Saturday, May 16, 2020

२० जुलै ते डिसेंबर पहिला आठवडा २०१९: क्वेस्ट फॉर टॅक्सी

२० जुलैनंतर तर मी हवेतच होतो.
मला वाटलं बॅज मिळाला म्हणजे आपण शेवटची अवघड हिलरी स्टेप पार केली.
आत्ता काय एव्हरेस्ट सर झालाच.
अभी टॅक्सी मिळणा किस झाड की पत्ती.
आत्ता मस्त शनिवार रविवार रुबाबात युनिफॉर्म घालून टॅक्सी चालवायची उजवा हात खिडकीबाहेर लटकावत ठेवून. 
...
...
...
पण मग कळलं खरी लढाई तर आत्ता होती.

बॅज मिळवणं ही वेळकाढू असली तरी निश्चित प्रोसेस होती.
पण अजिबात ओळख नसताना कोणाची तरी टॅक्सी चालवायला मिळायची काहीच गॅरंटी नव्हती.

आज मला कळलं टॅक्सी लाईन मध्येही आपल्या बॉलीवूडसारखं निपोटिझम आहे.
कोणाचा तरी रेफरन्स लागतोचच :)

एका अर्थी ते साहजिकच आहे  म्हणा आपली रोजी रोटी असलेली गाडी त्यांनी अनोळखी माणसाकडे का द्यावी?
प्रत्येक जण अनुभव आणि रेफरन्स मागायचा.
आणि ते तर टॅक्सी चालवूनच मिळणार
म्हणजे झाली ना ही कोंबडी - अंडं सिच्युएशन च्यायची!

मग चालू झाली माझी आणि केतकीची धडपड टॅक्सी मागायची...

नात्यात किंवा मित्रांत कोणाची टॅक्सी वगैरे नव्हती...
मुंबईत बऱ्यापैकी ओळखी आणि वट बाळगून असलेले काही एक्स मित्र होते...
पण काही अपरिहार्य तात्विक भांडणामुळे त्यांच्याशी संवाद तुटल्यात जमा...
मग आम्ही सर्वात ऑब्व्हियस मार्ग पत्करला:

टॅक्सीत बसलं की ड्रायव्हरलाच चाचपून पाह्यचं...
आमचा टिपीकल संवाद असा व्हायचा,
पात्र पोझीशन:
ड्रायव्हर साहेब स्टिअरींगवर
मी त्यांच्या बाजूला
आणि केतकी पाठच्या सीटवर

(अवांतर सिडक्शन टीप:
मुलीला टॅक्सीतून डेटवर घेऊन चालला असाल तर लुब्र्यासारखं पाठी तिला चिकटून बसण्याऐवजी...
तिला एकटीला पाठी बसवा
(तिच्यासाठी दरवाजा उघडायला विसरू नका. क्लिशेड आहे पण शिव्हर्लस आहे आणि वर्क्स ऑल द टाईम ;) )
आणि  तुम्ही पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसा.
त्यानी बऱ्याच गोष्टी सटली दाखवता येतात.
एकतर तुम्ही क्लासबिसला फाट्यावर मारता...
दुसरं म्हणजे तुम्हाला ती आवडते पण तरीही एक अलूफपणा आहे,
तुम्ही फालतू "C.P" लाळघोटेपणा करण्यातले नाहीयत वगैरे...
बाहेरचा कंस आणि टीप समाप्त)

हां तर बॅक टू टॅक्सीनामा.
टॅक्सी चालू झाल्यावर साधारण तीन मिनटांनी

मी:
दादा टॅक्सी किधर का है आपका?
(हे म्हणजे बर्फ फोडण्यासाठी)

ड्रायव्हर साहेब:
वडाळा
(बरं एक निरीक्षण असं की ९० टक्के टॅक्स्या वडाळ्याच्या असतात.)

