Friday, August 21, 2020

टॅक्सी दिवस ८: ९ फेब्रुवारी २०२०

आज पोलिसांच्या मॅरेथॉनमुळे मलबार हिलला पोचायला प्रचंड उशीर झाला.
सी लिंक आणि बरेचसे महत्त्वाचे रस्ते बंद होते.
'घरचं'च कार्य असल्यामुळे जागोजागी नाकाबंदी होती.
पण पोलीस वेल बिफोर टाइम अडवण्याऐवजी अगदी शेवटी चुकीच्या पॉईंटवर अडवत होते.
(उदाहरणार्थ सी लिंकची एंट्री )
त्यामुळे तीनचार वेळा लांबलचक वळसे घ्यावे लागले.

म्हणजे कमिटमेंट नको असेल तर मुलीला पहिल्या दोस्ती-सेक्सच्या आधीच सांगावं.
लग्नाच्या दिवशी नको ना कॅन्सल करायला... तसं काहीसं!

एकंदरीत थोडा वैतागलो पण ठीक आहे.
नुक्तीच पोलिसांनी मला काही गोष्टींत फारच चांगुलपणा दाखवून मदत केलीय.
त्यामुळे हे त्यांना माफ.

फायनली ११ वाजता टॅक्सी घेतली.
एका कपलला नरीमन पॉईंटच्या आय-नॉक्स ला सोडला.
फार देखणं शांत लोकेशन आहे ह्या मल्टिप्लेक्सचं.
इथेच मैत्रिणीबरोबर नानाचा नटसम्राट बघितला होता त्याची आठवण झाली.
नटसम्राट नाटक बरंच आधी पाह्यलं असल्याने मी थोडा ओव्हर एक्साईट झालो.
आणि मैत्रिणीला अंमळ जरा जोरानीच कॉमेंट्री देत होतो.
मागे एक नॉन-महाराष्ट्रीयन बाई बसली होती. ती मला ओरडली.
रिफ्लेक्स ऍक्शननी मी "आवाज हळूच होता" वगैरे मराठी बाण्याचा वाद घातला.
ती बिचारी गप्प झाली.
पण नीट विचार केला आणि कळलं की चूक माझी होती.
नटसम्राटसाठी खास आलेल्या नॉन-मराठी माणसाचा मराठी पिक्चरचा अनुभव नासायचं घनघोर पाप केलं असतं तर रंगदेवतेनी कधीच क्षमा केली नसती मला.
मग आख्खा पिक्चर गप्प बसलो आणि संपल्यावर तिची बिनशर्त कडकडून माफी मागितली.
निघता निघता आम्ही जवळ जवळ मित्रच झालो होतो.
मीच बिघडवलेलं मराठी माणसांचं इम्प्रेशन मीच दुरुस्त केलं असावं अशी आशा करतो.

असो...

नरीमन पॉईंट वरून लगेच एका कपलला मेट्रोला सोडलं.
मेट्रोला मुंबई बघायला आलेली उत्तर भारतीय फॅमिली उचलली.
पोराबाळांसकट ५ - ६ जण होते.
पण बसवले टॅक्सीत... इतकं चालावं!
रविवारी सकाळी चालतं.
पोलिसांची मॅरेथॉन गेट वे ला च संपत होती.
त्यामुळे तिकडे ही SSS  गर्दी होती.

काळा घोड्यावरून तीन मॅरेथॉनवाल्या मित्रांना  उचललं.
त्यांना अध्ये मध्ये ड्रॉप करत शेवटच्याला भाटिया हॉस्पिटलच्या गल्लीत सोडला.
तिकडे लगेचच ऑपेरा हाऊसचं भाडं मिळालं.
त्यांना सोडता सोडता बाजूच्या टॅक्सीतील एकाला गुटख्याचा कागद न टाकण्याविषयी विनंती  केली.
पाठच्या बाईंनी मला शाबासकी दिली :)

तितक्यात माझी मैत्रीण करिष्माचा मेसेज आला.
मित्रांना एक राईड फ्री असल्यामुळे तिला घ्यायला सात-रस्ताला गेलो.
तिला हँगिंग गार्डनला जायचं होतं.
महालक्ष्मी मंदिर सिग्नल वर ब्यक्कार जॅम होता.
तिनं शिव्या घालत गाडी सरळ लेफ्टच्या चढानं वर घ्यायला लावली.
ओ हो हो हा अल्टा माउंट रोडचा गॉर्जस नागमोडी रस्ता आज पहिल्यांदाच कळला.
बेसिकली हा रस्ता पेडर रोडला समांतर पण सरळ अज्जाबात न्हाई.
नावाप्रमाणे टेकड्यांवर चढत उतरत लवलव वळत हा रस्ता फायनली केम्प्स कॉर्नरला पुन्हा पेडर रोडला भिडतो.
म्हणजे पेडर रोड रिमलेस चष्मा लावणारा डिसेंट ऋजू मोठा भाऊ असेल;
तर अल्टा माउंट रोडला केस झिंझारलेला पण अशक्य हॅण्डसम, गिटार-बिटार वाजवणारा,
फॅमिलीशी फटकून रहाणारा,
फक्त वडलांच्या श्राद्धाला उगवणारा... बोहेमियन धाकटा भाऊ म्हणता येईल.
थँक्यू करिष्मा!

