Sunday, March 14, 2021

टॅक्सी दिवस १५: १४ फेब्रुवारी २०२१

आज रविवार असूनही व्हॅलेंटाईन डे थंडाच होता सगळीकडे. 

भाडं शोधत शोधत गाडी चर्चगेट स्टेशनला आणली. 

आता गाड्या पार्शली का होईना पब्लीकला चालू झाल्याने मागच्या महिन्यापेक्षा जास्त गर्दी होती. 

भाडी पटापट मिळत होती. 

एक कपल घेतलं त्यांना गेट-वेला जायचं होतं. 

मला वाटलं V- डे सेलिब्रेट करत असतील

मुलगी गुजरातीत बोलत होती... 

(आता मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसाला गुजराथी बऱ्यापैकी समजून येतेच.)

त्यांचा ब्रेकअप होत होता. 

मुलगी प्रचंड प्रॅक्टीकल आणि आयुष्याबद्दल क्लॅरिटी असलेली होती. तर मुलगा सेंटी. 

"ह्या ह्या वर्षी आपण कमावते होणार 

मग ह्या ह्या वर्षी आपली करिअर्स सेट होणार 

मग ह्या ह्या वर्षी आपले आई बाबा मरणार 

मग ह्या ह्या वर्षी आपली मुलं आपल्याला सोडणार 

आणि ह्या ह्या वर्षी आपण मरणार"

असं काहीतरी प्रचंड क्लिनिकल बोलत होती ती आणि तो तिच्या बिनतोड पॉईंट्सवर पटत नसतानाही तुंबून मान डोलावत होता. 

ब्रेकअप करायचाच असं ठरवून आलेल्या एकासमोर प्रेम वाचवायची धडपड करणारा दुसरा लाचार लाचार होत जातो...  पोटात थोडं  तुटलं. 

पण मी दोन्ही बाजूनी चार-दोनदा  राहून झालेला... 

एकदा तर दोन्ही बाजूंना एकाच मुलीसाठी ... ही ही ही :)

सो साईड्स घेणं अशक्यच!

मग एका तरतरीत सावळ्या मुलीला नरीमन पॉईंटजवळ सोडलं. 

आणि ओव्हल मैदानावरून तीन क्रिकेट खेळणाऱ्या पोरांना उचललं. 

मागच्या आठवड्यातच क्रिकेट खेळणाऱ्या पोरांबरोबर ती  मचमच झालेली... पण हे तिघं सालस होते. 

दापोली साईडचे होते मस्त बाणकोटी बोलत होते. 

"दादू आता घरी जाऊन पॅक मारू नको हां!", दोघं तिसऱ्याला बजावत होते. 

तिसरा थोडा मोठा होता दोघांपेक्षा पण त्यानं आज्ञाधारकपणे मान हलवली. 

यंगर दोघांना आम्ही चंदनवाडी स्मशानाजवळ सोडलं आणि ठाकूरद्वार येताच तो बोल्ला, 

"आता एक ९० मारावाच लागनार... डोकां निस्ता तापला उन्हामदी खेलून!"

मी पोलाइट हसण्याशिवाय काहीच करू नाही शकलो.

आता गिरगावात एवढ्या जवळ आल्यावर गणेशमामांना भेटलो १० मिन्ट. 

आमचे हँडसम गणेशमामा हे एक्स्पर्ट ड्रायव्हर, अस्सल गिरगावकर, "एके काळचे" कट्टर शिवसैनिक, 

मला पुण्या-मुंबई वरून "पोएम" (माझी शुभ्र सेक्साट व्हेन्टो गाडी ) मुंबई-पुण्याला आणायची असली की मी त्यांना कंपनीला बोलावून घ्यायचो. मग आम्ही गप्पा मारत आळीपाळीने गाडी चालवत यायचो. 

ही "कांदेवाडी": इकडे लायनीत सगळी लग्न पत्रिकांची दुकानं आहेत. बजेटनुसार पाहिजेत तशा पत्रिका  बनवून घ्यायला आख्ख्या राज्यातून कदाचित देशातून सुद्धा लोकं इथे येतात. 



फोटोतल्या देखण्या चप्पलची कृपया नोंद घेणे. 

खास लग्नासाठी वांद्र्याच्या लॉर्ड्स मधून घेतलेली... 

ही खरं तर एक नंबर शॉर्ट आहे. टाच बघा थोडी बाहेर येतेय.  

पण हेच माप एकंदर एस्थेटिक्समध्ये बसतं माझ्या मते. पुढचा नंबर फार मोठा झाला असता. 

 व्हॅनिटी इज माय फेव्हरेट सिन :)     

बाकी युनिफॉर्ममुळे कपड्यांची चमकोगिरी करता येत नाही. 

सो प्रत्येक दिवशी माझ्या कलेक्शनमधले वेगवेगळे चप्पल-बूट वापरून मी व्हरायटीची हौस भागवून घेतो.     

