Sunday, July 5, 2020

टॅक्सी दिवस १: ८ डिसेंबर २०१९

टॅक्सी मिळत नसल्याने माझा मोजो जरा ढिला पडत चालला होता.

वीकेंड्स फ्री ठेवले होते टॅक्सी चालवायची म्हणून...
पण टॅक्सी मिळत नसल्याने वैतागून साल्साचा क्लास लावून टाकला.
केतकीचा पुण्यात बचाता क्लास आणि माझा मुंबईत साल्सा असं थोडे शनिवार-रविवार चालू होतं.

तशाच एका शनिवारी रात्री केतकीचा मेसेज आला:

गुड न्यूज टुमारो इज युअर मीटिंग. 
१० :३० मॉर्निंग हॅंगिंग गार्डन सिमला हाऊस. 
दिनेश भाई ...
ही होल्ड्स ३ टॅक्सीज !

मी थरथरलोच.
फायनली...
आता केतकीनं त्यांना कसं कन्व्हिन्स केलं हे तिनं अजूनही नीट सांगितलं नाहीये मला खरं तर...


पण मी दुसऱ्या दिवशी डॉट १०:३० ला पोचलो प्रियदर्शनी पार्कजवळ.
मलबार हिल - प्रियदर्शनी पार्क म्हणजे मुंबईचे क्रीम ऑफ क्रीम एरियाज.
इतकी वर्षं राहून मी सुद्धा गेलो नव्हतो इथे ह्या आधी.

थेट सी फेसिंग असलेलं हे पार्क भारी सुंदर वाटत होतं.
पण मी जास्त टाइमपास न करता फक्त पार्कच्या टॉयलेटमध्ये धार मारून लगेच बाहेरच्या नाक्यावर आलो.
हो उगीच पहिल्याच दिवशी उशीर नको!

इकडे बऱ्याच टॅक्स्या उभ्या होत्या.
तेव्हढ्यात समोरून एक पाणीदार डोळेवाला माणूस आला.
तो दिनेशभाईच असणार...
अंदाज बरोबर होता.
हा टाईप मला ओळखीचा आहे थोडा.
मी बघितलाय हा टाईप:
मित्रांच्या रेसिंगच्या धंद्यात,
स्टॉक्सच्या डे-ट्रेडिंगमध्ये,
सोशल डान्सिंगमध्ये,
कम्प्युटर प्रोग्रॅमिंगमध्ये...
असे लोकं दिसायला अजिबात  ढासू वगैरे नसतात...
पण डोळे वेगळेच असतात त्यांचे...
पाणीदार... शार्पनेसचं अजब काजळ लावलेले.
त्यांच्या व्हॉटेव्हर फील्डमध्ये मास्टर असतात ते.
रपारप निर्णय घेत पैशाची हार-जीत पचवतात.
अप्रतिम नाचतात, किचकट प्रोग्रॅम डी-बग करतात.

तोच दिनेशभाईचा टाईप होता.
टॅक्सी चालवण्याच्या शास्त्र आणि कलेत मुरलेला माणूस.
त्यानं सुरवातीचं हाय हॅलो झाल्यावर फालतू वेळ न दवडता सटासट फोन लावले.
आधीच सांगितल्याप्रमाणे फक्त एका दिवसासाठी खाडा करायला कोणी तयार नव्हतं.
(साहजिकच आहे जवळ जवळ हातावर पोट असतं त्यांचं)

माझा चेहेरा पुन्हा पडायला लागला.
आज पण खाली हाथ बहुतेक :(

पण इतक्यात दिनेशभाईनं बाजूच्या एका टॅक्सीवाल्याला त्याच्या खास यु. पी. लहेजात हाक मारून बोलावलं.
"अरी ओ संजय इधर आ"
तो देखणा पोरगेलासा तरुण आला.
"चाबी दो गाडीका"
त्यानं निर्विकारपणे चावी दिनेशभाईला दिली.
आणि दिनेशभाईनं ती निर्विकारपणे माझ्या हातात दिली.

