Saturday, February 29, 2020

३ मार्च २०१८

मागचा आठवडा मी आणि आईनी खपून सगळे डोमिसाईलला लागणारे सगळे पेपर्स तयार केले:
ते खालील प्रमाणे:

  1. पूर्ण भरललेला ऍप्लिकेशन फॉर्म: तसा सोप्पा आहे फार किचकट नाहीये तो. 
  2. फॉर्मला चिटकवलेला फोटू 
  3. एक पूर्ण भरललेला छोटुसा डिक्लरेशन (हा फॉर्म बरोबरच येतो)
  4. १० वीच्या स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटची झेरॉक्स, याची वर्जिनल कॉपी कॉलेजमध्ये आपण जमा केलेली असते हे लक्षात ठेवा मी वर्जिनल नाय म्हणून उगीच पॅनिक झालो  
  5. १२ वीच्या लिव्हिंग सर्टिफिकेटची झेरॉक्स, आणि वर्जिनल 
  6. दहावी बारावी बीएस्सी आणि एमएस्सीच्या मार्कलिस्ट झेरॉक्स, आणि वर्जिनल
  7. आधार कार्ड झेरॉक्स, आणि वर्जिनल 
  8. वोटर्स कार्ड झेरॉक्स, आणि वर्जिनल 
आणि मग ठरवलं की आत्ता अशी जय्यत तय्यारी केल्यावर फर्स्ट शॉटमध्ये फॉर्म सबमीट मारायचा की झालं आपलं काम 
मग मस्त (दुसऱ्या ) शनिवारी सकाळी तयार होऊन माझे लकी बूट घालून दाढी बिढी करून पोचलो खिडकी  नंबर ४ वर   

बाय द वे इकडे खिडक्यांवर सगळीकडे एकदम कोवळी  चुणचुणीत पोरं पोरी आहेत 
त्यामुळे छान फ्रेश वाटतं 
आणि ती फारशी हसत बिसत नसली तरी टिपिकल सरकारी वसवस ही नाही करत 


तर मी सगळे छान पिनअप वगैरे केलेले पेपर्स सरकवून तय्यार की आता आपण डन डना डन...  
तर भस्सकन पोपटच केला खिडकीमागच्या लाल टिकावाल्या पोराने 

त्यानं मृदू पण ठाम आवाजात सांगितलं की २०१८ पासून मागच्या १० वर्षांचं प्रत्येक वर्षाचं एक तरी मुंबईत राहिल्याचं प्रूफ आणा 
उदाहरणार्थ लाईट बिल / एल आय सी प्रीमियम ची रिसीट वगैरे. 
झाला का आऱ्या आत्ता!

मी तीस एक वर्षं वांद्र्यात रहात असलो तरी दोन तीन जागा बदलेल्या वगैरे. 
पण मला आठवलं की आईच्या एका कलीगनं मागे लागून एक एल आय सी पॉलिसी घ्यायला लावलेली. 
(आपल्यात नाहीतरी पॉलिस्या ह्या नाही म्हणण्याच्या धाडसाअभावीच घेतल्या जातात :))

घड्याळ बघितलं ११:३० 
वेळ होता तसा ..कट टू कट :(
रिक्षात  बसता बसताच आईला विचारलं, "प्रीमियम रिसीट काढून ठेवणार का?"
आई म्हणाली, "तू घरी ये मग बघू."
हो म्हणजे पोटातला हर्निया सावरत ती कशी बेडखालचे पेपर्स काढणार ना? 
(आपल्यात नाहीतरी सगळे रेकॉर्ड्स सोफा कम बेडच्या बॉक्स मध्येच ठेवले जातात  :))

म्हटलं ठीक आहे... 
वांद्र्याला पोचलो १२:००

आणि... 
आईनं मागच्या दहा वर्षांच्या प्रीमियम रिसीट्स काढून तयार ठेवलेल्या!
मग तिच्या २३ आणि तिला मदत करणाऱ्या बारकुड्या बहिणीच्या १९ अशा टोटल ४२ पाप्या घेऊन मी खाली उतरलो 
१२: १५

परत अंधेरीला पोचलो: १२: ५०
ला. टि. पो. ने फक्त वरवरच्या दोन रिसिटी बघितल्या आणि टिक मारून मला पावती दिली. 

येयय :)
जिंकलो!

