Sunday, December 19, 2021

टॅक्सी दिवस २१: ६ नोव्हेंबर २०२१

दिनेशभाई त्यांच्या गावी गेले असल्यामुळे टॅक्सी पहिल्या शिफ्टच्या राजकुमारकडेच होती.

म्हणून ह्या वेळेस गाडी शनिवारी रात्रीच घरी आणून ठेवायचा प्लॅन होता. 

म्हणजे उद्या जरा आरामात उठता आलं असतं. 

राजकुमारकडून रात्री ९:३० च्या सुमारास गाडी उचलली. तडक घरी जायचाच प्लॅन होता पण भाडीच लागत गेली :)

तीसुद्धा नाना चौक, नवजीवन सोसायटी, सँडहर्स्ट रोड, ऑपेरा हाऊस अशी 

बाय द वे गिरगावच्या आंबेवाडी जवळच्या एका घराची ही कुमारसंभवातील पार्वतीच्या बिसतंतूही न पास होणाऱ्या यौवन-कुंभांच्या मदनघळीइतकी चिंचोळी एंट्री. 



फारच सुंदर आणि सरिअल आहेय ही. 

ह्या घरात गोद्रेजचं कपाट किंवा सोफा कसा नेला असेल असा प्रश्न मला पडला पण हू केअर्स!

कदाचित नीलकमलच्या सुटसुटीत खुर्च्या वापरत असतील ते लोक्स.   

मग ग्रॅण्ट-रोडच्या दिल्ली-दरबारचं भाडं आलं. 

बाय द वे ग्रॅण्ट-रोडच्या(च) दिल्ली-दरबारची बिर्याणी खास. 

कुलाबा माहीम वगैरेला ही त्यांच्या ब्रॅंचेस आहेत आणि त्याही वाईट नाहीयेत पण... 

परिणीती तरी कुठे वाईट आहे पण प्रियांका चोप्रा (जोनास ) उच्चा प्रकार आहे तसंच दिल्ली दरबार ग्रॅण्ट रोडचंच.  

दिल्ली दरबारच्या जरा पुढे एक माणूस उचलला त्याला परेल व्हिलेजला जायचं होतं.

खासच होता तो एकदम फ्रेंडली. 

आपण त्याला प्रवीण म्हणूयात. 

बसल्या बसल्या थेट गप्पा हाणायला लागला मस्तपैकी. 

तो वैश्यवाणी आहे म्हणजे लक्ष्या बेर्डेच्या ज्ञातीतला हे त्यानं पहिले छूट सांगून टाकलं. 

परेल लालबाग भागात ह्यांच्या समाजाची बरीच तंबाखूची - होलसेल किराणाची दुकानं होती / आहेत हेही सांगितलं.  

मग माझं काय लग्नं - मुलं वगैरे स्टेटस विचारून घेतलं. 

आमचा मुलांशिवाय DINK रहायचा प्लान सांगितला तेव्हा तो थोडा अचंबला पण त्याला जास्त करून स्वतःविषयीच शेअर करायचं होतं.

अगदी गरज लागलीच तर सगळी सेवींग्ज गदागदा हलवून (त्याचेच शब्द) तो पंधरा लाख उभे करू शकेल हेही त्यानं अभिमानानं सांगितलं.  

मग डायरेक्ट त्यानं स्वतःच्या सेक्स लाइफला हात घातला. 

आजकाल पहिल्यासारखा ड्राइव्ह येत नाही हे ही सांगून टाकलं. 

आणि चाळीशीपुढे गेल्याने असं असेल का हेही विचारून टाकलं. 

आता मी काही डॉक्टर वत्स किंवा सेक्स एज्युकेशन मधला कुमार-थेरपिस्ट ओटीस किंवा त्याची सायकॉलॉजिस्ट आई डॉ. मिलबर्न नसल्याने मी त्याला माझ्या परीने जेनेरिकच सल्ला दिला.    

(बाय द वे  सेक्स एज्युकेशन पहिले दोन सीझन्स मस्त. तिसरा चालू केलाय पण सगळे नेहमीचेच ट्रोप्स असल्यासारखे वाटतायत नव्या सीझनमध्ये. ॲक्टींग अर्थातच छान खास करून रुबी मस्त!)

तर त्याला सांगितलं की कधी कधी हा फेज असू शकतो, जास्त लोड न घ्यावा वगैरे. (लोड वरती ही पन इन्टेन्डेड हेहेहे :))

त्याला परेल व्हिलेजच्या अरुंद रस्त्यावर सोडला. 

हा तोच रस्ता जिकडे मी एकदा अनंत सामंतांसारख्या दिसणाऱ्या एका हँडसम माणसाला सोडलं होतं. 

टॅक्सी दिवस १४: ३ जानेवारी २०२१

उतरतानाही प्रवीणने बिचाऱ्याने आईस्क्रीम खाणार का विचारलं. 

भारी प्रेमळ होता. 

परेल व्हिलेज जवळच एका मुलाला उचलला. 

त्यानंही मन बरंच मोकळं केलं. ऑफीस-बॉय होता तो. 

"मालक पगार बरा देतो पण राब राब राबवतो", तो सांगत होता. 

"मग घरी जायला उशीर होतो नी चायनीज बांधून घ्यावं लागतं". रोज चायनीज खाऊन त्याच्या छातीत थोडं दुखूही लागलं होतं. 

मला पंकज भोसलेच्या कथेतील रोज चायनीज खाणारा (खावं लागणारा) तुकाराम आठवल्यासारखा झाला.   

एकंदरीत काय तर:

बारमधला काउंटर पुसत दारू भरणारा बारमन, चर्चमधला जाळीच्या अलीकडचा पाद्री आणि आम्ही टॅक्सीवाले ह्यांचा जॉब एकच आहे:

ऐकणं !!!


आजची कमाई:

(फार तर दोन तासांत ) ३७० रुपये (अजिबातच वाईट नाहीये)