फ SSS क् फायनली
माझी छाती धडधडायला लागली.
जवळ जवळ तीन वर्षं मी आणि माझी फॅमिली ह्या क्षणासाठी धडपडत होतो...
बाजूला एक काळी पिवळी सॅन्ट्रो शांतपणे उभी होती.
मी ब्लँक झालो दोन क्षण.
पण लगेच मेंदू ताळ्यावर आला.
असा नवशिकेपणा दाखवला तर ह्या लोकांचा कॉन्फीडन्स जायचा परत च्यायला.
खाकी पॅण्ट मी घरूनच घालून आलो होतो.
तिकडेच रस्त्यावर शर्ट काढला. (एSSS सलमान)
आणि युनिफॉर्मचा शर्ट चढवला.

गाडीचं दार उघडून आत बसलो.
दिपकमामानी शिकवल्याप्रमाणे आधी हॅन्डब्रेक काढला.
(दिपकमामावरचा ब्लॉग इथे वाचू शकाल: https://nilesharte.blogspot.com/2017/12/blog-post_27.html )

सीट हाईटप्रमाणे ऍडजस्ट केली.
डावी उजवीकडचे मिरर, रिअर व्ह्यू मिरर!

दिनेशभाई मला काहीतरी सांगत होते बहुतेक सी. एन. जी. विषयी.
इतक्यात डावीकडून एक माणूस डोकावला,
"ग्रॅण्टरोड स्टेशन ?"

सगळी आजूबाजूची गॅंग मजेत हसली,
"चलो बोहनी भी हो गयी आपकी"

फकिंग पहिलं भाडं!
तो माणूस आत बसला...
मी कॉन्फिडन्टली गिअर टाकला...
नेपियन्सी रोडवरून थोडा पुढे गेलो...
दिनेशभाई आणि टॅक्सीवाल्यांची गॅंग नजरेआड झाल्याची खात्री केली...
आणि हळूच पॅसेंजरलाच विचारलं,
"ग्रॅन्टरोड स्टेशनका रस्ता बतायेंगे थोडा प्लीज?"   

आता माझा रोडसेन्स फकॉल आणि डिसेन्ट यांच्या मध्ये कुठेतरी बसतो.
त्यातही बरीच वर्षं वीकडेज पुण्यात आणि वीकेंड्स मुंबईत (पण लोळत) काढल्याने मुंबईचे रस्ते अजूनच फिक्कट झालेले डोक्यात.
त्यामुळे मुंबईचे निदान महत्त्वाचे तरी रस्ते शिकणं हाही एक अजेंडा होताच.
(पहा कारण क्रमांक २ https://kalyapivalyanavasachigosht.blogspot.com/2020/02/blog-post_8.html )
पण थोडाफार अंदाज येईपर्यंत निर्लज्जपणे मदत घ्यायची हे ठरवलेलं.

रस्ता आमच्या पहिल्यावहिल्या भाड्यालाही माहीत नव्हता पण त्यानं बिचाऱ्यानं सरळ मॅप लावून टाकला.

त्याला स्टेशनवर सोडल्या सोडल्या गावदेवीचं भाडं मिळालं
आमच्या पूजाचा नवरा हेमंत वाघेसारखी पांढरी शुभ्र दाढीवाला माणूस आणि त्याची टीनएजर पोरगी होते.
त्यांनाही तोंड वेंगाडून रस्ता दाखवायची विनंती केली.
त्यांनीही किंचित तुच्छ लूक देत का होईना रस्ता दाखवलाच.

त्यांना विद्याभवनला सोडून सरळ चौपाटीवरून गाडी तारापोरवाला मत्स्यालयाजवळ थांबवली आणि टॅक्सीच्या पहिल्यावहिल्या दिवसाच्या आनंदात थोडं "बास्कून" घेतलं.

