Thursday, April 30, 2020

२२ जून २०१९

पुढच्या शनिवारी नेहमीप्रमाणे शेवटची शिवनेरी पकडून घरी वांद्र्याला आलो.
आल्या आल्या झोपाळलेल्या आईला विचारलं लायसन्स मिळालं का म्हणून.
तिनं पेंगुळलेल्या डोळ्यांतसुद्धा अपराधी भाव आणत "नाही" म्हटलं.

दुसऱ्या दिवशी आरामात उठलो बऱ्याच दिवसांनी आर. टी. ओ. ला जायचं नव्हतं.
डुप्लिकेट लायसन्स ची ऑनलाईन प्रोसेस दुपारी आरामात करायचं ठरवलं.
आणि पार्ल्याला टिळक मंदिरात गेलो.
ही माझी खूप जुनी आणि आवडती लायब्ररी.

बऱ्याच दिवसांनी थोडा वेळ हाताशी होता.
अशा वेळी मी पाहिजे ते पुस्तक मिळालं तरी झटपट पुस्तक बदलून कल्टी न मारता  रेंगाळत राहतो.
उगीच पुस्तकं चाळत, काहीबाही वाचत.
लायब्ररीच्या एका बाजूला पुलंच्या पुस्तकांच्या भिंतीचा आडोसा करून बाल-विभाग केलाय.
बच्चे लोकांना थोड्या टाचा उंचावून पुस्तकं काढता यावीत एवढ्या उंचीच्या रॅक्सच्या रांगा आहेत.
 
आणि ह्या सगळ्या समृद्ध अडगळीतच एक मोठं टेबल आणि चार पाच खुर्च्या आहेत.
खरंतर बाल विभागात आलेल्या  छोट्या किडो लोकांसाठी रिझर्व्हड आहेत त्या खुर्च्या... आरामात बसून वाचायला.  
पण मी बसतो तिकडे सुमडीत... 
लायब्ररीत बाल-विभागाच्या वयाचा असल्यापासून येत असल्यामुळे सगळ्या लायब्ररीयन पोरीसुद्धा थोडा कानाडोळा करतात. 

मस्त वाटतं त्या पुस्तकांच्या भिंतींत... 
तीन बाजूंनी हॅरी पॉटर नी फेमस-फाईव्ह नी टिंकल नी ऍस्ट्रिक्स नी एखादा चुकार मराठी किशोर आपल्या भोवती गराडा घालून असतात.
समोर उघड्या खिडकीतून रस्त्यापलीकडच्या  मंदिराचा कळस नी त्याला लागून झुलणारा आंबा दिसत रहातो.
ह्या मंदिराच्या पहिल्या मजल्यावरही एक अभ्यासिका आहे.
कैक वर्षांपूर्वी तिकडे एक पोरगी लॉ की अकाउंट्सच्या अभ्यासाला यायची.
एका आळसावलेल्या दुपारी आमची अशीच ओळख होऊन आम्ही टिळक मंदिराच्या वरच्या मजल्यावर हळूच जाऊन एकमेकांना हापस हापस हापसलेलं. (तेव्हा कॅमेरे बिमेरे नसायचे)
त्याची आज थोडी आठवण येऊन मी चोरटेपणानी उगीच आजूबाजूला बघितलं.

बाजूला एक  बहुतेक "सिद्धांत" आणि  मोस्टली "अर्शिका" खुर्चीवर गंभीरपणे पाय हलवत अनुक्रमे 'नार्निया' आणि "मोबी डिक" मध्ये डोकं घालून बसलेले होते.
मी त्यांच्या खिजगणतीतही नव्हतो.

मी पण खिडकीतून येणारं कोमट ऊन बघत निवांत बसलो.
लायसन्स मिळत नसल्याची ठसठस त्या शांतवेळी थोडी विसरल्यासारखी झाली.
अंमळ पेंगच यायला लागली माझ्या डोळ्यांवर... 
आणि खिशात माझा फोन थरथरला. 

