Tuesday, June 23, 2020

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३१ मे ते २ जून

निघताना नाही म्हटलं तरी आतून थोडं हलकं वाटत होतं.

युनिव्हर्सच्या जगड्व्याळ...
(बाय द वे हा 'जगड्व्याळ' शब्द भारी आवडतो मला)
भांड्याला आपण सूक्ष्म काही का होईना पोचा मारला
असं काहीतरी फिलींग येत होतं.

थोडा खुशीतच नाशिकच्या निवांत रस्त्यांवरून
सरसर परत निघालो.
जाता जाता दिसलेला
एका निवांत सरकारी कॉलनीतला हा देखणा रस्ता:

नाशिक रोडवर पुढे पायानी थोडं अधू असलेला एक माणूस पाय ओढत चालताना दिसला.
त्याचे केस मेंदीमुळे भडक लाल रंगाचे झाले होते.
मला उगीचच ती शेरलॉकची होम्सची लाल केसवाल्या माणसांची गोष्ट आठवली

त्याला बोल्लो, "भाई बस सिन्नरपर्यंत सोडतो तुला."
हा बिचारा पेशानी रंगकाम करणारा होता.
शिर्डीला पायी निघाला होता.

हातावर पोट असलेल्या मजुरांचे आपण अपराधी आहोत हे
बोलणंसुद्धा 'ढोंगी' वाटावं अशी परिस्थिती आहे...

त्याला सिन्नर फाट्याला सोडला.
तितक्यात एका अननोन नंबर वरून फोन आला.

कोणी साहूजी म्हणून लीडर होते उन्नाववरून.
उन्नाव अर्थातच माहिती होतं.
(साहूजींचा पक्ष कोणता त्यात नको शिरुयात.)
साहूजी पण त्या तीन मुलांच्या संपर्कात होते आणि त्यांनी माझे खास नॉर्थच्या मृदू आर्जवी स्टाईलमध्ये आभार मानले. 

मी घरच्या ओढीनं गाडी बिंग-बिंग मारत चाललो होतो.
हा परतीचा एकला ड्राईव्ह एन्जॉय करत नव्हतो असं काही मला म्हणवत नाही...
नुकतीच सर्व्हिस मारलेल्या गाडीची तृप्त मांजरीसारखी सुखद गुरगुर...
उजव्या बाजूला मोकळं पठार...त्याच्या पाठी मागे नांदूर - संगमनेरचे डोंगर...
डावीकडे मोस्टली हिरवी शेतं...
मे शेवट असल्याने संध्याकाळचे पावणेसात वाजलेतरी 'नारायण सुर्वे' बऱ्यापैकी फॉर्मात होते.
आणि त्यात हलका पाऊस सुरू झाला.
पुढे जवळ जवळ तासभर तरी गाडीतून समोर छान इंद्रधनुष्य दिसत राहिलं.

नारायणगावाजवळ सात वाजता पुन्हा नाशिकचे सत्संगी धनंजय ठाकरेंचा फोन आला.
बस-स्टॅण्डवर त्यांनी तिघांना जेवण पोचवलं होतं.
अमेझिंग को ऑर्डिनेशन... सत्संग हॅट्स ऑफ!

असंच को ऑर्डिनेशन मगाशी बसच्या वेळेस मिळालं असतं तर?...

मी स्वतः, प्रशासन, समाजसेवी संस्था आणि आपण सगळेच ह्या करोनाकाळात इंडियन टीमसारखे वागतोय.

एकाच वेळी प्रचंड ब्रिलियंट आणि प्रचंड ढिसाळ असं काहीतरी.

बाणेरला घरी पोचे पोचे तो दहा वाजले.

प्रचंड दमलो होतो... आई आणि बायकोनी आल्या आल्या आधी अंघोळीला पळवलं.
गर्रम शॉवरखाली बसून एक गारेगार बीअर मारली.
फ्रेश होऊन जेवायला बसे बसे तो अकरा!