मग तिकडून पुन्हा दोन तीन आसपासची भाडी मारून चर्चगेटला आलो.
तिकडून एका कपलला मेट्रोला सोडायचं होतं.
चर्चगेटवरून मेट्रोला जायचा महर्षी कर्वे रस्ता रेल्वे-ट्रॅकला समांतर जातो.
गोल मस्जिदीच्या सिग्नलला राईट वळायला थांबलेलो.
डावीकडे तीनचार तगडी पोरं दिसली.
मुंबईची नव्हती.
राज ठाकरेंच्या मोर्चाला आली होती बहुतेक

त्यांना ट्रॅकच्या पलीकडे मरीन ड्राइव्हला जायचं होतं आणि इकडचा फूटओव्हर ब्रीज बंद केलाय.

त्यांच्यातले दोन उत्साही दीडशहाणे शॉर्टकट शोधात तुटक्या कम्पाउंडमधून ट्रॅकवर घुसले आणि क्रॉस करायला लागले.
मी थरथरलोच.
रविवार दुपार असल्याने त्याक्षणी कोणती गाडी येत नव्हती ट्रॅकवर पण आली असती तर चटणी झाली असती त्यांची.
मी बराच ओरडा आरडा करून त्यांना धोका समजावून सांगितला.
शेवटी ते पुढच्या मरीनलाईन्स ब्रिजवर गेले जो फक्त २०० मीटरवर आहे.

मी कपाळावर हात मारत उजवीकडे वळलो.
(माजी) इंजिनाच्या कार्यकर्त्यांना इंजिनापासून वाचवलं मी बहुधा!

मग दोन-तीन भाडी मारून सैफी हॉस्पिटलवरून एका मुलीला उचललं.
हॉस्पिटलमध्ये तिची आई ऍडमिट होती आणि बराच हट्टीपणा करत होती वाटते.
भावाने आणलेला डब्बा खात नव्हती वगैरे.

मुलगी तिला खूप ताडताड बोलली वगैरे... आणि मग मात्र मायाळू झाली.
हे गुड कॉप / बॅड कॉप रुटीन सृष्टीच्या प्रारंभापासूनच आहे एकंदरीत.

पण आई आजारी असली की सुचत नाही काहीच हे मला नीटच माहिती.
बरी होवो लवकर तिची हट्टी-ममा!

तिला  कुलाबा कोळीवाड्यात जायचं होतं.
नेव्ही नगराच्या सुबक एरियात घुसून आम्ही टी. आय. एफ. आर. च्या आधी एक खुफिया राईट टर्न मारला.

च्यायला मला वाटायचं हे मुंबईचं दक्षिण टोक म्हणजे नेव्ही नगर आणि टी. आय. एफ. आर. फक्त
पण तसं नाहीये.

डावीकडे नेव्ही नगरची भिंत आणि उजवीकडे कुलाब्याची खाडी ह्यामध्ये हा चिंचोळा कोळीवाडा आहे.
आई आणि बायकोत चेपलेल्या मुलासारखा हे हे हे.

पण इकडून मुंबुड्याची निराळीच आणि मस्त स्कायलाईन दिसते.



त्या मुलीला सोडल्या सोडल्याच एक टिपिकल कोळी जोडपं टॅक्सीत चढलं.
त्यांना चर्चगेट स्टेशनला जायचं होतं.
आत्ता काय आलो तसंच बाहेर पडायचं.
मी फुल्ल कॉन्फिडन्समध्ये सणसणत मंत्रालयापर्यंत पर्रफेक्ट आलो आणि... हगलो.
तिकडून चर्चगेटचा राईट मारण्याऐवजी लेफ्ट मारला :(
नेहमी मी कूपरेज ग्राऊंडच्या पलीकडल्या बाजूने येतो आज पहिल्यांदा अलीकडून आलो त्यामुळे असेल बहुतेक.
लेफ्ट सरळ मरीन ड्राइव्हला जातो.
मी मनातल्या मनात त्यांना आपला घोटाळा कळला नसेल अशी आशा करत गाडी साळसूदपणे हळूच मरीन ड्राइव्हला वळवली.