मी बहुतेक "सिद्धांत" आणि  मोस्टली "अर्शिका" ला डिस्टर्ब होणार नाही ह्याची काळजी घेत जस्ट कोणाचा फोन आहे बघितलं...
आईचा फोन होता.
लायब्ररीत खरंतर फोन घेत नाही मी... 
पण आत्ताचा फोन कशाबद्दल असेल ह्याचा थोडा अंदाज होता.
सो मी कुजबुजत्या आवाजात फोन घेतला...
आणि तिकडून आई आख्ख्या लायब्ररीला ऐकू जाईल एवढ्या मोठ्ठया नाचऱ्या आवाजात ओरडली,
"निलू, पार्टी... पार्टी... लायसन्स मिळालं !" 


   
 
 
  

Saturday, April 25, 2020

१५ जून २०१९

बराच काळ आमचा हनिमून  पेंडिंग होता.
बायको दाखवत नसली तरी तिची सूक्ष्म नाराजी जाणवत होतीच.
फायनली एक दहा दिवसांची पुणे-कोल्हापूर-मालवण-गोवा-आंबोली-पुणे अशी धमाल रोड ट्रिप केली.
मजा आली.
कॉलनीतले माझे बरेचसे खास मित्र मालवणी असल्यामुळे बायकोला रस्त्यातली वैभववाडी, तळेरे, शिरगांव, आचरा, हडी, कुडाळ, शिरोडा, रेडी, डिचोली अशी गावं दाखवून आणि अवली मित्रांचे एकेक किस्से सांगून पीळपीळ पिळलं.  

मस्त फ्रेश होऊन आलो.
...
...
...
तर:
आत्ता टेक्निकली बॅज नंबर तर मिळालेला पण तो टिपिकल चकचकीत पितळी बिल्ला मिळवायचं फायनल काम बाकी होतं.
त्यासाठी पुन्हा एक अर्ज करावा लागतो.
तो बिल्ला मिळाला की टॅक्सी चालवायला रेडी!

आज सकाळी सगळी तयारी करून आर. टी. ओ. ला जाणार तर लायसन्सच मिळेना. 
आईनी कुठेतरी ठेवलेलं की काय कोण जाणे.
मी माझी नाराजी लपवायच्या प्रयत्नात आणि आई बिचारी अधिकाधिक अपराधी आणि ॲनक्शस होत शोधायला लागलेली.
मिळता मिळेनाच.   
सगळं ओम-फस्स!

प्रत्येकाच्या आयुष्यात हे एकदातरी होतंच.
पासपोर्ट/ लायसन्स/ पाकीट/ दागिना...
हाता-हाताशी असताना गायब होतो.
"अरे मिळेल पाच मिनिटांत"... आपण कॉन्फिडन्टली फायली, कपाटं, बेडच्या खालचे ड्रॉवर्स तपासतो.
मग जरा अजून अन-कन्व्हेन्शनल जागा: माळा, बायकोची पर्स, पोराचं दप्तर धांडोळून होतं.
मग आपण शेरलॉकला स्मरून आईच्या गावात आउट ऑफ द बॉक्स विचार करायला लागतो.
टीव्हीच्या पाठची पोकळी,  कारचा डॅशबोर्ड चेक करतो. हळूच्कन फ्रीजसुद्धा उघडून बघतो.
पण झाटा काय मिळायला नाय.

मग हळूहळू आपली आशा मावळायला लागते.
मीसुद्धा नर्व्हस होऊन पुण्याला आलो.

रोज आईला फोन करायचो.
तिनंही बिचारीनी गिल्टी होत सगळं घर पालथं घातलं पण नो लक्क!

आणि मग अशा वेळी आपल्याला सकाळी सकाळी हरवलेली वस्तू अवचित मिळाल्याचं  छान स्वप्नं पडतं.
आणि जाग आल्यावर शिटी-शिटी वाटत रहातं.
मलाही एक दिवशी तसंच स्वप्नं पडलं आणि उठून मी सरळ मनावर दगड वगैरे ठेवून डुप्लिकेट लायसन्सच्या अर्जाची तयारी करायला लागलो.









२९ मे २०१९

येय पुण्यात असताना आईचा मेसेज आला लायसन्सच्या फोटोसकट.
बॅज नंबर आला !!!


आता हनीमूनला फूल टू उत्साहात !

