Sunday, August 9, 2020

टॅक्सी दिवस ६: २६ जानेवारी २०२०

आज सव्वीस जानू असल्यामुळे पहिले छूट छातीला झेंडा चढवला.





















वाळकेश्वरवरून एका पारसी बाबाला मेट्रोला सोडला.
त्यानं थोडी सुट्टया पैशांवरून कटकट केली.
चलता है!

मग मेट्रोलाच गाडी लावून कयानीमध्ये मस्त आम्लेटपाव खाल्ला.
रविवार सकाळ असल्यामुळे मेजर गर्दी होती.
कयानी पाहिल्यापासून आम्लेट-पाव, ब्रूम मस्का आणि खास करून मटण समोशांसाठी फेमस आहेच.
शिवाय आजकाल सोशल मिडीयामुळे जुन्या फेमस अड्ड्यांची अजूनच हवा होतेय.
चांगलंच आहे.

मी एकटा जीव असल्याने शेअरींगला रेडी होतोच.
कयानी, गिरगावचं प्रकाश, किंग्ज सर्कलचं अंबा भुवन, / (पुण्यात) वैशाली अशा बिझी ठिकाणी नाटकं न करता शेअरींगला तयार झालात तर जागा लवकर मिळण्याची शक्यता पाच-पटीने गुणिले होते हे मी इथे नमूद करू इच्छितो.
(प्रकाश आणि अंबा भुवनला जाण्याचा प्रयत्न करीन टॅक्सिनाम्यात... माझी खास आवडती ठिकाणं आहेत.)

कयानीत माझ्या युनिफॉर्मकडे बघून सगळे थोडे कन्फ्यूज झाल्यासारखे वाटले.
पण कोणी अर्थातच काही बोललं नाही.

माझ्या टेबलावर दोन श्यामक दावरच्या ट्रूपमध्ये असतात तशी शिडशिडीत चिकणी पारशी मुलं आणि एक आय. टी. टाईप्स कपल होतं.
वेटर थोडे आमच्यावर वसवसत होते...
पण ते बिझी आहेत हे साक्षात दिसत होतं.
आणि वेटर्सचा उद्धटपणा = हॉटेलची टेस्ट / किंमत हे समीकरण जगजाहीर आहे.

पण पोरं तरुण आणि (शिवाय पारशीच :)) असल्यामुळे जरा वेटरवर वैतागली होती.
"वॊट फकिंग ऍटिट्यूड ही इज थ्रोइंग" वगैरे पुटपुटत होती.

मी न राहवून म्हणालो,
"ऍटिट्यूड इज पार्ट ऑफ चार्म मेट."
माझ्या युनिफॉर्ममुळे ती थोडी सरप्राइझ्ड झाली हे हे हे :)

जाताना काउंटरवर चक्क रासबेरी सोडा दिसला.
लगेच बायकोसाठी दोन बाटल्या घेऊन टाकल्या,
हे देखणं माणिक ड्रिंक माझं भारी आवडतं आहे:
आज-काल फारसं बघायला मिळत नाही. 






तिकडून दोन बायका आणि एका मुलीला उचललं.
आई मुलगी बहुधा पुण्याच्या आणि मावशी मुंबईची होती.
पुण्याच्या लोकांची मुंबईच्या घामाबद्दलची क्लिशेड तक्रार चालू होती.
शिवाय एका श्रीमंत शेजारणी बद्दल आई-मुलीचं कॉन्स्टन्ट बिचींग चालू होतं.
ती म्हणे घरून चितळ्यांचं म्हशीचं दूध उसनं नेते आणि परत देताना (स्वस्त) गाईचं दूध देते :)
काही बोला उसन्याचा हा प्रकार भारी आवडला मला.

त्यांना रीगलजवळ सोडलं.

तिकडून एका स्मार्ट चटपटीत मुलीला उचललं.
तिला चर्चगेट स्टेशनला जायचं होतं.
आता इकडे प्रॉब्लेम असा आहे की कामा रोडवरून इरॉस टॉकीजच्या दिशेनी राईट बंद आहे.
म्हणून मी गाडी सरळ पुढे मंत्रालयाच्या दिशेनी नेली म्हटलं जिकडे मिळेल तिचे यु टर्न मारूया.
पण पाठी पोरगी करपली.
'अरे इधरसे क्यू लाया लेफ्ट मारके यु टर्न मारने का था शॉर्टकट है रोज का' वगैरे वगैरे...
तणतणायला लागली.