आता पुन्हा अम्बॅसेडर हॉटेलकडे राईट मारला की चर्चगेट.

पण झोल पचायचा नव्हता.
कोळी मामा आधी हळू हळू आणि मग ताड ताड उकळायला लागले.
"आम्हाला काय येडा बनवतो काय?" वगैरे...
त्यांची तीन तीनदा माफी मागितली पण ते जरा जास्तच भडकले होते.
त्यांची बायको बिचारी माउली होती पण,

"आवो जावंदे, सॉरी बोल्ले ना ते. त्याचा काय येवडा?  आणि मग टर्न मारायच्या आदीच सांगायचा ना त्याला..."
तुमाला येवडा म्हायती होता तर..."

तिनी पॉईंट काढला.
शेवटी ते धुसफुसत गप्प झाले.

९० रुपये झाले त्यांनी १०० ची नोट दिली...
माझ्या चुकीचं परिमार्जन म्हणून मी त्यांना ५० परत द्यायला लागलो.
पण त्या जेश्चरनी त्यांना अगदीच भरून आलं...
माझा घोटाळा मोठ्या मनानी माफ करत त्यांनी ८० रुपये घ्यायला लावले.

प्रेमानी जग जिंकता येतं वगैरे....

चर्चगेट स्टेशनवरूनच हाजी-अलीला जाणारी चार-पाच मुलं टॅक्सीत बसवली.
यु. पी. साईडचेच गरीब मजूर होते. त्यांनासुद्धा वाजवी दरात सोडल्यामुळे साश्चर्य खुश झाली पोरं.

हाजी-अली सिग्नलवरून गाडी हळूहळू वरळीच्या दिशेनी टाकली... अशीच एमलेस!

उजवीकडे सरदार पटेल स्टेडियम ठेवून थोडं पुढे गेलं की एक छोटा सिग्नल नेहेमी लागतो.
डावीकडे छोटा देखणा रस्ता परत समुद्राच्या दिशेनी जातो बहुतेक.

भेंडी ४३ वर्षं मुंबईत काढली पण कधी लेफ्ट मारायची सवड / इच्छा झाली नाही...
सो व्हाय नॉट आज... रप्पकन लेफ्ट मारला.













अच्छा इकडेच ही समुद्र-महाल बिल्डींग आहे च्यामारी!
येस बँकेच्या राणा कपूरमुळे सध्या जरा फेमस (?) झालीय ही बिल्डींग.

समुद्र-महालच्या  बाजूच्या रस्त्यानी सरळ पुढे गेलो.
हाही रस्ता प्रायव्हेट आहे खरं तर.
इकडे एक वॉचमन होता पण हा अगदीच 'झेन' म्हणता येईल असा चिल्ड आऊट होता.
त्याला काही प्रॉब्लेम असेलसं वाटलं नाही.
जाताना उगीच त्याला हात दाखवला, त्यानंही दाखवला :).
(अवांतर जुगाडू टीप:
नाकाबंदी, वॉचमन अशा अडवल्या जाण्याच्या ठिकाणी वापरायची ही मुंबईकरांची ऍग्रेसिव्ह आयडीया आहे.
नवीन सोसायटीत जाताना वॉचमनला उगीचच क्या दोस्त कैसा हय, खाना हुआ क्या असं म्हणून पहा. तो हसून आत जाऊ देणारच...
पोलीस नाकाबंदीत तर आमची मैत्रीण अनुया ही तर सरळ गाडीचा आतला लाईटच ऑन करते.
एवढं सहकार्य बघून बिझी पोलिसांनासुध्दा बरं वाटतं आणि ते सरळच जाऊ देतात आपल्याला.
आपला आणि त्यांचा दोघांचाही वेळ वाचतो.)   


तर हा निर्जन रस्ता सरळ समुद्राच्या टोकालाच थडकतो.
इकडून समुद्रात डावीकडे हाकेच्या अंतरावर हाजीअली दिसतं.
इकडे मा हजानी दर्ग्याची जुनी देखणी इमारत आहे.

ही फारशी कोणाला माहीत नसलेली खिन्न मेलनकॉलिक जागा माझी आवडती होत जाणार असा मला दाट संशय येतोय. 