Thursday, April 23, 2020

४ मे २०१९

सगळे पेपर्स कडक तयार करून पोचलो.
केतनला एवढ्या फेऱ्या घातल्यामुळे सगळी केस माहिती होतीच.
शिवाय व्हेरिफिकेशन आधीच बोरकर सरांनी करून दिलं होतं.
केतननी झटपट त्याच्याकडून क्लिअरन्स दिला.
वरती बसलेल्या शेटे साहेबांनीही झपकन सही दिली शिवाय फॉलोअपबद्दल कौतुकही केलं :)

ऑल सेट !
आता नवीन लायसन्स बॅज नंबर चढून घरी येईल. 

आजचा खर्च: ७६६ रुपये (ऑनलाईन बॅज ऍप्लिकेशनची फी)

Tuesday, April 21, 2020

३० एप्रिल २०१९

आजही सकाळीच पोचलो पण ऑफीसमध्ये सगळीकडे सामसूम.
बो#$र, केतन, लोखंडे कोणीच नव्हते.
साहजिकच आहे काल दीड दोन वाजेपर्यंत सगळ्यांना इलेक्शनची कामं होती.
सो थकून झोपले असणार सगळे बहुतेक.

एजंटला विचारलं "फॉर्म S. E. C." काय आहे तर त्यानं सांगितलं "स्कूल-लिव्हिंग सर्टिफिकेट" पण माझा फारसा विश्वास नाही बसला.

परत एकदा १० नंबर खिडकीतून आत डोकावलो एक गोरासा हँडसम पोरगा दिसला.
बहुतेक तिकडे प्यून असावा तो.
खेटे घालून घालून थोडा ओळखीचा झाला होता.

त्याला विचारलं "फॉर्म S. E. C." विषयी तर त्यानं सांगितलं, "आपलं पंधरा वर्षांचं डोमिसाईल सर्टिफिकेट."
ठरावीक वर्षं मुंबईत राहिलेल्यांनाच बॅज द्यायची पॉलिसी आहे आर. टी. ओ. ची सो हे मला जास्त प्रोबॅबल वाटलं.
ठीक आहे मग सरळ घरी आलॊ आणि शांतपणे ऍप्लिकेशन भरलं.
पंधरा वर्षांचं डोमिसाईल काढलेलं होतंच. 
https://kalyapivalyanavasachigosht.blogspot.com/2020/03/blog-post_10.html
ते अपलोड केलं.
आता फायनल हल्ला ४ मे ला.



Sunday, April 19, 2020

२९ एप्रिल २०१९

तर आता फायनली बॅजसाठी ऍप्लिकेशन:
इतके वेळा "सारथी" ऑनलाईन सर्व्हिसेसच्या पेज वर गां# घासून मला आत्ता पेजचा फ्लो जवळ-जवळ पाठ झालेला.
तेव्हा ठरवलं की बॅजचं ऑन-लाईन ऍप्लिकेशनसुद्धा आपणच भरायचं.
त्यालातरी कशाला हवा एजंट?

मग सकाळी पुन्हा प्रायमरी हेल्थ सेंटरला गेलो आणि एका रागीट दिसणाऱ्या पण छान चीक-बोन्स असलेल्या डॉक्टरणीकडून फिटनेस सर्टिफिकेट घेतलं.
हो बॅजसाठी हे लागतं.

अजून एक गोष्ट ऑनलाईन फॉर्मवर लिहिलेली ती म्हणजे "फॉर्म S. E. C."
आत्ता एकच कन्फ्युजन की च्यायला हा "फॉर्म S. E. C." म्हणजे काय बुव्वा?
आणि त्यात परत चुकीचं काही भरलं की पुन्हा बोंबला!



मग गिरगावातल्या ओळखीच्या एजंट अनिल मामांना फोन केला शंका निरसन करण्यासाठी.
तर ते एकदम हायपरच झाले,
"अरे अजिबात काय भरू नको ते चुकलं तर वांधे होतील.उद्या ताडदेव आर टी ओ ला ये माझा दुसरा एजंट भरेल."

म्हणजे गम्मत काये माहितीये का?
खरं तर या ऑनलाईन प्रोसेस मुळे त्या बिचाऱ्या अर्धशिक्षित एजंट लोकांपेक्षा आपण जास्त "एम्पावर्ड" आहोत आणि हे आपल्याला माहीतच नाहीये :)
म्हणजे आयटीवाल्या मृगाच्या बेंबीत ऑनलाईनची कस्तुरी वगैरे.
एजंटलोकांना ऑनलाईन प्रोसेसची नीटशी ओळख नसल्याने ते स्वतः घाबरतात आणि आपल्याला पण उगाच टरकवतात.
खरं तर वाईटात वाईट होऊन काय होणार तर आपलं ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि ६०० रुपये वाया जाणार.

ठीक आहे खली-बली!
उद्या आर टी ओ लाच जाऊन काय ते फाईंड आऊट करूया आणि भरूया रन-टाइमला.

आजचा खर्च: १० रुपये (पुन्हा मेडिकल चेक-अपचा केसपेपर काढण्यासाठी)






Friday, April 17, 2020

२६ एप्रिल २०१९

करेक्शन झालं एकदाचं!
रोज फोन करून लोखंडेंचं डोकं खायचो.

खरं तर ऍप्लिकेशनचा कागद फक्त ४ नंबर खिडकीवर परब मॅडम कडे द्यायचा होता.
फक्त २० फूट अंतर कापायला ६ दिवस लागले :)
चालायचंच...
हे सगळे अनुभव घेण्याचाच तर सगळा पॉईंट आहे या एक्सरसाईझचा!

पण बेष्ट पार्ट म्हणजे आत्ता बॅज ऍप्लिकेशनचा ऑप्शन दि स तो य चक्क!

ए SSS धतर ततर ततर ततर!


Wednesday, April 15, 2020

२० एप्रिल २०१९

ही शनिवारची सकाळ माझ्या चांगलीच लक्षात आहे.

सक्काळी सक्काळी परत आर टी ओ  ला गेलो.
१० नंबर खिडकीवर रांग लावली.
केतनला झोल समजावून सांगितला.
केतननी नीट सगळं ऐकून घेतलं.

माझी काहीच चूक नसताना सॉफ्टवेअरच्या चूकीमुळे मी हेलपांडतोय हे त्याला पटत होतंच.
पण त्याचाही नाईलाज होता.

तो म्हणाला, "एकदम पहिल्या लायसन्सचा काही रेकॉर्ड आहे का?"
आता घरी कुठेतरी असेलही झेरॉक्स.
मी आपला चुपचाप ते शोधण्यासाठी घरी जायची तयारी करायला लागलो.
पण केतनला माझी दया आली असावी.

अचानक तो म्हणाला,
"एक काम करा दुसऱ्या मजल्यावरच्या मोठ्या पाटील साहेबांना भेटा.
त्यांना तुमची केस तुम्हीच समजावून सांगा.
हे घ्या तुमचे पेपर्स."
त्यानं एक लहानशी चळत माझ्या हातात दिली.
त्यांनी सही केली की तुमचं काम होऊन जाईल लोखंडे जरा जा त्यांच्या बरोबर.

बाजूला एक सावळे किरकोळ यष्टीचे लोखंडे क्लार्क बसलेले होते.
द. मा. मिरासदारांच्या गोष्टीतले एकाच वेळी प्रेमळ आणि बेरकी गावकरी असतात ना तसे दिसत होते ते.

ते आणि मी पायऱ्या चढायला लागलो.
हेच ते दुसऱ्या मजल्यावरचं सुप्रीम कोर्ट.
आधीच सांगितल्याप्रमाणे इकडे असिस्टंट कमिशनर लेव्हलचे ऑफीसर बसतात.

पाटील साहेबांच्या केबीनमध्ये गेलो तर ते आज सुट्टीवर!
माझा चेहेरा परत पडायला लागलेला. 
लोखंडे म्हणाले थांबा शेटे सायबांकडे जाऊया. 

शेटे अजूनच मोठे साहेब... 
आम्ही त्यांच्या ऑफीसमध्ये घुसलो टिपिकल बड्या सरकारी ऑफिसरची केबीन. 
मोठ्ठं टेबल, त्याच्यावर शुभ्र टेबल क्लॉथ, कोपऱ्यात चकचकीत पितळी अशोक स्तंभाची मूर्ती वगैरे वगैरे...

