Sunday, September 20, 2020

टॅक्सी दिवस १०: १ मार्च २०२०

आज सकाळी बँड्रावरून नेहेमीप्रमाणे मलबार-हिलला जायला  टॅक्सी पकडली. 

वांद्र्याचे कॉलनीतले काही टॅक्सीवालेही आता ओळखीचे झालेयत. 

आज असेच तोंडओळखीचे आफ्रोझभाई भेटले.  

आता मलबार-हिलची दिनेशभाईंची टॅक्सी बऱ्यापैकी सेट आहे तशी पण मुंबईकर सदैव "ऑन" असतो. 

म्हणूनच आफ्रोझभाईंनासुद्धा सगळी स्टोरी सांगितली... म्हणजे बँड्रातही शनिवारी टॅक्सी मिळण्याची शक्यता चाचपून पहावी हा हेतू. 

तर ते माझ्या एकंदरीत प्रोजेक्टवर बेहद्द इंप्रेस झाले.  

बहोत मेहनती हो, आपकी इन्शाल्ला बहोत तरक्की हो वगैरे तोंडभरून आशीर्वाद दिले. 

अचानक काय वाटलं त्यांना... बोलले, "बेटे कभी मुमकीन हो तो माहीम दर्गेपे एक चादर चढाना!"

इतकी वर्षं मुंबईला राहून माहीम दर्गाही बाहेरूनच बघत आलोय... बघायला हवा तोही एकदा आतून...


मलबार-हिलवरून टॅक्सी घेतली आणि माझ्या नेहमीच्या आवडत्या जागी: मरीन लाईन्सला समुद्राच्या विरुद्ध रस्त्यावर थांबलो. 

इस्लाम जिमखान्यासमोरून दोन सहावी सातवीतली मुलं आली. एकमेकांचे करकच्चून खास दोस्त असावेत. 

दोघं एकमेकांना धपाटे मारत होती, हलक्या लाथा मारत बोचकारत होती, हुलकावण्या देत होती...

त्यांची ती निखळ भांडोभांड जिगरी दोस्ती बघून मला मस्तच वाटलं. 

ह्या फोटोच्या आधी आणि नंतर कॉन्स्टन्ट मारामारी चालू होती त्यांची. 



ह्यातल्या गोरटेल्या गोल्याला आधी गोल मस्जिदीजवळ सोडला तिथे उतरल्यावरही तो दुसऱ्याच्या अंगावर पाणी ओतून गेला. 

कमाल होते दोघंही. 

मग एका पारशी कपलला ठाकूरद्वारहून ताडदेवला सोडलं. 

समोरच "सरदार पावभाजी" बाबांचं फेव्हरेट. 

कैक वर्षं झाली सरदारची  पावभाजी खाऊन. 

राहवेना... टॅक्सी साईडला लावून घुसलोच. 

ह्यांची पावभाजी थोडी वेगळी असते म्हणजे आपल्या शिवसागर किंवा रादर इतर सगळीकडे मिळते तशी लालचुटूक नव्हे तर थोडी काळसर करड्याकडे झुकणारी. 

थोडी जास्त दाटसुद्धा 

चव अर्थातच छान ... पाव बटरमध्ये निथळणारे ... 

पण मला शिवसागरचीच आवडते खरं सांगायचं तर.  

टू इच हिज ओन  वगैरे!



तिकडून एक चैत्यभूमीचं भाडं मिळालं. 

तिकडून दादर स्टेशनचा पूर्वेचा टॅक्सी स्टॅन्ड. 

स्टॅण्डवर तर टॅक्सीसाठी क्यूच असतो त्यामुळे हमखास भाडं मिळतं. 

तिकडून गांधी मार्केटचं भाडं मिळालं. 

स्टेशनवरून माटुंग्याकडे जाताना मुद्दामहून गाडी रुईयावरून काढली. 

प्रणव सखदेवची 'काळे करडे स्ट्रोक्स' आठवली. 

माटुंगा जिमखान्याच्या मैदानात चायनीज हाणून आणि थम्सअपमध्ये टाकलेली रम मारून पहुडलेला त्यातला नायक आणि त्याचा अंध मित्र आठवला. 

नंतर एक देखण्या सावळ्या साऊथ इंडियन माणसाला धारावीत सोडला आणि घरी जाऊन थोडा लंच ब्रेक घेतला. 

 ब्रेकनंतरही उलटसुलट बरीच भाडी मारली:

रे रोड - माझगांव - नागपाडा - मदनपुरा - अलेक्झांड्रा वगैरे. 

मला नॉर्मली पोल्यूशनमुळे थोडा बारीक खोकला नेहेमी असतो. 