डिसेंबरातल्या रविवारची ती निवांत प्रसन्न सकाळ.
उजवीकडचा समुद्र...
तिकडून येणारा खारा की (मतलई?) "Zephyr" म्हणतात तसा वारा.
मरीन ड्राईव्हचा सामसूम कट्टा...
त्यावरचं चोचित चोच घातलेलं एकमेव प्रेमळ जोडपं.
सगळं साठवून घेतलं...

तितक्यात एक पोरग्या नेव्हीनगरला जायला आला.

च्यायला आरामात टॅक्सी लावून भाड्याची तासंतास वाट बघत मस्त मिलिंद बोकील वाचायचं असं काहीतरी रोमँटिक डोक्यात होतं माझ्या...
पण इकडे तर बॅक टू बॅक भाडी येत होती.
हे बिगिनर्स लक? की मुंबईची जगप्रसिद्ध अहर्निश बिझी धावपळ??

एनीवेज त्याला नेव्हीनगरला सोडलं... (बरोबर ओळखलंत मॅप त्यालाच उघडायला लावला ;))
(नेव्हीनगर हा मुंबईच्या एक्स्ट्रीम दक्षिण टोकाला असलेला देखणा डिफेन्स एरिया)
आणि सी. एन. जी. शोधत शोधत भायखळ्याला जे. जे. च्या पुलाजवळ आलो.

च्यायला आयुष्यभर पेट्रोल गाडी चालवलेली... सी. एन. जी. पहिल्यांदाच भरत होतो.
सी. एन. जी. भरायला पंपावर एका डोळ्यात फूल पडलेला सिन्सिअर चेहऱ्याचा मुस्लिम पोऱ्या होता.
त्याला विचारलं, "भाय फुल्ल टँकमे कितना लंबा चलेगा गाडी?"

तो बोलला मालूम नही बडे भाय...
"मेरा आज फर्स्ट दिन है पंपपे"

"एSSS मेरा भी...फर्स्ट दिन..."
त्याला टाळीच दिली मी.

पुढे ना. म. जोशी मार्गावर एक मस्त गंगाधर गाडगीळांसारखा दिसणारा मराठी माणूस भेटला...
छान स्टाईलमध्ये सिगारेट पीत होता.
गाडगीळ प्यायचे काय सिगारेट? कोण जाणे??

खूप आधी आमच्या वांद्रयात बाबांबरोबर रविवारी सकाळी मटण आणायला जायचो.
एम. आय. जी ग्राउंडवर...
मत्स्यगंधा मटण शॉप असं छान नाव होतं त्या दुकानाचं!

तिकडे मोस्टली गंगाधर गाडगीळपण यायचे.
क्वचित विं. दा. सुद्धा
आपला आणि ह्या थोर लोकांचा मटणवाला एक आहे हे पाहून जरा मस्त वाटायचं.

तर त्या गं. गा. लूक अलाईकला हिरा पन्नाला सोडला.
आता म्हटलं सकाळचं  सत्र संपवून घरी निघावं.
जरा मटण बिटण खाऊन थोडी वामकुक्षी करून परत संध्याकाळी गाडी काढावी.
(आता मी अर्ध्याहून थोडा जास्त पुणेकर आहे सो डू द मॅथ बिचेस :))

मग हळू हळू हाजी अलीवरून कूच करत सिद्धिविनायकाला पोचलो.
इतक्यात दोघंजण टॅक्सीत बसले.
मराठीच होते थोडे हायर क्लास टाईप:
एक जण बहुतेक अमेरिकेतून थोड्या दिवसांसाठी आला असावा.
त्यांना शिवाजीपार्कला जायचं होतं.
सिंधुदुर्ग हॉटलेला.
अय हा आपला एरिया हाय बॉस.
सकाळपासून पहिल्यांदा मॅप न लावता कॅडल रोड वरून फुल्ल कॉन्फिडन्समध्ये गाडी रेटली.

