Friday, September 24, 2021

टॅक्सी दिवस १७: २९ ऑगस्ट २०२१

जवळ जवळ सहा महिन्यांनी टॅक्सीवर रुजू झालो. 

कारण अर्थातच दुसऱ्या लाटेचा लॉकडाऊन. 

शिवाय मुंबईत पली-बढी आणि पुण्याला ख्या ख्या हसणारी बायको आता कट्टर पुणेकर झाली हसून पुणे सोडायला मागत नाही हे ही. धर्मांतरीत बरेचदा जास्त कट्टर असतात ते असे :)

आज दिनेशभाईंना चावी घेऊन यायला थोडा वेळ होता.  

तो पर्यंत वाट बघत काढलेले मलबार हिलचे हे काही फोटो  





बाकी सकाळ आणि दुपार अगदीच स्लो होती. 

चर्चगेट स्टेशन - मेट्रो - फोर्ट - व्ही. टी. - कफ परेड असाच फिरत राहिलो. 

दुपारी टॅक्सीतच डुलकी काढून फ्रेश झालो आणि झटका आल्यागत सरळ दादरला आलो. 

रानडे रोडवरच्या किचाट गर्दीत उगीचच कीडा म्हणून टॅक्सी टाकली. 

रानडे रोडच्या रम्य आठवणी बऱ्याच आहेत. 

पुढे पोर्तुगीज-चर्च, सिद्धी-विनूला जाणारा गोखले रोड आणि प्लाझा - दादर स्टेशनला जाणार एन. सी. केळकर रोड ह्या दोघांना जोडणारा हा छोटेखानी रोड. 

छोटेखानी असला तरी स्ट्रॅटेजिक असल्यामुळे ब्यकार बिझी दादरचा सुवेझ कालवा म्हणालं तरी चालेल. 

पण ह्याचा खरा चार्म दिवाळीच्या दिवसांत. 

दिवाळीची सलामी खरं तर गणपती संपल्यावर एखाद्या आठवड्यातच लागायची इथं. 

कारण रानडे रोडवरच्या स्टेशन एन्डला भरणारी महाराष्ट्र व्यापारी पेठ:

व्यापारी किंवा रादर "व्यापार" पेठ दिवाळीच्या बरीच आधी भरत असली तरी दिवाळीचे वेध, माहौल आणि चाहूल आणणाऱ्या बालपणीच्या रमल खुणांमधली ही एक प्रमुख खूण.

साधारण दांडियाच्या आसपास मी आई बाबा आणि छोटी बहीण नमा इथे चक्कर मारणार म्हणजे मारणारच. 

मामा लोकांसाठी भाऊबीजेला शर्टपीस, नवीन प्रकारचे गृहोपयोगी आयटम, इमिटेशन ज्वेलरी असं काय काय घायचो आम्ही इथे. 

पण व्यापारी पेठेची खरी खासियत म्हणजे अगदी कटींग एज म्हणाव्यात अशा काहीतरी सुपीक वस्तू. 

आजकाल टेलिशॉपिंगच्या चॅनेल्सवर किंवा एक्सप्रेसवेच्या फूडमॉलला बघून त्याचं अप्रूप एवढं राहिलं नाही पण तेव्हा मात्र नारळ फोडायची सोप्पे मशीन, तेल वाचवणारा बुधला, किंवा मटणाच्या नळीतला बाव काढायची शिडशिडीत कांडी (जी नंतर आम्हाला कुठेच मिळाली नाही) असं काय काय बघून मी भारी इम्प्रेस व्हायचो.

तिकडूनच एकदा एक बिल्ला घेतलेला. 

तेव्हा एटीज आणि अर्ली नाईंटीज मध्ये स्टाईल होती असे बिल्ले जीन्सच्या मांडीवर किंवा शर्टाच्या खिशावर लावायची. 

त्यावर जॉर्ज मायकेल, एम जे किंवा सुस्तनी सॅम-फॉक्स ह्यांचे फोटो असत किंवा बॅड बॉय  नाहीतर फ्री युवर माईंड   नाहीतरफेथ  असं काही लिहिलेलं असायचं. 

पण व्यापारी पेठेत मिळालेला हा बिल्ला काही वेगळाच होता. 

वेगवेगळ्या कोनांतून बघितलं की झळझळत्या रंगांत वेगवेगळे होलोग्राफीक पॅटर्न्स दिसायचे. 

त्याचे रंग इतके सुंदर आणि फकिंग सरिअल होते की असा बिल्ला खरंच माझ्याकडे होता की ते स्वप्न होतं ह्याच्या उंबऱ्यावर मी आज आहे. 

पण होता तो बिल्ला माझ्याकडे नक्की... बहुतेक :) 

त्या रंगांच्या आठवणीवरच ट्रिप केलं मी थोडा वेळ रानडे रोडवरच्या ट्रॅफिकमध्ये. 

आणि मग एका साध्याश्याच कपलला उचललं. 

मागेही सांगितल्याप्रमाणे बरेचदा पुरुषांचा सूक्ष्म अप्पर हॅन्ड जाणवत राहतो कपल्सच्या बोलण्यातून. 

उदाहरणार्थ इथे ती त्याला बिचारी तीन-तीनदा  कोणतं तरी "चौकड्यांचं" शर्ट घ्यायच्या प्लॅनविषयी बोलत होती. 

"त्याला छान दिसेल" वगैरे 

आणि हे येडं आँ नि अँ करत विचारतंय, "आरे मंजे काय?" 

ती बिचारी हताश होऊन म्हणाली, "आरे चेक्सचा शर्ट रे"

"अगं येडी मग आसा बॉल्ना चेक्स म्हणून चौकड्या चौकड्या काय करते?"

मला त्या पोरीचं थोडं वाईट वाटलं.  

शिवाजी पार्कला त्यांना सोडल्या सोडल्या तीन कोवळे तीन एजर्स घेतले. 

त्यांना अँटॉप हिलला जायचं होतं. 

पाठी दोन मुली आणि बाजूला एक मुलगा  

टिपिकल मुंबईकर टीन-एजर्स! फार श्रीमंत नसल्यामुळे अजूनच चटपटीत. 

पाठची एक शिडशिडीत थोडा जास्त मेकअप केलेली मुलगी बहुतेक ग्रुपची अल्फा डॉगअसावी.

तिचीच उत्साही बडबड, फणकारे आणि बाकीच्या दोघांची फिरकी घेणं कॉन्स्टंट चालू होतं. 

माझ्या बाजूचा हसरा मुलगा बिचारा खूपच झालं की, "भोत बोल रही है, बचेगी नही तू हां" अशा क्षीण पोकळ धमक्या देत होता.  

वो उसको लाईक करता है क्या...  

वो दोनो का ब्रेकअप हुआ...  

मै तो उसका फोन भी नै उठानेवाली... 

इत्यादी इत्यादी त्यांचं चालू होतं. 

बोलण्याच्या ओघात विषय तिच्या नवीनच लग्न होऊन आलेल्या भाभीवर गेला. 

"भाभी कैसी है  रे तेरी?", दुसऱ्या मैत्रिणीनं विचारलं. 

"फिफ्टी पर्सेंट अच्छी है!"

भारी! हे पर्सेंटेज मला फार आवडले. 

मी माझे टॅक्सीवाले कान टवकारले. 

"क्यूँ रे ऐसा?", मैत्रिणीनं ऑब्व्हियस प्रश्न विचारला

"अरे वैसे मेरे को सपोर्ट करती है लेट आयी वगैरे तो लेकिन मई कुच बी शेयर की तो जाके भैया के पास उलटी करती है यार. 

फिर भैया मेरी बजाते है" (कोट अनकोट हेच होतं आणि आख्ख्या जगातली पोरं असंच बोलतात सो चिल वगैरे)

मस्त होते तिघेही. 

मी उदारणार्थ आज ४४ वर्षांचा आहे आणि आम्हालाही जिवलग मैत्रिणी होत्या / आहेत तरी १०० % मोकळेपणा नव्हता हे कबूल. उगीचच वायफळ किंचित सेक्शुअल टेन्शनही असायचं वगैरे. 

पण आजकालच्या पिढीची आंतर्लिंगी मैत्री अजूनच निर्विष दिलखुलास झालीय हे छानच. 

तर त्यांना अँटॉप हिलला एका कॉर्नरला सोडलं आणि आता सुसाट जाऊन टॅक्सी रिटर्न करायचा प्लॅन करू लागलो. 

तेवढ्यात एक घामजेलेला सौधिंडियन थोडासा मोहनलालसारखा दिसणारा इसम आला, 

"वो सामनेवाला लेनमेसे सामाण लेगे अगे जाणेगा हई प्रदिग्शा नगर झायन चलेंगे क्या?"

मी "सामनेवाला" लेनकडे एक नजर टाकली. 

आणि मला पहिली आठवण झाली झोंबी मूव्हीजची. 

आख्खी गल्ली माणसांनी ठास ठास ठासून भरली होती. 

गाडी तर सोडाच मुंगी किंवा मुंगीचं नखही आत जाणं अ-फकिंग-श-फकिंग-क्य दिसत होतं 

माझ्या घामेजलेल्या मन:चक्षूंना ती गल्ली अशी दिसली. 


पण मोहनलाल माझा आवडता नट असल्याने मला त्या माणसाला नाही म्हणवेना... 

त्याला नेहमीचा पेरेनियल प्रश्न विचारला, "आप रस्ता बतानेमे हेल्प करेंगे ना?" 

"हा करेगा ना" म्हणत तो आईला लुचणाऱ्या लहान बाळाच्या अधीरतेने आत घुसला. 

मी पण हिय्या करून गाडी आत टाकली. 

सुहास शिरवळकरांच्या भाषेत अगं गं गं!!!

माझी गाडी कशी जात होती नी माणसं कशी बाजूला होती, की दोन्ही बाजूंनी चिकटणारी दुकानं पण बाजूला होत होती की हा मुंबई नावाची राक्षसरूपी देवी हा चमत्कार घडवून आणत होती मला खरंच माहीत नाही. 

त्यात समोरून पण गाड्या पास होत होत्या आता बोला. 

मुंबई खरंच जगात एकमेवाद्वितीय आहे. 

पण हे प्रचंड स्ट्रेसफुल होतं. मी थोडंसं दरडावूनच लेफ्ट साईड पहायची जबाबदारी मोहनलालवर टाकली.  

आणि तो ही थोडं अपराधी वाटून इमानदारीत को-ड्रायव्हिंग निभावत होता. 

 हे म्हणजे माझी एक मैत्रीण तालेवार सासुरवाडीला वारस पाहिजे म्हणून अनिच्छेनेच आय. व्ही. एफ. ला तयार झाली.  

पण नंतर आय व्ही एफ ची हजार अवधानं सांभाळताना फ्रस्ट्रेट होऊन नवऱ्याला घालून पाडून बोलत, गिल्टी करत  सगळी कामं त्याच्याकडून करून घ्यायची तसं थोडंसं. 

आता ते सिम्पली दत्तक घेऊ शकले असते किंवा मी सिम्पली नाही म्हणू शकलो असतो पण... पणच... 

त्यात एका ठिकाणी मोहनलालची गरीब दिसणारी बायको आणि त्याहूनही गरीब दिसणारी मुलगी त्याची वाट बघत थांबलेले. 

तिकडे मी गाडी थांबवली आणि त्या तिघांनी आणि मी मिळून कसले तरी जाड लोखंडी पत्रे आणि एक ब्रिटिश काळातलं शिलाई मशीन टॅक्सीच्या कॅरिअरवर चढवलं. 

