकीचा मेसेज आला:

गुड न्यूज टुमारो इज युअर मीटिंग. 
१० :३० मॉर्निंग हॅंगिंग गार्डन सिमला हाऊस. 
दिनेश भाई ...
ही होल्ड्स ३ टॅक्सीज !

मी थरथरलोच.
फायनली...
आता केतकीनं त्यांना कसं कन्व्हिन्स केलं हे तिनं अजूनही नीट सांगितलं नाहीये मला खरं तर...


पण मी दुसऱ्या दिवशी डॉट १०:३० ला पोचलो प्रियदर्शनी पार्कजवळ.
मलबार हिल - प्रियदर्शनी पार्क म्हणजे मुंबईचे क्रीम ऑफ क्रीम एरियाज.
इतकी वर्षं राहून मी सुद्धा गेलो नव्हतो इथे ह्या आधी.

थेट सी फेसिंग असलेलं हे पार्क भारी सुंदर वाटत होतं.
पण मी जास्त टाइमपास न करता फक्त पार्कच्या टॉयलेटमध्ये धार मारून लगेच बाहेरच्या नाक्यावर आलो.
हो उगीच पहिल्याच दिवशी उशीर नको!

इकडे बऱ्याच टॅक्स्या उभ्या होत्या.
तेव्हढ्यात समोरून एक पाणीदार डोळेवाला माणूस आला.
तो दिनेशभाईच असणार...
अंदाज बरोबर होता.
हा टाईप मला ओळखीचा आहे थोडा.
मी बघितलाय हा टाईप:
मित्रांच्या रेसिंगच्या धंद्यात,
स्टॉक्सच्या डे-ट्रेडिंगमध्ये,
सोशल डान्सिंगमध्ये,
कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये...
असे लोकं दिसायला अजिबात  ढासू वगैरे नसतात...
पण डोळे वेगळेच असतात त्यांचे...
पाणीदार... शार्पनेसचं अजब काजळ लावलेले.
त्यांच्या व्हॉटेव्हर फील्डमध्ये मास्टर असतात ते.
रपारप निर्णय घेत पैशाची हार-जीत पचवतात.
अप्रतिम नाचतात, किचकट प्रोग्रॅम डी-बग करतात.

तोच दिनेशभाईचा टाईप होता.
टॅक्सी चालवण्याच्या शास्त्र आणि कलेत मुरलेला माणूस.
त्यानं सुरवातीचं हाय हॅलो झाल्यावर फालतू वेळ न दवडता सटासट फोन लावले.
आधीच सांगितल्याप्रमाणे फक्त एका दिवसासाठी खाडा करायला कोणी तयार नव्हतं.
(साहजिकच आहे जवळ जवळ हातावर पोट असतं त्यांचं)

माझा चेहेरा पुन्हा पडायला लागला.
आज पण खाली हाथ बहुतेक :(

पण इतक्यात दिनेशभाईनं बाजूच्या एका टॅक्सीवाल्याला त्याच्या खास यु. पी. लहेजात हाक मारून बोलावलं.
"अरी ओ संजय इधर आ"
तो देखणा पोरगेलासा तरुण आला.
"चाबी दो गाडीका"
त्यानं निर्विकारपणे चावी दिनेशभाईला दिली.
आणि दिनेशभाईनं ती निर्विकारपणे माझ्या हातात दिली.

फ SSS क् फायनली
माझी छाती धडधडायला लागली.
जवळ जवळ तीन वर्षं मी आणि माझी फॅमिली ह्या क्षणासाठी धडपडत होतो...
बाजूला एक काळी पिवळी सॅन्ट्रो शांतपणे उभी होती.
मी ब्लँक झालो दोन क्षण.
पण लगेच मेंदू ताळ्यावर आला.
असा नवशिकेपणा दाखवला तर ह्या लोकांचा कॉन्फीडन्स जायचा परत च्यायला.
खाकी पॅण्ट मी घरूनच घालून आलो होतो.
तिकडेच रस्त्यावर शर्ट काढला. (एSSS सलमान)
आणि युनिफॉर्मचा शर्ट चढवला.

गाडीचं दार उघडून आत बसलो.
दिपकमामानी शिकवल्याप्रमाणे आधी हॅन्डब्रेक काढला.
(दिपकमामावरचा ब्लॉग इथे वाचू शकाल: https://nilesharte.blogspot.com/2017/12/blog-post_27.html )

सीट हाईटप्रमाणे ऍडजस्ट केली.
डावी उजवीकडचे मिरर, रिअर व्ह्यू मिरर!

दिनेशभाई मला काहीतरी सांगत होते बहुतेक सी. एन. जी. विषयी.
इतक्यात डावीकडून एक माणूस डोकावला,
"ग्रॅण्टरोड स्टेशन ?"

