Saturday, August 1, 2020

टॅक्सी दिवस ५: १९ जानेवारी २०२०

आज दोनच भाडी मारली.

एका माझ्या मेमे मावशीसारख्या दिसणाऱ्या प्रेमळ बाईला रे रोडला सोडली.
तिने मला भायखळ्याच्या "S" ब्रिजचा रस्ता दाखवला.
भारी डौलदार आहेत हे पूलबुवा.

















मावशीबाई एक्सपर्ट कूक होत्या.
पारसी / गुजराथी / मुघलाई / चायनीज फूड,
नल्ली निहारी / बिर्याणी /  केक्स सगळं काही बनवायच्या.
लवकरच अमेरिकेला कूकिंगचे क्लास घ्यायला चालल्या होत्या.

रे रोड वरून डायरेक्ट घाटकोपरचं भाडं मिळालं.
मी लांबचं भाडं मिळालं म्हणून खुषारलो.
(हार्डकोअर टॅक्सीवाला बनत चाललोय हळूहळू ;))

पण लाल बहादूर शास्त्री रोडवरून एक चिंचोळा लेफ्ट मारला आणि बाबा माझे...
टिपीकल असल्फाच्या स्लम्समधून चढणारा चिंचोळा रस्ता.
साक्षात नेमाडेकाकांची समृद्ध अडगळ!
दोन्ही बाजूला लावलेल्या बाईक्स, दुकानं, चिल्ली-पिल्ली आणि अर्थात समोरून येणाऱ्या गाड्या.

इकडे तिकडे गाडी लागली तर राडा!
च्यायला फुल्ल टू स्ट्रेसमध्ये.
पण ते न दिसू न देता वर्षानुवर्षं इकडे येत असल्याचा आव आणून कशीबशी गाडी घुसवली.
अशा ठिकाणी यु टर्न मारणं म्हणजे अजून एक दिव्य
पण एका बंधूभावी रिक्षावाल्यानं "आने दो, मारो फुल्ल श्टेरींग" करत हेल्प केली आणि मी उताराला लागलो.

आत्ता मी जरा जरा मजा घ्यायला लागलेलो निरुंद रस्त्याची.
एक्झॉटिक गिचमिड गल्ल्यांतून गाडी मारणारा 'जेसन बोर्न' असल्याचा जरा जरा फील  यायला लागलेला.
तेव्हढ्यात गल्लीतून बाहेर पडता पडता अगदी शेवटी एका बाईकला हलके घासलीच.
'जेसन बोर्न' सायबांची हवा टाईट...
पण इकडे तेव्हढं चालून जात असावं बहुधा... कोणी ढुंकूनसुद्धा बघितलं नाही.

पण मी मात्र हळहळलो.

एव्हरेस्ट चढलो नी मोरीत पडलो वगैरे.

...
...
...

मागच्या आठवड्यात बायकोचे वडील अचानक गेले त्यामुळे ती प्रचंड डिस्टर्ब्ड आहे.
रात्री सरळ मीरारोडला थडकलो आणि तिला उचलली.

रविवारी रात्रीच्या निवांत मुंबईत दोघं एमलेस फिरलो.

तिचं दुःख थोडं हलकं झालं का? माहीत नाही... बहुतेक नाहीच...
मला मात्र रात्रीची मुंबई आणि व्हल्नरेबल बायको दोघांविषयी य' व्यांदा माया दाटून आली.






आजची कमाई: ६५० रुपये
(बायकोला अर्थात फ्री राईड)


1 comment: