Saturday, July 11, 2020

टॅक्सी दिवस २: १५ डिसेंबर २०१९

आज दिनेशभाईंनी त्यांची स्वतःचीच टॅक्सी दिली.
ह्या वॅगन-आर बाई कचकावून साडे-पाच लाख किलोमीटर चाललेल्या.
इकडे आपण च्यायला गाडी एक लाख किलोमीटर चालली की रेस्टलेस व्हायला लागतो.
पर्स्पेक्टीव्ह पर्स्पेक्टीव्ह म्हणतात ते हेच असावं बहुधा!

तर आधी दिनेशभाईंनाच ग्रॅण्ट रोड स्टेशनला सोडलं.
लगेचच एका कपलचं भाडं मिळालं.
गाडी जुनी तिला पॉवर स्टिअरींग नव्हतं.
स्टेशनवर टर्न  मारता मारता हात भरून आले.
माझ्या मस्का व्हेन्टोची फार याद आली.
कपलला भारतीय विद्याभवनला जायचं होतं.
ही लोकेशन्स पहिल्या दिवसासारखीच.

मग चौपाटीवरून माझ्या आवडत्या स्पॉटला जाऊन थांबलो...
तारापोरवाला ऍक्वेरियमला. हे ही पहिल्या दिवसासारखंच!
आज चक्क थोडा वेळ मिळाला तेव्हढ्यात थोडं "अचंब्याच्या गोष्टी" वाचलं.
सुबोध जावडेकर आणि मधुकर धर्मापुरीकर ह्यांनी संपादित केलेला हा संग्रह.
किशोरवयीन मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगितलेल्या गोष्टी हे सगळ्या कथांतील कॉमन सूत्र.
"पतंग" नावाची मिलिंद बोकिलांची अप्रतिम गोष्टं आहे ह्या संग्रहात.
टॅक्सी थांबवून मिलिंद बोकील वाचायचं स्वप्न पूर्ण झालं माझं फायनली :)

तेव्हढ्यात एक चटपटीत तरुण मुलगी आली तिला मेट्रो सिनेमाला जायचं होतं.
सिम्पल रस्ता: मरीन ड्राइव्हवरून पुढे जाऊन फ्लायओव्हर खाली पेट्रोल पंपावरून लेफ्ट मारला की सरळ मेट्रो.
पण काहीतरी हुशारी दाखवण्याच्या नादात तो लेफ्ट मिस केला आणि नंतर कुठला तरी लेफ्ट-राईट-लेफ्ट मारून कसे कोण जाणे आम्ही चर्चगेट स्टेशनला पोचलो.
शी SSS फकिंग एम्बॅरसिंग!
ती वैतागलीच शिवाय घाईत असावी.
चर्चगेट स्टेशनला पोचल्यावर बोलली, "जाऊ दे आता मी ट्रेननीच परत उलटी मरीन लाईन्सला जाते."
साधी सिम्पल केस कॉम्प्लिकेटेड करून ठेवणाऱ्या एखाद्या रेम्याडोक्या सरकारी नोकरासारखं वाटलं मला!
मग तिच्याकडून पैसे नाही घेतले.
चुकीचं क्षालन वगैरे...

मग अजून एका जोडप्याला सँडहर्स्ट-रोड स्टेशनला सोडलं.
लहानपणी डोंबिवलीवरून आईबरोबर तिच्या ऑफीसला व्ही. टी. ला यायचो.
तेव्हा हे स्टेशन नेहमी वाचायचो.

समहाऊ कांजूरमार्ग आणि सँडहर्स्ट रोड मला सेंट्रलवरची भारी दुर्लक्षित स्टेशनं वाटायची.
म्हणजे भरपूर भावंडांच्या गोतावळ्यात एखादा मधला इन- सिग्निफिकंट भाऊ असावा तशी.
लोकं विक्रोळीला -भांडुपला रहातात पण कांजूरमार्गला कोणी राह्यल्याच कधी ऐकलं नाही.
लोकं भायखळा-मस्जिद व्ही. टी. ला कामाधंद्याला जातात पण सँडहर्स्ट रोड... नेव्हर.

ह्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मच्या बाहेर काहीच नसेल नुसती फसवी पोकळी असेल असं काहीतरी वाटायचं मला.
पण आज ते स्टेशन बाहेरून बघितलं आणि ते खरंखुरं असल्याची खात्री पटली.