तसंच टॅक्सीत खोकताना एका मुस्लीम चाचांनी एक बऱ्याच कॉम्प्लिकेटेड काढ्याचा उपाय सुचवला. 

तो बनवायच्या स्टेप्स मी दुर्दैवाने विसरलो पण आजचा दिवस प्रेमळ मुस्लिम म्हाताऱ्यांचा आहे हे मात्र खरं. 

(बाय द वे करोनाकाळात तो क्रॉनिक खोकला चक्क गायब झालाय, पोल्यूशन खरंच कमी झालंय बहुतेक) 

नंतर चौपाटीवरून जाताना बाजून चक्क दिनेशभाई गेले आणि मी त्यांना आणि त्यांनी मला स्टायलीत हात दाखवला. 

ही माझी फँटसी होती:

असे टॅक्सी/रिक्षावाले सुसाट जात असताना बाजूनी कोणतरी त्यांचा मित्र दुसऱ्या टॅक्सी/रिक्षावर दिसतो... 

आणि दोघंही समांतर गाड्या थोड्या स्लो करून मोजून पाच सेकंदात फॅमिली-गाव आणि विश्वाला कव्हर करणाऱ्या गप्पा हाणतात, आणि सहाव्या सेकंदाला कस्टमरच्या आठ्या ओळखून परत सुसाट विलग होतात... 

हे मला भारी  चार्मिंग वाटत आलेलं.  

आज तीही विच्छा पूर्ण झाली आणि टॅक्सीवाल्यांच्या ब्रेद्रनमध्ये शिरकाव झाल्यासारखं वाटून माझी कॉलर टाईट वगैरे. 

आजची कमाई: 

७५० रुपये  



 




 

  




Saturday, September 5, 2020

टॅक्सी दिवस ९: २३ फेब्रुवारी २०२०

आजही साऊथ मुंबईतच भाडी मारली सकाळी...
गिरगावात फडके मंदिराजवळ एकाला सोडलं...

कांदेवाडी, सी. पी. टॅंक, फडके-वाडी... आख्खं गिरगावच लहानपणापासून खास आवडीचं:

माझ्याच "पाइनॅपल सन्" ब्लॉगमधल्या ह्या नोंदी: https://nilesharte.blogspot.com/2011/09/blog-post_17.html 
>>>>>
गिरगाव : चर्नीरोडचा ब्रिज , गायवाडीतला चिक्कीवाला , प्रार्थना समाजातला उदबत्तीचा वास, ऑपेरा-हाउसवरचे हिऱ्यांचे सौदागर आणि फाफडा जिलेबी (अतिरेक्यांच्या %#$% चा %^$%^ ), ती पत्रिकांची दुकाने, सी पी टॅन्क वरच्या गायी, चाळींच्या शेरीतला आंबूस वास आणि राजुदादाच्या सेंटचा घमघमाट, फडकेवाडीचा गणपती, प्रकाशची ती सूक्ष्म टेबल्स आणि स्वर्गीय साबुवडा, मिणमिणत्या चिमणीतला गंडेरीवाला.
शेणवे वाडीतले राडे आणि मठाबाहेरचे गजरे....आणि या सगळ्यात असूनही नसलेला समुद्र!
>>>>>>

पण 'प्रकाश'बद्दल अजून थोडं बोलायला हवं: 
गिरगावात अनेक आयकॉनिक मराठमोळी हॉटेल्स आहेत तशी...  
पणशीकर, तांबे, विनय, कोल्हापुरी वगैरे...  

पण देवांत जसा विष्णू (की शंकर ज्यानी त्यानी आपापला नंबर वन घेणे),  
देसी पॉर्नमध्ये जशी स्वाती नायडू (की हॉर्नी लिली ज्यानी त्यानी आपापला नंबर वन घेणे)
विदेशी पॉर्नमध्ये जशी सन्नी (की मिया खलिफा ज्यानी त्यानी आपापला नंबर वन घेणे)
गाड्यांमध्ये जशी लॅम्बोर्घिनी  (की बुगाटी ज्यानी त्यानी आपापला नंबर वन घेणे)
तद्वैतच प्रकाश हे माझे नंबर वन आहे, होते आणि राहील.

आईबरोबर तिच्या माहेरी गिरगावात आलो की मंगळवारी फडकेवाडीतल्या गणपतीला धावतं  "स्सप" देऊन 
इकडे साबुदाणा-वडा खायला येण्याच्या बिलोरी आठवणी अजूनही मेंदूच्या कोपऱ्यात चमचमत राहिल्यायत!

(छायाचित्रं जालावरून साभार.)

'होल इन द वॉल'ची साक्षात व्याख्या म्हणता यावी अशी फडके गणपती मंदिरासमोरची ही इवलुशी जागा. 


