Saturday, October 8, 2022

उपसंहार / सिंहावलोकन / रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे:

 आधी आपण बघूया प्रोजेक्टच्या सुरुवातीला सेट केलेले अजेंडे आणि नियम किती साध्य झाले वगैरे:

( पहा उपोद्घात: https://kalyapivalyanavasachigosht.blogspot.com/2020/02/blog-post_8.html )

१. मन्नत:

नवस तर फिटलाच असं म्हणता यावा. सो इकडे मी स्वतःला १०० % मार्क दिल्यास कोणाची हरकत नसावी. 

२. मुंबूड्या:

मुंबईत जन्मलो आणि वाढलो तरी गेली १५ वर्षं पोटापाण्यासाठी पुण्यात राहून काम करतोय. 

आई आणि बहिणीसाठी मुंबईला येणं होत रहायचं पण एकंदरीत धबडग्यात मुंबईचा टच सुटल्यासारखाच झालेला. 

ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने तो काही दशांशाने का होईना परत मिळाला हे छानच. 

मुंबईच्या बेसिक रस्त्यांची थोडीफार आयड्या आली. 

चुकत माकत, कधी पाशिंजरांच्या शिव्या खात,

चर्चगेट ते व्ही टी स्टेशन, चर्चगेट ते कुलाबा, व्ही टी ते माझगाव, हाजीअली ते महालक्ष्मी आणि पुढे परेल भोईवाडा

वगैरे वगैरे महत्त्वाचे रस्ते कळून आले. 

गूगल मॅप्सची मदत अर्थातच झाली. 

पण बहुतेक वेळा पाशिंजरांनी न रागावता माहीत नसलेले रस्ते दाखवले. 

खास करून मध्य आणि दक्षिण मुंबईचा ब्लू प्रिंट समजून आला. 

तीन महत्त्वाचे रूट्स म्हणता यावेत. 

जे एकमेकांना समांतर जातात. (पुण्यातल्या जे एम / एफ सी / आणि एस बी रोडसारखे पण त्यापेक्षा मोठया स्केलमध्ये )

पश्चिमेला समुद्रालगत जाणारा कॅडल रोड - वरळी - हाजीअली - पेडर रोड - चौपाटी हा एक: तिघांतला सगळ्यात पॉश

सायन - दादर टी टी - नायगाव - परेल - के ए एम - भायखळा - जे जे - व्ही टी ला जाणार दुसरा: बराचसा कनिष्ठ मध्यमवर्गीय

वडाळा - शिवडी - रे रोड - डॉकयार्ड - बी पी टी वाला तिसरा: हा तर साक्षात इंडस्ट्रीयल. ह्याचा चेहेरामोहरा हातावर पोट असलेल्यांचा.   

हे झालं भूगोलाविषयी. 

शिवाय थोडी खवैय्येगिरी करता आली. 

प्रकाश, सरदार पावभाजी, बॉम्बे कॉफी हाऊस, सुरती भोजनालय अशा काही आवडत्या जागांना भेट देता आली. 

रविवार दुपारची निवांत दक्षिण मुंबई चाखता आली. 

काही सुंदर पण भण्ण, भग्न, खिन्न जागा बघितल्या. 

चिंचोळ्या किचाट गर्दीच्या रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन गाडी चालवली. 

ठिकठिकाणचे सी एन जी पंप वाले, खास टॅक्सीवाल्यांसाठीचा अति गोड चहा बनवणारे चहावाले आणि बरेच टॅक्सीवालेसुध्दा ओळखीचे झाले.  

आणि बरंच काही... 

मुंबई अर्थातच कॉम्प्लेक्स, जगड्व्याळ, कधीच हातात न येणारी निसरडी म्यूझ आहे. 

तिला पूर्ण जाणणं अजिबातच अशक्य आहे हे मला नीटच कळलं. 

सो ह्या कॅटेगरीत मी मला ५५ % मार्क देईन. 

३. पर्स्पेक्टिव्ह:

आधीच म्हटल्याप्रमाणे हा रस्त्यावर उतरून जगण्याचा प्रयत्न होता तो सफल झाला का?

निर्दयपणे म्हणायचं तर बऱ्याच अंशी नाही!

पण त्याला माझी मानसिक तयारी होतीच. 

केवळ तीस सेशन्समध्ये मी स्कॉर्सेसीच्या "ट्रॅव्हीस बिकल"सारखा हार्ड कोअर टॅक्सीवाला होईन ह्याची शक्यता कमीच होती आणि ते झालंही नाही. 

पण एक वेगळ्याच जगाची तोंडओळख का होईना करून घेता आली. 

बऱ्याच लोकांचं आयुष्य उबदार, सुरक्षित, जमाडी जमतीनं भरलेलं नसतं हे कळलं. 

आपण होंडा सिटी चालवताना रस्त्यावरच्या बाकीच्या इतर ड्रायव्हर्समध्ये जी क्षमाशीलता आणि दिलदारपण असतो तो आपण टॅक्सी ड्रायव्हर असल्यास एकदम घटतो असा अनुभव आला :) 

रोड रेज अनुभवले, अरेला कारे केलं, शिव्या खाल्ल्या शिव्या दिल्या... 