सगळी आजूबाजूची गॅंग मजेत हसली,
"चलो बोहनी भी हो गयी आपकी"

फकिंग पहिलं भाडं!
तो माणूस आत बसला...
मी कॉन्फिडन्टली गिअर टाकला...
नेपियन्सी रोडवरून थोडा पुढे गेलो...
दिनेशभाई आणि टॅक्सीवाल्यांची गॅंग नजरेआड झाल्याची खात्री केली...
आणि हळूच पॅसेंजरलाच विचारलं,
"ग्रॅन्टरोड स्टेशनका रस्ता बतायेंगे थोडा प्लीज?"   

आता माझा रोडसेन्स फकॉल आणि डिसेन्ट यांच्या मध्ये कुठेतरी बसतो.
त्यातही बरीच वर्षं वीकडेज पुण्यात आणि वीकेंड्स मुंबईत (पण लोळत) काढल्याने मुंबईचे रस्ते अजूनच फिक्कट झालेले डोक्यात.
त्यामुळे मुंबईचे निदान महत्त्वाचे तरी रस्ते शिकणं हाही एक अजेंडा होताच.
(पहा कारण क्रमांक २ https://kalyapivalyanavasachigosht.blogspot.com/2020/02/blog-post_8.html )
पण थोडाफार अंदाज येईपर्यंत निर्लज्जपणे मदत घ्यायची हे ठरवलेलं.

रस्ता आमच्या पहिल्यावहिल्या भाड्यालाही माहीत नव्हता पण त्यानं बिचाऱ्यानं सरळ मॅप लावून टाकला.

त्याला स्टेशनवर सोडल्या सोडल्या गावदेवीचं भाडं मिळालं
आमच्या पूजाचा नवरा हेमंत वाघेसारखी पांढरी शुभ्र दाढीवाला माणूस आणि त्याची टीनएजर पोरगी होते.
त्यांनाही तोंड वेंगाडून रस्ता दाखवायची विनंती केली.
त्यांनीही किंचित तुच्छ लूक देत का होईना रस्ता दाखवलाच.

त्यांना विद्याभवनला सोडून सरळ चौपाटीवरून गाडी तारापोरवाला मत्स्यालयाजवळ थांबवली आणि टॅक्सीच्या पहिल्यावहिल्या दिवसाच्या आनंदात थोडं "बास्कून" घेतलं.

डिसेंबरातल्या रविवारची ती निवांत प्रसन्न सकाळ.
उजवीकडचा समुद्र...
तिकडून येणारा खारा की (मतलई?) "Zephyr" म्हणतात तसा वारा.
मरीन ड्राईव्हचा सामसूम कट्टा...
त्यावरचं चोचित चोच घातलेलं एकमेव प्रेमळ जोडपं.
सगळं साठवून घेतलं...

तितक्यात एक पोरग्या नेव्हीनगरला जायला आला.

च्यायला आरामात टॅक्सी लावून भाड्याची तासंतास वाट बघत मस्त मिलिंद बोकील वाचायचं असं काहीतरी रोमँटिक डोक्यात होतं माझ्या...
पण इकडे तर बॅक टू बॅक भाडी येत होती.
हे बिगिनर्स लक? की मुंबईची जगप्रसिद्ध अहर्निश बिझी धावपळ??

एनीवेज त्याला नेव्हीनगरला सोडलं... (बरोबर ओळखलंत मॅप त्यालाच उघडायला लावला ;))
(नेव्हीनगर हा मुंबईच्या एक्स्ट्रीम दक्षिण टोकाला असलेला देखणा डिफेन्स एरिया)
आणि सी. एन. जी. शोधत शोधत भायखळ्याला जे. जे. च्या पुलाजवळ आलो.

च्यायला आयुष्यभर पेट्रोल गाडी चालवलेली... सी. एन. जी. पहिल्यांदाच भरत होतो.
सी. एन. जी. भरायला पंपावर एका डोळ्यात फूल पडलेला सिन्सिअर चेहऱ्याचा मुस्लिम पोऱ्या होता.
त्याला विचारलं, "भाय फुल्ल टँकमे कितना लंबा चलेगा गाडी?"

तो बोलला मालूम नही बडे भाय...
"मेरा आज फर्स्ट दिन है पंपपे"

"एSSS मेरा भी...फर्स्ट दिन..."
त्याला टाळीच दिली मी.

पुढे ना. म. जोशी मार्गावर एक मस्त गंगाधर गाडगीळांसारखा दिसणारा मराठी माणूस भेटला...
छान स्टाईलमध्ये सिगारेट पीत होता.
गाडगीळ प्यायचे काय सिगारेट? कोण जाणे??

खूप आधी आमच्या वांद्रयात बाबांबरोबर रविवारी सकाळी मटण आणायला जायचो.
एम. आय. जी ग्राउंडवर...
मत्स्यगंधा मटण शॉप असं छान नाव होतं त्या दुकानाचं!

तिकडे मोस्टली गंगाधर गाडगीळपण यायचे.
क्वचित विं. दा. सुद्धा
आपला आणि ह्या थोर लोकांचा मटणवाला एक आहे हे पाहून जरा मस्त वाटायचं.