हे सगळं त्या किचाट गर्दीतच हां. 

मी उदारणार्थ आज ४४ वर्षांचा आहे पण मला अक्षरश: जेन्युइनली आईची आठवण यायला लागली. 

मम्मॅ SSS असं जोरात भोकाड पसरून रडत टॅक्सी सोडून पळून जावंसं वाटायला लागलं. 

त्यात गाडीला जरा जरी हिसका बसला की वरचे लोखंडी पत्रे प्रचंड आवाज करत थाड थाड आपटायचे. 

एका अगदीच अडनिड स्पॉटवर एक उंच काळा मोठ्ठा पोरगा माझ्या खिडकीत वाकून बोलला खर्ज लावत... 

"भाय ये एरीयामे गाडी आरामसे चलाने का क्या"     

कपाळात आलेल्या गोट्या त्याला दिसू न देता मी ही स्मगली मान हलवली. 

म्हणजे हॉलीवूड मूव्हीत असतो तर तो मला निग्गा आणि मी त्याला "DAWG" म्हणालो असतो. 

असंच धीरोदात्त बेअरींग ठेवत आम्ही रेटलं आणि पुढे रस्ता किंचित का होईना विरळ झाला. 

मी सुटकेचा नि:श्वास सोडला. 

हा खूफिया रस्ता डायरेक्ट आणिक डेपोजवळ बाहेर पडतो. 

तिकडून आम्ही प्रतीक्षा नगरला आलो. 

मोहनलाल साहेबांचं घर एका म्हाडा कॉलनीत होतं. 

गर्दी पहिल्यापेक्षा बेटर असली तरी ती होतीच. 

आम्ही जरा बऱ्या रस्त्यावरून एक चिंचोळा राईट मारला

मी हुश्श करून गाडी थांबवली. 

मी गळून गेलेला वगैरे. कुठे प्रतीक्षानगर की कोळीवाड्यात आलोय काही आयडीया नाही. 

त्यालाच म्हटलं, "भाई अभी बाहर निकलने का रस्ता बताव."

तो कॉन्फिडन्टली बोल्ला, "बस आगे जाके सामनेवाला लेफ्ट लेलो". 

समोरचा रस्ता पण बारीक एकच गाडी जाईल असा. पन्नास एक फुटांवरचा सामनेवाला लेफ्ट पण मला थोडा संशयास्पद वाटला.  

पाठचा आडवा रस्ता बराच रुंद होता फक्त थोडा एक दहा फूट रिव्हर्स मारावा लागला असता. 

मी त्याला पुन्हा एकदा विचारलं, "की रिव्हर्स लेके जाऊ?" 

आता त्याला घरी जायची घाई झालेली थोडा वैतागूनच तो बोल्ला, "अरे सामनेसे जाव यार"

खाया पिया भर गया पेट #$%सेठ अब #$%पे बैठ म्हणतात ते असं. 

मी गाडी पुढे काढली आणि लेफ्ट मारला. 

आईच्ची रे! मला मागे जाऊन मोहनलालच्या डोक्यात त्याचंच शिलाई मशीन घालावंसं वाटलं

पण आता रिव्हर्स शक्य नव्हता. 

हा पूर्ण रस्ता बाजार बसला होता. 

आणि बसला म्हणजे "बसला" बरं का उभा नव्हे. 

मुंबईत बऱ्याच रस्त्यांवर ठरावीक दिवशी असे बाजार बसतात. 

भाज्या, लिंबं, सुऱ्या, पिना, स्वस्तातली अंतर्वस्त्र, फरसाण असं काय काय बाया बापडे रस्त्यावर मांडून बसतात. 

आणि त्या जमिनीवरच्या बाजारात मी गाडी घातली होती. 