आजची कमाई:
८०० रुपये




















































Saturday, August 15, 2020

टॅक्सी दिवस ७: २ फेब्रुवारी २०२०

टॅक्सी ताब्यात घेऊन आज सरळ पार्ल्याला लायब्ररीत गेलो.
टिळकमंदिरची ही खूप जुनी आणि मस्त लायब्ररी.
पण आजकाल महिनो न महिने पुस्तक बदलायचं राहून जातं...
माझ्याकडून दंड घेऊन घेऊन शेवटी इकडच्या मुलींनाच माझी दया येते आणि त्याच परस्पर पुस्तकं एक्स्टेन्ड करतात.
(इकडे पाहिल्यापासून सगळं स्त्री राज्य आहे. ह्या लायब्ररीला "ऍमेझॉन" म्हटलं तर ते बऱ्याच अर्थानी चपखल बसेल :))
...
पार्ला कॉलेजला असताना मी आणि मित्रवर्य सचिन भट दोघं रोज आपापली दोन पुस्तकं वाचून मग स्वॅप करून आणखी दोन वाचून दुसऱ्या दिवशी परत लायब्ररीत हजर व्हायचो...
आणि  काउंटरवरच्या मुलीनी आ वासला की आसुरी आनंदाने टाळ्या द्यायचो ते आठवलं.

गेले ते दिन गेले...

पण आज किरण गुरवांचं "राखीव सावल्यांचा खेळ" घेतलं.
(क्लास कथा आहेत एकेक... "बलबीराचे पाश" मला सगळ्यात आवडली.)

पार्ल्यावरून एक डायरेक्ट आर्थर रोडचं भाडं मिळालं.
(लांबच भाडं मिळाल्याने मी खुश!)
पॅसेंजर बहुतेक भायखळ्याच्या फुले मंडईतला फळांचा किंवा भाज्यांचा ट्रेडर असावा.
छान दिलखुलास माणूस होता.
गावी नुकतंच छोटंसं घर बांधलं होतं त्यामुळे  खूप खुश होता.
मित्राला फोनवर सांगत होता, अरे बाल्या मस्त गावच्या घरी गच्चीव खाट टाकून लोळायचं आणि दोन पोरी द्राक्ष भरवायला...
आम्हा पुरुषांच्या फॅंटसीज तशाही शतकानुशतकं त्याच आहेत :)

मग जे. जे. फ्लायओव्हरजवळ एक स्मोकर उचलला.
शिस्तीत सिगरेट विझवून तो तंद्रीत टॅक्सीत बसला.
म्हणजे असं मला ग्लोरिफाय नाय करायचंय पण काही काही हेव्ही स्मोकर माणसं जाम सेक्सी वाटतात मला...
त्यांच्या काळसर ओठांसकट.
हाही असाच खूप ऑर्डीनरी असूनही हँडसम होता.
मला उगीचच नवाजुद्दीनची आठवण झाली...
तो तर सरळ सरळच हँडसम आहे पण त्याच्या अंगाला कायम सिगरेटचा वास येत असणार असं मला का कोण जाणे वाटत राहतं...
त्यातून बाबा आठवले, त्यांच्या अंगाला विल्स सिगरेट + मुंबई लोकल्सचा घाम + ओल्ड स्पाईसचं मस्क फ्लेवरचं आफ्टरशेव्ह असा तिपेडी वास यायचा.
मी त्यांच्या तुंदील पोटात तो वास घेत घेत खोल घुसत जायचो.

आजचा दिवस पुरुषांच्या नावे आहे बहुतेक...

तिकडून एक कोवळं मुस्लिम कपल उचललं त्यांना 'गुलशन ए इराण' ला जायचं होतं.
इट सीम्स हे हॉटेल भेंडीबाजार / पायधुणी / महम्मद अली रोडच्या लोकल क्राउड मध्ये बरंच पॉप्युलर आहे.
ट्राय करायला हवं एकदा... नेहमीचं 'शालीमार' थोडं मेन-स्ट्रीम झालंय आताशी.
...
...
...

बाकी मग काळा घोडा फेस्टिव्हल चालू असल्याने तिकडून बरीच भाडी मारली.
तिकडून एका तरूण पारशी कपल  आणि त्यांच्या बाबूला कुलाबा कॉजवेला सोडलं.
आज अचानक लक्षात आलं असावं तिच्या...
नवऱ्याला म्हणाली, "दस्तूर आ बध्धा टॅक्सीजना रूफ्स बहु अमेझिंग ??? हॅव यु एव्हर नोटीस्ड डिअर?"

आयला हो खरंच टॅक्सीजच्या रूफ कव्हर्सची हटकून इंटरेस्टींग पॅटर्न्स असतात.
उदाहरणार्थ हे माझ्या टॅक्सीचं रूफ:



कुलाब्याला आलो की इलेक्ट्रिक हाऊस वरून लेफ्ट मारून कूपरेज जवळच्या रस्त्यावर जायचं हे मला आता नीटच कळालेलं .
तिकडे गाडी लावून थोडा मायक्रो ब्रेक घ्यायचा पाणी बिणी प्यायचं... वहीत अशा नोंदी करायच्या... 
पुढेच सुलभ असल्याने हलकंही होता येतं. 