सगळे जेवायला बसणार इतक्यात कुशलेंद्रचा फोन आला,

रात्रीपर्यंत जवळ जवळ १२ मजूर एस. टी. स्टॅण्डवर जमले होते.
पण आर. टी. ओ. चे लोक आले आणि सांगितलं की दुपारच्या बसेस शेवटच्या होत्या.
आज एकतीस मे असल्याने उद्यापासून अनलॉक १.० चालू होईल आणि परप्रान्तीय मजुरांना सोडणाऱ्या बसेस आता थांबवल्यायत.

सगळं विजयी-बिजयी फिलिंग खाड्कन उतरलं.
बेसिकली जगातलं सगळ्यात वाईट टायमींग होतं आमचं.

ऑफीशियली लॉक डाऊन संपल्यामुळे मजुरांची बसेसची सोय काढून घेतली होती.
आणि नॉर्मल सोयी तर अर्थातच इतक्यात चालू होणार नव्हत्या.

एस. टी. स्टँडच्या कंट्रोलर साहेबांशी बोलून बघितलं. १२ मजुरांसाठी एक शेवटची बस सोडता आली असती.
विनवण्या केल्या पण त्यांचा नाईलाज होता. 'वरतून' परवानगी नव्हती.

परत कुशलेंद्रला फोन केला तर तिनाचे बारा झालेला त्यांचा ग्रुप विनातक्रार एस. टी. स्टॅन्ड सोडून अपरात्रीच पायी चालायला लागला होता.

साहू साहेबांना फोन करून काही मदत होऊ शकेल का बघितलं ते ही प्रयत्न करत होते पण इतक्या रात्री अर्थातच काही शक्य नव्हतं.

शेवटी हिंपुटी होऊन झोपलो.

१ जून:
सकाळी साहूजींचा फोन आला.
रात्रभर चालल्यावर नाशिकच्या थोडं पुढे आपल्या पोरांना एका यु. पी. च्या बसवाल्यानी घेतलं होतं.
तो त्यांना भोपाळला सोडणार होता.
थोडं हायसं वाटलं आणि सोमवारच्या मीटिंग्जच्या धबडग्यात बुडून गेलो.
संध्याकाळी साडेसहाला परत कुशलेंद्रचा फोन आला.
हे लोकं भोपाळला पोचले होते.

उद्या त्यांची रेवाला जायची व्यवस्था होणार होती.
भोपाळ ते रेवा अजून ११ तास.
तिकडून शाहडोल ४ तास.
तिकडून बांधवगडच्या जवळपास त्यांचं घर ५० किलोमीटर.

२ जून:
संध्याकाळी  पावणेपाचला फोन आला.
आपली पोरं घरी पोचली होती.

त्यांना आणि मलाही खूप खूप काही बोलायचं होतं..
पण ते बरेचदा "बहोत शुक्रिया" आणि मी बरेचदा "चलो अच्छा हुआ" इतकंच बोलत राहिलो.
तसंही आम्हा पुरुषांना आनंद नी प्रेम खुलून व्यक्त न करायचा बद्धकोष्ठी प्रॉब्लेम असतोच.

कधीतरी बांधवगडला येण्याचा वायदा करून आम्ही फोन ठेवला.

फाय-फकिंग-नली !!!

(दोन महिने आधी गोव्यावरून आणि)
३१ मेला सकाळी दहा वाजता पुण्यावरून चालू झालेली त्यांची फरफट शेवटी संपली होती.

मी त्यातल्या एका अगदी अगदी छोटयाशा तुकड्यात त्यांच्या बरोबर होतो.

अशा लाखो अश्राप जीवांचे लॉकडाऊनमध्ये किती आणि कसे हाल झाले असतील ह्याची किंचितशी कल्पना आली असं कदाचित म्हणता येईल.

