Friday, April 8, 2022

टॅक्सी दिवस २५ ते २७: २३ जानेवारी ते २० मार्च २०२२:

टॅक्सी दिवस २५: २३ जानेवारी ते २०२२:

एका छान शुभ्र पांढऱ्या केसांच्या देखण्या म्हातारीला केम्प्स कॉर्नरच्या पारसी पंचायतीत सोडलं. 

फार छान एरिया आहे खरं तर पण फोटो काढायला मनाई असल्याने आणि वॉचमन रोखून बघत असल्याने फोटो काढू शकलो नाही. बाकी आज नोंद करण्यासारखं काही नाही. 

आजची कमाई: ११५ रुपये. 

-----------------

टॅक्सी दिवस रात्र  २६: १९ फेब्रुवारी २०२२:

आजही रात्रीच टॅक्सी घेतली. 

पेडर रोड वरून दोन टिप्पिकल साऊथ बॉम्बेच्या पोरांना उचललं. 

त्यांना विलिंग्डन जिमखान्याला सोडायचं होतं. 

हाच तो जिमखाना जिकडच्या एका देवीप्रसाद केजरीवालच्या नावे "एग्ज केजरीवाल" ही डिश ओळखली जाते. 

मला स्वतःला इतकं ओलसर अंडं शक्यतो मनापासून नाही आवडत पण ज्याचा त्याचा चॉईस वगैरे... 

पोरं त्यांच्या खास "सोबो" लिंगोत इंग्लिश बोलत होती. 

"अरे डोन्ट हॅव चेंज तो पे धिस पुअर डूड (म्हणजे मी) या SSS"

दुसरा बोल्ला, "अरे डोण वरी या SSS माय डॅड गेव्ह मी फुल्ल ऑन 'हंडो'का थप्पी टुडे!"

आणि ते सुळ्ळकन शंभरची नोट मला टेकवून चेंज न घेता भारी परफ्यूमचा दरवळ सोडत ते जिमखान्यात शिरले. 

मी काही क्षण त्या एंटायटल्ड पण एकंदरीत सालस मुलाच्या "हंडोच्या थप्पी"ला फॅन्टसाईझ केलं. 

हे असं माझं रोल्स अलट-पलट होणं भारी मजेशीर आहे. 

मीही शनिवारी रात्री चर्नीरोडच्या कॅथलिक जिमखान्याला असाच भसाभस परफ्युम मारून जायचो. 

तिकडच्या देखण्या कॅथलिक "साठो"त्तरी मैत्रीणींबरोबर नाचायला. 

आता थोडा टॅक्सीत बिझी आहे ते संपलं की पुन्हा जाईनच. 

तसंही तीस दिवस जवळ जवळ होत आलेत. 

शनिवार रात्रीची व्हाईब काही और असते हेच खरं. 

आजची कमाई: १८९ रुपये. 

-----------------

टॅक्सी दिवस २७: २० मार्च २०२२:

कालही रात्रीच टॅक्सी उचलली असल्यामुळे आजही आरामात गाडी काढली. 

आणि वांद्रे माहीम माटुंगा सिटीलाईट असा रमत गमत जात होतो. 

सिटीलाईटला दोन कारवारी बहिणींना उचललं. 

केवड्यासारखा छान पिवळसर गोरा रंग होता त्यांचा. 

त्यांना हिंदमाताला जायचं होतं. 

बहुतेक चांगले स्पोर्ट्स शूज थोडे स्वस्तात घ्यायचे होते त्यांना. 

आजकाल सगळीकडेच फॅक्टरी आउटलेट्स आलीयेत जिकडे ब्रॅण्डेड वस्तू घसघशीत डिस्काउंटमध्ये मिळतात. 

पण ह्या फंड्याची सुरुवात साधारण १५ - २० वर्षांपूर्वी मुंबईतल्या हिंदमातापासूनच झाली. 

तिकडून फिरत फिरत माझगाव ब्रिजजवळ पोचलो तिकडे एका मुस्लिम कुटुंबाची टॅक्सी बंद पडली होती. 

मग टॅक्सीवाल्यांच्या ब्रदरहूडला जागून त्या ड्रायव्हरला बॅकअप दिला आणि त्या कुटुंबाला माझ्या टॅक्सीत घेतलं. 

त्यांना नाखुदा मोहल्ला (इंटरेस्टिंग नाव) ला सोडलं. 

आणि तसाच मोहम्मदअली रोडवरून पुढे निघालो. 

मनीष मार्केट व्ही. टी. करत हुक्की आली म्हणून पी. डिमेलो रोड क्रॉस करून सरळ आत घुसलो. 

जोरात लघवीला आलेली. 

चाळीसनंतर बऱ्याच पुरषांना हा प्रॉब्लेम चालू होतोच. 

माझे बाबा आम्ही कुठेही शॉपिंगला / फिरायला वगैरे गेलो की मध्येच पाच मिनिटांत येतो सांगून गायब व्हायचे ते ह्याचसाठी. 

आई वैतागलेली, मी आणि बहीण बावचळलेले. 

तेव्हा एवढ्या संख्येने 'सुलभ'पण नव्हती आत्तासारखी.

पण अट्टल बेवड्याला जसे सगळीकडचे अड्डे माहीत असतात तसेच बाबांना सगळ्या मुंबईतल्या मुताऱ्या पाठ होत्या. 

बाबांची उगीचच आठवण आली तीही अशा वियर्ड विषयावरून . 

हवाही चिकचिक मळभवाली हुरहूर लागेलशी. 

समोरच एक 'सुलभ' होतं सो आधी हलका झालो आणि मग आजूबाजूला बघितलं. 

इकडे तिकडे सोन्याचे कण खरवडत बसणाऱ्या खाण मजुराला अचानक मदर-लोड मिळावी तसं काहीतरी झालं. 

समोर निवांत प्रशस्त सुंदर रस्ता, त्याच्या उजव्या कडेला सुंदर दगडी इमारती.

डावीकडे बॉम्बे पोर्ट ट्रस्टची मोठ्ठाली भिंत,   

दोन्ही बाजूंना झुलणारी अगणित पुरातन अज्रस्त्र झाडं आणि रविवारच्या निवांत रस्त्यांवर पोरांचं रंगलेलं क्रिकेट. 

बॅलार्ड इस्टेटला आधी फारसा कधी आलो नव्हतो बहुतेक पण आज मी वेडाच झालो. 




हे राजबिंडं दिसणारं कॅरेक्टरदार "ग्रँड हॉटेल" 




आणि हा थेट "पॅन्स लॅबरिन्थ्" मधून आल्यासारखा वाटणारा  वृक्ष-पितामह  



काळ्या पिवळ्या नवसाचे काहीच दिवस राहिलेयत आता. 
शेवटच्या त्या मोजक्या सेशन्समध्ये ब्रेक घ्यायला बॅलार्ड इस्टेट फिक्स! 
आजची कमाई: २३० रुपये.  

     

  

  


No comments:

Post a Comment