Sunday, January 24, 2021

टॅक्सी दिवस १४: ३ जानेवारी २०२१

आज नव्या वर्षात पहिल्यांदा टॅक्सी काढली. 

टॅक्सी चालवायला लागून वर्षापेक्षा अधिक काळ झाला.  टॅक्सी दिवस १: ८ डिसेंबर २०१९

१३ महिन्यांत १४ सेशन्स म्हणजे प्रगती फारच हळू आहे.

अर्थात लॉक-डाऊनमुळे जवळ जवळ ६ महिने बाहेर पडताच आलं नाही. 

तशीही ३० सेशन्स पूर्ण करायची फिक्स्ड टाइमलाईन ठेवली नाहीये सो जेवढा वेळ लागेल तो लागेल. 

तर... 

एका "सौधिंडियन" काकूंना नाना चौकात भाजी मार्केटला सोडलं.

लॉक-डाऊनमुळे चांगली भाजी मिळत नाहीशी झाल्याची तक्रार करत होत्या. 

तिथून भाडं शोधात शोधत माझ्या आवडत्या स्पॉटला मरीन लाईन्सला 'कॅथलिक जिमखान्या'पाशी आलो. 

पण कोस्टल रोडचं काम चालू असल्याने सगळीकडे वेडे-बिद्रे पिवळे डायव्हर्जन ब्लॉक्स टाकलेयत. 

मरीन ड्राईव्हचा सुबकपणा 'गॉन गर्ल' झालाय. 

वेस्टर्न / सेंट्रलला विविध खोदकामांच्या पेरेनियल किचाटीची आपल्याला सवय असतेच. 

पण आत्ता साऊथ मुंबईही मेट्रो आणि इतर प्रोजेक्टच्या कामांनी विद्रूप झालीय. 

रविवारी सुंदर निवांत दिसणारे हिरवे रस्ते राड्या-रोडयामुळे ओळखू येईना झालेत. 

होपफुली "इट गेट्स वर्स बिफोर इट गेट्स बेटर" चा फंडा इथे लागू व्हावा.  

मुली हॉट तयार होण्याआधी तोंडाला वेडेविद्रे पॅक लावून बसतात तसं काहीसं इथे असेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. 

थोडक्यात सगळी प्रोजेक्ट्स लवकरात लवकर पूर्ण व्हावीत आणि मुंबईकरांना के. एल. पी. डी. न मिळता मुंबई अजून छान होवो हीच प्रार्थना. 

(होप इज द बिग्गेस्ट... :) )

तर थोडक्यात काय तर कॅथलिक जिमखान्याजवळ थांबणं कॅन्सल करून पुढे पुढे जात राह्यलो. 

आणि वानखेडे स्टेडियमच्या विनू मंकड रोडपाशी पोचलो. 

आधीच निवांत रस्ता त्यात साऊथ मुंबईची रविवार सकाळ आणि त्यात करोनामुळे सामसूम 

ही म्हणजे 'डाव'ला किस करताना तिनं तोंडातलं फ्रुट अँड नट आपल्या तोंडात सरकवावं आणि त्या उष्ट्या तुकड्यात नटही असावा (किंवा फ्रुट) असा त्रिवेणी संगम वगैरे. 

मग टॅक्सी पार्क करून जरा विनू मंकड रोडचा आनंद घेतला. 



तिकडे फूटपाथवर चालताना ही 'प्री-टीन' कैरी दिसली आणि भारी छान वाटलं. 

असं पार दोन तीन महिने आधी पुढच्या ऋतूची किंवा सणाची चोरचाहूल लागलेली मला ज्याम आवडते. 

एकदम मनाने मी एप्रिल-मे मध्ये पोचलो. 

का कुणास ठाऊक पण एप्रिल-मे मला नेहेमी प्रचन्ड धावपळीचे, ताणाचे, स्ट्रेसचे आणि प्रचंड ऍक्शनवाले महिने जातात. 

शाळेनंतर बऱ्याच परीक्षा ह्या महिन्यांत असायच्या म्हणून, की माझे बरेचसे नवीन जॉब्स मी उन्हाळ्यात चालू केले म्हणून की एकंदर उन्हाळा हा तलखीचाच असतो म्हणून... कोण जाणे... 