बाकी काही निरीक्षणं:
  • आधीच सांगितल्यानुसार समाजसेवी संस्थांचा अप्रतिम समन्वय बघायला मिळाला. 
  • पोलीस, एस. टी. वाले. आर. टी. ओ. ह्यांचाही हडेलहप्पी अनुभव आला नाही. थेट मदत करू शकत नसले तरी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सगळे काम करतायत. हायवेवर भेटलेल्या 'त्या' एस. टी. ड्रायव्हरनीसुद्धा पोरांना घ्यायचं नाकारलं कारण त्यालाही मध्येच रस्त्यात माणसं घेण्यात धोका वाटला असू शकतो.   
  • पण नाशकात कुठून बस सुटतायत हे मात्र कोणी नीट सांगितलं नाही आणि आमचा बहुमोल वेळ वाया गेला त्याची चुटपुट लागून राहिली. 
  •  अनलॉक वनच्या पूर्वसंध्येला आम्ही गेलो ते भिक्कारचोट टायमींग होतं. "लॉकडाऊन"मधल्या गरिबांसाठीच्या सोयी काढून घेतल्या गेल्या पण "अनलॉक" काही लगेच चालू झालं नाही. 
  • निवांत सामसूम नाशिक अजूनच सुंदर दिसतं :)


बाकी घरी हॉट बायकोनी चार दिवस सेल्फ-क्वारंटाईन करायला लावलं तेव्हा हालत थोडीफार "वुल्फ ऑफ वॉल..." मधल्या लिओ सारखी झाली होती...

आणि जाता जाता साहूजींची परवानगी घेऊन त्यांचा डी. पी. टाकतोय.
ह्यातले साहूजी कोण ते तुम्हीच ओळखा.




                                            ---------------- समाप्त----------------












































Saturday, June 6, 2020

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३१ मे २०२०... डी-डे

चला ऑल  सेट !
रात्री मास्क, ग्लोव्ह्ज वगैरे सगळी तयारी केली.
बायको तर बॉर्डरवर चाललेल्या जवानासाठी होतात तशी सेंटीमेंटल झाली होती.
"अय जाते हुए लम्हो जरा ठेहरो" वाजणार असं वाटायला लागलं...  
महादेवाची फॅन असल्याने बिचारीने रुद्राक्षाची माळसुद्धा बॅगेत टाकली. 

सकाळी झटपट उठून वाकड ब्रिजवर तीन मुलं आणि पुण्यातील सत्संगी कोऑर्डिनेटर हरीश ह्यांना भेटलो. 

अमित पटेल, कुशलेंद्र पटेल आणि सिजू पटेल.  
तिघेही लहानखुऱ्या चणीचे. 
अमित आणि कुशलेंद्र देखणे टीनएजर, 
सिजू थोडा वयानी मोठा चेहेरा थोडाफार "रामगड के शोले"मधल्या डुप्लिकेट देवानंदसारखा. 

कोऑर्डिनेटर हरीश पण माझ्यासारखा आय. टी. वाला.

चाकण वरून कदाचित एम. पी. च्या बसेस सुटतायत असं ऐकून होतो. 
तिकडे एक फायनल प्रयत्न करायचं ठरवलं. 
चाकण तसंही ऑन द वे च होतं. 

तिकडे पोचलो आणि कळलं की बसेस सुटत होत्या पण दोन दिवसांपूर्वीच थांबल्या त्या.   
चलो नाशिक!

कोऑर्डिनेटर आम्हाला ऑल द बेस्ट देऊन परत निघाले.   
हो पण निघण्याआधी कोऑर्डिनेटर साहेबांनी सिजूची मांसामच्छी आणि मद्यपानावरून 'सत्संगी' शाळा घेतली. 
त्यांची खरंच खूप मदत झाली पण प्रत्येकाचा किंचित का होईना अजेंडा असतोच नाही म्हटलं तरी. 
सिजूही अगदी मान डोलावत होता पण मास्क आडचे त्याचे डोळे मात्र मिस्कील हसत होते.

शेवटी जगात फ्री लंच असं काही नसतंच हेच खरं!

फायनली ११ वाजता आम्ही निघालो.