स्टुपिड एल आय सी च्या रिसीट्स अशा ऐनवेळी कामाला आल्या हे मस्तच. 
सो लोक हो, एल आय सी प्रीमियम हा सरकारमान्य रेसिडन्स प्रूफ आहे बरं का :)

आत्ता चौथ्या शनिवारी सर्टिफिकेट घ्यायला जायचं!

खर्च:
फॉर्मला पाच रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लागतो तो बाहेर १० रुपयाला मिळतो. 
खरं तर माझ्या तत्वात बसत नाय वगैरे पण युद्ध जिंकण्यासाठी काही चकमकी हराव्या लागतात हेच खरं :(

आणि रिक्षाचे डबल पैसे :)

सो एकूण खर्च: ३०० + १० = ३१० रुपये














Wednesday, February 26, 2020

१७ फेब २०१८

ऍपरंटली वांद्रे पूर्व अंधेरी तालुक्यात येतं गम्मतच सगळी नं काय.
आज भवन्सजवळच्या तेहसीलदार ऑफिसमधून डोमिसाईलचा फॉर्म घेऊन आलो.
आत्ता पुढच्याच्या पुढच्या शनिवारी फॉर्म सबमिट मारायचा
पुढच्याच्या पुढच्या कारण अर्ज सबमिट करायचा टाइम फक्त:
मंगल गुरू आणि शनी १०:३० ते १:३०
जॉब पुण्यात असल्यामुळे वीकडेज बाद
आणि सेकंड आणि फोर्थ शनिवार सुट्टी


खर्च ७ रुपये (फॉर्मची किंमत ७ रुपये)

Tuesday, February 25, 2020

१७ जानेवारी २०१८

मध्ये बराच काळ गेला (जवळ जवळ ९ महिने)
नवीन जॉब त्यासाठी नवीन जागा अशा सगळ्या धकाधकीत ह्याचा पाठपुरावा राहूनच गेला.

शेवटी आज बॅजसाठी काय काय लागतंय याची माहिती गोळा करायला आर. टी. ओ.त गेलो .
कुठून सुरुवात करायची काहीच कळेना.
एका भल्या टॅक्सीवाल्याने आयडिया दिल्यानुसार सरळ पब्लिक रिलेशन ऑफिसर ज@@डे यांच्या केबीनमध्ये गेलो.
इकडे तिकडे वेड्यासारखं रँडम भेटण्यापेक्षा आधी पी. आर. ओ. सायबांना पकडलं तर रिझल्ट्स पटकन मिळतील ...
असं मला वाटलं होतं :)

पण तसं काय झालं नाय.
एकतर त्यांच्या केबीन मध्ये घुसल्या घुसल्या भस्सकन लाईटच गेले.
अंधारात दोन समलिंगाच्या स्ट्रेट माणसांना उगीचच जाणवतं तसं सेक्शुअल टेन्शन जाणवायला लागलं...
मग त्या गूढ अंधारात घाबरून त्यांनीच १२ नंबरच्या खिडकीवर जायला सांगितलं...
तिकडे आधी कोण नव्हतं पण नंतर आलेल्या मॅडमनी १३ वर  टोलवलं  आणि १३ वरच्या मनुष्याने शेवटी दया येऊन मला झटकन रिक्वायरमेंट्सचा फोटो काढून दिला.
येयय :)

तर या रिक्वायरमेंट्समध्ये मुख्य गोष्ट म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे आपण मुंबईत किमान १० वर्षं रहात असल्याचा दाखला.

खर्च:
0 रुपये.

आता भवन्स कॉलेजजवळच्या तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन डोमिसाईल सर्टिफिकेट काढून आणणे हे पुढील काम.

११ एप्रिल २०१७

टी. आर. लायसन्स घरी आलं.
आनंदाने एव्हढी मोठी वाढलेली दाढी काढली.
आईला ती कधीच आवडायची नाही.

मी चिकन-चुपडा बेसन लाडू झालेला बघून आई तर रडायलाच लागली.
हे आई लोक्स भारी सेन्टी असतात. 


Thursday, February 20, 2020

१६ मार्च २०१७

तर आता ट्रान्सपोर्ट लायसन्स:

बेसिकली ट्रान्सपोर्ट लायसन्स असेल तरच तुम्ही टूरिस्ट (पिवळी नंबर प्लेट) गाडी चालवू शकता.
टॅक्सीसाठी हे नेसेसरी असलं तरी सफिशियंट नसतं. त्यासाठी तुम्हाला बॅजही लागतो.
पण ह्या लायसन्सवर तुम्ही ओला-उबर चालवूच शकता.