तेवढ्यात एक शिडशिडीत छान मुलगी बसली तिला चर्चगेटला सोडायचं होतं... 
ह्यावेळेस मागच्या रविवारी खाल्लेल्या चटपटीत मुलीच्या शिव्या स्मरून मी न  चुकता तो जुगाडू U टर्न परफेक्ट मारला.

तिकडून एका मुलीला ताजच्या पाठच्या गेटवर सोडायचं होतं. 
आता ताजच्या पाठच्या गल्लीत पण हे SSS खोदून ठेवलेलं  त्याच्या राईट किंवा लेफ्ट दोन्ही कडून एकच गाडी जाईल एव्हढी फकॉल जागा मला वाटलं खड्ड्यांच्या पुढे दोन्ही रस्ते एकमेकांना भेटतील म्हणून मी मनात टॉस करून गाडी राईटला घातली आणि च्यायची पुढे रस्ता बंद. 
झक मारत पुन्हा गाडी बाहेर आणून - पुन्हा कुलाबा कॉजवेवर आणून पुन्हा - रिगलचा U मारून गाडी कशीबशी ताजच्या ढुंगणाला लावली.     

अस्सल मुंबईकर मॅडमचा डोळ्यांतला संताप अर्थातच माझी पाठ भाजून काढत होता. 
शिवाय तिची हॉटलेची शिफ्ट असणार आणि आधीच उशीर झाला असावा बहुतेक तिला. 

परत सॉरी सॉरी बोलून ४६ चे ३० च घेतले.  

आज जहांगीरजवळच्या रस्त्यावर काळा घोडा फेस्टिव्हलची उत्फुल्ल गडबड होती. 

आयुष्यभर मुंबईत राहून फेस्टिव्हलला जायचा योग आला नव्हता... आज जाऊयाच बोल्लो माँ की आग!

हुतात्मा चौकातल्या रिंगणातल्या पार्कींग लॉट मध्ये टॅक्सी बरोब्बर एका तासासाठी पार्क केली.

हे सेंटर पीसचं इन्स्टॉलेशन आवडलं



आणि हा आमच्या मुंबईच्या एरियल फोटोग्राफी प्रदर्शनातला हा आमच्या गव्हर्नमेंट कॉलनीचा फोटो:




(मार्क केलेला आमचा चौक) 

गर्द झाडांमधल्या ह्या सुबक कॉलनीत वाढतानाच्या असंख्य कडू-गोड आठवणी आहेत...

स्वतःच्या आणि खास दोस्तांच्या जीवावरच्या मारामाऱ्या / प्रेमप्रकरणं / ब्रेकअप्स / एकसंध जोडलेल्या गच्चीतले घामेजलेले मेकाऊट्स / गणपती / दिवाळ्या / होळ्या / हंड्या / मॅचेस / पार्ट्या आणि काय काय आठवून पोटात तूटलं... 

आमचा चौकही तूटलाय आता... 

कालाय तस्मै वगैरे... 

एक तास संपायला आला होता... 
काळा घोड्याच्या चेतना हॉटेलचं पण बरंच नाव बरीच वर्षं ऐकून होतो. 
फटाफट थाळी खाल्ली... ठीक वाटली... नॉट ग्रेट आणि चिकार महाग, जिलबी मात्र छान. 

टॅक्सी लॉटमधून काढायला गेलो तर पार्किंगमधला इसम १०० रुपये मागायला लागला.
ह्या टेबलनुसार टॅक्सीचा रेट ३५ रुपये आहे.


हुज्जत घातल्यावर तो बोर्ड वेगळ्या पार्कींगचा आहे वगैरे काहीही वेडा बनवायला लागला.
अरे साक्षात पार्किंगच्या रिंगणात असलेला बोर्ड दुसऱ्या पार्किंगचा कसा असेल?

शेवटी ७० रुपये घेतले.

माझ्या गाडीचं प्रायव्हेट पार्किंग समजलं तर सत्तर रुपये ठीक आहेत
पण टॅक्सीचे खरे ३५ च हवेत.

इन जनरल ते माणूस बघून बिल फाडतायत.

आजूबाजूच्या दोन तीन लोकांना विचारलं असता सर्रास त्यांच्याकडून तासाभरासाठी १०० / दोन तासांसाठी २००  रुपये घेत असल्याचं कळलं.


ह्या लूटमारीचा कडाडून निषेध!

बाकी मग फेस्टिव्हलला उत्साही लोकांची गर्दी असल्याने कुलाबा-काळाघोडा-चर्चगेट अशी भाडी मारत राह्यलो.

चार विरारवाल्यांना चर्चगेटला सोडलं आणि जडावून झोप आली एकदम. 
जिलब्या बहुतेक अंगावर आल्या :)

चर्चगेट स्टेशनच्या (विरारकडे तोंड केल्यास) उजवीकडे काही शांत गल्ल्या आहेत एस एन दि डी टी कॉलेजच्या आसपास.
ही पण एक आम्हा टॅक्सीवाल्यांच्या विश्रांतीची आवडती जागा.
इकडे टॅक्सी लावून वीस मिनटं डोळे मिटले...

तेवढ्यात थाड्कन टॅक्सीवर आपटलं काहीतरी...
तीनचार पोरं फुटबॉल घेऊन चालली होती...
मी थोडी खुन्नस दिली...
"अंकल मै  नही इसने मारा", त्यांनी एकमेकांवर बिल फाडलं.

आम्ही पण कॉलनीत असेच अत्रंगी होतो त्याची आठवण येऊन हसू यायला लागलं.

झोप तशीही उडाली होती एक कडक चहा मारला आणि परत भाडी मारायला लागलो.


आजची कमाई: ६५० रुपये
 

















  






















 

Sunday, August 9, 2020

टॅक्सी दिवस ६: २६ जानेवारी २०२०

आज सव्वीस जानू असल्यामुळे पहिले छूट छातीला झेंडा चढवला.





















वाळकेश्वरवरून एका पारसी बाबाला मेट्रोला सोडला.
त्यानं थोडी सुट्टया पैशांवरून कटकट केली.
चलता है!

मग मेट्रोलाच गाडी लावून कयानीमध्ये मस्त आम्लेटपाव खाल्ला.
रविवार सकाळ असल्यामुळे मेजर गर्दी होती.
कयानी पाहिल्यापासून आम्लेट-पाव, ब्रूम मस्का आणि खास करून मटण समोशांसाठी फेमस आहेच.
शिवाय आजकाल सोशल मिडीयामुळे जुन्या फेमस अड्ड्यांची अजूनच हवा होतेय.
चांगलंच आहे.

मी एकटा जीव असल्याने शेअरींगला रेडी होतोच.
कयानी, गिरगावचं प्रकाश, किंग्ज सर्कलचं अंबा भुवन, / (पुण्यात) वैशाली अशा बिझी ठिकाणी नाटकं न करता शेअरींगला तयार झालात तर जागा लवकर मिळण्याची शक्यता पाच-पटीने गुणिले होते हे मी इथे नमूद करू इच्छितो.
(प्रकाश आणि अंबा भुवनला जाण्याचा प्रयत्न करीन टॅक्सिनाम्यात... माझी खास आवडती ठिकाणं आहेत.)

कयानीत माझ्या युनिफॉर्मकडे बघून सगळे थोडे कन्फ्यूज झाल्यासारखे वाटले.
पण कोणी अर्थातच काही बोललं नाही.

माझ्या टेबलावर दोन श्यामक दावरच्या ट्रूपमध्ये असतात तशी शिडशिडीत चिकणी पारशी मुलं आणि एक आय. टी. टाईप्स कपल होतं.
वेटर थोडे आमच्यावर वसवसत होते...
पण ते बिझी आहेत हे साक्षात दिसत होतं.
आणि वेटर्सचा उद्धटपणा = हॉटेलची टेस्ट / किंमत हे समीकरण जगजाहीर आहे.

पण पोरं तरुण आणि (शिवाय पारशीच :)) असल्यामुळे जरा वेटरवर वैतागली होती.
"वॊट फकिंग ऍटिट्यूड ही इज थ्रोइंग" वगैरे पुटपुटत होती.

मी न राहवून म्हणालो,
"ऍटिट्यूड इज पार्ट ऑफ चार्म मेट."
माझ्या युनिफॉर्ममुळे ती थोडी सरप्राइझ्ड झाली हे हे हे :)

जाताना काउंटरवर चक्क रासबेरी सोडा दिसला.
लगेच बायकोसाठी दोन बाटल्या घेऊन टाकल्या,
हे देखणं माणिक ड्रिंक माझं भारी आवडतं आहे:
आज-काल फारसं बघायला मिळत नाही. 