रेडिओवर "मन की बात" लागलं होतं. 
थोडंसं ऐकलं पण बोअर झालो. 
एफ एम लावून टाकलं. 
पाठी तिघंही तसे गप्पच होते. 
मी थोडा-फार बर्फ फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी अवघडून उत्तरं दिली 
मी ही त्यांना मग जास्त पिळलं नाही. 
तुम्ही दोन महिने भणंग पायपीट करत असलात तर तुमचा पिकनिकचा मूड असणं शक्य नाही हे मान्यच.  

पण राजगुरूनगरजवळ "सोला बरस की बाली उमर को..." लागलं आणि सिजूनं मास्कमधून दबक्या आवाजात गायलाच सुरुवात केली.   
आत्ता एक दुजे के ची गाणी आवडणारा माणूस अगदी यंग नसणारच.  माझ्या आसपास वयाचा कदाचित... 
पण एकंदरीत सगळेच थोडे रिलॅक्स झाले. 
पुढे मंचर आळेफाटा संगमनेर...   
सिन्नरच्या आधी एका चेकपोस्ट वर अडवलं पण मजुरांना सोडायला चाललोय बोलल्यावर लगेच सोडलं. 
साधारण दीडला नाशिकला पोचलो. 
द्वारका सर्कल नाशिक रोड शहराच्याही थोडं पुढे आहे. 
तिकडे थोडी विचारपूस थडकलो.
हा नाशिक मधला एक मोक्याचा पॉईंट बेसिकली मुंबई पुणे आणि नाशिक शहरातून येणारे रस्ते इकडे एकत्र येतात. 
इकडे आपल्या चेंबूरसारखी लायनीत ट्रॅव्हल कंपन्यांची ऑफिसेसही आहेत.

प्लॅन असा होता की तिघांना इथे सोडायचं . 
मुंबई किंवा पुण्यावरून एम.पी.च्या दिशेनी जाणारा ट्रक-बस काहीतरी त्यांना मिळालं असतं. 
पण द्वारका सर्कलला फुल्ल सामसूम.

इकडून ट्रक-बस मिळणं अशक्यच वाटत होतं. 
बायकोनी सगळ्यांसाठी चीज पराठे दिले होते ते उभ्या उभ्या खाल्ले. 
आता खरं तर प्लॅनप्रमाणे मी निघायचं होतं पण माझा पाय निघेना. 
इकडून त्यांना शष्प काही वाहन मिळणार नाही हे सरळ सरळ दिसत होतं...
काय करावं? 
सत्संग संस्थेचे नाशिकमधले कार्यकर्ते धनंजय म्हणून होते त्यांनी सांगितलं की पुढे जळगाव-रोड वर जकातनाक्याजवळ बसेस-ट्रक्स थांबतात तिथे काही मिळू शकेल. 
चान्स घ्यायचं ठरवलं. 

पुन्हा सगळे गाडीत. 

जकात नाक्याच्या दिशेनी निघालो आणि बाजूनी एक लाल डब्बा जाताना दिसला. 
त्याला स्लो करून ओरडून विचारलं कुठची गाडी म्हणून?
तो म्हणाला, "एम. पी. बॉर्डर"

भेंचो SSS द लॉटरी!!!

त्याला थांबवत गाडी लिटरली बसला आडवी लावली... 
जॉनी गद्दारमध्ये आयटमला उचलायला नील-नितीन-मुकेश लावतो तशी... 
(बाय द वे अप्रतिम पिक्चर)   

खिडकीतून मुंडी काढणाऱ्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केली.

तो बोल्ला, "मेडिकल सर्टिफिकेट आहे का?"

"आहे साहेब", मी. 
तिघांचे ही पेपर्स क्लिअर होतेच. 
"बरं"... ड्रायव्हर अडखळत बोलला. 

तिघांनीही पटापट बॅगा काढल्या... एक एक सॅक होती फक्त 
(आमच्या मुंबईतून पुण्याला जाताना सात-सात बॅगा असतात. फकिंग लाईफ! फकिंग पर्स्पेक्टिव्ह!!)