गिरगावात लगेचच एक टिपिकल चटपटीत गुजराथी स्त्री बसली तिला चार वाजायच्या आत व्ही. टी. ला सोडायचं होतं. 

कारण चार वाजता लोकल्स बंद होतात. 

हे करोनानी वेगळेच विचित्र स्ट्रेस आणलेयत लोकांच्या आयुष्यात. 

"स्टेथम" बाबाचं नाव घेऊन टॅक्सी "बिंग बिंग" हाणली (हा सुहास शिरवळकरांचा आवडता शब्द: 'मंदार पटवर्धन'चा डावा हात  जाड्या 'प्रिन्स' नेहमी "बिंग बिंग" करत बुलेटवरून यायचा). 

चारला दोन कमी असताना आम्ही व्ही. टी. च्या  सिग्नलला पोचलो. 

मेन गेटला पोचेस्तो उशीर झाला असता. 

तिनं क्षणात निर्णय घेतला आणि मला चाळीस रुपये टेकवून टॅक्सीबाहेर उडी मारली...   

साडीचा बोऺगा सावरत सिग्नलच्या कडेच्या कंपाउंडच्या फटीतून आत घुसत ती स्टेशनात लुप्त झाली. 

मुंबईकर थोर आहेत... 

पण माझ्याकडून करोनाला आई-बहिणी आणि बाप-भावावरून शिव्या!!!

नंतर एन. सी. पी. ए. जवळ मरीन ड्राइव्हवरून चार कोवळी पोरं उचलली. 

बहुतेक गुजरातेमधले बोहरी/खोजा / कच्छी मुस्लीम असावेत. 

त्यांना मिनारा मस्जिदला जायचं होतं. 

मस्त पोरं होती. एकमेकांना 'लौडे' ह्याच नावानं हाक मारत होती. 

लौडे चोदू गांड आणि तत्सम शब्दांची ती दिलखुलास पखरण ऐकून कानांना मिरचीचा ठेचा खाल्ल्यागत सणसणून छान वाटलं. 

कॉलनीचे जुने दिवस आणि तुटलेले मित्र आठवले.

"कुठं निजवतोयस?" ह्या प्रश्नानेच दोस्तांचे फोन सुरू व्हायचे ते आठवलं. 

...

मग मौलाना शौकत अली रोडवर एका लहानखुऱ्या पण बहुतेक देखण्या मुलीला आणि तिच्या दोन मुलांना उचललं. 

बुरख्यातून दिसणारे अप्रतिम यवनी पाणीदार डोळे होते तिचे. 

तिला शुक्लाजी इस्टेटला जायचं होतं.

शुक्लाजी इस्टेट / कामाठीपुरा हा मुंबईचा एके काळचा रेडलाईट एरिया खरं तर...  

डोंबिवलीच्या आमच्या घरी कोणी पाहुणे आले आणि शनिवारी रात्री "प्रोग्रॅम" झाला की  माझे बाबा आणि इतर मराठी मध्यवर्गीय पाहुण्यांच्या तोंडून ह्या एरियाच्या दहशत + आकर्षण मिश्रित दंतकथा दबक्या आवाजात ऐकायला मिळायच्या. 

कशा इकडच्या बायका "कटोरी" ब्लाऊज घालतात आणि जाणाऱ्या लोकांना हातवारे करून बोलावतात वगैरे...    

पण आता जेन्ट्रीफिकेशनच्या रेट्यात त्याचं रेडलाईटपण जवळ जवळ लुप्त झालंय. बाकी मुंबईसारखाच एक किचाट गर्दीवाला एरिया बस्स.      

कैक वर्षांपूर्वी इथे "बच्चूका पराठा" मध्ये माझ्या भावानं अप्रतिम सीक कबाब आणि पराठा खिलवलेले.  

त्या सीकची चव अजून आठवणीत असल्याने मागल्या सीटवरच्या त्या सुंदर  MIL (F अर्थातच नव्हे कारण बायको मड्डर करेल माझा) ला मी विचारलं, 

"यहाँ बच्चू सीकवाला किधर है मॅडम पता है क्या?"

ती सूक्ष्म फणकारत उत्तरली, "यहां शुक्लाजी इस्टेटमें सीक-परांठेवाले तो भोत सारे है कई भी चले जाओ"

मी पोपट पचवण्याच्या प्रयत्नात ... पण MIL उतरताना मात्र डोळ्यांनी हसल्यासारखी वाटली किंवा नसेलही. 

टॅक्सीवाल्याने पॅसेंजर्सशी केव्हा आणि किती बोलायचं हा प्रोटोकॉल गहन आहे आणि मला मात्र तो अजून झाट कळलेला नाही हेच खरं.           

बाकी अजून काही भाडी मारून सरळ घरी WILF कडे :)

आजची कमाई: 

 ४३० रुपये (आणि कदाचित एक स्माईल)