ह्या वर्षीही हे महिने बहुधा प्रचन्ड हॅपनींग असणार आहेत हे जाणवून मला थोडं सुरसुरल्यासारखं झालं. 

एनीवेज ह्या कैरीबाईंना एक चावाही मारला. थोडी तुरट असली तरी छान होती. 





हा देखणा रस्ता डायरेक्ट चर्चगेट स्टेशनच्या पाठच्या गेटलाच भिडतो. 

करोनामुळे अर्थातच हे गेट बंद होतं. 

वरील सगळ्या कारणांमुळे स्टेशनात शिरणाऱ्या ट्रेनमध्ये अक्षरश: चिटपाखरू नव्हतं. 


भाडी मिळत नसतील तर स्टेशनच्या बाहेर रांगेत हमखास भाडी मिळतात. 

पॅसेंजर्स टॅक्सीसाठी मरत असतात. सटासट भाडी मिळतात.   

पण आज चक्क चर्चगेट स्टेशनबाहेर टॅक्स्यांची रांग होती. 

माझा नंबर पाचवा वगैरे होता. 

पॅसेंजर नव्हतेच दहा मिंटांनी वगैरे एखादा बाहेर येत होता.   

मी सीट मागे करून मस्तपैकी रविवारचा  'लोकरंग' वाचायला घेतला. 

भारत सासण्यांचं "भ्रमयुगातले चतुर मौन" वाचत होतो. अंमळ रंगलोच. 

लेख संपवून वर बघितलं तर पुढचे चारी टॅक्सी ड्रायव्हर कधीच निघून गेले होते आणि मी बेसावधपणे भला मोठ्ठा गॅप ठेवला होता.    

पाठच्या एका चपळ ड्रायव्हरने सुळ्ळकन माझ्यापुढे टॅक्सी टाकून पॅसेंजर शोधायला चालू केलं होतं. 

मी चिडून जोरजोरात हॉर्न वाजवायला लागलो पण तसंही त्या दीड-शहाण्याला  जवळचं भाडं नको होतं 

सो दोन पोरी माझ्या टॅक्सीत आल्या. 

लेसन लर्न्ट: 'मुंबईत नजरकी भूल तो $डवा गुल्ल'

त्या मुलींना मंगलदास मार्केटला जायचं होतं.     

मंगलदास मार्केट-  झवेरी बाजार- लोहार  चाळ म्हणजे मुंबईतला किचाट एरिया. 

चिंचोळे रस्ते अर्थात आज जरा निवांत!

मुलींना ड्रॉप केलं. त्या भुलभुलैयात कुठे होतो काय माहिती नाही. 

पण हळूहळू पुढे निघालो... कुठेतरी बाहेर निघूच. 

आता माझी एक सवय आहे. 

भाडी बरेचदा एकदम ट्रॅफीक मध्ये सोडावी लागतात पण मग मी पहिला चान्स मिळाला की माझ्या डायरीत नोंदी करतो, 

भाड्याची खास लकब, काही किस्सा, किती रुपये मिळाले वगैरे. 

नंतर ब्लॉग ह्या नोंदींवरूनच मारतो. 

तर... असाच मी रस्त्यानी चाललेलो बहुतेक झवेरी बाजार असावा. 

डावीकडे बंद दुकानासमोर किंचित मोकळी जागा दिसली... म्हटलं इकडे दोन क्षण थांबून नोंद करूया. 

म्हणून शिस्तीत इंडिकेटर देऊन गाडी लेफ्टला टाकणार इतक्यात लेफ्टनीच बाईकवर दोन पोरं झपकन पुढे आली. 

त्यांना थोडी कट बसली आणि ती किंचित धडपडली. 

"तेरी माँकी चू SSS त" त्यांनी थांबवून मला शिवी घातली. 

उजवीकडे अजून त्यांच्या गॅंगमधल्या आणखी तीन चार बाईक्सवर डबल/टिबल सीट पोरं.

सगळी तिकडेच जवळपास रहाणारी बहुतेक रविवारचं आझाद मैदानावरचं  क्रिकेट संपवून चाललेली. 

