Sunday, March 29, 2020

१६ फेब्रुवारी २०१९

चला आता सगळी जय्यत तयारी झालेली. बो##र काका म्हणाले.
आता काय नाय ऑनलाईन फॉर्म भरायचा.
थोडा किचकट असतो तुला कसा भरायचा कळणार नाही.
एक काम कर बाहेर बसतात त्यातल्या कोणत्याही एका एजंट कडून भरून घे.
काय एक शंभर रुपये एक्स्ट्रा घेईल.

ठीक...
मी बाहेर छत्र्या लावून बसलेले असतात त्यातल्या एका कडे गेलो.
त्यानं पटापट "सारथी" ची वेबसाईट उघडली.
(तसं पाहता ही वेब साईट खूपच चांगली आणि फंक्शनल आहे.)
मी जय्यत तयारीत...
पण बॅजसाठी अर्ज करायचा ऑप्शनच दिसेना :(



इकडे खरं तर "ISSUE OF PSV BADGE TO A DRIVER" ऑप्शन दिसायला हवा.




माझा चेहरा पडला.
एजंट पोरगा म्हणाला त्या १० नंबरच्या खिडकीवर जा आणि त्यांना सांगा तुमचा प्रॉब्लेम.

आता अंधेरी आर. टी. ओ. ची १० नंबरची खिडकी म्हणजे नामांकित प्रकरण आहे.
पुढे बरेच महिने ह्या खिडकीशी संबंध आला.

बेसिकली इकडे खिडकीवर सकाळी ११ ते १ एक माणूस बसतो आणि तुमच्या लायसन्स संदर्भात ज्या पण काही अर्ज, तक्रारी, कैफीयती, दुरुस्त्या असतात त्या निकालात काढतो.
त्याच्या लेव्हलला नाही करता आलं तर वरती दुसऱ्या मजल्यावर असिस्टंट कमिशनर ग्रेडच्या सायबांकडे जायचं.
अशी सगळी हायरार्की.

म्हणजे आर. टी. ओ. ची हाय कोर्ट नी सुप्रीम कोर्ट म्हणावा हवं तर.

तर १० नंबर:
रांग बऱ्यापैकी होती फार लांब नव्हे एक १० माणसं.
पण प्रत्येक माणसाची आपापली किचकट केस.
त्यामुळे फारच हळूहळू पुढे सरकत होती.

कुणाचं लायसन्सवर नाव चूकीचं पडलेलं,
कुणाचा चेंज ऑफ ऍड्रेसचा रेकॉर्डच गायब,
कुणी सहा महिन्यांपासून लायसन्सची वाट पहातंय.

"सुखाचा बोअरींग एकच प्रकार असतो पण दुःख मात्र प्रत्येकाचं आपापल्या परीनं युनिक वेगळं असतं"
असं कोणीतरी म्हणालंयना ते इकडेही लागू पडावं.

जवळ जवळ तासाभरानी माझा नंबर आला.
जाळीदार खिडकीच्या पाठीएक उग्र चेहेऱ्याचा माणूस बसलेला.
आपण त्याला 'केतन' म्हणूया सध्या.

त्याला माझी केस सांगितली.
ट्रान्सपोर्ट लायसन्स दाखवलं.

चेहेरा उग्र असला तरी माणूस सेन्सिबल आणि चटपटीत होता.
त्यानं सिस्टीममध्ये बघितलं आणि एक करेक्शनची चिठ्ठी हातात कोंबली.
मग ४ नंबरला जाऊन तो अर्ज दाखवला.

आता ४ नंबर हे अजून एक नामांकित प्रकरण.
बेसिकली १० नंबरला तुमच्या अर्जाची स्क्रूटिनी होते.

पण ऍक्च्युअल सिस्टीमच्या डेटाबेसमध्ये एंट्री ही चार नंबरला होते.
४ नंबर ला जाऊन दहा नंबरच्या सायबांची (आपण त्यांना केतन म्हणूयात) चिठ्ठी दाखवली.

ह्या ४ नंबरच्या खिडकीपाठी का कोण जाणे ब्लॅकहोलसारखा गर्द अंधार आहे.
इकडचा माणूस त्या अंधारात पाच मिनटं गुडूप झाला आणि मग येऊन बोल्ला.

सिस्टममध्ये करेक्शन केलंय दोन अडीच तासांनी मेसेज येईल तुम्हाला.

आता पारंपरिक आर डी बी एम एस डेटाबेसेस ते नवीन नो एस क्यू एल डेटाबेसेस...
गूगलचे मॅप  रिड्यूस अल्गोरिदम्स वगैरे आख्खी आय. टी. दुनिया अशा क्वेरीज सिस्टीममध्ये निमिषार्धात अपडेट करण्यासाठी झटत असते हे मला नीटच माहिती.

पण अडीच तास तर अडीच तास त्यांची काही प्रोसेस असू शकेल कदाचित.


मी लिंक रोडवरच्या एका कॅफेत टाईमपास केला आणि मेसेज आल्या आल्या परत आर. टी. ओ.त धावलो.
पुन्हा ऑनलाईन फॉर्म उघडला.
आता तर काय ऑप्शन दिसणारच.
पण हे राम... अजूनही ऑप्शन दिसेनाच.

पुन्हा दहा नंबर पुन्हा केतन.
आता त्यानंही हात वर केले.
हा सॉफ्टवेअर सिस्टीमचा घोळ आहे तुम्ही ऑनलाईन सपोर्टशी बोलून बघा. त्यानं सुचवलं.

हिंपुटी होऊन घरी आलो.








Sunday, March 22, 2020

१२ जानेवारी २०१९

बेसिकली बॅजसाठीच्या पोलीस क्लीअरन्सची प्रोसेस बरीचशी पासपोर्टच्या पोलीस क्लीअरन्ससारखीच आहे.
ऑनलाईन अर्ज करून स्कूल लिव्हिंग, आधार कार्ड आणि फोटो साईटवर 'वर्भर' (अपलोडला हा शब्द कसा वाटतो?) करायचाय.
शिवाय खेरवाडी पोलीस स्टेशनला जाऊन एक अर्ज द्यायचा.
हे ते ऍप्लिकेशन आईच्या सुवाच्य अक्षरात लिहिलेलं :)



आता मी मुंबईतली कनिष्ठ मध्यमवर्गीय मुलं जशा आणि जेवढ्या मारामाऱ्या करतात तेवढ्या तरुणपणी केलेल्या.
पण सिरीयस असं काही नाही... एकंदरीत वृत्ती पापभीरू म्हणता यावी.
सो आपला रेकॉर्ड क्लिअर.
तेव्हा क्लिअरन्स  मिळायला काही अडचण पडू नये.

आजचा खर्च १२३ रुपये ६० पैसे



५ जानेवारी २०१९


क्रॉफर्ड मार्केटच्या SB२ ला गेलो पण त्यांनी तात्काळ परत पिटाळलं.

परत खेरवाडी पोलीस स्टेशनला आलो तर कळलं की ऑनलाईन अर्जच भरायचाय.

साईट टेरिबल आहे.



Friday, March 13, 2020

४ जानेवारी २०१९: उत्तरार्ध

आत बऱ्यापैकी अंधार होता.
क्षण दोन क्षण मला काही दिसेना...
मग मी डोळे मिचकावत आजूबाजूला पाहिलं.

जणू एका जगड्व्याळ सरकारी एमोरल प्राण्याच्या पोटात शिरलो होतो मी.

खिडक्यांच्या तोंडातून माणसांची धडपड, आकांक्षा, इच्छे-अनिच्छेनी दिलेले पैसे, फॉर्म्स, फोटो, अर्ज विनंत्या...
सगळं बकाबका खाऊन आपल्या पोटात साठवणारा निर्विकार अज्रस्त्र प्राणी.    
आज पहिल्यांदा त्याला मी आतून बघत होतो.
आजूबाजूला सगळं सेपिया-टोनमध्येच होतं. 
टेबलं, खुर्च्या, पेपरांचे गठ्ठे, चहाचे पेले, आणि आतली माणसं सगळंच!

हे तसं होतंच की अंधुक प्रकाशामुळे तसं वाटत होतं कोण जाणे.