आता ह्याची प्रोसेस थोडी ग्रे आहे.
हे लायसन्स तुम्हाला ड्रायव्हिंग स्कूलमार्फतच काढावं लागतं.
(असं मला सांगण्यात आलं.)

मग एका शुक्रवारी ड्रायव्हिंग स्कूलचे हुसेनभाई छान गोल टोपीत नमाज वगैरे पढून सुरमा वगैरे लावून मला आर. टी. ओ. ला घेऊन गेले आणि मी ड्रायव्हिंगची टेस्ट दिली.
गेली पाच वर्षं गाडी चालवत असल्याने त्याचा काही प्रश्न नव्हताच.
सो मी आरामात टेस्ट दिली आणि तहान लागली म्हणून लिंबूपाणी प्यायला गेलो.

तेवढ्यात हुसेनभाई मला शोधत आरडाओरडा करत आले.
"अरे भाय तुमको जाने किसने बोला चलो जल्दी वापस."
माझी जरा फाटलीच... च्यायला आता काय?

परत आम्ही त्या आर. टी. ओ. च्या मैदानात गेलो.
हुसेन भाईनी मला खस्सकन खेचलं आणि बोलले, "जाओ बैठो!

मला काही कळेना... परत टेस्ट?
पण समोर कुठलीच कार नव्हती...
...
...
...

एक रिक्षा उभी होती फक्त.
हुसेनभाईंनी मला ढकललं आणि त्या रिक्षावाल्यानी मला रिक्षात ओढलं.
ड्रायव्हिंग सीटवर!

त्यानंच रिक्षा चालू केली हॅण्डल मला दिलं.
मग युवर्स ट्रूलीनी रिक्षाचा एक राउंड मारला.
तसं सोपंच होतं पण रिक्षाचा टर्न मारताना मात्र भारी जोर काढायला लागतो.
आत्ता मला कळलं ते रिक्षावाले असं पादायच्या तयारीत असल्यासारखे एक कुल्ला सरकवून का बसतात ते.

एकंदरीत मला काही कळायच्या आधीच माझी रिक्षाची पण टेस्ट देऊन झाली.

हे म्हणजे कोळणीनी पापलेट पिशवीत टाकताना दोस्तीखात्यात चार  मांदेलीसुद्धा टाकावीत तसं काहीसं :)

खर्च:
१००० रुपये.
     

Monday, February 17, 2020

३१ जानेवारी २०१७

बदललेला ऍड्रेसवालं लायसन्स घरी आलं.
स्पायडी ताडदेवच्या सॊनीकडून वांद्र्याच्या मार्व्हलकडे आला.
होमकमींग :)



Friday, February 14, 2020

२९ नोव्हेंबर २०१६

आर. टी. ओ. किंवा रादर कोणतीही सरकारी कामं करण्याची टीप नंबर १.

ऑफिस उघडायच्या आधी पाच मिनटं पोचा.
म्हणजे दहा वाजता.
काय्ये ना सकाळी सकाळी पोचलो की रांगा जवळ जवळ नसतातच.
किंवा असल्या तरी 'तूम्मीच पयले'
सो नो मचमच.

दुसरा फायदा असा की.
खिडकीच्या पलीकडच्या सगळ्या लोकांचा मूड छान फ्रेश असतो.
मस्तं स्माईल वगैरे देतात.

सो ऍड्रेस ट्रान्स्फरचे फॉर्म्स भरून...
क्लार्क + हेडक्लार्क + आर. टी. ओ. सायबांची सही घेऊन...
बायो-मेट्रिकवर (भयाण :)) फोटो काढून
डॉट एका तासात आपल्या गोष्टीचा नायक बाहेर आलाय :)

आजचा खर्च:
३६३ रुपये ५५ पैसे.
त्यांनी ३६४ घेतले पण फेअर इनफ.
(एजंट नॉर्मली २००० घेतो)

सो आजचा धडा:
थोडे स्वकष्ट आणि पेशन्स ठेवायची तयारी असली की पैसे न देता कामं होतात...

आता दीड महिना वाट बघायची.
नवीन ऍड्रेसवालं लायसन्स घरी आलं की पुढची स्टेप:
कमर्शियल (टूरिस्ट) लायसन्स काढायचं.





