Thursday, April 30, 2020

२२ जून २०१९

पुढच्या शनिवारी नेहमीप्रमाणे शेवटची शिवनेरी पकडून घरी वांद्र्याला आलो.
आल्या आल्या झोपाळलेल्या आईला विचारलं लायसन्स मिळालं का म्हणून.
तिनं पेंगुळलेल्या डोळ्यांतसुद्धा अपराधी भाव आणत "नाही" म्हटलं.

दुसऱ्या दिवशी आरामात उठलो बऱ्याच दिवसांनी आर. टी. ओ. ला जायचं नव्हतं.
डुप्लिकेट लायसन्स ची ऑनलाईन प्रोसेस दुपारी आरामात करायचं ठरवलं.
आणि पार्ल्याला टिळक मंदिरात गेलो.
ही माझी खूप जुनी आणि आवडती लायब्ररी.

बऱ्याच दिवसांनी थोडा वेळ हाताशी होता.
अशा वेळी मी पाहिजे ते पुस्तक मिळालं तरी झटपट पुस्तक बदलून कल्टी न मारता  रेंगाळत राहतो.
उगीच पुस्तकं चाळत, काहीबाही वाचत.
लायब्ररीच्या एका बाजूला पुलंच्या पुस्तकांच्या भिंतीचा आडोसा करून बाल-विभाग केलाय.
बच्चे लोकांना थोड्या टाचा उंचावून पुस्तकं काढता यावीत एवढ्या उंचीच्या रॅक्सच्या रांगा आहेत.
 
आणि ह्या सगळ्या समृद्ध अडगळीतच एक मोठं टेबल आणि चार पाच खुर्च्या आहेत.
खरंतर बाल विभागात आलेल्या  छोट्या किडो लोकांसाठी रिझर्व्हड आहेत त्या खुर्च्या... आरामात बसून वाचायला.  
पण मी बसतो तिकडे सुमडीत... 
लायब्ररीत बाल-विभागाच्या वयाचा असल्यापासून येत असल्यामुळे सगळ्या लायब्ररीयन पोरीसुद्धा थोडा कानाडोळा करतात. 

मस्त वाटतं त्या पुस्तकांच्या भिंतींत... 
तीन बाजूंनी हॅरी पॉटर नी फेमस-फाईव्ह नी टिंकल नी ऍस्ट्रिक्स नी एखादा चुकार मराठी किशोर आपल्या भोवती गराडा घालून असतात.
समोर उघड्या खिडकीतून रस्त्यापलीकडच्या  मंदिराचा कळस नी त्याला लागून झुलणारा आंबा दिसत रहातो.
ह्या मंदिराच्या पहिल्या मजल्यावरही एक अभ्यासिका आहे.
कैक वर्षांपूर्वी तिकडे एक पोरगी लॉ की अकाउंट्सच्या अभ्यासाला यायची.
एका आळसावलेल्या दुपारी आमची अशीच ओळख होऊन आम्ही टिळक मंदिराच्या वरच्या मजल्यावर हळूच जाऊन एकमेकांना हापस हापस हापसलेलं. (तेव्हा कॅमेरे बिमेरे नसायचे)
त्याची आज थोडी आठवण येऊन मी चोरटेपणानी उगीच आजूबाजूला बघितलं.

बाजूला एक  बहुतेक "सिद्धांत" आणि  मोस्टली "अर्शिका" खुर्चीवर गंभीरपणे पाय हलवत अनुक्रमे 'नार्निया' आणि "मोबी डिक" मध्ये डोकं घालून बसलेले होते.
मी त्यांच्या खिजगणतीतही नव्हतो.

मी पण खिडकीतून येणारं कोमट ऊन बघत निवांत बसलो.
लायसन्स मिळत नसल्याची ठसठस त्या शांतवेळी थोडी विसरल्यासारखी झाली.
अंमळ पेंगच यायला लागली माझ्या डोळ्यांवर... 
आणि खिशात माझा फोन थरथरला. 

मी बहुतेक "सिद्धांत" आणि  मोस्टली "अर्शिका" ला डिस्टर्ब होणार नाही ह्याची काळजी घेत जस्ट कोणाचा फोन आहे बघितलं...
आईचा फोन होता.
लायब्ररीत खरंतर फोन घेत नाही मी... 
पण आत्ताचा फोन कशाबद्दल असेल ह्याचा थोडा अंदाज होता.
सो मी कुजबुजत्या आवाजात फोन घेतला...
आणि तिकडून आई आख्ख्या लायब्ररीला ऐकू जाईल एवढ्या मोठ्ठया नाचऱ्या आवाजात ओरडली,
"निलू, पार्टी... पार्टी... लायसन्स मिळालं !" 


   
 
 
  

No comments:

Post a Comment