Saturday, October 10, 2020

टॅक्सी दिवस ११: ८ मार्च २०२० (विमेन्स डे)

आज शनिवारी रात्रीच टॅक्सी घेतली. 

हे आमचे दिनेशभाई! 

ह्यांनी टॅक्सी  दिली नसती तर मी अजूनही टॅक्सीच शोधत बसलो असतो सो त्यांचे अनेकानेक आभार.    


रविवारी सकाळी टॅक्सी काढताना बायकोनी आयड्या दिली की आज महिला दिन असल्यामुळे सर्व चिकिता उर्फ  सेनोरिटा उर्फ मादाम...किंवा खरं तर ही सगळी विशेषणं तद्दन क्लिशेड करून टाकण्याची अपरिमित ताकद आणि विस्मयकारी गुंतागुंत असलेल्या बायकांकडून आज मी भाडं घेऊ नये.  

मला ही आयड्या पटली आणि मी रविवारच्या प्रसन्न वगैरे सकाळी मोठया उत्साहाने वगैरे टॅक्सी बाहेर काढणार तर टॅक्सी चालूच व्हायला नाय माँकी. 

वरच्या दिनेशभाईंबरोबरच्या फोटोत ही गाडी नाकाड फुटलेल्या आडमुठ्या पण मनाने तशा चांगल्या असलेल्या गट्टू - बटल्या पैलवानासारखी दिसतेय...  
आणि ती एक्झॅक्टली तशीच आहे. 
बॅटरीचा प्रॉब्लेम असल्याने कधी कधी सकाळी स्टार्ट व्हायलाच मागत नाही. 
पण नशीबाने आमच्या कॉलनीचं गेट थोड्या उतारावर असल्याने तीन-चार भल्या शेजाऱ्यांची आणि सिक्युरिटीवाल्यांची मदत घेऊन गाडी धक्का स्टार्ट केली. 

हे पहिलंच भाडं एका आई आणि मुलीचं: कापड बाजार ते माहीम स्टेशन. 
(सेल्फी ह्या गोष्टीसाठी मी अंमळ टू ओल्ड असल्यामुळे वाईट सेल्फीज काइंडली ऍडजस्ट!)



तिकडून शिवाजी पार्क: 
पार्काजवळ माझा खास मित्र मंदार रहातो. 
त्याला बरेच दिवसांपासून टॅक्सी आणि माझा युनिफॉर्म दाखवायचा होता... म्हणून त्याला एक धावती भेट दिली. 

त्याच्या चाळीच्या गॅलरीतून दिसलेला हा गच्चम फुललेला कवठी चाफा आणि उद्याच्या होळीची तयारी:



पार्कातून एका मुलीला प्रभादेवीच्या एका कॉर्पोरेट ऑफीसला सोडलं. 
तिच्याकडूनही पैसे घेतले नाही आणि तिला सेल्फीसाठी विनंती केली. 
तिनं ती थोडी घाईत असल्याचं पोलाईटली सांगितलं आणि मी ताणून धरलं नाही. 
कदाचित त्या अंमळ अंधाऱ्या पार्कींगमध्ये माझी रिक्वेस्ट तिला फ्रीकी वाटली असू शकते.

हे नकार स्वीकारण्याबद्दल थोडं बोलूयात:

जे लोक्स साल्सा / स्विंग / बचाता / टॅंगो किंवा तत्सम सोशल डान्सिंगमध्ये थोडेफार ऍक्टिव्ह आहेत... 
त्यांना मुलींच्या किंबहुना कुणाच्याही कुठल्याही नकाराचा आदरानेच स्वीकार करायला हवा हे नीटच माहिती असतं.  

सोशल डान्सिंगमध्ये मुलींचा गमतीदार अप्पर हॅन्ड असतो.
म्हणजे तुम्हीच मुलीकडे जाऊन डान्ससाठी विचारायचं शास्त्र असतंय. 
मुलगी डान्सला होकार किंवा नकार तिच्या मर्जीने अर्थातच देऊ शकते. 

तिच्या नकार देण्याला कैक कारणं असू शकतात... 
आधी नाचनाचून ती दमलेली असू शकते,
किंवा गाणं तिच्या आवडीचं नसू शकतं,
किंवा तिनं तुम्हाला आधी वाईट नाचताना पाहिलं असू शकतं, 
किंवा आधी कधीतरी सोशलमध्ये जेन्युइनली चुकून तिच्या बूबीला तुमचा ओझरता हात लागल्यामुळे तुम्ही मनुष्यरूपातील वासनाधारी अजगर असल्याचा तिने समज करून घेतलेला असू शकतो,
किंवा डोळे वटवटारून पाहणाऱ्या, नाचण्याचा गंध नसणाऱ्या औरंगजेबी पझेसीव्ह बॉयफ्रेंडशी पंगा घेणं त्या रात्रीपुरतं तरी तिला नको असू शकतं, 
किंवा तुमच्यापेक्षा सहापटीने चांगलं लीड करणाऱ्या त्या दुसऱ्या स्मार्टीसाठी तिनं स्वतःला राखून ठेवलं असू शकतं.    
किंवा ती तुमच्या एक्सची बेस्ट फ्रेंड असल्यामुळे तिला तुमच्यावर खुन्नस असू शकते. 
किंवा तिला तुम्हाला काहीही कारणाशिवाय ऍंवीच नाही म्हणून तुमच्या ओशाळत्या चेहेऱ्याचा इव्हील आनंद लुटायचा असू शकतो. 

कारण X Y Z काहीही असो तुम्हाला तो नकार ग्रेसफुली आणि ग्रेसफूलीच स्वीकारायचा असतो. 