मी:
अच्छा...
(मग जुळवाजुळव करून घसा खाकरून)
मेरे को भी टॅक्सी चलाने का है. मेरा बॅज वगैरे सब रेडी है. है क्या किसका टॅक्सी?
नही तो आप दे दो सॅटर्डे संडे!
(हे सगळं एका दमात)

आत्ता हे ऐकून ड्रायव्हर सायबांना एक हलकासा शॉक बसतो...
डोळ्यांतला अविश्वास स्विफ्टली हसण्यामध्ये कन्व्हर्ट होतो.
हे माझी उटपटांग विनवणी ऐकून त्यांच्या चेहेऱ्यावर जे हसू उमटतं ना...
तिकडेच पैसे वसूल आहेत खरं तर.

ड्रा.सा:
(चेहेरा हसरा ठेवत +अविश्वास शिताफीने न दिसू देत + आवाजात पुरेसा कॅज्युअलपणा आणत)
आप टॅक्सी चलाओगे?

मी:
हां! मेरा बॅज बीज सब रेडी हय. लायसेन्स दिखाऊ क्या?
युनिफॉर्मभी रेडी है!
(इकडे वरच्या टिपेत दिलेला सेक्सी अलूफपणा धाब्यावर बसवून मी साक्षात डेस्परेट झालोय हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आलं असेलच.
चालायचंच... )

(पाठच्या सीटवरून)
केतकी:
आप उनको एक बार चान्स तो दे दो.
प्लीज प्लीज भाईसाब!

ड्रा.सा:
लेकिन क्यूँ भाई?
अच्छे पढे लिखे दिखते हो.

आता त्यांच्या क्यूँ? ह्या प्रश्नाला मी प्रत्येक वेळी वेगवेगळं उत्तर देतो.
हे म्हणजे थोडंसं डार्क नाईटमधल्या जोकरसारखं आहे.
तो कसा प्रत्येक वेळी नवीनच बॅकस्टोरी बनवून सांगतो तसं काहीसं!

मी:
मै रायटर हूँ आपकी लाईफ जानना चाहता हूँ

किंवा
मेरे कुछ बडे काम के लिये मैने मन्नत मांगी थी.

किंवा
मुंबईकी सडकोंपे घुमना चाहता हूँ.


(ही सगळीच उत्तरं खरी होती आपापल्या परीने खरं तर.)

ह्यावर ड्रायव्हर सायबांचे जवाब साधारण असे:

ड्रा.सा:
मत आओ इस धंदेमें.
हम तो मजबूरीसे चलाते है!

किंवा
अब पहिले जैसा मझा नही रहा इस धंदेमे.

किंवा
आप एक दिनभी नही टीक पाओगे इसमें.

किंवा
ओला-उबर चलाओ फिर...

इत्यादी इत्यादी.

पण एकंदरीतच टॅक्सी मिळवणं वाटतं तितकं सोप्पं नव्हतं...
मुख्य अडचण आधी सांगीतल्याप्रमाणे रेफरन्सची.

त्यामुळेच कोणाही रँडम टॅक्सीला विचारण्यापेक्षा एरियातल्या टॅक्सी ड्रायव्हरना विचारल्यास मिळण्याची शक्यता वाढेल असं आम्हाला कळालं.

पण एरियातल्या टॅक्सीवाल्यांनी सुद्धा नन्नाचा पाढा वाचला मोस्टली.

त्यात माझीही एक मेख होतीच.

आठवडाभर पुण्यात काम करत असल्याने मी फक्त वीकेंड्सना टॅक्सी चालवायची असं ठरवलेलं.

पण अशी दोनच दिवस टॅक्सी मिळणं अजूनच अडचणीचं!

मग असं कळलं की बरेचसे यु. पी. तले ड्रायव्हर्स  एप्रिल ते जुलै पावसाळ्यात शेतीसाठी गावाला जातात तेव्हा त्या काळात टॅक्सी  मिळू शकेल.

सो आलं का परत वाट बघणं चुपचाप.