Monday, February 10, 2020

२८ नोव्हेंबर २०१६

हायला वांद्र्याला असलो तरी लायसन्स ताडदेव आर टी ओ चं होतं.
आता का?
तर शेवटी भारतीय असल्यामुळे सगळ्या गोष्टी वशिला लावून सोप्या? करून घ्यायची वाईट सवय झालेली.
माझ्या एका लांबच्या मामाचं गिरगावला ड्रायव्हिंग स्कूल असल्याने तेव्हा कैक वर्षांपूर्वी झटपट लायसन्स तिकडून करून घेतलेलं...

पण आत्ता मात्र टॅक्सीचा बॅज काढायचा तर लायसन्स आणि राहायचा पत्ता मॅच होणं मस्ट!
हे असं आपण तेव्हा जुगाड मारतो आणि नंतर मग घोळ होतात.
बाय द वे ह्याच विषयावर  हंस २०१९ च्या अंकात "अलियास" नावाचा छान किस्सा आलाय.
गॅसचं कनेक्शन घेताना मारलेला शॉर्टकट आणि त्याची नंतरची चित्तरकथा.

इथे तर आपलं ठरलंय ना की सगळं स्वतः: करायचं.
थ्रू प्रॉपर चॅनेल... "शॉर्टकट" मारायचे नाहीत वगैरे.
तर सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ताडदेव आर टी ओ कडून एन. ओ. सी. घेणं.
(आणि मग ते लायसन्स अंधेरी आर. टी. ओ. ला ट्रान्स्फर करणं.)

सो ताडदेव...
ताडदेव आर. टी. ओ. चं लोकेशन फार मस्त आहे खरं तर:

महालक्ष्मी स्टेशन चा ब्रिज चढून आलात की सरळ रेल्वे रुळांना समांतर ब्रिजवरून जायचं रेसकोर्स उजव्या हाताला ठेवून.
साधारण दहा मिनटांत तुम्ही ऑलमोस्ट हिरा-पन्नाच्या सिग्नलला पोचता.
त्याच्या जस्ट आधी एक लेफ्ट टर्न आहे तो घ्यायचा.
मग उजवीकडे गोल्फ कोर्सची निवांत हिरवाई  बघत रमत गमत चालत अजून पाच मिनिटांत आर टी ओ.

अंधेरीच्या निर्विकार कॉंक्रिट बिल्डिंगपॆक्षा ताडदेव आर टी ओ ला मस्त कॅरेक्टर आहे.
प्रशस्त मोकळी जागा, बैठी ऑफिसेस आणि झाडं वगैरे.

काम झटपट झालं आणि मग मी खुशीत येताना फूटपाथवरल्या आजीकडून मस्त गजरे घेतले.
आजी पण झक्कास होती  छान टूथलेस हसत तिनं तीनाऐवजी चार गजरे दिले... शुभ-शकुन!

चला श्री गणेशा तर चांगला झालाय आता उद्या धडक अंधेरी आर टी ओ.
काम लायसन्स ट्रान्स्फर.

आजचा खर्च:
१००० रुपये






























Saturday, February 8, 2020

काळ्या पिवळ्या नवसाची गोष्ट: उपोद्घात


आयुष्यात थोडा काळ का होईना काळी-पिवळी टॅक्सी चालवायची हे मी बरीच वर्षं घोकत होतो.
आता का?

तर बरीच कारणं:

१. मन्नत:
बरीच वर्षं रखडलेलं आमचं घर होण्यासाठी आईनं अपार कष्ट आणि धडपड केली.
तेव्हाच मी ठरवलेलं की आपलं मुंबईतलं घर झाल्यावर या युनिव्हर्सचे, मुंबईचे आभार मानायचे.
कसं?
तर किमान एक महिना टॅक्सी चालवून...
लोकांना सेवा देऊन.
म्हणजे लोकं कसे गुरुद्वारात चप्पल संभाळतात, किंवा भंडाऱ्यात आनंदानी वाढायला सरसावतात तसं काहीतरी.
बाय द वे कसं कोण जाणे... कुठल्याही भंडाऱ्याचा साधा डाळ-भात-भाजी नी लाडू कातील टेस्टी लागतो.
एन्नी वेज...
शेवटी आमचं ते छोटंसं सुबक सुंदर घर झालंच.
सो इट वॊज हाय टाइम .

२. मुंबूड्या:
म्हणजे जी मुंबई मुंबई म्हणून आपण उमाळे काढून बोलत असतो ती खरंच आपल्याला माहीत आहे का?
की नाही?
नसल्यास या निमित्ताने ती धांडोळून बघता येईल का?
फार नाहीतर थोडीतरी??