त्यांची ही टेबलं पहा मुंबईतल्या जागेच्या टंचाईत ऑप्टिमायझेशनचं सर्वोत्तम उदाहरण आहे हे. 



ह्यावर जेमतेम कुल्ला टेकवत किंवा बरेचदा उभ्या-उभ्याच तुम्ही जगातला सर्वोत्तम साबुदाणा वडा खाल राजेहो. 

जगात इतरत्र किंवा आपल्या घरी आई महाशिवरात्रीला बनवते ते साबुदाणे वडे चांगलेच असतात.   
बेसिकली जगभरात काय करतात तर साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण असलेले गोळे करून चांगले तळतात. 
साधारण यु. एफ. ओ. तबकडीच्या आकाराचे. 
पण इकडचा वडा पूर्ण गोलाकार असतो टेनिसबॉलपेक्षा थोडा लहान.  
शिवाय आतलं मिश्रण जवळ जवळ (पण पूर्ण नव्हे अशा) साबुदाणा खिचडीचं असतं. 
... वरचं कुरकुरीत आवरण... त्याला वर्णनात उतरवणं फोल आहे ते खाऊनच बघायला हवं. 
आणि अर्थातच हे आवरण आणि आतलं मिश्रण एकमेकांशी फटकून नसतातच. 
काय कुठे सुरू होतं ह्याच्या रेषा माझ्या नैतिकतेइतक्याच धूसर आहेत! 


... 
बरोबर दिलेल्या दाण्याच्या दाट चटणीबरोबर दोन वडे चेपले आणि त्यांचं किंचित पातळसर आणि मिठाची कणी टाकलेलं पियुष प्यायलं की आख्ख्या जगाबद्दल निर्हेतुक निरलस आणि निरामय प्रेम दाटून येतं. 
पियुषसुद्धा मला प्रकाशचं  आणि प्रकाशचंच आवडतं. 
पणशीकरचं अति दाट आणि अति गोड असतं I.M.O किंवा आस्वादचं जास्तच पात्तळ!

असो...  

पण आज मात्र फडकेरोडवर गाडी लावून प्रकाशमध्ये जाणार तितक्यात बॉम्बे हॉस्पीटलचं भाडं आलं. 
त्यामुळे बायको बरोबर असताना दिसलेल्या एक्सकडे टाकलेल्या कटाक्षासम प्रेमळ ओझरता कटाक्ष प्रकाशकडे टाकून मी गिअर टाकला. 
    
तिकडून अजून एक दोन भाडी मारल्यावर गेटवेवरून एक नॉर्थचं कुटुंब उचललं.  
त्यांना सांताक्रूझला सोडायचं होतं. 
छान पण चेहेऱ्यावर रागीट भाव असलेली २३-२४ ची मुलगी, 

तिचा थोडा लाडावलेला झम्या टाईप टीनएजर भाऊ 
(जो पंकज भोसलेच्या गोष्टींत असता तर त्याच्या हॉट भैणीला पटवायला कॉलनीतल्या पोरांनी हमखास त्याला प्यादं बनवला असता.)   

पॅसिव्ह वडील आणि थोडी ऍग्रेसिव्ह आई...  
मी उगीचच ह्यांना असंच्या असं कास्ट करून आयुष्मान खुराना साठी मनातल्या मनात स्क्रिप्ट लिहायला सुरुवातसुद्धा केली. 
    
मुलीला नुक्तीच एडलवाईज मध्ये नोकरी लागली असावी. 
एकंदरीतच फॅमिलीतली अल्फा डॉग तीच असावी. 
मी लांबच्या रस्त्यानी नेऊन त्यांचं भाडं फुगवू नये म्हणून मॅप चेक करून मला सटासट डायरेक्शन्स देत होती. 

तिनं आधीच मला निक्षून सांगीतल्याप्रमाणे गाडी वाकोल्याला घरी नेण्याआधी कालिन्याला एडलवाईजच्या ऑफीससमोर लावली. 

मग तिनं आनंदानं सगळ्यांना तिचं ऑफीस बाहेरून दाखवलं...  
"सेक्योरिटी अंदर ॲन्ट्री नही देगा", हेही अभिमानानं सांगितलं. 
ते तिघंही आपल्या पोरीच्या ऑफीसची मोठ्ठी बिल्डिंग कौतुकमिश्रित अप्रूपानं बघत राहिले.
        
हे मुंबईचं जगातल्या प्रत्येकाला फेअर संधी देण्याचं गुडविल आपण टिकवणार आहोत?  
की पडक्या घरातल्या वेडसर म्हाताऱ्यासारखा कुजकटपणा करून सगळ्यांना हाकलवून लावण्यात धन्यता मानणार आहोत??

आज इतकंच. 
कमाई: ४४५ रुपये