तिकडून दोन बायका आणि एका मुलीला उचललं.
आई मुलगी बहुधा पुण्याच्या आणि मावशी मुंबईची होती.
पुण्याच्या लोकांची मुंबईच्या घामाबद्दलची क्लिशेड तक्रार चालू होती.
शिवाय एका श्रीमंत शेजारणी बद्दल आई-मुलीचं कॉन्स्टन्ट बिचींग चालू होतं.
ती म्हणे घरून चितळ्यांचं म्हशीचं दूध उसनं नेते आणि परत देताना (स्वस्त) गाईचं दूध देते :)
काही बोला उसन्याचा हा प्रकार भारी आवडला मला.

त्यांना रीगलजवळ सोडलं.

तिकडून एका स्मार्ट चटपटीत मुलीला उचललं.
तिला चर्चगेट स्टेशनला जायचं होतं.
आता इकडे प्रॉब्लेम असा आहे की कामा रोडवरून इरॉस टॉकीजच्या दिशेनी राईट बंद आहे.
म्हणून मी गाडी सरळ पुढे मंत्रालयाच्या दिशेनी नेली म्हटलं जिकडे मिळेल तिचे यु टर्न मारूया.
पण पाठी पोरगी करपली.
'अरे इधरसे क्यू लाया लेफ्ट मारके यु टर्न मारने का था शॉर्टकट है रोज का' वगैरे वगैरे...
तणतणायला लागली.


आता हा खालचा जुगाडू यु टर्न म्हणजे एकदम हार्डकोअर रोज मुंबईत जा ये करणाऱ्या ड्रायव्हर आणि प्रवाशाला माहित असणार...
शिवाय तसं पाहिलं तर मंत्रालयाचा 'यु' हार्डली ३०० मीटरनी जास्त असेल.


पण मुंबईकर सेकंदा-सेकंदाच्या हिशोबावर चालतात हे तर फेमसच. 
सो मी चूपचाप शिव्या खाऊन घेतल्या.
पैसे नको देऊ सांगितलं पण पैसे मात्र दिले तिनी.
ठीकाय लेसन लर्न्ट!

चर्चगेट स्टेशनवरून  दोन चिकणी गुजराथी मुलं उचलली.
बडोदा का सुरतची होती.
मुंबई काय काय बघता येईल विचारत होते.
त्यांना थोडी रेकमेंडेशन्स दिली आणि लिओपोल्डला सोडलं.

कुलाबा कॉजवेवरून नेहेमीच्या रस्त्यावरून सरळ जाण्याऐवजी इलेक्ट्रिक हाऊस वरून असाच लेफ्ट मारला  आणि अवचित ह्या शांत निवांत कूपरेज रोडवर पोचलो. 
सध्या फक्त आईतवारीच टॅक्सी चालवत असल्यामुळे इतर दिवशीचं माहीत नाही पण रविवारी तर हा रस्ता भारी निवांत असतो. 
डावीकडे कूपरेज फुटबॉल ग्राऊंड आणि उजवीकडे अँटिक बिल्डिंग्ज असलेल्या ह्या रस्त्यावर बरेचसे टॅक्सी /उबरवाले गाड्या पार्क करून विश्रांती घेतात. मी ही थोडं चिल केलं.  

















मग मंत्रालयाजवळून ड्युटी संपवून दमून घरी चाललेल्या दोन पोलिसांना उचललं आणि व्ही. टी. स्टेशनला सोडलं.

व्ही. टी. वरून असाच भायखळा परळ करत एल्फिस्टनला आलो.
तिकडून दादर स्टेशन - सिद्धिविनायक - दादर स्टेशन अशी दोन तीन भाडी मारली.

माझ्या एका मित्रानी ही आयडिया मला आधीच दिली होती.
मला टॅक्सी मिळत नसल्याने मी फ्रस्ट्रेट झालो होतो तेव्हा तो म्हणालेला,
"अरे वेड्या तुला समाजसेवाच करायचीय तर दादर स्टेशनला तुझी गाडी घेऊन जा आणि फक्त सिद्धिविनायक असं ओरड, लोकं धावत येतील."

खरंच स्टेशनवर सिद्धिविनायकला जायला भाबडे भाविक खूप होते.
हेच तर पाहिजे होतं आपल्याला.