त्यातही एवढा टाईमपास झाल्याने माझं ट्रान्सपोर्ट लायसन्स मार्च २०२० मध्ये एक्सपायर होतंय म्हणजे अजून लोचा.

बॅज तर मिळाला पण टॅक्सी कशी मिळवायची हे मात्र मला (नी बायकोलाही) सुधरेना!


















  

Tuesday, May 5, 2020

२० जुलै २०१९: माईलस्टोन

१८ नंबरच्या खिडकीवरून फायनली बॅज घेतला.
मोठ्ठा माईलस्टोन!
आत्ता तो पहिल्यासारखा चकचकीत सेक्सी पितळी बिल्ला नाही मिळत :(
फक्त असं कार्ड मिळतं. ठीकाय हे तर हे...



२८ नोव्हेंबर २०१६ ते २० जुलै २०१९
अदमासे दोन वर्षं आठ महिने लागले मला बॅज काढायला.
बरं खर्च साधारण: ३२८१ रुपये (एजंट्सकडे रेट १५००० आहे)

सगळी प्रोसेस साधारण अशी होती.



आता ह्या टप्प्यावर आपण जरा "रेट्रोस्पेक्टिव्ह" वगैरे करूया.

तर ह्यातून काय काय शिकलो?

१.
आजकाल पासपोर्ट, लायसन्स इत्यादी कामं पहिल्यापेक्षा बरीच सोप्पी आणि पारदर्शक झालीयत.
शिवाय बऱ्याच गोष्टी ऑनलाईन आहेत.
त्यामुळे माझ्यासारख्या आय. टी. बॅकग्राउंडवाल्या इसमासाठी गोष्टी स्वतःच्या स्वतः करणं आणि थ्रू प्रॉपर चॅनल करणं हे अर्धशिक्षित एजंटच्या हातात देण्यापेक्षा जास्त एथिकलच  नव्हे तर लॉजिकलसुद्धा आहे.

 २.
सरकारी माणसं सुद्धा को ऑपरेटिव्ह असतात.
फक्त आपल्याला ऋजू + ठामपणा + पेशन्स + प्रांजळपणा ह्याचं योग्य मिश्रण सादर करता यायला हवं.
प्रांजळपणा तर फार महत्त्वाचा:
आपल्याला काय हवंय ते तळतळून सांगितलं तर लोकं नक्की मदत करतात.

केतन, बो##र काका, लोखंडे, शेटे सर अशा सगळ्यांनीच खूप मदत केली त्यांचे मनापासून आभार.
(काही नावं बदललीयत)

३. टॉयलेट्स मात्र सगळीकडे भयाण आहेत!

एकंदरीत टेबलाखालून पैसे न देता इमानदारीत बॅज काढण्याचा प्रयत्न बहुतेक यशस्वी झाला असं म्हणता येईल.
पण...
"बघा तुम्ही सगळे चुत्ये आहात मी कशी कामं केली असा माझा दावा अजिबातच नाही."

कारण सरळ आहे:
सुखवस्तू बॅकग्राउंडमधून आणि शिक्षणातून आणि वर्षानुवर्षं मोठ्या शहरात राहून आलेला आत्मविश्वास आपल्या वर्गाकडे असतोच.
सो "शॉर्टकट्स" जरी मारले नाहीत तरी सगळ्या अधिकाऱ्यांशी मी चटपटीतपणे बोलून  लाघवीपणे कामं मार्गी लावू शकलो.
शिवाय ह्या प्रोसेसला तीन एक वर्षं लागली तितकी वाट पहायची माझी तयारी होती कारण ह्या सगळ्यावर माझं पोट अजिबातच अवलंबून नाहीये.

पण एखादा अर्धशिक्षित, गरीब माणूस ह्या सगळ्या ऑनलाईन प्रोसेसला भेदरू शकतो. त्याला एजंटचे आणि कोणाकोणाचे पाय धरावे लागू शकतात हे मान्यच.