३. पर्स्पेक्टिव्ह:
आमचे नयन खानोलकर सर मुंबईच्या बिबट्यांसाठी खूप काम करत असतात.
(भारी सॉर्टेड माणूस.)
ते एकदा बोलण्याच्या ओघात म्हणलेले, "आपण नं रस्त्यावर उतरून आयुष्य जगत नाही."
पटलंच ते एकदम रप्पकन!
हो म्हणजे आपले मित्र, बायको, नातेवाईक, कलीग्ज सगळॆ जवळ जवळ त्याच त्याच डेमोग्राफिक मध्ये असतात.

तर मग आपल्या ह्या हायर मिडल क्लास वाल्या, ठाणे-बोरिवली-वांद्रे-बाणेर-विमाननगर मध्ये २ बी. एच. के. त रहाणाऱ्या,
७ ते १३ लाखाची गाडी चालवणाऱ्या,
जाराचे शर्ट्स घालणाऱ्या (स्पेलींग ZARA असलं तरी उच्चार जारा आहे. हाच तो हायर मिडल क्लास स्नॉबिशपणा :)),
वर्षातून एक फॉरीन टूर करणाऱ्या,
दणादण स्विगीवरून अजब गजब पदार्थ ऑर्डर करणाऱ्या,
गेम ऑफ थ्रोन्स नी सॅक्रेड गेम्स बघणाऱ्या कोषाबाहेरचं जे मोठ्ठ आणि तितकंच खरं जग आहे...
त्या जगातले लोक कसे रहातात हे कणभर तरी समजून घेता येईल का?
आपण ज्यांना टॅक्सीवाला भैया म्हणत आईबहिणीवरून शिव्या देत आपल्या शौर्याची सुरक्षित खाज भागवून घेतो,
त्यांची ही काही बाजू असेलच... ती या निमित्ताने एक शतांश तरी समजावी असाही हेतू.

आता ह्याला रॉकस्टार मधल्या रणबीरचा भाबडेपणा म्हणा, सोशल एक्सपेरिमेंट म्हणा, एका फेसलेस  होतकरू लेखकानं जगण्याला कवटाळण्याची केलेली प्राणांतिक धडपड म्हणा किंवा सुलेमानी कीडा  म्हणा.
ह्याचं जे पण काही होतंय त्याच्या नोंदी मी इथे वेळोवेळी टाकत जाईनच.

तर...

आधी काही रूल्स सेट केले.
ते खालील प्रमाणे:

नियम १:
साधारण तीस दिवस टॅक्सी चालवायची. हे तीस दिवस अर्थातच जॉबमुळे सलग मिळणं अशक्य. तेव्हा बहुधा शनिवार-रविवार चालवून हे फ्लाईन्ग ;) अवर्स पूर्ण करायचे.

नियम २:
टॅक्सी चालवून वरकमाई करणं हा काय आपला हेतू नाय. हा मुळात एक प्रकारे कायनातला थँक्यू बोलायचा प्रयत्न आहे. सो... 
नियम २-अ: इमानदारीत टॅक्सी चालवायची. कुठेही नियम वळवा-वाकवायचे नाहीत. 
नियम २-ब: पाशिंजरला होईल तितकी मदत करायची. 
नियम २-क: नाही बोलणारे टॅक्सी-रिक्षावाले असंख्यवेळा आपल्या डोक्यात तिरके गेलेयत सो कुणालाही नाही म्हणायचं नाही. येईल ते भाडं स्वीकारत जायचं. 
   
नियम ३:
ओला-उबेर चालवणं शक्य आहे...
पण मला लहानपणापासून काळ्या पिवळ्या टॅक्सीचं भारी आकर्षण...
ते विडीचा वास येणारे शिडशिडीत मुस्लिम ड्रायव्हर्स...
त्यांच्या त्या साळुंकी सारख्या फियाट...
ते हॅन्ड गियर आणि त्यांच्या टोकाच्या त्या कट ग्लासचा पाचू असलेल्या मुठी.
जाम आवडायचं लहानपणापासून...
सो काळी पिवळीच चालवायची.
मुंबईची शान आहे ती!!!


आता टॅक्सी चालवण्यासाठी ऑब्व्हियस गोष्ट म्हणजे अर्थातच टॅक्सीचा बॅज काढणं.
उद्यापासून ते ऑपरेशन चालू.