आता घराच्या एवढ्या जवळ आलोय तर घरी जेवायलाच जाऊया म्हणून गाडी बॅन्ड्राला टाकली.
पण अक्षरशः घराच्या खाली एका फॅमिलीनी सिटीलाईटला जाणार का विचारलं.
भूक मजबूत लागलेली एक क्षण नाही म्हणावं वाटलं...
पण संधीवाताचा त्रास असलेले म्हातारे आजोबा होते...
घेतलं त्यांना.
तानाजी मूव्ही बघायला चालली होती फॅमिली.
नातू जरा आगाऊ होता. बापानी लाडावला होता बहुतेक.
आधीच त्रासलेल्या आजोबांना इरिटेटिंग प्रश्न विचारून हैराण करत होता.
आमच्या लहानपणी गव्हर्मेंट कॉलनीत अशा आगाऊ पोरांना मोठ्या मुलांकडून डोक्यात खवडे मिळायचे त्याची आठवण झाली :)

सिटीलाईटच्या समोरच गोपी टॅंक मंडई.
मासे-खाऊंची काशी-काबा वगैरे.
शिरीष कणेकरांनी त्यांच्या लेखांतून फेमस केलेली वगैरे.
सो साहजिकच इकडून एका कोळीण मावशीला घेतलं आणि माहीमच्या मच्छिमार कॉलनीत सोडलं.

तिकडून परत दोन कोळणींना उचललं त्यांना कापड बाजारला टाकून घरी सुटलो.
कोलंबीचं लोणचं आणि तळलेली मांदेली वाट बघतायत.
त्यात कोळणींच्या पाट्यांमुळे टॅक्सीत घमघमाट माहौल तयार झालेला.

लेट्स फकिंग इट!


मासे - मासे - मासे SSS

आजची कमाई: ३४५ रुपये
















Saturday, August 1, 2020

टॅक्सी दिवस ५: १९ जानेवारी २०२०

आज दोनच भाडी मारली.

एका माझ्या मेमे मावशीसारख्या दिसणाऱ्या प्रेमळ बाईला रे रोडला सोडली.
तिने मला भायखळ्याच्या "S" ब्रिजचा रस्ता दाखवला.
भारी डौलदार आहेत हे पूलबुवा.

















मावशीबाई एक्सपर्ट कूक होत्या.
पारसी / गुजराथी / मुघलाई / चायनीज फूड,
नल्ली निहारी / बिर्याणी /  केक्स सगळं काही बनवायच्या.
लवकरच अमेरिकेला कूकिंगचे क्लास घ्यायला चालल्या होत्या.

रे रोड वरून डायरेक्ट घाटकोपरचं भाडं मिळालं.
मी लांबचं भाडं मिळालं म्हणून खुषारलो.
(हार्डकोअर टॅक्सीवाला बनत चाललोय हळूहळू ;))

पण लाल बहादूर शास्त्री रोडवरून एक चिंचोळा लेफ्ट मारला आणि बाबा माझे...
टिपीकल असल्फाच्या स्लम्समधून चढणारा चिंचोळा रस्ता.
साक्षात नेमाडेकाकांची समृद्ध अडगळ!
दोन्ही बाजूला लावलेल्या बाईक्स, दुकानं, चिल्ली-पिल्ली आणि अर्थात समोरून येणाऱ्या गाड्या.

इकडे तिकडे गाडी लागली तर राडा!
च्यायला फुल्ल टू स्ट्रेसमध्ये.
पण ते न दिसू न देता वर्षानुवर्षं इकडे येत असल्याचा आव आणून कशीबशी गाडी घुसवली.
अशा ठिकाणी यु टर्न मारणं म्हणजे अजून एक दिव्य
पण एका बंधूभावी रिक्षावाल्यानं "आने दो, मारो फुल्ल श्टेरींग" करत हेल्प केली आणि मी उताराला लागलो.

आत्ता मी जरा जरा मजा घ्यायला लागलेलो निरुंद रस्त्याची.
एक्झॉटिक गिचमिड गल्ल्यांतून गाडी मारणारा 'जेसन बोर्न' असल्याचा जरा जरा फील  यायला लागलेला.
तेव्हढ्यात गल्लीतून बाहेर पडता पडता अगदी शेवटी एका बाईकला हलके घासलीच.
'जेसन बोर्न' सायबांची हवा टाईट...
पण इकडे तेव्हढं चालून जात असावं बहुधा... कोणी ढुंकूनसुद्धा बघितलं नाही.

पण मी मात्र हळहळलो.

एव्हरेस्ट चढलो नी मोरीत पडलो वगैरे.

...
...
...

मागच्या आठवड्यात बायकोचे वडील अचानक गेले त्यामुळे ती प्रचंड डिस्टर्ब्ड आहे.
रात्री सरळ मीरारोडला थडकलो आणि तिला उचलली.

रविवारी रात्रीच्या निवांत मुंबईत दोघं एमलेस फिरलो.

तिचं दुःख थोडं हलकं झालं का? माहीत नाही... बहुतेक नाहीच...
मला मात्र रात्रीची मुंबई आणि व्हल्नरेबल बायको दोघांविषयी य' व्यांदा माया दाटून आली.






आजची कमाई: ६५० रुपये
(बायकोला अर्थात फ्री राईड)