खरंतर कुणाला मुंबईतल्या लायसन्ससाठीच्या शंका असतील तर मीसुद्धा मदत करू शकेन एवढा कॉन्फीडन्स आलाय आता.

एनीवेज...
आजचा दिवस मात्र सेलिब्रेट करणार... शिक्रण मटारची उसळ वगैरे :)

उद्यापासून पुढचा चॅप्टर:
आत्तातर खरा पिक्चर चालू होतोय.
म्हणजे बॅज मिळणं हा सेटअप होता: गँग्ज ऑफ वासेपूर १ सारखा.
टॅक्सी चालवणं तर अजून बाकीच आहे पार्ट २ सारखं:
तिकडेच तर खरी ऍक्शन आहे.

तर...
आत्ता पुढचं मिशन: शनिवार-रविवार टॅक्सी चालवायला देईल असा टॅक्सी मालक शोधणं.





    

Saturday, May 2, 2020

२९ जून २०१९

झालं होतं असं की लायसन्स पोस्टानी घरी आलं तेव्हाच समोरच्या मित्राच्या वडलांचा मृत्यू झाला होता.
शेजारधर्मानुसार आपल्या घरीही आईनं बऱ्याच लोकांची उठण्या-बसण्याची सोय केलेली.
त्या घाईत तिनं लायसन्सचा फोटो काढून मला पाठवला आणि गडबडीत लायसन्सचा लिफाफा हंस दिवाळी अंकात कोंबला आणि ती साफ विसरून गेली.
मागच्या शनिवारी तिनं जस्ट एक फ्लूक म्हणून पुस्तकांचं कपाट चेक केलं आणि टा SSS डा SSS

नव्या उत्साहात परत आर. टी. ओ. ला थडकलो.
त्यातही आज बॅजचा फॉर्म विकणाऱ्याची टपरी बंद होती.
अरे देवा!
पण नशिबानी बाजूच्या स्टॉलवाल्याला माहिती होतं फॉर्मची चळत कुठे लपवलीय ते.
त्यानं देवासारखा काढून दिला फॉर्म.
बंद टपरी जवळच थोडी शांत जागा होती तिकडेच उभं राहून फॉर्म भरला....
नाहीतर आर. टी. ओ. मधल्या केऑसमध्ये रन टाईमला काही भरता येणं अशक्य नसलं तरी फार अवघड असतं.

एखाद्या एजंटच्या सराईतपणे १० नंबरच्या खिडकीवर गेलो.
आज गर्दी नव्हती कारण खिडकीत केतन नव्हता.
बाजूला कोणतरी एक क्लार्क होते त्यांना विचारलं "केतन कुठे आहे?"

त्यांनी थोडा विचित्र लूक दिला मला, "कोण हा दीडशहाणा?" अशा टाईपचा.
"केतनसाहेब ना... 'तीन स्टार' आहेत ते. १८ नंबरच्या खिडकीत बसलेयत."

मग मला स्ट्राईक झालं केतन स्वतः सुद्धा सिनियर इन्स्पेक्टर होता.
बहुतेक त्याला एका पातळ फुल बाह्यांचा जाकीटात तेसुद्धा बहुतांशी खिडकीपलीकडून बघितल्याने माझ्या लक्षात आलं नव्हतं ते.

आणि मी त्याला लॉर्ड फॉकलंडसारखा अरे तुरे करत होतो.
मग  १८ नंबर खिडकीवर झप्पकन केतन "सायबां"ची सही घेतली.
त्याला आय मीन त्यांना :) लोखंडेंनी माझ्या नवसाबद्दल सांगितलं असावं बहुतेक.
त्याच्या डोळ्यांत सहानुभूती + प्रोत्साहन वगैरे स्पष्ट दिसत होतं.

३ फोटो + लायसन्सची झेरॉक्स + फॉर्म सबमिट केलं आणि ५० रुपये भरून चलान घेतलं.
आत्ता १० दिवसांनी इथेच यायचं आणि बॅज घ्यायचा :)

आजचा खर्च: ५० रुपये