आता हा खालचा जुगाडू यु टर्न म्हणजे एकदम हार्डकोअर रोज मुंबईत जा ये करणाऱ्या ड्रायव्हर आणि प्रवाशाला माहित असणार...
शिवाय तसं पाहिलं तर मंत्रालयाचा 'यु' हार्डली ३०० मीटरनी जास्त असेल.


पण मुंबईकर सेकंदा-सेकंदाच्या हिशोबावर चालतात हे तर फेमसच. 
सो मी चूपचाप शिव्या खाऊन घेतल्या.
पैसे नको देऊ सांगितलं पण पैसे मात्र दिले तिनी.
ठीकाय लेसन लर्न्ट!

चर्चगेट स्टेशनवरून  दोन चिकणी गुजराथी मुलं उचलली.
बडोदा का सुरतची होती.
मुंबई काय काय बघता येईल विचारत होते.
त्यांना थोडी रेकमेंडेशन्स दिली आणि लिओपोल्डला सोडलं.

कुलाबा कॉजवेवरून नेहेमीच्या रस्त्यावरून सरळ जाण्याऐवजी इलेक्ट्रिक हाऊस वरून असाच लेफ्ट मारला  आणि अवचित ह्या शांत निवांत कूपरेज रोडवर पोचलो. 
सध्या फक्त आईतवारीच टॅक्सी चालवत असल्यामुळे इतर दिवशीचं माहीत नाही पण रविवारी तर हा रस्ता भारी निवांत असतो. 
डावीकडे कूपरेज फुटबॉल ग्राऊंड आणि उजवीकडे अँटिक बिल्डिंग्ज असलेल्या ह्या रस्त्यावर बरेचसे टॅक्सी /उबरवाले गाड्या पार्क करून विश्रांती घेतात. मी ही थोडं चिल केलं.  

















मग मंत्रालयाजवळून ड्युटी संपवून दमून घरी चाललेल्या दोन पोलिसांना उचललं आणि व्ही. टी. स्टेशनला सोडलं.

व्ही. टी. वरून असाच भायखळा परळ करत एल्फिस्टनला आलो.
तिकडून दादर स्टेशन - सिद्धिविनायक - दादर स्टेशन अशी दोन तीन भाडी मारली.

माझ्या एका मित्रानी ही आयडिया मला आधीच दिली होती.
मला टॅक्सी मिळत नसल्याने मी फ्रस्ट्रेट झालो होतो तेव्हा तो म्हणालेला,
"अरे वेड्या तुला समाजसेवाच करायचीय तर दादर स्टेशनला तुझी गाडी घेऊन जा आणि फक्त सिद्धिविनायक असं ओरड, लोकं धावत येतील."

खरंच स्टेशनवर सिद्धिविनायकला जायला भाबडे भाविक खूप होते.
हेच तर पाहिजे होतं आपल्याला.

आता घराच्या एवढ्या जवळ आलोय तर घरी जेवायलाच जाऊया म्हणून गाडी बॅन्ड्राला टाकली.
पण अक्षरशः घराच्या खाली एका फॅमिलीनी सिटीलाईटला जाणार का विचारलं.
भूक मजबूत लागलेली एक क्षण नाही म्हणावं वाटलं...
पण संधीवाताचा त्रास असलेले म्हातारे आजोबा होते...
घेतलं त्यांना.
तानाजी मूव्ही बघायला चालली होती फॅमिली.
नातू जरा आगाऊ होता. बापानी लाडावला होता बहुतेक.
आधीच त्रासलेल्या आजोबांना इरिटेटिंग प्रश्न विचारून हैराण करत होता.
आमच्या लहानपणी गव्हर्मेंट कॉलनीत अशा आगाऊ पोरांना मोठ्या मुलांकडून डोक्यात खवडे मिळायचे त्याची आठवण झाली :)

सिटीलाईटच्या समोरच गोपी टॅंक मंडई.
मासे-खाऊंची काशी-काबा वगैरे.
शिरीष कणेकरांनी त्यांच्या लेखांतून फेमस केलेली वगैरे.
सो साहजिकच इकडून एका कोळीण मावशीला घेतलं आणि माहीमच्या मच्छिमार कॉलनीत सोडलं.

तिकडून परत दोन कोळणींना उचललं त्यांना कापड बाजारला टाकून घरी सुटलो.
कोलंबीचं लोणचं आणि तळलेली मांदेली वाट बघतायत.
त्यात कोळणींच्या पाट्यांमुळे टॅक्सीत घमघमाट माहौल तयार झालेला.

लेट्स फकिंग इट!


मासे - मासे - मासे SSS

आजची कमाई: ३४५ रुपये
















No comments:

Post a Comment