आनंदात आम्ही नंबर एक्स्चेंज मारले आणि स्कूलबसला लेट झालेल्या पोराच्या आईच्या गडबडीत मी त्यांना बसमध्ये पिटाळणार... 

इतक्यात ड्रायव्हर बोल्ला, "नको नाय जमणार पाठच्या बसमधून या.
अचानक त्यानं पलटी मारली. 

माझ्या पोटात बोगदा... 

लिटरली  हात जोडून विनवण्या केल्या मी. 
मला रडायला यायचं बाकी होतं... 
(ती गुजरात दंगलीमधल्या माणसाची प्रतिमा आहे ना हात जोडून विनवण्या करणारी... 
मी माझ्या घाऱ्या डोळ्यांनी नी धूळभरल्या चेहेऱ्यानी तसाच दिसलो असणार असं मला नंतर हाईंड-साईट मध्ये वाटलं.)

पण ड्रायव्हरला काही दया आली नाही. 

एक क्षणात तो गाडीच्या बाजूनी बस काढून निघून गेला. 

त्या हायवेवरच्या भर्र उन्हात आम्ही चौघे हतबुद्ध!

हाता-तोंडाशी आलेला घास जाणं म्हणजे काय ते लिटरली कळलं मला त्यावेळी.

पण त्या तिघांना मात्र लॉकडाऊनने सवय करून दिली असावी अशा अगणित अपेक्षाभंगांची. 
कोरड्या नजरेनी तिघांनीही बॅगा पुन्हा डिकीत टाकल्या.  

ह्या जकातनाक्यावरही मरणप्राय सामसूम पुन्हा आम्ही बुचकळ्यात. 

एक मिनटापूर्वी रस्त्याच्या उलट्या बाजूला एक आर. टी. वाले. मामा दिसले होते. 


त्यांना कदाचित माहित असावं म्हणून पुढे यु-टर्न मारून आम्ही पुन्हा नाशिकच्या दिशेनी साधारण ५०० मीटर आलो आणि समोरच्या जळगाव रस्त्यावरून अजून एक एम. पी. ची बस पास झाली. 
जले पे नमक!

आर. टी. ओ. मामानं पकडलं ते एखादी बस थांबवून देऊ शकतील का विचारलं. 

ते म्हणाले, "पावर नाय! पण एक काम करा सरळ जावा हिकडून वीस एक किलोमीटर. विल्होळीच्या जैन मंदिरावरून बसेस सुटतायत दुसऱ्या राज्यातल्या मजुरांसाठी तिकडे जावा"

सरळ पुन्हा मुंबईच्या दिशेनी सुसाट निघालो.  

द्वारका सर्कल, नाशिकचा बॉम्बे नाका पार करून पुढे परत यु टर्न मारला. 

हे विल्होळीचं सुबक जैन मंदिर.


इकडे "करोना रिलिफ" चा बॅनर ही लावलेला आम्ही परत आशावलो. 
पण गेटवर सूमसाम:

वॉचमन काकांना विचारलं तर ते म्हणाले दोन दिवसांपूर्वीपर्यंत सुटत होत्या बसेस इथून पण आता ते थांबलं. 
कदाचित बॉम्बे नाक्यावरून सोडतायत वाटते. 

पुन्हा नाशिकच्या दिशेनी सुसाट.  

नाशिकचा बॉम्बे नाका!   
नावातच सगळं आलं. 

बॉम्बे नाक्याच्या बस स्टॅण्डवर आलो आणि एकदम लॉक-डाऊन अंगावर आला. 
इकडेसुद्धा स्म्शानशांतता. 

लायनीत लागलेल्या पन्नास साठ गप गुमान बसेस
आणि आख्ख्या स्टॅण्डवर दोनच माणसं एक कंट्रोलर आणि एक ड्रायव्हर. 

त्यांना विचारलं, "एम. पी. च्या बसेस?"