आता एकदा कांजूरमार्गपण बघायला पाहिजे... हे हे हे! 

सँडहर्स्ट रोड वरून एका मारवाडी जोडप्याला सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या क्वार्टर्समध्ये सोडलं.

हे हॉस्पीटलपण छान प्रशस्त मोठं असूनही थोडं दुर्लक्षितच म्हणता यावं.
म्हणजे के ई एम, जे. जे., नायर वगैरे गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा दरारा ह्याला नाही.
पण पी. डिमेलो रोडवरचा छान शांत एरिया ह्याला लाभलाय.
किंवा कदाचित एरवी गर्दी असेल आणि रविवार सकाळ म्हणून शांत असेल.
पण हा (आजतरी) शांत थोडा खंडहर टाईप्स कॅम्पस आवडला मला.
इकडे थोडा ब्रेक घ्यायचं ठरवलं.

कॅंटीनमध्ये शांतपणे बसून मिसळपाव नी चहा मारला.
ही अशी शेट्टीटाइप पांढऱ्या वाटाण्याची उसळवाली पोटभरू मिसळ बऱ्याच दिवसांनी खाल्ली.
आमचा दोस्त पप्या कॉलनीतल्या उडप्याकडे एक मिसळ - पाचदा एक्स्ट्रा उसळ (जी कॉम्प्लिमेंटरी असते) आणि वीस पाव खायचा त्याची आठवण आली...

मग आरामात बाहेर पडून एका माणसाला क्रॉफर्ड मार्केटला सोडला.
त्या भल्या माणसाने काढलेला आमचा हा टॅक्सी ताईंबरोबरचा फटुआ!
एखाद्या सीझन्ड बॉक्सरसारखं टोणपे खाल्लेलं तिचं नाक बघा!


मी हा फोटो निरखून बघत असतानाच खिडकीवर टकटक झाली.
एक टीन एजर (बहुतेक "आस्कर") पोरगी शेम्बड्या बाळाला टेंगण्यावर घेऊन माझं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत होती.
मी सुट्टे पैसे द्यायचे की निगरगट्ट इग्नोर मारायचा ह्यातला एक ऑप्शन निवडणार,
इतक्यात ती बोल्ली,
"क्या अंकल कबसे आवाज दे रैले तुमको... बाबुलनाथ चलोगे क्या?"
मी मनातल्या मनात तिला सॉरी बोलत गडबडीनी बसवलं आणि आपली रस्ता सांगण्याची पेटन्ट रिक्वेस्ट टाकली.

तिनीसुद्धा कॉन्फिडन्टली हो सांगितलं, "ये मेरा रोजका रस्ता है"... वगैरे...
आणि ऑलमोस्ट मला नो एंट्रीत गाडी घालायला लावली.
समोरून राप राप येणाऱ्या गाड्या बघून मी रन टाईमला तिची डायरेक्शन्स ओव्हरराईड केली.
तो लेफ्ट सोडून पुढे गेलो.
(प्रत्येक देश, जहाज, विमान आणि टॅक्सीच्या कप्तानाला असे स्प्लिट-सेकंड हार्ड-डिसीजन्स कधी कधी घ्यावे लागतात उदाहरणार्थ नोटबंदी! )
मग तिची चिडचिड इग्नोर मारत शिस्तीत मॅप चालू केला.


ती आणि तिचा छोटा बाबू डोळे विस्फारून मॅपकडे नवलाईनी बघत राह्यली.
मग त्यांना मी गूगल मॅपचा झटपट क्रॅश कोर्स दिला.
बाबुलनाथ आल्यावर मीटरचे साठ रुपये झाले.