लांबवर प्रत्येक खिडकीच्या मागे ऐलतीरावरची माणसं बसली होती.
आणि बाहेर खिडकीतून आत हात, बोटं, डोळे, कागद  नाचवणारी पैलतीरावरची माणसं.
आर. टी. ओ. चा ऐलतीरावरचा माणूस मुलाच्या ऍडमिशनचा फॉर्म भरायला जातो तेव्हा तो पैलतीरावरचा होत असणार बहुतेक.
असे आपले ऐल आणि पैल तीर रोज...  किंवा रादर क्षणोक्षणी बदलत असणार असं काय काय मॅड माझ्या डोक्यात यायला लागलं...

काही टेबलं खिडकीपासून थोडी लांब होती.
ऐलतीराच्या थोडी अजुन अलीकडे.
अशाच एका टेबलामागे एक माणूस बसलेला.
पांढरा शर्ट, चष्मा, हँडसम म्हणता यावा असा.
गोरटेला थोडा कॉकेशियन वळणाचा चेहरा आणि मिशांमुळे मी त्याला मनातल्या मनातच चेक्सचा शर्ट जीन्स आणि बूट्स चढवून घोड्यावर बसवून काऊबॉय करून टाकला.  
बेस्ट म्हणजे त्यानं शर्टाची दोन बटणं उघडी टाकलेली...
मी स्वतः:पण असंच ही-वेज कायम दाखवत असल्यामुळे मला थोडी आपुलकी वाटली.
हा बाबा आपल्याला मदत करेल अशी थोडी आशा वाटली आणि मी त्याच्या समोर गेलो.
एकदा वाटलं आपण त्या फॉरबिडन दारातून आत आल्याबद्दल वसवसतो की काय...
पण हे साहेब चांगले होते.
त्यांना बहुधा अशा हळूचकन् आत घुसणाऱ्या मानवी-मूषकांची सवय असावी.

त्यांना मी माझी टॅक्सी बॅज काढायची इच्छा सांगितली.
ते गोवेकरी मृदू टोनमध्ये म्हणाले, "काहीच प्रॉब्लेम नाही. एक एजंट पकड. होऊन जाईल काम आरामात."
...
...
... 

मी एक मोठ्ठा श्वास घेतला आणि माझा सगळा टॅक्सी-बॅजचा फंडा त्यांना सांगितला...
हे नवसासाठी करतोय... शॉर्टकट्स मारायचे नाहीयेत वगैरे.

थोडे अम्युझ्ड झाल्यासारखे वाटले.
चष्म्याआडून त्यांचे डोळे मिस्कील हसल्यासारखे वाटले...
मी अजून रेटून दिलं पुढे,
"सर कितीपण वेळ लागला तरी चालेल, आपल्याला घाई नाहीये पण बॅज स्वतः:च्या जीवावर काढायचाय. तुम्ही फक्त गाईड करा."

ते बोलले,
"दोन गोष्टी मेन:
एक १५ वर्षांचं डोमिसाईल..."

"येतंय ते १५ दिवसांत", मी.

"आणि SB-२ (स्पेशल ब्रॅन्च कमिशनर ऑफीस) चं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट."

"ठीकाय उद्याच जातो", मी बोल्लो.

मी आभारून निघालो...
त्यांनी थांबवलं, बोलले,
"माझा नंबर घे, काही लागलं विचारायचं असलं तर फोन कर... मी हेडक्लार्क बो##र"
...
...
...
मला उगीचच बाकीबाब बोरकरांची आठवण झाली आणि गोव्याच्या समस्त लोकांबद्दल प्रेम दाटून आलं.

उद्या चलो SB-२

आजचा खर्च:
कोर्ट फी स्टॅम्प पाच रुपये.


 





  

Tuesday, March 10, 2020

४ जानेवारी २०१९

१५ वर्षांचा डोमिसाईल दाखला:
बहुतेक हा नियम सरकारनी मुंबईच्या भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात म्हणून वगैरे केला असावा.
ठीक आहे काय ते कायद्यानी करा...
ते परीक्षेला आलेल्या बाहेरगावच्या लोकांना मारणं वगैरे माझ्या डोक्यात जातं.
शुद्ध गुंडगिरी आहे ती.

तर डोमिसाईलसाठी आधी कोर्ट फी स्टॅम्प घेतला.
ह्या वेळेस पाच रुपयांचा स्टॅम्प पाच रुपयांनाच घ्यायचा असं ठरवल्यामुळे अंधेरी कोर्टात गेलो.