ते म्हणाले, "तासाभरापूर्वीच दोन सोडल्या लागोपाठ..." 
त्याच त्या दोन आमच्यासमोरून गेलेल्या. (मी  दात ओठ खाल्ले!)
आईच्ची जय... काखेत कळसा... 

द्वारका सर्कल आणि बॉम्बे नाका लिटरली २ किलोमीटर लांब आहेत एकमेकांपासून. 
आम्ही पन्नास किलोमीटर आणि मोलाचा तासभर वाया घालवला होता केवळ कोणी नीट ठोस माहिती न दिल्यामुळे :(



मी कंट्रोलर साहेबांना अजून एक बस सोडण्याची विनवणी केली. 

"तुम्ही बावीस माणसं आणा आत्ता अजून एक सोडतो." 

आत्ता बावीस माणसं कुठून येणार? 
हे तिघं जण होते. 
पण ड्रायव्हरसाहेब म्हणाले, 
"काळजी करू नका रात्रभरात जमतात माणसं. 
उद्या सकाळी हंड्रेड पर्सेंट सोडतो बस. 
ह्या लोकांना राहू दे एस. टी. स्टॅन्डवरच." 

तसंही एस. टी. स्टॅन्ड निवांत होता. 
इकडे त्यांना रात्र काढणं शक्य होतं... 
तिघा पोरांचंही तेच मत पडलं. 
नाशिकमधले सत्संगी धनंजय यांनी त्यांना रात्रीचं जेवण पोचवायची जबाबदारी घेतली. 
एकंदरीत उद्या ते घराच्या दिशेनी निघतील अशी आशा वाटायला लागली. 

मी पांच मिनिटांचा ब्रेक घेतला. 
तो निवांत एस. टी. स्टॅन्ड थोडा नजरेत साठवला.
बाहेर परिस्थिती वाईट आहे पण उन्हाळ्यातल्या लख्ख संध्याकाळची ती निरव शांतता मला आवडली नाही असे काही म्हणवत नाही. 
  
तोंडावर पाणी मारलं आणि तिघांचा निरोप घेतला.
त्यांना थोडे पैसे हवेयत का विचारलं तर अमित दुखावलाच एकदम... 
"पैसे नही चाहिये, बिलकुल नही चाहिये" तो तटकन उत्तरला.

मलाच वरमल्यासारखं झालं आणि त्यांना मिठ्या मारायचा मोह टाळून मी परत निघालो. 


  

क्रमश: 





   



   
  






  




  




  
      

Tuesday, June 2, 2020

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर ३० मे २०२०

शुक्रवारी मित्राशी पुन्हा एकदा कन्फर्म केलं.
तो म्हणाला आज थोडं काम असल्यामुळे शनिवारी निघेल त्या पोरांना घेऊन.
म्हटलं ठीक आहे तीनही मजूर पोरांचं आधार-कार्ड, मेडिकल सर्टिफिकेट वगैरेचे फोटोज वगैरे रेडी करूयात तोवर.
सगळी तयारी करून मी शेळ्यांची स्वप्नं बघत पुन्हा शुक्रवारी झोपलो.

शनिवारी उठल्या उठल्या मित्राचा मेसेज,
"बायको अजिबात हो म्हणायला तयार नाहीये, सॉरी"

भरोशाच्या म्हशीला टोणगा #$%^ 

माझ्या घरी पण थोडीफार हीच परिस्थिती असल्यामुळे त्याच्यावर रागवताही येईना.
घरी धीर करून सांगून टाकलं मलाच जावं लागेल म्हणून.
स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग वगैरे...

बायकोनी साथ सोवळ्याचे नियम वदवून घेऊन कशीबशी परवानगी दिली.
(बाय द वे "साथसोवळे" हा शब्द मित्रवर्य पंकज भोसले याने जगात रूढ केला असावा असा माझा दाट संशय आहे.)
आता आधी इ पास काढणं आलं त्यासाठी आधी माझं मेडिकल सर्टिफिकेट लागणार.
ते जवळच्याच एका हॉस्पिटलनी वाजवी दरात (१००) झटपट काढून दिलं.
(मजूर पोरांना ऑलरेडी गोव्यातूनच मिळालं होतं.)