त्यांना लोखंडेंनी केस समजावून सांगितली. 
ते थोडे त्रासलेले दिसले... 
ऑलमोस्ट आम्हाला उडवून लावायच्या बेतात... 
... 
... 
... 

कसं आहे ना प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही क्षण येतात. 
वर्षं किंवा महिने किंवा आठवडे किंवा तास नव्हे... 
इट फकिंग बॉइल्स डाऊन टू अ सेकंड!
त्या सेकंदात तुम्ही काय करताय ह्यावर पुढच्या सगळ्या गोष्टींची माळ बनते किंवा बिघडते. 

शूट-आउटवर मारलेला गोल,
क्युबा क्रायसिसमध्ये न्यूक्लिअरच्या बटणावर ठेवलेलं बोट,
बायकोनी अफेअर पकडल्यावर म्हटलेलं नाय  / हो... 
इट फकिंग बॉइल्स डाऊन टू अ सेकंड!
  
हा सेकंद माझा होता. 
मी पुन्हा एक मोठ्ठा श्वास घेतला... 
आणि म्हणालो, "सर मी जरा तुम्हाला थोडी बॅकग्राउंड सांगू का?"

मला माहिती होतं की माझ्या बंदुकीतल्या सगळ्या गोळ्या आत्ताच रिकाम्या करायच्यात... पुन्हा संधी मिळणार नाही.  
भडाभडा मी काहीच राखून न ठेवता सगळं सांगून टाकलं सरांना... 

माझा नवस, 
टॅक्सीवाल्यांना, मुंबईला जाणून घ्यायची इच्छा,  
ब्लॉग लिहायचा  प्लॅन, 
अजिबात झोल न करता बॅज काढायचाय... सगळं सगळं. 

जरा जास्तच बोलल्यासारखं वाटलं मला... 
पण ठीक आहे मेलेलं कोंबडं... वगैरे... 

त्यांचे चष्म्याआडचे भेदक डोळे किंचित निवळल्यासारखे वाटले.
"तुम्ही सध्या काय करता?", त्यांनी विचारलं. 
"सर मी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे."

"पगार चांगला असेलच"

"हो सर मस्त आहे पण टॅक्सी आपल्याला पैशासाठी चालवायचीच नाही आहे." 
माझा धीर चेपलेला, मी जरा जास्तच फ्री झालो. 

त्यांना बहुधा जवळ जवळ मी आवडायला लागलेलो एव्हाना. 
खेळकर हसत त्यांनी हिरव्या पेनानी लफ्फेदार सही मारली पेपर्सवर. 
"जा तुम्ही झालं तुमचं काम." 

त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मारून आम्ही खाली आलो. 
लोखंडेंचा एक गालगुच्चा घ्यावासा वाटत होता मला पण कंट्रोल केलं. 

कागद फडकावत परत केतनकडे आलो. 
तो ही हसला. बोलला प्लीज बसणार का थोडा वेळ बाकीची कामं उरकायचीयत. 

मी बोललो धावेल. 
एक खुर्ची घेऊन शांतपणे पेपर वाचत बसलो दोन एक तास. 
ऐलतीरी... जगड्व्याळ सरकारी प्राण्याच्या पोटात... मधून मधून आजुबाजूला बघत. 
एक लक्षात आलं की हे लोकही प्रचंड बिझी असतात. 
बऱ्याच विनोदी सिरीज/ चित्रपटांत आरामात डुलत डुलत चालणारी सरकारी ऑफिसेस दाखवतात... 
पण इकडे प्रचंड काम चालू होतं... आतले लोकं बाहेरच्या लोकांचे किचकट प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न खरंच करत होते. 

बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन झाल्या हे अल्टिमेटली चांगलं असलं तरी सध्या मात्र त्याच्यात माझयासारखेच अनेक लोकांचे घोळ होते.
केतन प्रचंड एफिशियंटली लोकांच्या प्रॉब्लेम्सचा फडशा पाडत होता. 
  
