Sunday, January 30, 2022

टॅक्सी दिवस २३: २८ नोव्हेंबर २०२१

आज प्रभादेवीवरून एका साध्याश्या बाईंना घेतलं त्यांना सिटीलाईटला सोडायचं होतं.

बहुतेक गोपी-टॅंक मंडईत मासे घ्यायला. 

ताजे फडफडीत मासे खाणाऱ्यांसाठी हे मार्केट म्हणजे मक्का मदिना काशी व्हॅटिकन सगळंच आहे. 

शिरीष कणेकरांनी त्यांच्या बऱ्याच लेखांत गोपी-टॅंक फेमस करून ठेवलंय. बाय द वे कणेकरांनी मला एकदा त्यांच्या खास भाषेत रॉयल स्नब दिलेला पण मीच तेव्हा तरुण आणि थोडा दीडशहाणा होता सो ते ओके वगैरेच. तो किस्सा पुन्हा केव्हातरी... 

तर प्रभादेवीवरून निघून कॅडल रोडवरून सुसाट आलो हे ठीकच. 

पण शिवाजी पार्कला समर्थ व्यायाम मंदिराजवळ राईट मारून लेडी जमशेदजी रोडला लागायला हवं होतं. 

च्यायला नादात तो राईट विसरलो आणि पुढच्या बऱ्याचश्या छोट्या छोट्या गल्ल्यांत राईटला नो एंट्री आहे. 

मग कसाबसा बऱ्याच पुढे यु टर्न मारून राजा बढे चौकातून सिटीलाईटला आलो. 

नेहमीप्रमाणे पापक्षालनार्थ भाड्यापेक्षा पैसे कमी घ्यायची ऑफर बाईंना दिली पण बाई म्हणाल्या, "जाऊद्या हो काय वीस रुपयांनी मी पण नाय पैशेवाली होणार नी तुमीपण नाय होणार."

देव बरें करो. 

सिटीलाईटच्या सिग्नलवर हा गजरा घेतला. 

मला गाडीला गजरा बांधायला फार म्हणजे फारच आवडतो. 

लगेच त्या गाडीला आपल्या खास जवळच्या बाईचं कॅरॅक्टर येतं. 

गाडी आणि आपलं कनेक्शन अजून घट्टंमुट्टं होतं असं मला वाटत राहतं. 



आणि मग मोगऱ्याच्या वासानी अजून भळाभळा आठवणी व्हायलाच लागल्या. 

नात्यातल्या लग्नांतल्या आई / मावश्या / काक्या / आत्या / आणि माम्यांच्या चंदेरी जरवाल्या घसघशीत वेण्या आठवल्या. 

रात्री लग्न संपता संपता थकलेल्या बायका त्यांचे विस्कटलेले हेअर बन्स, सरकलेल्या वेण्या, मध्येच आलेली केसांची बट... 

थोड्या वेडू , किंचित व्हल्नरेबल आणि प्रचंड गोड दिसायच्या त्या सगळ्या. 

आमच्या आईच्या दाट कुरळ्या आणि अनमॅनेजेबल केसांचं तर साक्षात घरटंच व्हायचं. 

आणि तिला तशी बघून मला प्रचंड माया दाटून यायची. 

मेसी-बन वाल्या बायका हा माझा वीकपॉइंट तेव्हापासूनच असावा कदाचित. 

(इडिपस वगैरे... )

सायली, मोगरा, जाई-जुई, लाल-कवठी-सोनचाफा, गुलछडी, बकुळी, अबोली काय काय घालायची माझी आई डोक्यात.

तिच्या डोक्यांतली माझी सगळ्यांत आवडती तीन फुलं खालील चढत्या क्रमाने:

दवणा: 

दिसायला नाजूक बारीक फुलं पण काय ह्यांचा वास असतो. 

सटल-बिटल घंटा. इन युअर फकिंग फेस घमघमाट. 


सुरंगी:
हिचा गजरा अंमळ दुर्मिळच. 

बाबा पगार झाला की किंवा खास स्पेशल दिवशी आईला आणायचे हा गजरा. 

ह्याचा वास म्हणजे स्ट्रेट सुखानी गुदमरून जायचं काम.

तेव्हा काही समजायचं नाही पण प्रचंड कामुक सुगंध असतो सुरंगीचा. 

ह्याचा गजरा दिसतोही एखाद्या तांबूस मऊशार सुरवंटासारखा. 

काय वेगळाच प्रकार आहे हा. 

(सुरंगीचे छायाचित्र मिसळपाव.कॉम वरील "जागु" प्राजक्ता म्हात्रे यांच्या ब्लॉगवरून साभार)



करवंदं:  

येस आपली करवंदं!   

ही काळी करंद व्हायच्या आधी टीन-एजर असताना ह्यांना असा सुंदर कुसुम्बी रंग येतो की लिहितानाही मी त्या रंगाच्या आठवणीने थरथरतोय. 

काही इतकं सुंदर, टवटवीत आणि प्रसन्न फार कमी वेळा बघितलंय मी.

आई व्ही टी वरून डोंबिवलीला संध्याकाळी ऑफीसवरून यायची आणि तिला आणायला मी आणि बाबा स्टेशनवर जायचो. 

(हो तेव्हा ८०-८२ साली डोंबिवली स्टेशनावर हे शक्य होतं.)

तिचा घामेजलेला पण आम्हाला बघून फुललेला चेहेरा, केसांचं अर्थातच झालेलं टोपलं, पर्सच्या चामड्याचा येणारा एक वेगळाच वास, 

(हा असा वास लोकल ट्रेननी प्रवास करणाऱ्या बायकांच्या पर्सला हटकून येतो.)   

आणि गाडीतच घेऊन डोक्यात घातलेली ती सुंदर फुलं... टेक्निकली खरं तर फळं!

मी बक्कन तिच्या केसांतूनच एक दोन करवंद तोडायचो आणि ती तुरट आंबट रसरशीत देखणी फळं तशीच खायचो. 

सिंपलर टाईम्स!

भारी सुंदर दिसतात करवंदं मुलींच्या डोक्यात. 

आजकाल कोणीच घालत नाही... का कोण जाणे.  



---------


आज फुलांच्या आणि कच्च्या करवंदांच्या आठवणीतच थोडीफार भाडी मारली. 
(फुलांची छायाचित्रे जालावरून साभार)

आजची कमाई: 

५५० रुपये 












    

 





 


No comments:

Post a Comment