चेहेऱ्यावरचा पोपटी ओशाळेपणा शिताफीनी लपवून तुम्ही दुसऱ्या मुलीला विचारू शकता किंवा तिसऱ्या नाहीतर चौथ्या...  
कधी कधी तर लायनीत सगळ्या मुलींनी दिलेले नकार गिळून तुम्हाला झक मारत कोपऱ्यात उभं रहावं लागतं... 
तुमच्या आवडत्या ट्रॅकवर पार्टनरसह नाचायची तुमची कितीही अपरंपार इच्छा असली तरीही!   
पण हे नकार अजिबातच पर्सनल आणि सिरीयसली घ्यायचे नसतात हे चांगल्या सोशल डान्सरला नीटच माहिती असतं. 
आणि अर्थात तुम्ही एकटे धुवांधार नाचूच  शकता. 

एकंदरीत काय तर सोशल डान्सिंग तुम्हाला नकार ग्रेसफुली पचवण्याचं उत्तम बाळकडू देतं. 

ऍसिड हल्ल्याच्या, नी ब्लेडनी वार केल्याच्या, नी रेपच्या बातम्या वाचल्याकी आपल्या सगळ्या समाजाला नकार पचवण्यासाठी तरी साल्सा शिकवायला पाहिजे असं तुटून तुटून वाटत राहतं!
... 
... 
... 

प्रभादेवीवरून ह्या तीन महिला कॉन्स्टेबल्सना वरळी पोलीस हेड-क्वार्टर्सला सोडलं. 
जालना-औरंगाबाद साईडच्या होत्या बहुतेक. 
डिपार्टमेंटच्या कोणत्यातरी परीक्षेसाठी आल्या होत्या. 
कलमांची सटासट सटासट उजळणी करत होत्या, ऐकायला मस्त वाटत होतं. 
त्यांनी भाडं न देण्याची ऑफर साफच नाकारली पण सेल्फीला मात्र आनंदानी तयार झाल्या. 
माझी मर्यादित सेल्फी कौशल्ये आणि कुवत स्वतः:च ओळखून ह्यापुढचे सगळे सेल्फी मी पॅसेंजरनाच काढायला दिलेत हे सूज्ञ वाचकांच्या लक्षात आलं  असेलच. 

     


बाय द वे वरळीला आत पोलीस मुख्यालयाचा एवढा मोठ्ठा आणि बऱ्यापैकी हिरवागार परिसर आहे हे आज पहिल्यांदाच कळलं. 

तिकडून एका मल्लू कॉन्ट्रॅक्टरला कोस्टगार्ड्स ऑफीसला सोडला. 
परत हा आतला रस्ता एव्हढा सुंदर आहे मला हे मला माहितीच नव्हतं. 
एका साईडला कोस्टगार्डसच्या सुबक भिंती दुसरीकडे छोटेखानी डोंगराचा कातळ आणि समोर चमचमणारा समुद्र
फकींग गॉर्जस. 

ही मुंबईपण ना... 
वीस वर्षं लग्न झालेल्या सवयीच्या बायकोनी एका मंडेन रात्री अचानकच अनंगरंगाचा नवीन डाव टाकून नवर्याला चकीत करावं
तशी आहे ही साली मुंबई.
अजूनही तिच्या गजबजत्या गुदमरत्या क्लॉस्ट्रोफोबीक पोटातनं अशी काही झळझळती रत्नं अवचित मिळतात हेच खरं!

बाकी दिवसभर मारलेल्या भाड्यांतील महिलांबरोबरचे हे आणखी काही सेल्फी. 
    



    

 
 ही वरच्या फोटोतली माझी मैत्रीण पूजा. 

सगळ्या महिलांना राईड फ्री असल्याची पोस्ट सकाळीच टाकल्याने तिनं राईडसाठी फोन केला होता. 

तिला सायन गुरुकृपा हॉटेलवरून उचललं आणि बी. के. सी. ला साधारण ८ वाजता सोडलं आणि  
 (बाय द वे 'गुरुकृपा'चे समोसे आख्ख्या मुंबईच्या थिएटर्समध्ये जातात. त्याविषयी इथे वाचू शकाल :

बी. के. सी. सगळा कॉर्पोरेट एरिया असल्यामुळे संध्याकाळी त्यातही रविवारी सामसूम असते. 
इकडे निवांत दोन मिनटं थांबून ब्रेक घेणार इतक्यात बलराम बिल्डिंगच्या मागल्या शांत रस्त्यावर मला ही पोरं दिसली:   

मालाड गोरेगाववरून ही पोरं खास बी एम एक्स स्टंट्सची प्रॅक्टिस करायला इथे येतात असं कळलं. 

आपल्यालापण अडनिड वयात सलमानची मैने प्यार किया मधली बी एम एक्स वरची क्लायमॅक्सची फाईट जाम आवडलेली. 
घरी मागे लागून A-1 ची छान मोरपिशी रंगाची बी एम एक्स सुद्धा घेतली होती. 

तेव्हा सलमान आणि बी एम एक्स दोन्ही भारी वाटायचे 
नंतर हळूहळू ह्यातल्या एका गोष्टीचं आकर्षण घटलं आणि दुसऱ्या गोष्टीबद्दल जवळ जवळ तिटकाराच... 
   
पण ही पोरं मात्र भारी स्टंट्स करत होती. 























हिरोसारखा छावा दिसणारा युसूफ नावाचा पोरगा त्यांचा लीडर कम कोच होता. 
ही त्यांची सगळी गॅंग




बाकी बरीच भाडी  विनामूल्य सोडल्यामुळे आज कमाई फारशी नव्हती.
पण एकंदरीत मजा आली.  

आजची कमाई: ४०० रुपये