अंधेरी पूर्वेच्या स्टेशन ब्रिजखालीच कोर्टाचा हा छान प्रशस्त हिरवा परिसर आहे,
हाही आज पहिल्यांदाच बघितला.
कोर्ट असल्यामुळे इकडेही थोडी लगबग होतीच पण सकाळी लवकर जायचा धडा शिकल्याने स्टॅम्प चटकन मिळाला.

मग पुन्हा अंधेरीच्या तहसीलदार ऑफीसात १५ वर्षांच्या दाखल्याचं ऍप्लिकेशन केलं

अजय पटेल हा तिकडचा क्लार्क फारच ऋजू + टेक-सॅव्ही + मदतीला तत्पर आहे.
त्याचा फीडबॅक आवर्जून वहीत लिहिला.

डोमिसाईल १५ दिवसांत घरी येईल आता.

काम पटकन झालं सुट्टीवर असल्याने उत्साह आणि वेळही होता.
शिवाय भवन्सवरून आर. टी. ओ. तसं जवळच.
एक जस्ट चक्कर टाकायला म्हणून आर. टी. ओ. त गेलो.
दोन तीन खिडक्यांवर उगाच घुटमळलो...
काय फायदा नाय झाला.
ही बॅजची नवीन ऑनलाईन प्रोसेस काय आहे कोणालाच नीट माहिती नव्हतं...

जाऊन दे धार मारून सरळ घरी जावं झालं...
बायको माहेरी असल्याचा चान्स घेऊन वीकडेतल्या सुट्टीतलं दुपारचं पॉर्न पदरात पाडून घ्यावं... 
असा दांडेकरी विचार करून मी टॉयलेटमध्ये घुसलो.

आता हे टॉयलेट आर. टी. ओ. ऑफीसच्या दरवाजाच्या बरोब्बर समोर आहे.
 कुठल्याही सरकारी ऑफीसची रचना साधारण अशीच असते.

सो आर. टी. ओ. च्या दर्शनी भागात मध्ये मोठं प्रवेशद्वार आणि डावी उजवीकडे रांगेत खिडक्या १० नंबर १३ नंबर वगैरे. जिकडे आपण रांगा लावतो.
(नंबर मध्ये काही लॉजिक नाहीये कुठलीही खिडकी कुठेही आहे :))
प्रवेशद्वारातून आत जाऊन डावीकडे वळलं की ह्या सगळ्या खिडक्यावाल्या हॉलचा दरवाजा लागतो.
आणि त्याच्या समोर टॉयलेट.

मजा अशी आहे की ऑफीसचे कर्मचारी ह्या दरवाज्यातूनच ये जा करतात.
हा  दरवाजा सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सीट्स (ज्या अर्थातच खिडकीमागे असतात) पासून खूप लांब आहे.

सो कोणी कर्मचारी कामानिमित्त बाहेर पडला की दरवाजाला चक्क कुलूप मारतो.
एजन्ट लोकांनी ऑफीसमध्ये घुसू नये म्हणून हा उपाय.
आत्ता ह्यानी सिस्टम लगेच काय सुपर स्वच्छ नाय होणार पण ठीक आहे ॲट लीस्ट दे आर ट्रायिंग!

मी त्या कुलपाकडे एक नजर टाकली आणि टॉयलेटमध्ये घुसणार...
इतक्यात कोणतरी एक पोरगा आला आणि त्यानं ते कुलूप उघडलं...
आता आत जाऊन तो कडी लावणार इतक्यात त्यानं पॅन्ट जरा घासल्यासारखी केली.
त्याला जोराची लागली होती.
कुलूप तसंच ठेवून तो समोरच्या टॉयलेटमध्ये घुसला.

मी इकडे तिकडे बघितलं आणि माझ्याही नकळत आत घुसलो...



 




Monday, March 9, 2020

३ जानेवारी २०१९

हो बराच वेळ गेला मध्ये कारण माझं लग्न झालं :)

लग्नाच्या सुट्टीतच हे काम कंटिन्यू करायचं ठरवलं पण हाय राम,
प्रोसेस सगळी ऑनलाईन झालीय आता :(
आधी जमवलेला फॉर्म वगैरे सगळं वाया गेलं.

शिवाय १० वर्षांचा रहिवासी दाखला चालणार नाही टॅक्सीसाठी १५ वर्षांचा दाखला लागतो.
ठीकाय वही सही.

पुनःश्च हरी ॐ