सगळी काटक सावळी, आताच्या फॅशनप्रमाणे पिळलेल्या मिश्या, टोकदार दाढ्या, डोक्याच्या पाठी बारीक मशिन नी पुढे लांब केस एकंदरीत अत्रंगी !  

माझ्या डोक्यात काहीतरी सरसरलं, मघाशी त्या टॅक्सीवाल्यानं चुत्या बनवल्याचा रागही असेल... 

 "फाईट ऑर फ्लाईट" ??? फाईट माँ की... माझी अमिग्डाला खुसपुसली. 

"काय झालं ए SSS ?", मी थंड डोळे आणि कॉलनीच्या टिपीकल निब्बर आवाज लावला. 

वातावरण तंग! पोरं कोणत्याही क्षणी मला वाजवायच्या तयारीत. 

मी लाडात फोन उचलला आणि रँडम बोललो,

"शिंदे जीप पाठवा इकडे, सोनावणेंना पण घ्या"

बोलताना सगळ्यांना डोळ्यांत डोळे टाकून खुन्नस देत राह्यलो. 

गांड तर माझीही फाटलेली पण मनातल्या मनात अनंत सामंतांचे सगळे हिरो जागवले. 

(खास करून एम. टी. आयवा. मधला दीपक गन स्लिंगर)

फोनवर थोडा ब्लफत राहीलो. 

त्यात नशीब म्हणजे पुढे एक निळी व्हॅन उभी. फकींग लॉटरी!

पोरांनीही बघितली ती बहुतेक आणि ती शिस्तीत बॅकफूटवर गेली. 

फ्रेंडली झाली. 

अहो काका तुमी गाडी एकदम सायटला घातली वगैरे मवाळपणे बोलायला लागली. 

मीही मग जास्त ताणलं नाही. 

ते निघाले आणि मीही. 

फक्त फार त्यांच्या दिशेनी गेलो नाही :) 

एक अंदाजे राईट मारला आणि क्रॉफर्ड-मार्केटला निघालो.

छातीत धडधडत होतं. तो ब्रेकिंग-बॅडमध्ये वॉल्टर व्हाईट पहिल्यांदा एक छोटासा स्फोट मारतो ना त्याची थोडी आठवण झाली. 

आणि हो जाताना त्या निळ्या व्हॅनला पास झालो... ती 'बेस्ट'ची होती. हॅहॅहॅ :)

जे जे वरून असाच पुढे जात राहीलो साधारण लालबागला एक भाडं उचललं डिट्टो अनंत सामंत फक्त थोडा कमी रुंद 

तसेच जाड ओठ पांढरी दाढी... रगेड हँडसम!  

हे साहेब कंटिन्यूअस सिगरेट ओढत होते. 

तो सगळं करून पचवून बाहेर पडलेला परेल भायखळा एरीयातला खतरनाक पण दिल का अच्छा रिटायर्ड गँगस्टर असणार असं मला उगीचच वाटत राह्यलं. 

काय सेन्स नाय त्या वाटण्यात सो सिरीयसली घेऊ नका. 

पण माणूस छान होता एकंदरीत. बहुतेक मालवणी. पण मराठी छान होतं एकदम शुद्ध. 

त्याची सोसायटी पण छान होती परळ व्हिलेजच्या टेकडीवर. 

हे परळ व्हिलेज पण भारी छान आहे अजूनही. 

तिकडून मला फोटो काढायचे होते पण त्यांचा वॉचमन घेऊ देईना. 

पण "प्रति-सामंत" साहेबांनी त्याला सांगून काही फोटो मला काढू दिले. 








परळ व्हिलेज वरूनच एका ताईंना बधवार पार्क (कफ परेड) ला सोडलं. 

डॉमेस्टिक हेल्पचा इंटरव्ह्यू होता त्यांचा ३:३० वाजता. 

लॉक डाऊननंतर त्या कामासाठी पहिल्यांदाच बाहेर पडत होत्या. 

तीन परळमध्येच वाजलेले पण स्वतःला ट्रान्सपोर्टर मधला जेसन स्टेथम समजून रामसाम गाडी मारली आणि त्यांना ३:३२ ला बधवार पार्कला टच केलं. 

देव (त्यांचे आणि सकळांचेच) बरे करो...  

आजची कमाई:

३४० रुपये.