तर त्या गं. गा. लूक अलाईकला हिरा पन्नाला सोडला.
आता म्हटलं सकाळचं  सत्र संपवून घरी निघावं.
जरा मटण बिटण खाऊन थोडी वामकुक्षी करून परत संध्याकाळी गाडी काढावी.
(आता मी अर्ध्याहून थोडा जास्त पुणेकर आहे सो डू द मॅथ बिचेस :))

मग हळू हळू हाजी अलीवरून कूच करत सिद्धिविनायकाला पोचलो.
इतक्यात दोघंजण टॅक्सीत बसले.
मराठीच होते थोडे हायर क्लास टाईप:
एक जण बहुतेक अमेरिकेतून थोड्या दिवसांसाठी आला असावा.
त्यांना शिवाजीपार्कला जायचं होतं.
सिंधुदुर्ग हॉटलेला.
अय हा आपला एरिया हाय बॉस.
सकाळपासून पहिल्यांदा मॅप न लावता कॅडल रोड वरून फुल्ल कॉन्फिडन्समध्ये गाडी रेटली.

सहा डिसेंबर नुकताच झाला होता.
शिवाजी पार्क एरियातल्या काही हुच्चभ्रू लोकांमध्ये  'त्या' आठवड्यात आम्हाला कित्ती नी कश्शी गैरसोय झाली हे माना वेळावत सांगायची फॅशन आहे.
तसं थोडं फर्स्ट वर्ल्ड स्नॉबिश बोलणं त्या दोघांतही झालं.
पण माझ्या चेहेऱ्यावर सूक्ष्म आठ्या दिसल्या असाव्यात बहुतेक.
त्यांनी गडबडीनं विषय बदलला!

शिवसेनाभवन ते  प्लाझाचा रोड,
शिवसेनाभवन ते पोर्तुगीज चर्चचा गोखले रोड.
आणि ह्या दोघांना छेदणारा रानडे रोड.
ह्या सेक्सी त्रिकोणातल्या एका गुप्त बोळात साधारण लॅबिया मायनोराच्या जागी हे सिंधुदुर्ग हॉटेल आहे.
इकडे एकही बोळ न चुकता आल्याबद्दल मी स्वतःचीच पाठ थोपटली वगैरे.
पण त्या आनंदात मीटरचं कुठलं तरी बटण चुकीचं दाबलं की दोनदा दाबलं की कायकी.
मीटरच हँग झाला.

तेव्हढ्यात एक पारशी कुटुंब बसलं: फाईव्ह गार्डन्स.
त्यांना बोललो, "मीटरचा प्रॉब्लेम आहे.अंदाजानी काय द्यायचं ते द्या"
पारशी कुटुंबाला पारशी कॉलनीत सोडण्याची संधी मला सोडायची नव्हती.

आई-बाबा नी साधारण वीसेक वर्षांचा मुलगा.
पोराचे फंडे एकदम क्रिस्टल क्लियर होते.
अमक्या पॉइंटला लग्न...
मुलं नकोत वगैरे वगैरे.
आई कळवळून एक तरी मूल पाहिजे वगैरे सांगत होती.
मस्त पार्सीफाइड इंग्लिश चालू होतं.
"लुक ऍट आपडा ग्रॅनू ने... एटला एटी-सिक्स रनिंग बट बध्धू फीट छे"... वगैरे...
नवरा बोलण्याच्या ओघात बायकोला बोलला,
"व्हेन यु टर्न ६० यु वोन्ट बी एबल टू वॉक ओन्ली."
नी पोरानी पण दुजोरा दिला.
खरं तर तीला काहीच प्रॉब्लेम नव्हता थोडीशी सुखवस्तू ओव्हर वेट होती फक्त.
साहजिकच ती दुखावल्या सारखी झाली...
आम्हा पुरुषांना पाचपोच एकंदरीत कमीच चायला!

पुढेही बऱ्याचं पॅसेंजर्समध्ये बघितलं की,
एका सूक्ष्म सटल लेव्हलवर पुरुष बायकांच्या खास करून बायकोच्या बाबतीत किंचित पण निश्चित इन-सेन्सिटिव्ह असतात...

फाईव्ह गार्डन मधल्या कुठल्यातरी अर्जुन की भीम की सहदेव गार्डनजवळ एक सुंदर बिल्डिंगपाशी त्यांना सोडलं.
मीटर गंडलेलाच होता...
पोरानं बापाला वॉर्न केलं.
"पापा डोण्ट गिव्ह अबव्ह सिक्स्टी"
पण बापानं पोराला दाबत माझ्या हातात शंभरची कोरी जांभळी नोट कोंबली.

टू मच!
पहिल्या दिवशी टीप सुद्धा मिळाली :)
गॉड ब्लेस पारसीज!

आता गाडी भरधाव घरी :)
पहिली कमाई ५४० रुपये!
पहिली कमाई बायकोच्या हातात वगैरे!!