दोन्ही बाजूला रस्त्यावर मांडलेला माल आणि मध्ये गिऱ्हाईकांना चालायला जेमतेम एक रांग 

मघासचा रस्ता परवडला कारण तो गर्दी असली तरी लेजिट रस्ता तरी होता 

पण इकडे मात्र मी (अलिखित) नियम तोडला होता.  

ह्या रस्त्यावर चार चाकी गाडी घालणंच: पाप किंवा लंडूर-च्युत्यापा किंवा दीडशहाणा उद्दामपणा होता आणि ते मला प्रत्येकाच्या नजरेत करकरीत दिसत होतं. 

मला खरंच घाम फुटला. आगीतून फुफाट्यात वगैरे... 


समोरची गर्दी आणि डावी-उजवीकडे पायातळी मांडलेल्या बाया-बापड्यांच्या चादरीवरचा माल सांभाळत मी गाडी जीव मुठीत धरून नेटाने काढत राहिलो. 

आणि एक ठिकाणी मात्र स्टेलमेट झाला. समोरून दोन तीन बाईक्स इथून माझी टॅक्सी आणि आजूबाजूला घचर-घोचर. 

वातावरण तंग माझी पुंगी टाईट. 

एक चुकीची मूव्ह आणि गर्दीकडून माझी धुलाई फिक्स वगैरे... 

पुढचा पहिला बाइकवाला समंजस होता थोडं इकडे तिकडे करत तो निघाला. 

पाठी एका बाईकवर ट्रिपल सीट बसलेली तीन पोरं माझ्याकडे खाऊ की गिळू नजरेनी बघतायत त्यात वरतून जन्माष्टमीचा पाऊस चालू झालेला. 

माझ्या डावीकडल्या एका मुस्लिम खेळणीवाल्याला माझी दया आली असावी. 

त्यानं उरापोटावर त्याची खेळण्यांची गाडी सरकवत तसूभर बाजूला घेतली. 

पोरांनीही खुन्नस देत का होईना को-ऑपरेट केलं आणि ती हळूहळू पास होताना मी त्यांना लाडात "थँक्यू" म्हटलं. 

त्यातला एक दुसऱ्याला हलकेच ढोसत बोलला "हा बघ थँक्यू बोलतोय"

त्याला शक्य असतं तर त्यानं नजरेनीच मला जाळून राख वगैरे केलं  असतं. 

माझी गांड फाटलेली पण थोडं हसूही फुटणारसं वाटलं, मी कंट्रोल केलं आणि निर्लज्ज निर्विकार पोकर फेस करून गाडी काढली. 

तेव्हा खूप टेण्यात आलेलो पण आज जवळ जवळ महिन्याभरानी हे लिहिताना मात्र मुंबूबद्दल प्रेम (की कणव) दाटून येतंय. 

मुंबई (किंवा भारतातल्या कुठल्याही शहरा / गावा) तल्या खासकरून फारसं सोशल स्टेटस किंवा पैशाचं पाठबळ नसलेल्या वर्गाचा हा "काइंडली ऍडजस्ट ऍटिट्यूड" साक्षात अद्भुत आहे.

माझाही सेन्स ऑफ एंटायटलमेंट थोडासा का होईना कमी होतोय... 

उबर किंवा झोमॅटो किंवा ऍमेझॉनवाल्यांनी घोळ केले तरी चिडचिड कमी होतेय...  

कारण प्रत्येक जण आपापल्या परीनी जगण्याची लढाई जगतोय सो लिव्ह अँड लेट लिव्ह वगैरे... 

आणि हो त्या रस्त्यानंतर आता कुठेही कशाही ट्रॅफिकमध्ये गाडी घालणं मस्काच वाटतंय!

व्हॉट डजन्ट किल यु मेक्स यु... :)

आजची कमाई: 

३६८ रुपये 

टीप: 

झोंबी मूव्हीजची चित्रं नेटफ्लिक्स वरून साभार 

मूव्ही: आर्मी ऑफ द डेड


     


 


 


   

  

.