मग इ-पास काढायला बसलो.
ही प्रोसेस बऱ्यापैकी स्मूथ आहे.
मुख्य ड्रायव्हरचे मेडिकल सर्टिफिकेट + फोटो अपलोड करावा लागतो.
शिवाय गाडी नंबर आणि सहप्रवाशांचे आधार नंबर इत्यादी.
ते सगळं तासभर बसून नीट भरलं आणि सबमिट मारलं.
लगेच एक कोड आला ये SSS य!


नॉर्मली इ-पास ऍप्लिकेशन केल्यावर पोलिसांचं होय / नाही दिवसभरात कळून जातं असं ऐकून होतो.
(आपले मराठी प्रकाशक ह्यातून काही बोध घेतील काय?)

पण आय. टी. वाला असल्याने जरा जास्त भाव मारत लगेच लाडात कोड टाकून ऍप्लिकेशन स्टेटस शोधायला लागलो.
आणि घात झाला चक्क "धिस आय डी नॉट फाउंड" मेसेज यायला लागला.
कोड तर बरोबर होता बाकी डिटेल्सही बरोबर होते.
पुन्हापुन्हा चेक केलं... सेम मेसेज...

सरकारी सॉफ्टवेअरवरचा विश्वास डळमळायला लागला.

पुन्हा ऍप्लिकेशन भरलं तर च्यायला सांगतंय "ऍप्लिकेशन इज ऑलरेडी अंडर प्रोसेस नवीन ऍप्लिकेशन अलाऊड नाय!"

आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना!

माझं ऍप्लिकेशन कुठच्या तरी लिम्बो मध्ये त्रिशंकू सारखं लटकत होतं बहुतेक.

मला माझ्या टॅक्सी बॅज ऍप्लिकेशनच्या वेळचा घोळ आठवायला लागला.
https://kalyapivalyanavasachigosht.blogspot.com/2020/03/blog-post_29.html  )

दोन तास ह्याच्यातच गेले.
दुपारचे चार वाजलेले.
ती पोरं तिकडे आशा लावून बसलेली.
आज ऍप्लिकेशन गेलं नाही तर उद्या सकाळी निघणं अशक्य.
सोमवारी पुन्हा गांडफाट काम... सुट्टी मारणं जवळ-जवळ अशक्य. 

काय करावं कळेना.

'कॅबेज'शी नाम-साधर्म्य असलेल्या एका सॉफ्टवेअर कंपनीने सॉफ्टवेअर बनवल्याचं खाली वेबपेजच्या कोपऱ्यात दिसलं.
लगेच तिकडच्या एका मित्राला फोन लावला.
त्याला उगीचच घाल घाल शिव्या घातल्या असं सॉफ्टवेअर बनवतात का वगैरे वगैरे.
आता दहा हजार एम्प्लॉयीतला तो एक बिचारा, त्याचं प्रोजेक्टपण नाही ते.
पण तरी बिचार्याने ऐकून घेतलं.
तो स्वतः: उत्तम सॉफ्टवेअर टेस्टर असल्याने दोन तीन कॅपिटल / स्मॉल वगैरे कॉम्बिनेशन्समध्ये ऍप्लिकेशन आयडी टाकून बघायला सांगितलं.
ते सगळं केलं पण नो लक्क.

वैतागून फोन कट केला आणि तेवढ्यात व्हाट्सऍपवर मेसेज आला:

"सगळे डॉक्युमेंट्स नीट कॅरी करा तुमचा अर्ज मंजूर झालाय - पुणे पोलीस" 

:)
  

क्रमश:






 

Monday, June 1, 2020

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर २८ मे २०२०

"टॅक्सीनामा"ची पुढची काही प्रकरणं लिहून तयार होती पण टाकायची इच्छाच मरगळल्यासारखी झाली.

