Monday, June 1, 2020

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: करोना चॅप्टर २८ मे २०२०

"टॅक्सीनामा"ची पुढची काही प्रकरणं लिहून तयार होती पण टाकायची इच्छाच मरगळल्यासारखी झाली.

पायपीट करणाऱ्या अश्राप जीवांचे हाल बघवेनात.
आपलं टॅक्सी चालवणं म्हणजे एक सुरक्षित उच्चभ्रु पोराचा गिमिकी चूष असल्यासारखं माझं मलाच वाटायला लागलेलं. 
तसंही ते लॉकडाऊनमध्ये पॉजवर गेलेलं... 

आतून काही छान वाटेना... 

शनिवार-रविवार माझ्या गाडीतून साधारण २ (/३?) लोकांना ८ ते १० तासांचा ड्राइव्ह करून पोचवण्याचा ऑप्शन मांडला.
पण आपण काय सोशल मिडीया इन्फ्लुएन्सर वगैरे नसल्याने आधी कोणाचा फारसा प्रतिसाद आला नाही.

पण नाही म्हटलं तरी आता माझे टॅक्सीवाले / उबरवाले खास मित्र झालेयत.
त्यांच्या नेटवर्कमध्ये शब्द टाकून ठेवला. 
आणि कामाच्या धबडग्यात विसरून गेलो. 

गुरुवारी त्यातल्याच राजेश भाईंचा फोन आला. 
हे एका सत्संगी पंथातले. 
मुंबई / पुण्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पुरवणं वगैरे काम त्यांची संस्था करते. 
मी खरं तर जवळ जवळ उद्धट म्हणता यावं इतका कर्मकांडं / देवापासून दूर गेलेला. 
पण ह्या विचित्र वेळी लोकं कोणत्याही श्रद्धेपोटी का होईना एकमेकांना मदत करतायत हे मस्तच. 

तर...

तीन मजूर गोव्यावरून (हो गोव्यावरून) पुण्यात चालत आलेले.

मध्य प्रदेशातल्या शाहडोलचे होते. 
गोव्यात कुठच्या तरी मेडिकल कंपनीत पोटासाठी २२ मार्चला गेले आणि २५ मार्चला लॉकडाऊन लागल्यामुळे पायपीट करत परत निघालेले. 

त्यांना नाशिकपर्यंत सोडलं तरी चालणार होतं तिकडून ते मध्य प्रदेश बॉर्डरला जायचा प्रयत्न करू शकले असते. 
मी घरी सांगितलं तर बायको आणि आईनी रडून घेतलं... 
घरी भयानक अबोला वगैरे... 
तितक्यात अजून एका मित्राचा फोन आला. 
तो लग्नाची व्हिडीओ शूटिंगची कामं घेणारा वगैरे... 
पण त्याची ती सगळी कामं साफ बंद झालेली असल्यामुळे तोही थोडा टेन्शनमध्ये. 
तो म्हणाला ड्रायव्हिंगची काही असाइनमेंट असेल तर सांग मी माझी अर्टिगा घेऊन जाईन तेवढीच घरी पैशांची मदत वगैरे. 

माझं डोकं चालायला लागलं! 
त्याला बोल्लो, हे असे असे मजूर आहेत त्यांना नाशिकला सोड आणि परत ये. 
माझी असाइनमेंट समज आणि पेमेंट माझ्याकडून घे.

तो  बोल्ला चालेल.
मी तर माझ्या समन्वय स्कील्स वर स्वतःच खूष:
मजुरांना हेल्प, मित्राला हेल्प आणि आणि बायको परत हसा-बोलायला लागली. 

म्हणजे विन-विन आणि विनच. 

"इ-पास" चं ही मित्रच बघणार होता. 
बेष्ट! 
आपण फक्त कर्मा ओरपायचा!  

त्या मजुरांना इकडे सत्संगात ठेवलं होतं त्याचे को-ओर्डीनेटर होते हरीशभाई म्हणून त्यांना मेसेज टाकला. 
आणि उंटावरून शेळ्या हाकता येतात कधी कधी असं म्हणत झोपून गेलो. 

पण ते व्हायचं नव्हतं...


-क्रमश:

No comments:

Post a Comment