Sunday, May 8, 2022

टॅक्सी दिवस २८: २७ मार्च २०२२:

आज दादर टी. टी., वडाळा बस डेपोच्या आसपासच्या परिसरात बरीच भाडी मारली. 

राजा शिवाजी (आमची जुनी किंग जॉर्ज) शाळेजवळून दादर पूर्व स्टेशनकडे जाताना अचानक ही देखणी इमारत दिसली. 

बाबासाहेब आंबेडकर इकडे राह्यचे बहुतेक. 

इकडून असंख्य वेळा जाऊनही आधी कधी लक्षातच नाही आलं... 



हिंदू कॉलनीतलं एक भाडं मिळालं आणि मग तिथल्या शांत रस्त्यांवर उगीच निरुद्देश फिरत राहीलो. 


हे फाईव्ह गार्डनच्या पाचमधलं कुठलं तरी एक गार्डन. 

गणेश मतकरीच्या बऱ्याच कथा इथे घडतात. 

त्याचा तो खिशात "नकल्टस" (ह्याला आम्ही कॉलनीत "फाईट" म्हणायचो) बाळगणारा राडेबाज पारशी पोरगा इथे कुठेतरी दिसेल असं मला उगीचच वाटत राह्यलं. 

पण आता मात्र कुठल्यातरी (बहुतेक) कामगार मंडळाची निवांत मिटींग चालू होती तिकडे. 

मुंबईत बऱ्याच गार्डन्समध्ये दुपारी तुम्हाला बरेचदा असे ग्रुप एकत्र येऊन मिटींग घेताना दिसतात. 

  1. लबाड विकासकांनी वर्षानुवर्षं थकवलेली त्यांची रिडेव्हलपमेंटची घरं, 
  2. एखादी बंद पडलेली कंपनी आणि मालकाने त्यांचे बुडवलेले कष्टाचे पैसे, 
  3. एकत्र चालणारी महिन्याच्या पहिल्या रविवारची भिशी,
  4. किंवा गावातल्या सुंदर हेमाडपंथी मंदिराला पॉप कलर्स मारून विरूप करायचे प्लान 

विषय बहुतेक ह्यातलाच  एक असतो. 

पण तो पहिल्या दोनपैकी नसून दुसऱ्या दोनपैकी असावा अशी इच्छा करत घेतलेले काही फोटो:





वडाळा बस डेपोजवळून एक मस्त मालवणी कुटुंब उचललं. 

कोरलेल्या मिश्या आणि केसांना काळा कुळकुळीत कलप केलेले, कुरकुरीत पांढरीफेक टाईट पॅण्ट मारलेले,  शिडशिडीत पण हलकंसं पोट असलेले बाबा.

सुस्वरूप, डोक्यात घसघशीत गजरा घातलेली, थोडी स्थूल, एकाचवेळी खाष्ट आणि प्रेमळ वाटणारी आई. 

आणि त्यांच्या दोन सुस्वरूप टीन-एज सुरु व्हायच्या बेतातल्या  मुली.    

म्हणजे त्या एक नंबर डान्सर असणार आणि कॉलनी / वाडीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमांत "चिक्क मोत्याची माळ" वर हमखास प्राईज उचलत असणार ह्याची मला खात्रीच!

बहुतेक कुठे ठाणा भांडुप साईडला ते लग्नाला निघाले होते. वडाळा स्टेशनवरून हार्बरनी कुर्ल्याला जाऊन ट्रेन बदलणार होते बहुतेक.  

"पपा मला टेशनला गेल्यावर खायला पायजेल", दोघींतली एक कुर्र्यात बोलली. 

(आमच्या सगळ्या मालवणी पोरांना लहानपणापासूनच बाबांना "पपा"च म्हणायला शिकवलं जातं.) 

"आरे घॅवया ना", बाबानी गुटका आणि सेंटचा मिश्र वास सोडत प्रॉमिस दिलं. (आवाजाचा पोत: डिट्टो उपेंद्र लिमये) 

"काय नको, तुमी दोघीपण ज्यास्ती श्यान्या झाल्याय, तुमाला शिक्षा!", आईनं व्हेटो बजावला. 

"उम्म्म", मुलगी लाडीक चंबू करत रुसली वगैरे. 

"लग्नाला बँकर (त्यांना बहुतेक बँक्वेट म्हणायचं होतं) मध्ये जेवायचाच हाय", आईनं बिनतोड मुद्दा काढला. 

त्यांचं बँटर, कॅमराड्री, फॅमिलीतला पावर प्ले वगैरे अजून ऐकायला मला अर्थातच आवडलं असतं पण तितक्यात वडाळा स्टेशनच आल्याने माझा नाईलाज झाला. 

मला ती फॅमिली साक्षात जयंत पवारांच्या "वरणभात लोंचा"  किंवा जी. के. ऐनापुरेंच्या "कांदाचिर" नाहीतर "रिबोट" नाहीतर "चिंचपोकळी" कथासंग्रहामधून उठून आल्यासारखी वाटली. 

बाय द वे: जी. के. ऐनापुरे हा भारी लेखक एवढा अंडररेटेड का आहे?

आजची कमाई: ३१४ रुपये


 






No comments:

Post a Comment