खूप गरीब, खूप फाईट माराव्या लागणाऱ्या लोकांत एक स्ट्रीट-स्मार्टपणा असतो.
बेरकी आणि करुण झळा आलटून पालटून घेत राहतो तो
तिच्यातला तो स्मार्टनेस आता जागा झाला.
"क्या अंकल रोज मै इधरसे पच्चास रुपयेमे आती हूँ! आपने आज घुमाके लाया" वगैरे बोलू लागली"

मी बोल्लो, "दीदी जो देना है दे दो नो प्रॉब्लेम"
"मेरे पास इतना ही है", चाळीसच्या नोटा पुढे करत ती म्हणाली.
तिच्या कोवळ्या चेहऱ्यावरचं टफ कुकीचं क्युट आवरण बघून मला हसू यायला लागलं.
(अवांतर: "क्युट" हा शब्द मुलाच्या तोंडी कोणत्याही वेळी शोभत नाही हे माझं स्ट्रॉंग मत आहे. सो हे वाक्य असं वाचा:)
तिच्या कोवळ्या चेहऱ्यावरचं टफ कुकीचं लोभस (की बेरकी की करुण?) बेअरींग बघून मला हसू यायला लागलं.

तिच्याच वयाच्या बँकर इंटर्न्स बी. के. सी. च्या स्टारबक्समध्ये चाळीस हजाराचं महिन्याचं फक्त कॉफीचं बिल करतात...
त्याची उगीचच आठवण झाली.
  
"ये भी नही दिया तो चलेंगा दीदी", तिला म्हटलं.

हे ऐकून तर फुललीच ती,
"आपको बहोत दूरका अच्छा भाडा मिलेगा..." वगैरे तोंड भरून आशीर्वाद देत गेली.
कडेवरचा बाबू पण बोळकं पसरून हसत होता.

...
...
...

ठीक आहे ना आपल्या नियमावलीत टॅक्सी फायद्यात चालवायची असा नियम कुठे आहे?
हे हे हे हे :)

लगेच हॅंगिंग गार्डनचं भाडं मिळालं:
बाबुलनाथ वरून सिग्नल नी चौपाटीला राईट मारला की वाळकेश्वरवरून हँगिंग गार्डन: नो ब्रेनर!
तरीपण मॅपवर टाकलं जरा कॉन्फिडन्स नसल्यामुळे.
मॅप च्यायला चौपाटीवर न जाता आतून पेडर रोडवरून जायला सांगत होता.
मला वाटलं असेल बेटर रास्ता म्हणून उलटी टॅक्सी फिरवली आणि बाबुलनाथ पुन्हा क्रॉस करताना मॅपवर "डन!"
आलं.

च्यायची म्हणजे आधीचं बाबुलनाथ डेस्टिनेशन बदललंच नव्हतं.
परत त्या शेट्टी कुटुंबाच्या शिव्या खात कसाबसा यु टर्न मारून परत चौपाटीवरूनच गेलो.
त्यांच्याकडूनही चुकीचं क्षालन म्हणून वीस रुपये कमी घेतले.
स्प्लिट-सेकंड हार्ड-डिसीजन्स कधी कधी असे सडकून चुकतात उदाहरणार्थ नोटबंदी :))

आज म्हणजे एकंदरीत शिव्या खायचाच दिवस आहे!

हँगिंग गार्डनला फोटोग्राफी करायला आलेली तीन पोरं-पोरी त्यांच्या ट्रायपॉडसकट उचलली.
बिचारी सकाळी लवकर आली असावीत. डिलाईल रोडपर्यंत पेंगत होती.

डिलाईल रोड म्हणजे परळ टिपिकल मराठी मालवणी बहुल एरिया.
एक मालवणी आई आणि तिची दोन तरुण मुलं उचलली.
पुरुषांच्या बाबतीत अजून एक मिथ-बस्टर:
पुरुष पण सडकून गॉसिप करतात.

कोण्या तरी लहान बाळाच्या बारशावरून प्रेमळ उणी दुणी काढणं चालू होतं.
"काय तां टाईट ड्रेस.
बाबू नुसतो घामाघूम (हे मालवणी लोकं बाळाला "बाबू" भारी गोड स्टायलीत बोलतात)
ह्यांका कळूक नांय?..."
वगैरे फुल्ल ऑन चालू होतं!

त्यांना वरळी नाक्याला सोडून तडक घरी आलो.

दुपारची झोप काढून पुन्हा टॅक्सी काढणार तर टॅक्सी स्टार्ट व्हायलाच तयार नाही.
दिनेशभाईंना बोलावून घेतलं... इग्निशनचा प्रॉब्लेम होता.
रिपेअर व्हायला सोमवार उजाडणार.

सो आजचा दिवस अर्धाच पकडता येईल. 
आजची कमाई:  ३८१ रुपये







   











    

No comments:

Post a Comment