बो#$र काका आणि लोखंडे सुद्धा कोणत्यातरी अर्जंट आर. टी. आय. ऍप्लिकेशनला उत्तर देण्याची डेस्परेट तयारी करत होते.  
मला एकदम किरण गुरवांचा  अल्टिमेट कथासंग्रह आहे "राखीव सावल्यांचा खेळ" म्हणून त्यातली "भूमी" कथा आठवली. 

एकंदरीत राईट टू इन्फर्मेशनमुळे  सरकारी ऑफीसेसची अकाऊंटेबिलिटी निश्चितच वाढलीय हे नक्की!
   
मला बराच वेळ शांत विनातक्रार बसलेला बघून केतननी कॉफीही मागवली... 
खरंतर पोटात सकाळपासून काही नसल्यामुळे प्रचंड ऍसिडिटी झालेली. पण त्यांचं मन मोडवेना. 

एकंदरीतच केतन, बो#$र काका आणि लोखंडे ह्यांनी नियमाची चौकट कुठेही न तोडता खूपच सहकार्य केलं. 
सो एकंदरीत वसवस करणाऱ्या खडूस आणि स्लो सरकारी ऑफिसेसचा स्टिरिओटाइप हळूहळू का होईना पण चेंज होतोय हे मी फर्स्ट हॅन्ड सांगू शकतो. 

फायनली तीन वाजता लोखंडे म्हणाले की साहेब तुम्ही गेलात तरी चालेले मी करतो तुमचं करेक्शन! 
मी पोटात भूक आणि दिलात आशा घेऊन घरी आलो.     

  

Saturday, April 4, 2020

१२ एप्रिल २०१९

पुण्यात असताना आईचा ऑफीसमध्ये फोन आला.
रिन्यूड लायसन्स घरी आलंय म्हणून.

लायसन्स आपल्या घरी येतं असा तोरा बरीचजणं मिरवायची त्याची आठवण आली.
गव्हर्नमेंट कॉलनीत सगळेच सरकारी नोकर असल्याने तरुणपणी काही मित्र लायसन्स आपल्या घरी येतं अशा फुशारक्या मारायचे त्याची आठवण झाली.
आपल्या भारतीयांना वशिले लावून काम करण्यात एक सुप्त आनंद मिळतोच.
पण आत्ताशा ते तसंही प्रत्येकाच्या घरीच येतं... बऱ्याचशा गोष्टी बऱ्याच अंशी ट्रान्सपरंट झाल्यायत हे मान्य करायलाच हवं.

असो तर लगेच उत्साहाने परत बॅज ऍप्लिकेशनचं पेज उघडलं पण हाय राम अजूनही ऑप्शन नाहीच आणि आईकडनं लायसन्सचा फोटो मागवला तर ट्रान्सपोर्ट क्लासच गायब :(

भेंचोत मला भीती वाटत होती तेच झालं.

लगेच सारथी सपोर्टला  मेल केलं पण त्यांचा नेहमीप्रमाणे रिप्लाय आला आर. टी. ओ. ला जाऊन चेक करा म्हणून.

मला मोठ्ठ्यानी रडावसं वाटायला लागलं.

ठीक आहे पुनःश्च हरी ओम.

२५ मार्च २०१९

आज आर. टी. ओ. १०:३० लाच थडकलो.  आणि एन. टी. लायसन्स रिन्यूअल साठी सबमीट केलं.
लवकर गेल्यावर कामं सटासट होतात ही थिअरी परत 'य' व्यांदा प्रूव्ह झाली.

खिडकीवरचा केतन तर आता छान ओळखायला लागलाय. 
त्याला विचारलं की लायसेन्सवरच्या क्लास मध्ये पुन्हा काही गडबड होणार नाही ना?

त्यानं फक्त हसून देवावर भरोसा ठेवायला सांगितलं.

आजचा खर्च: ६६६ रुपये (लायसन्स रिन्यूअल)
साइन ऑफ सैतान वगैरे ;)
सिक्स सिक्स सिक्स ... साइन ऑफ द बीस्ट...
आयर्न मेडनचं मस्त गाणं आहे माझं आवडतं :)   


२४ मार्च २०१९

आता लायसन्स रिन्यूअल साठीचं फिटनेस सर्टिफिकेट पण आर. टी. ओ. च्या आजूबाजूचे काही डॉक्टर्स शंभर दोनशे रुपये घेऊन देतात असं ऐकून होतो.