टॅक्सीवालेच टॅक्सीवाल्यांची मारताना पाहिले. 

बंधुभावाला जागून मदतही करताना पाहीले. 

बरेचसे ड्रायव्हर आयुष्यभर टॅक्सीतच रहातात झोपतात त्यांना आपल्यासारखं घट्टंमुट्टं घरच नसतं हेही बघितलं. 

थोडक्यात सांगायचं तर पॅरासाईट किंवा भाऊबळी पिक्चरचा पॉईंट अजून थोडा नीट कळला. 

चालवायला टॅक्सी शोधताना एक ड्रायव्हर बोललेला भाई आप एक दिन भी नाही टिकोगे ते आठवलं. 

(तीस दिवस का होईना पण टिकलो) 

हे आयुष्य मी त्यांच्यासारखं जगू शकेन का? तर नाही.

आपण असं जगू शकणार नाही पण लोक काही पर्याय नसल्याने असं जगतात हे भान आलं. 

हेही किंचित यशच. 

म्हणजे कसं आहे ना संगीत शिकताना आपण ऑफ बीट जातोय ही समजणं सुद्धा मोठी गोष्ट असते... 

ऑन बीट वाजवणं ही तर पुढची पायरी. 

तर ती पहिली पायरी नीटच समजली इथे: You know that you don't know!

इकडे मी मला काठावर पास होण्यापुरते ३५ % देईन. 

आता आपण उपोद्घातातील नियम किती पाळले ते बघूया:

नियम: इमानदारीत टॅक्सी चालवायची. कुठेही नियम वळवा-वाकवायचे नाहीत. 

हा नियम चांगलाच पाळला. प्रसंगी पाशिंजरांच्या शिव्या खाऊनही सिग्नल तोडले नाहीत किंवा नो एंट्रीत कोणी बघत नसतानाही गाडी घातली नाही. 

टॅक्सीचा बॅजही थ्रू प्रॉपर चॅनेल जाऊनच मिळवला. 

थोडा नेट लावला तर सरळ मार्गाने झोलझाल न करता कामं होतात, सिस्टीमचे लोकंही मदत करतात हे पाहून छान वाटलं  

नियम : पाशिंजरला होईल तितकी मदत करायची. 

हे ही बऱ्याच अंशी पाळलं. 

होता होईल तो मदत केली. 

पैशासाठी अडवलं नाही. 

रस्ता चुकवल्यास सरळ पाशिंजरांची क्षमा मागून टाकली. 

नियम: नाही बोलणारे टॅक्सी-रिक्षावाले असंख्यवेळा आपल्या डोक्यात तिरके गेलेयत सो कुणालाही नाही म्हणायचं नाही. येईल ते भाडं स्वीकारत जायचं. 

हा मात्र काहीवेळा मोडला. दुसऱ्या शिफ्टचा ड्रायव्हर आपली वाट पहात असताना शेवटच्या क्षणी भाडं घेणं शक्य नसतं. 

अशा वेळी अपराधीपणे सॉरी पुटपुटून निघून गेलो. 

टॅक्सीवाले बरेचदा उगीच नाही म्हणत असले तरी बरेचदा त्यांची जेन्युईन अडचण असते हे समजलं. 

आधी रिक्षावाल्यांशी बरेचदा तावातावाने भांडायचो ते (अर्थातच) आता अजिबातच करावंसं वाटत नाही :)

गम्मत म्हणजे आत्ताशा सिव्हिल कपड्यांतही मला रिक्षा टॅक्सीवाले कुठे जायचं असेल तर पटकन हो म्हणतात. 

त्यांना भावकीतले लोक ओळखू येण्याचा सेन्स असावा बहुतेक. 

हे अजून काही बोनस फायदे:

इन जनरल बरेच टॅक्सीवाले चांगले मित्र झालेत. दिनेशभाई, राजकुमार इत्यादी. 

फेसबुक, ऐसी अक्षरे, सहकारी, मित्र, शेजारी आणि बऱ्याच जणांनी ह्या प्रोजेक्टचं भरभरून कौतुक केलं आणि माझी कॉलर टाईट केली. 

लिहिण्यात नोंदी करण्यात काही एक शिस्त आली. 

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही एक संकल्प आरंभापासून अंतापर्यंत तडीस नेण्याचं निखळ समाधान लाभलं. 

शेवटी ह्या ऍब्सर्ड, व्यर्थ, बरेचदा भंजाळून टाकणाऱ्या आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही प्रोजेक्ट लागतोच. 

मग कोणी वारीला जातो, कोणी सचिनच्या प्रत्येक मॅचला हजेरी लावतो, कोणी नवीन ऑपरेटींग सिस्टीम लिहितो, कोणी लोकांना व्याकरण शिकवतो आणि कोणी कबुतरं पाळतो. 

तसंच हे ही... 

पुढे काय?

काही तरी नवीन!

बघूया कसं जमतंय ते!!


------- समाप्त --------