Saturday, April 3, 2021

टॅक्सी दिवस १६: २१ फेब्रुवारी २०२१

आजकाल मी प्रियदर्शनी-पार्क समोरच्या हैद्राबाद हाऊसवरून टॅक्सी घेतली की सरळ हँगिंग गार्डनला लावतो. 

मुंबईच्या टकल्यावरच्या ह्या सुंदर बागेत दोन तीन चालत चकरा मारतो...  

मग गार्डनमधल्या छान पायऱ्यावाल्या उतारावरच्या सुलभमध्ये मुत्तूकोडी मारतो... 

आणि मग खुष होऊन भाडी शोधायला लागतो. 

असंच खाली आल्यावर ग्रॅण्ट-रोड स्टेशनचं भाडं मिळालं. 

बहुतेक गुजराथी मध्यमवयीन नवरा बायको होते. 

मी खुषीत हँगिंग गार्डन वरून सरळ पुढे केम्प्स कॉर्नरच्या दिशेनी टॅक्सी काढली. 

उतारावरून केम्प्स कॉर्नरला आलं आणि तिकडून राईट मारून सरळ-ग्रॅण्ट रोड स्टेशन. 

पण उतारावर सरळ पुढे पुढे गेलो तर रस्ता अरुंद होत होत बंदच झालेला. 

काही महिन्यांपूर्वी मलबारहिलची दरड कोसळल्यामुळे साफ बंद केलेला हा रस्ता. 

खरं तर मला लक्षात यायला हवं होतं. 

च्यायची अरुंद रस्त्यावरून यु मारायलाच १५ मिनटं गेली. 

त्यांची बाकीची फॅमिली दुसऱ्या टॅक्सीतून कधीच स्टेशनला पोचलेली. त्यांचे ह्यांना फोनवर फोन येत होते. 

पण माणूस प्रचंड सज्जन होता. 

काहीही तक्रार न करता चुत्यापा उशीर त्यानं सहन केला. 

जवळ जवळ वीस मिनटं उशीर करून मी त्यांना स्टेशनला सोडला आणि माफी मागत पैसे नको म्हटले. 

पण त्यानं साफ नाकारत पूर्ण ७० रुपये घ्यायला लावले, "चूक सगळ्यांकडून होते" सांगत!

मग हळूहळू टॅक्सी चालवत हीरा-पन्नाला आलो. 

तिकडे एक साधीशी थोडी भणंग स्त्री भेटली. 

खिन्न, सावळी, पोरग्या म्हणून अगदी चालून जाईलशी... वेडावाकडा बॉयकट. 

दारूचा मेजर वास येत होता पण टाईट मात्र नव्हती. 

अगदी नवं कोरं शर्ट - पॅण्ट घातली होती, तिचा वाढदिवस असेल का? का कोणी दिलं असेल?

एक मिनिट... फकिंग का म्हणून? 

तिचं तिनंच ही घेतलं असेल काय फरक पडतो. 

भेंचोत माझ्याकडून पैसे घेतले किंवा मी दिले काय? 

हा आपला पिळपिळीत जजमेंटल उच्च म. म. व. पणा मध्येच विळविळतो हेच खरं. 

तिच्या पायाला मात्र ओलसर जखमेचं मोठ्ठं बँडेज होतं. 

हिरा पन्ना आणि कॅफे नूरानी मधल्या डिव्हायडरवर पाय फरफटत तिनं टॅक्सीला हात केला. 

मी कचाकच गाडी थांबवत तिला रस्त्याच्या मध्येच उचलली.  

पाठच्या लोकांनी थोड्या शिव्या घातल्या पण रविवार असल्याने चालून गेलं. 

मी पण दिल्या :) 

मला व्हाईट टायगर मधला तो बलराम ड्रायव्हिंग शिकताना शिव्या घालायला शिकतो तो सीन आठवला. 

( बाय द वे मला पुस्तक आणि पिक्चर दोन्ही आवडलं... पिक्चर तर जास्तच, आदर्श गौरव क्लास ! ) 

एनीवेज "बर्थडे गर्ल"ला वरळीला लोटसजवळ सोडलं. 

बाकी मग ४ - ५ रँडम भाडी मारत ऑपेरा-हाऊसला आलो. 

इकडे तीन गोरी घारी कच्छी पोरं भेटली त्यांना काळबादेवीला जायचं होतं. 

त्यांनाच शरण गेलो आणि गोल-देवळाजवळून गल्ली बोळातून मी त्यांना किंवा रादर "त्यांनी मला" :) काळबादेवीला आणलं. 

भुलेश्वर - काळबादेवी म्हणजे कचकावून गुजराती बहुल ट्रेडिंग एरिया. 

स्वस्त नॉन- ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक आयटम, इमिटेशन ज्वेलरी, खास दांडीयाचे कपडे, चमको आणि किफायतशीर शरारे, डिझायनर साड्या, भांडी अशा बऱ्याच काय काय गोष्टींसाठी. 

आणि अर्थातच गुज्जू फूड! 

आता गुज्जू फूड (आणि मुलीसुद्धा ) माझा वीकपॉईंट!

सो इकडे लंचब्रेक घ्यायचं ठरवलं. 

टॅक्सी पार्क केली. 

बाय द वे पार्कींगवरून आठवलं टॅक्सीचा अजून एक फायदा. 

काळबादेवीसारख्या एरियात किंवा रादर मुंबईतच पार्कींगपायी तुमचं घामटं निघू शकतं... 

पण आम्हा टॅक्सीवाल्यांसाठी मात्र सगळीकडे जागा राखीव असते. 

तुम्ही "राखीव स्टॅन्ड: तीन टॅक्सी / पाच टॅक्सी अलाऊड" असे बोर्ड बघितले असतील. ते हेच. 

सो अशाच काळबादेवीच्या टॅक्सी स्टॅन्डवर रुबाबात गाडी लावली आणि हॉटेलात घुसलो. 

इट धिस बि SSS या SSS चेस !!!

आता हॉटेलचं नावच साक्षात "सुरती" सो समजून जा!



मी तर गुज्जू (अन्न पूर्ण)ब्रम्ह पाह्यल्याच्या आनंदात. 

आणि "सुरती"नी अजिबात निराश केलं नाही. 

मुळात हे असं पाच-सहा वाट्या असलेलं ताटच लौ आहे आपलं. 



ही आपली खास हिंदुस्थानी लक्झरी!

"पोर्शन" बेस्ड कॉन्टी / वेस्टर्न जेवण पण आवडतंच. 

पण सगळ्या नट्या आवडून झाल्या तरी शेवटी रवीनाकडेच यावं तशी थाळी ती थाळी!  

गूळ घातलेली गोडसर डाळ, दोन सात्विक भाज्या, गर्रम पोळ्या, कढी, कोन नाय कोंचावाला डाळ भात आणि डेडली श्रीखंड. 

फकींग सुख!

बायकोला आणायला पाह्यजे एकदा इकडे. 

ती एन्जॉय करणार म्हणून अजिबातच नव्हे तर एकदम कॉन्ट्ररी:

तिचा कट्टर मासे-कोंबड्या-मटणखाऊ सोल इकडे होली वॉटर शिंपडलेल्या व्हॅम्पायरसारखा भयाण टाहो फोडतो का ते बघायला... हे हे हे :)

जाता जाता काढलेले काळबादेवी एरियाचे हे काही फोटो:






आजची कमाई:

४२० रुपये