पण आमच्या गव्हर्नमेंट कॉलनीत छोटेखानी छान आणि स्वच्छ अर्बन प्रायमरी हेल्थ सेन्टर आहे.
आपल्याला थ्रू प्रॉपर चॅनल जायचं असल्याने त्यांनाच फिटनेस सर्टिफिकेटची विचारणा केली आणि त्यांनी झटपट दिलं सुद्धा.



खर्च: १० रुपये (केसपेपर काढण्यासाठी) 


Friday, April 3, 2020

१८ मार्च २०१९

महिनाभर सारथी सपोर्टशी मेलामेली केली.
हा त्यांचा मेल आयडी: sarathi@nic.in
मेल सपोर्ट अतिशय चांगला आहे. तुमची क्वेरी सोडवण्याचा ते त्यांच्या परीने खरंच प्रयत्न करतात.

पण इथे मात्र त्यांनी सांगितलं की: आर. टी. ओ. लाच जाऊन तुमची क्वेरी रिसॉल्व्ह करा.
मी परत आर. टी. ओ. ला पिंग-पॉंगलो.
केतन सुद्धा जेन्युइनली विचारात पडला,

"सिस्टीममध्ये तर तुमचे रेकॉर्ड्स सगळे बरोबर आहेत.
तुम्ही ट्रान्सपोर्ट लायसन्स तर काढलंय ते २०२० पर्यंत व्हॅलिड आहे.
(मी ट्रान्सपोर्ट लायसन्स २०१७ ला काढलेलं ते ३ वर्षांसाठीच असतं. मग रिन्यू करावं लागतं.)...
मग..."

आणि खिडकीच्या बाहेर माझी आणि आत त्याची एकाच वेळी ट्यूब पेटली.

झालं काय की माझं नॉर्मल ड्रायव्हिंग लायसन्स जे १९९८ ला काढलेलं. ते २०१८ ला एक्सपायर झालं.
आता माझ्याकडे खरं तर २०१७ पासून ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स असल्याने एन. टी. (नॉर्मल) लायसन्स रिन्यू करायचं काही कारण नव्हतं.
बाय द वे. आपले लेटेस्ट ऑनलाईन डिटेल्स कोणीही ह्या वेबसाईट वर जाऊन बघू शकतो बरं का.
फक्त लायसन्स नंबर आणि जन्म तारीख टाकायची.
हे पहा माझे लायसन्स डिटेल्स:






त्यांच्या ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये कोड असा असणार.

if there are mutiple licenses and any license is expired:
    disable  badge option.

खरं तर तो कोड असा हवा.

if there are mutiple licenses and ALL licenses are expired:
    disable  badge option.


मी आणि केतननी दोघांनीही एकमेकांकडे बघितलं.
पुढे काय करायचं ह्याचं उत्तर आम्हाला माहिती होतं.

एक तर सारथी वेबसाईटशी भांडून वरचा बग फिक्स करून घ्यायचा.
(जे काही फारसं शक्य वाटत नव्हतं.)

किंवा
झक मारत मुदलात गरज नसतानाही नॉर्मल एन. टी. लायसन्ससुद्धा रिन्यू करून घ्यायचं.
---------------------  

मी घरी जाऊन तावातावात सारथी सपोर्टला मेलही लिहिलं. नितीन गडकरींनाही  कॉपीमध्ये ठेवलं वगैरे.
पण सपोर्टनी थंडपणे आर. टी. ओ. ऑफीसलाच जायला सांगितलं.
गडकरी साहेब त्यांचा तो @nic.in चा मेल आयडी ते बघत नसणार बहुतेक.
एन. टी. लायसन्सच रिन्यू करावं लागणार.

आता नेक्स्ट स्टेप:
ह्या तीन वर्षांत मी ४० क्रॉस केल्यामुळे लायसन्स रिन्यू करण्याआधी फिटनेस सर्टिफिकेट :)