सहा डिसेंबर नुकताच झाला होता.
शिवाजी पार्क एरियातल्या काही हुच्चभ्रू लोकांमध्ये  'त्या' आठवड्यात आम्हाला कित्ती नी कश्शी गैरसोय झाली हे माना वेळावत सांगायची फॅशन आहे.
तसं थोडं फर्स्ट वर्ल्ड स्नॉबिश बोलणं त्या दोघांतही झालं.
पण माझ्या चेहेऱ्यावर सूक्ष्म आठ्या दिसल्या असाव्यात बहुतेक.
त्यांनी गडबडीनं विषय बदलला!

शिवसेनाभवन ते  प्लाझाचा रोड,
शिवसेनाभवन ते पोर्तुगीज चर्चचा गोखले रोड.
आणि ह्या दोघांना छेदणारा रानडे रोड.
ह्या सेक्सी त्रिकोणातल्या एका गुप्त बोळात साधारण लॅबिया मायनोराच्या जागी हे सिंधुदुर्ग हॉटेल आहे.
इकडे एकही बोळ न चुकता आल्याबद्दल मी स्वतःचीच पाठ थोपटली वगैरे.
पण त्या आनंदात मीटरचं कुठलं तरी बटण चुकीचं दाबलं की दोनदा दाबलं की कायकी.
मीटरच हँग झाला.

तेव्हढ्यात एक पारशी कुटुंब बसलं: फाईव्ह गार्डन्स.
त्यांना बोललो, "मीटरचा प्रॉब्लेम आहे.अंदाजानी काय द्यायचं ते द्या"
पारशी कुटुंबाला पारशी कॉलनीत सोडण्याची संधी मला सोडायची नव्हती.

आई-बाबा नी साधारण वीसेक वर्षांचा मुलगा.
पोराचे फंडे एकदम क्रिस्टल क्लियर होते.
अमक्या पॉइंटला लग्न...
मुलं नकोत वगैरे वगैरे.
आई कळवळून एक तरी मूल पाहिजे वगैरे सांगत होती.
मस्त पार्सीफाइड इंग्लिश चालू होतं.
"लुक ऍट आपडा ग्रॅनू ने... एटला एटी-सिक्स रनिंग बट बध्धू फीट छे"... वगैरे...
नवरा बोलण्याच्या ओघात बायकोला बोलला,
"व्हेन यु टर्न ६० यु वोन्ट बी एबल टू वॉक ओन्ली."
नी पोरानी पण दुजोरा दिला.
खरं तर तीला काहीच प्रॉब्लेम नव्हता थोडीशी सुखवस्तू ओव्हर वेट होती फक्त.
साहजिकच ती दुखावल्या सारखी झाली...
आम्हा पुरुषांना पाचपोच एकंदरीत कमीच चायला!

पुढेही बऱ्याचं पॅसेंजर्समध्ये बघितलं की,
एका सूक्ष्म सटल लेव्हलवर पुरुष बायकांच्या खास करून बायकोच्या बाबतीत किंचित पण निश्चित इन-सेन्सिटिव्ह असतात...

फाईव्ह गार्डन मधल्या कुठल्यातरी अर्जुन की भीम की सहदेव गार्डनजवळ एक सुंदर बिल्डिंगपाशी त्यांना सोडलं.
मीटर गंडलेलाच होता...
पोरानं बापाला वॉर्न केलं.
"पापा डोण्ट गिव्ह अबव्ह सिक्स्टी"
पण बापानं पोराला दाबत माझ्या हातात शंभरची कोरी जांभळी नोट कोंबली.

टू मच!
पहिल्या दिवशी टीप सुद्धा मिळाली :)
गॉड ब्लेस पारसीज!

आता गाडी भरधाव घरी :)
पहिली कमाई ५४० रुपये!
पहिली कमाई बायकोच्या हातात वगैरे!!







 



























No comments:

Post a Comment