पायपीट करणाऱ्या अश्राप जीवांचे हाल बघवेनात.
आपलं टॅक्सी चालवणं म्हणजे एक सुरक्षित उच्चभ्रु पोराचा गिमिकी चूष असल्यासारखं माझं मलाच वाटायला लागलेलं. 
तसंही ते लॉकडाऊनमध्ये पॉजवर गेलेलं... 

आतून काही छान वाटेना... 

शनिवार-रविवार माझ्या गाडीतून साधारण २ (/३?) लोकांना ८ ते १० तासांचा ड्राइव्ह करून पोचवण्याचा ऑप्शन मांडला.
पण आपण काय सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर वगैरे नसल्याने आधी कोणाचा फारसा प्रतिसाद आला नाही.

पण नाही म्हटलं तरी आता माझे टॅक्सीवाले / उबरवाले खास मित्र झालेयत.
त्यांच्या नेटवर्कमध्ये शब्द टाकून ठेवला. 
आणि कामाच्या धबडग्यात विसरून गेलो. 

गुरुवारी त्यातल्याच राजेश भाईंचा फोन आला. 
हे एका सत्संगी पंथातले. 
मुंबई / पुण्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पुरवणं वगैरे काम त्यांची संस्था करते. 
मी खरं तर जवळ जवळ उद्धट म्हणता यावं इतका कर्मकांडं / देवापासून दूर गेलेला. 
पण ह्या विचित्र वेळी लोकं कोणत्याही श्रद्धेपोटी का होईना एकमेकांना मदत करतायत हे मस्तच. 

तर...

तीन मजूर गोव्यावरून (हो गोव्यावरून) पुण्यात चालत आलेले.

मध्य प्रदेशातल्या शाहडोलचे होते. 
गोव्यात कुठच्या तरी मेडिकल कंपनीत पोटासाठी २२ मार्चला गेले आणि २५ मार्चला लॉकडाऊन लागल्यामुळे पायपीट करत परत निघालेले. 

त्यांना नाशिकपर्यंत सोडलं तरी चालणार होतं तिकडून ते मध्य प्रदेश बॉर्डरला जायचा प्रयत्न करू शकले असते. 
मी घरी सांगितलं तर बायको आणि आईनी रडून घेतलं... 
घरी भयानक अबोला वगैरे... 
तितक्यात अजून एका मित्राचा फोन आला. 
तो लग्नाची व्हिडीओ शूटिंगची कामं घेणारा वगैरे... 
पण त्याची ती सगळी कामं साफ बंद झालेली असल्यामुळे तोही थोडा टेन्शनमध्ये. 
तो म्हणाला ड्रायव्हिंगची काही असाइनमेंट असेल तर सांग मी माझी अर्टिगा घेऊन जाईन तेवढीच घरी पैशांची मदत वगैरे. 

माझं डोकं चालायला लागलं! 
त्याला बोल्लो, हे असे असे मजूर आहेत त्यांना नाशिकला सोड आणि परत ये. 
माझी असाइनमेंट समज आणि पेमेंट माझ्याकडून घे.

तो  बोल्ला चालेल.
मी तर माझ्या समन्वय स्कील्स वर स्वतःच खूष:
मजुरांना हेल्प, मित्राला हेल्प आणि आणि बायको परत हसा-बोलायला लागली. 

म्हणजे विन-विन आणि विनच. 

"इ-पास" चं ही मित्रच बघणार होता. 
बेष्ट! 
आपण फक्त कर्मा ओरपायचा!  

त्या मजुरांना इकडे सत्संगात ठेवलं होतं त्याचे को-ओर्डीनेटर होते हरीशभाई म्हणून त्यांना मेसेज टाकला. 
आणि उंटावरून शेळ्या हाकता येतात कधी कधी असं म्हणत झोपून गेलो. 

पण ते व्हायचं नव्हतं...


-क्रमश: