Friday, April 8, 2022

टॅक्सी दिवस २५ ते २७: २३ जानेवारी ते २० मार्च २०२२:

टॅक्सी दिवस २५: २३ जानेवारी ते २०२२:

एका छान शुभ्र पांढऱ्या केसांच्या देखण्या म्हातारीला केम्प्स कॉर्नरच्या पारसी पंचायतीत सोडलं. 

फार छान एरिया आहे खरं तर पण फोटो काढायला मनाई असल्याने आणि वॉचमन रोखून बघत असल्याने फोटो काढू शकलो नाही. बाकी आज नोंद करण्यासारखं काही नाही. 

आजची कमाई: ११५ रुपये. 

-----------------

टॅक्सी दिवस रात्र  २६: १९ फेब्रुवारी २०२२:

आजही रात्रीच टॅक्सी घेतली. 

पेडर रोड वरून दोन टिप्पिकल साऊथ बॉम्बेच्या पोरांना उचललं. 

त्यांना विलिंग्डन जिमखान्याला सोडायचं होतं. 

हाच तो जिमखाना जिकडच्या एका देवीप्रसाद केजरीवालच्या नावे "एग्ज केजरीवाल" ही डिश ओळखली जाते. 

मला स्वतःला इतकं ओलसर अंडं शक्यतो मनापासून नाही आवडत पण ज्याचा त्याचा चॉईस वगैरे... 

पोरं त्यांच्या खास "सोबो" लिंगोत इंग्लिश बोलत होती. 

"अरे डोन्ट हॅव चेंज तो पे धिस पुअर डूड (म्हणजे मी) या SSS"

दुसरा बोल्ला, "अरे डोण वरी या SSS माय डॅड गेव्ह मी फुल्ल ऑन 'हंडो'का थप्पी टुडे!"

आणि ते सुळ्ळकन शंभरची नोट मला टेकवून चेंज न घेता भारी परफ्यूमचा दरवळ सोडत ते जिमखान्यात शिरले. 

मी काही क्षण त्या एंटायटल्ड पण एकंदरीत सालस मुलाच्या "हंडोच्या थप्पी"ला फॅन्टसाईझ केलं. 

हे असं माझं रोल्स अलट-पलट होणं भारी मजेशीर आहे. 

मीही शनिवारी रात्री चर्नीरोडच्या कॅथलिक जिमखान्याला असाच भसाभस परफ्युम मारून जायचो. 

तिकडच्या देखण्या कॅथलिक "साठो"त्तरी मैत्रीणींबरोबर नाचायला. 

आता थोडा टॅक्सीत बिझी आहे ते संपलं की पुन्हा जाईनच. 

तसंही तीस दिवस जवळ जवळ होत आलेत. 

शनिवार रात्रीची व्हाईब काही और असते हेच खरं. 

आजची कमाई: १८९ रुपये. 

-----------------

टॅक्सी दिवस २७: २० मार्च २०२२:

कालही रात्रीच टॅक्सी उचलली असल्यामुळे आजही आरामात गाडी काढली. 

आणि वांद्रे माहीम माटुंगा सिटीलाईट असा रमत गमत जात होतो. 

सिटीलाईटला दोन कारवारी बहिणींना उचललं. 

केवड्यासारखा छान पिवळसर गोरा रंग होता त्यांचा. 

त्यांना हिंदमाताला जायचं होतं. 

बहुतेक चांगले स्पोर्ट्स शूज थोडे स्वस्तात घ्यायचे होते त्यांना. 

आजकाल सगळीकडेच फॅक्टरी आउटलेट्स आलीयेत जिकडे ब्रॅण्डेड वस्तू घसघशीत डिस्काउंटमध्ये मिळतात. 

पण ह्या फंड्याची सुरुवात साधारण १५ - २० वर्षांपूर्वी मुंबईतल्या हिंदमातापासूनच झाली. 

तिकडून फिरत फिरत माझगाव ब्रिजजवळ पोचलो तिकडे एका मुस्लिम कुटुंबाची टॅक्सी बंद पडली होती. 

मग टॅक्सीवाल्यांच्या ब्रदरहूडला जागून त्या ड्रायव्हरला बॅकअप दिला आणि त्या कुटुंबाला माझ्या टॅक्सीत घेतलं. 

त्यांना नाखुदा मोहल्ला (इंटरेस्टिंग नाव) ला सोडलं. 

आणि तसाच मोहम्मदअली रोडवरून पुढे निघालो. 

मनीष मार्केट व्ही. टी. करत हुक्की आली म्हणून पी. डिमेलो रोड क्रॉस करून सरळ आत घुसलो. 

जोरात लघवीला आलेली. 

चाळीसनंतर बऱ्याच पुरषांना हा प्रॉब्लेम चालू होतोच. 

माझे बाबा आम्ही कुठेही शॉपिंगला / फिरायला वगैरे गेलो की मध्येच पाच मिनिटांत येतो सांगून गायब व्हायचे ते ह्याचसाठी. 

आई वैतागलेली, मी आणि बहीण बावचळलेले. 

तेव्हा एवढ्या संख्येने 'सुलभ'पण नव्हती आत्तासारखी.

पण अट्टल बेवड्याला जसे सगळीकडचे अड्डे माहीत असतात तसेच बाबांना सगळ्या मुंबईतल्या मुताऱ्या पाठ होत्या. 

बाबांची उगीचच आठवण आली तीही अशा वियर्ड विषयावरून . 

हवाही चिकचिक मळभवाली हुरहूर लागेलशी. 

समोरच एक 'सुलभ' होतं सो आधी हलका झालो आणि मग आजूबाजूला बघितलं. 

इकडे तिकडे सोन्याचे कण खरवडत बसणाऱ्या खाण मजुराला अचानक मदर-लोड मिळावी तसं काहीतरी झालं. 

समोर निवांत प्रशस्त सुंदर रस्ता, त्याच्या उजव्या कडेला सुंदर दगडी इमारती.

डावीकडे बॉम्बे पोर्ट ट्रस्टची मोठ्ठाली भिंत,   

दोन्ही बाजूंना झुलणारी अगणित पुरातन अज्रस्त्र झाडं आणि रविवारच्या निवांत रस्त्यांवर पोरांचं रंगलेलं क्रिकेट. 

बॅलार्ड इस्टेटला आधी फारसा कधी आलो नव्हतो बहुतेक पण आज मी वेडाच झालो. 




हे राजबिंडं दिसणारं कॅरेक्टरदार "ग्रँड हॉटेल" 




आणि हा थेट "पॅन्स लॅबरिन्थ्" मधून आल्यासारखा वाटणारा  वृक्ष-पितामह  



काळ्या पिवळ्या नवसाचे काहीच दिवस राहिलेयत आता. 
शेवटच्या त्या मोजक्या सेशन्समध्ये ब्रेक घ्यायला बॅलार्ड इस्टेट फिक्स! 
आजची कमाई: २३० रुपये.  

     

  

  


Saturday, March 5, 2022

टॅक्सी दिवस २४: १९ डिसेंबर २०२१

झालं असं की मी जी चालवतो त्या टॅक्सीचा प्रायमरी ड्रायव्हर राजकुमार नॉर्थला आपल्या गावी गेलेला. 

टॅक्सी उभी ठेवणं परवडत नाही त्यामुळे मालक दिनेश-भाईंनी दुसऱ्या एका बदली ड्रायव्हरला महिनाभर टॅक्सी चालवायला दिली होती. त्याला आपण 'राकेश' म्हणूया. 

तर राकेशनी मागच्या आठवड्यात दारूच्या नशेत टॅक्सी ब्यक्कार ठोकली. 

नशीबाने (टॅक्सीची) बॉडी चेपण्यावरच निभावलं. 

पण गाडीचं मजबूत काम निघालं. 

आता पुरुषाला गाडीचं काम निघालं की नुस्ती उलघाल उलघाल होते.इट'स अ बॉय थिंग! 

सो दिनेशभाई प्रचंड स्ट्रेसमध्येच होते. त्यांना किमान मॉरल तरी सपोर्ट द्यायला मी टॅक्सीच्या हॉस्पीटलमध्ये पोचलो. 

 दिनेशभाईंनी महालक्ष्मीच्या "घास गल्ली"त बोलवलं. 

ही आख्खी लेन टॅक्स्यांचं स्वस्त काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे हे मला आजच कळलं. 

थोडा लवकरच पोचलो. 

दिनेशभाई यायचे होते. 

सो आख्ख्या गल्लीत एक राउंड मारला. 

रविवार सकाळ धंद्याच्या दृष्टीने निवांत असल्याने बरेच टॅक्सीवाले इथे गाडीच्या छोट्या मोठ्या तक्रारी सॉल्व्ह करायला आलेले. 

मी हे काही फोटो काढले. 





आणि लाडात इकडे तिकडे फिरत राह्यलो. 

हे सगळं थोडं संशयास्पदच झालं असणार.   

आणि म्हणूनच एक धिप्पाड सरदारजी आला आणि मला विचारायला लागला की, "भाई (येस भाईच "पाई" नव्हे मुंबईच्या सरदारजीचा ऍक्सेंट थोडासाच पंजाबी असतो. अमृतसरच्या सरदारजीसारखा फुल्लऑन नव्हे.) कौन हो तुम? यहां क्या कर राहे हो??"

सु. शीं. च्या भाषेत "माहौलमध्ये गढूळ सुम्म ताण" वगैरे. 

मग त्याला सांगितलं की मीही आधा-अधुरा का होईना टॅक्सीवालाच आहे वगैरे. बॅजही दाखवला. 

मग तो थोडा  निवळला. 

त्याला वाटलेलं की मी आडव्या तिडव्या लावलेल्या गाड्यांचे फोटो काढून आर. टी. ओ. ला पाठवतोय की काय?

म्हणून तो मला घाबरलेला आणि मी त्याला...  हीहीही. 

म्हणजे नॅशनल पार्कात अवचित समोर आलेला बिबट्या आणि माणूस दोघंही एकेमकांना घाबरतात तसं काहीसं :)

आता त्यादिवशी मी लेपर्ड प्रिंटची अंडरवेअर (आतमध्ये (आता खरं तर ती अंडरवेअर असल्याने "आतमध्ये" हे रिडंडंट आहे पण सुपरमनने सगळा गोंधळ घातलाय. आतला कंस पूर्ण) बाहेरचा कंस पूर्ण) घातली असल्याकारणाने बिबट्याचा रोल इथे मी घेऊ इच्छितो म्हणजे कोणाची हरकत नसेल तर.  

माझा प्रोजेक्ट समजावून सांगितल्यावर सरदारजी एकदमच फ्री झाला. 

चहा वगैरे मागवत त्यानं त्याच्या खालसा कॉलेजच्या आठवणी वगैरे सांगितल्या.

अशा रीतीने आमचा मॅन-ऍनिमल आपलं मॅन-मॅन कॉन्फ्लिक्ट सुरळीतपणे सुटला. 

पण मला फेसबुकवरील अवलिया फोटोग्राफर मित्र अमित कुंभार ह्याचं कोट आठवलं: 



>>>>>>>
भारतात स्ट्रीट फोटोग्राफी करण्यासाठी तुमच्याकडे खालील गुण असलेच पाहिजेत :
1. प्रचंड कोडगेपणा रोमारोमात
बाणवने / णे
2. जो आडवा येईल त्याला फाट्यावर मारणे
3. बाचा बा~ची झालीच तरं नम्रतेत स्थितप्रज्ञ् होणे
4. नडायला आलेल्याचं खडे कडे ब्रेन म्यॅपिंग करणे.
5.साळसूद पणे फोटो काढुंन मी नाय त्या गावचा असा भास निर्माण करणे
...
...
वगैरे वगैरे

>>>>>>>

तेवढ्यात दिनेशभाई  आलेच आणि तो सरदारजी त्यांचा मित्रही निघाला.  

मग दुपार जवळपास संपेपर्यंत आम्ही गाडीचं कामच करत राह्यलो. 

माझ्या पोनी बांधलेल्या रुपेरी केसांना आणि सुखवस्तू कपड्यांना आसपासचे लोक आधी थोड्या संशयाने बघत राह्यले पण मग नंतर सरावले. 

समोरच्या पत्र्यांच्या घरांतून मिश्रीचे, कालवणाचे वास येत राह्यले. 

आणि घासगल्लीच्या वामकुक्षीची वेळ होईपर्यंत मीही तिकडचाच होऊन गेलो. 

अशी अडनिड गल्ल्यांतून मुंबई भेटत रहाते आणि आमची इंटिमसी वाढत जाते. 

प्रिय व्यक्तीच्या रँडम ऍब्सर्ड गोष्टीही प्रिय होत जाव्यात. रुपेरी केस, भरडा आवाज, वेडावाकडा दात किंवा तर्जनी जाईल एवढं भोक पडलेली पॅंटी सुद्धा. 

माझं आणि मुंबईचं ही तसंच चाल्लंय... 

घासगल्लीतल्या एका अफलातून घराचा हा आणखी एक फोटो. 



दुपारनंतर दिनेशभाईंची दुसरी टॅक्सी घेऊन थोडीफार भाडी मारली. 

पण ही गाडी माझ्या सवयीची नव्हती.  

तिचा ब्रेक मध्येच मिस व्हायचा. 

म्हणजे ब्रेक पॅडल दाबलं की मध्येच पुचकट लूज पडायचं मग थोडं पम्प करून पुन्हा मारलं की ब्रेक बसायचा. जरा डेंजरच प्रकार. 

आदल्या दिवशी प्रपोज मारल्यावर निकरानी नाही म्हणलेल्या कॉलनीतल्या पोरी दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडा नेट केल्यावर अवचित हो म्हणायच्या... एका दिवसात कुठलाही पॅरामीटर अजिबात बदललेला नसताना. 

तसंच काहीसं हेही.  

हे कॉलनी/ प्रपोज/ पोरींवरून पंकज भोसलेचं "विश्वामित्र सिंड्रोम" आठवलं. 

जरूर वाचा. टॉप पुस्तक आहे. 

https://www.loksatta.com/lokrang/book-review-vishwamitra-syndrome-by-pankaj-bhosale-zws-70-2820680/


आजची कमाई:   

२२० रुपये. 




    




 

 

  

 





Sunday, January 30, 2022

टॅक्सी दिवस २३: २८ नोव्हेंबर २०२१

आज प्रभादेवीवरून एका साध्याश्या बाईंना घेतलं त्यांना सिटीलाईटला सोडायचं होतं.

बहुतेक गोपी-टॅंक मंडईत मासे घ्यायला. 

ताजे फडफडीत मासे खाणाऱ्यांसाठी हे मार्केट म्हणजे मक्का मदिना काशी व्हॅटिकन सगळंच आहे. 

शिरीष कणेकरांनी त्यांच्या बऱ्याच लेखांत गोपी-टॅंक फेमस करून ठेवलंय. बाय द वे कणेकरांनी मला एकदा त्यांच्या खास भाषेत रॉयल स्नब दिलेला पण मीच तेव्हा तरुण आणि थोडा दीडशहाणा होता सो ते ओके वगैरेच. तो किस्सा पुन्हा केव्हातरी... 

तर प्रभादेवीवरून निघून कॅडल रोडवरून सुसाट आलो हे ठीकच. 

पण शिवाजी पार्कला समर्थ व्यायाम मंदिराजवळ राईट मारून लेडी जमशेदजी रोडला लागायला हवं होतं. 

च्यायला नादात तो राईट विसरलो आणि पुढच्या बऱ्याचश्या छोट्या छोट्या गल्ल्यांत राईटला नो एंट्री आहे. 

मग कसाबसा बऱ्याच पुढे यु टर्न मारून राजा बढे चौकातून सिटीलाईटला आलो. 

नेहमीप्रमाणे पापक्षालनार्थ भाड्यापेक्षा पैसे कमी घ्यायची ऑफर बाईंना दिली पण बाई म्हणाल्या, "जाऊद्या हो काय वीस रुपयांनी मी पण नाय पैशेवाली होणार नी तुमीपण नाय होणार."

देव बरें करो. 

सिटीलाईटच्या सिग्नलवर हा गजरा घेतला. 

मला गाडीला गजरा बांधायला फार म्हणजे फारच आवडतो. 

लगेच त्या गाडीला आपल्या खास जवळच्या बाईचं कॅरॅक्टर येतं. 

गाडी आणि आपलं कनेक्शन अजून घट्टंमुट्टं होतं असं मला वाटत राहतं. 



आणि मग मोगऱ्याच्या वासानी अजून भळाभळा आठवणी व्हायलाच लागल्या. 

नात्यातल्या लग्नांतल्या आई / मावश्या / काक्या / आत्या / आणि माम्यांच्या चंदेरी जरवाल्या घसघशीत वेण्या आठवल्या. 

रात्री लग्न संपता संपता थकलेल्या बायका त्यांचे विस्कटलेले हेअर बन्स, सरकलेल्या वेण्या, मध्येच आलेली केसांची बट... 

थोड्या वेडू , किंचित व्हल्नरेबल आणि प्रचंड गोड दिसायच्या त्या सगळ्या. 

आमच्या आईच्या दाट कुरळ्या आणि अनमॅनेजेबल केसांचं तर साक्षात घरटंच व्हायचं. 

आणि तिला तशी बघून मला प्रचंड माया दाटून यायची. 

मेसी-बन वाल्या बायका हा माझा वीकपॉइंट तेव्हापासूनच असावा कदाचित. 

(इडिपस वगैरे... )

सायली, मोगरा, जाई-जुई, लाल-कवठी-सोनचाफा, गुलछडी, बकुळी, अबोली काय काय घालायची माझी आई डोक्यात.

तिच्या डोक्यांतली माझी सगळ्यांत आवडती तीन फुलं खालील चढत्या क्रमाने:

दवणा: 

दिसायला नाजूक बारीक फुलं पण काय ह्यांचा वास असतो. 

सटल-बिटल घंटा. इन युअर फकिंग फेस घमघमाट. 


सुरंगी:
हिचा गजरा अंमळ दुर्मिळच. 

बाबा पगार झाला की किंवा खास स्पेशल दिवशी आईला आणायचे हा गजरा. 

ह्याचा वास म्हणजे स्ट्रेट सुखानी गुदमरून जायचं काम.

तेव्हा काही समजायचं नाही पण प्रचंड कामुक सुगंध असतो सुरंगीचा. 

ह्याचा गजरा दिसतोही एखाद्या तांबूस मऊशार सुरवंटासारखा. 

काय वेगळाच प्रकार आहे हा. 

(सुरंगीचे छायाचित्र मिसळपाव.कॉम वरील "जागु" प्राजक्ता म्हात्रे यांच्या ब्लॉगवरून साभार)



करवंदं:  

येस आपली करवंदं!   

ही काळी करंद व्हायच्या आधी टीन-एजर असताना ह्यांना असा सुंदर कुसुम्बी रंग येतो की लिहितानाही मी त्या रंगाच्या आठवणीने थरथरतोय. 

काही इतकं सुंदर, टवटवीत आणि प्रसन्न फार कमी वेळा बघितलंय मी.

आई व्ही टी वरून डोंबिवलीला संध्याकाळी ऑफीसवरून यायची आणि तिला आणायला मी आणि बाबा स्टेशनवर जायचो. 

(हो तेव्हा ८०-८२ साली डोंबिवली स्टेशनावर हे शक्य होतं.)

तिचा घामेजलेला पण आम्हाला बघून फुललेला चेहेरा, केसांचं अर्थातच झालेलं टोपलं, पर्सच्या चामड्याचा येणारा एक वेगळाच वास, 

(हा असा वास लोकल ट्रेननी प्रवास करणाऱ्या बायकांच्या पर्सला हटकून येतो.)   

आणि गाडीतच घेऊन डोक्यात घातलेली ती सुंदर फुलं... टेक्निकली खरं तर फळं!

मी बक्कन तिच्या केसांतूनच एक दोन करवंद तोडायचो आणि ती तुरट आंबट रसरशीत देखणी फळं तशीच खायचो. 

सिंपलर टाईम्स!

भारी सुंदर दिसतात करवंदं मुलींच्या डोक्यात. 

आजकाल कोणीच घालत नाही... का कोण जाणे.  



---------


आज फुलांच्या आणि कच्च्या करवंदांच्या आठवणीतच थोडीफार भाडी मारली. 
(फुलांची छायाचित्रे जालावरून साभार)

आजची कमाई: 

५५० रुपये 












    

 





 


Saturday, January 1, 2022

टॅक्सी दिवस २२: ७ नोव्हेंबर २०२१

काल रात्री टॅक्सी घरीच असल्यामुळे आज मलबारहील ऐवजी आमच्या गव्हर्नमेन्ट कॉलनीतूनच सुरुवात केली. 

हे सगळे कॉलनीतल्या टॅक्सी स्टॅन्डवरचे नेहमीचे टॅक्सीवाले. 

टॅक्सी मिळवण्यासाठी जेव्हा मी आणि बिको जंग जंग पछाडत होतो तेव्हा आम्ही ह्या सगळ्यांचं मेजर डोकं खाल्लेलं त्यामुळे सगळे मला नीटच ओळखतात. 

आज मला साक्षात टॅक्सीसकट आणि युनिफॉर्ममध्ये बघून सगळ्यांना आनंदच झालेला 

इस्मायल, रफीकभाई, नौशाद, नजीम, सैदू, पट्टू, ओमान असे सगळे. 

मिलेनियल्सच्या थोडा आधीचा जन्म असल्याने सेल्फी मला कधीच काढता येत नाहीत.  

सो कातरलेल्या सेल्फीचे अपश्रेय पूर्ण माझेच.


 



पुढे मग एका यंगीश आई-बाबा आणि मुलाला सहकार नगर (वडाळ्याला) सोडलं. 
ही सुद्धा एक छान सुबक ( अजूनतरी ) विक्राळ टॉवर्स नसलेली तीनचार मजली बिल्डींग्सची बऱ्यापैकी मोठी कॉलनी. 
मुंबईत एकेकाळी अशा बऱ्याच सुबक कॉलनीज होत्या. 

आमची वांद्र्याची गव्हर्नमेंट कॉलनी, सांताक्रुझची पोस्ट अँड टेलिग्राफ कॉलनी, अंधेरीचं विजयनगर, बोरिवलीची नॅन्सी कॉलनी वगैरे वगैरे. 

तिथेच हलका व्हायला एका इंडस्ट्रीयल इस्टेटच्या टॉयलेटमध्ये गेलो. 
अंधाऱ्या बोळकांड्यावाल्या इंडस्ट्रीयल इस्टेट्स मुंबईत किंवा कोणत्याही मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशाच दिसत असाव्यात बहुधा. 

इथे अर्थातच छोट्या इंडस्ट्रीज आणि बरेचदा लहान किंवा मध्यम फिल्म कंपन्यांची प्रॉडक्शन हाउसेस, चित्रकार किंवा शिल्पकारांचे स्टुडिओज, स्टार्टअप कंपन्या असंही बरंच काय काय असतं. 

दिवाळीनंतरचा रविवार असल्याने आज मात्र ही गांजा मारलेल्या स्टोनरसारखी सुम्म होती. 



आजचा दिवसही तसाच. 
प्रांजळपणे सांगायचं तर खास काही नाही. 

आजची कमाई:
३७४ रुपये 


  




Sunday, December 19, 2021

टॅक्सी दिवस २१: ६ नोव्हेंबर २०२१

दिनेशभाई त्यांच्या गावी गेले असल्यामुळे टॅक्सी पहिल्या शिफ्टच्या राजकुमारकडेच होती.

म्हणून ह्या वेळेस गाडी शनिवारी रात्रीच घरी आणून ठेवायचा प्लॅन होता. 

म्हणजे उद्या जरा आरामात उठता आलं असतं. 

राजकुमारकडून रात्री ९:३० च्या सुमारास गाडी उचलली. तडक घरी जायचाच प्लॅन होता पण भाडीच लागत गेली :)

तीसुद्धा नाना चौक, नवजीवन सोसायटी, सँडहर्स्ट रोड, ऑपेरा हाऊस अशी 

बाय द वे गिरगावच्या आंबेवाडी जवळच्या एका घराची ही कुमारसंभवातील पार्वतीच्या बिसतंतूही न पास होणाऱ्या यौवन-कुंभांच्या मदनघळीइतकी चिंचोळी एंट्री. 



फारच सुंदर आणि सरिअल आहेय ही. 

ह्या घरात गोद्रेजचं कपाट किंवा सोफा कसा नेला असेल असा प्रश्न मला पडला पण हू केअर्स!

कदाचित नीलकमलच्या सुटसुटीत खुर्च्या वापरत असतील ते लोक्स.   

मग ग्रॅण्ट-रोडच्या दिल्ली-दरबारचं भाडं आलं. 

बाय द वे ग्रॅण्ट-रोडच्या(च) दिल्ली-दरबारची बिर्याणी खास. 

कुलाबा माहीम वगैरेला ही त्यांच्या ब्रॅंचेस आहेत आणि त्याही वाईट नाहीयेत पण... 

परिणीती तरी कुठे वाईट आहे पण प्रियांका चोप्रा (जोनास ) उच्चा प्रकार आहे तसंच दिल्ली दरबार ग्रॅण्ट रोडचंच.  

दिल्ली दरबारच्या जरा पुढे एक माणूस उचलला त्याला परेल व्हिलेजला जायचं होतं.

खासच होता तो एकदम फ्रेंडली. 

आपण त्याला प्रवीण म्हणूयात. 

बसल्या बसल्या थेट गप्पा हाणायला लागला मस्तपैकी. 

तो वैश्यवाणी आहे म्हणजे लक्ष्या बेर्डेच्या ज्ञातीतला हे त्यानं पहिले छूट सांगून टाकलं. 

परेल लालबाग भागात ह्यांच्या समाजाची बरीच तंबाखूची - होलसेल किराणाची दुकानं होती / आहेत हेही सांगितलं.  

मग माझं काय लग्नं - मुलं वगैरे स्टेटस विचारून घेतलं. 

आमचा मुलांशिवाय DINK रहायचा प्लान सांगितला तेव्हा तो थोडा अचंबला पण त्याला जास्त करून स्वतःविषयीच शेअर करायचं होतं.

अगदी गरज लागलीच तर सगळी सेवींग्ज गदागदा हलवून (त्याचेच शब्द) तो पंधरा लाख उभे करू शकेल हेही त्यानं अभिमानानं सांगितलं.  

मग डायरेक्ट त्यानं स्वतःच्या सेक्स लाइफला हात घातला. 

आजकाल पहिल्यासारखा ड्राइव्ह येत नाही हे ही सांगून टाकलं. 

आणि चाळीशीपुढे गेल्याने असं असेल का हेही विचारून टाकलं. 

आता मी काही डॉक्टर वत्स किंवा सेक्स एज्युकेशन मधला कुमार-थेरपिस्ट ओटीस किंवा त्याची सायकॉलॉजिस्ट आई डॉ. मिलबर्न नसल्याने मी त्याला माझ्या परीने जेनेरिकच सल्ला दिला.    

(बाय द वे  सेक्स एज्युकेशन पहिले दोन सीझन्स मस्त. तिसरा चालू केलाय पण सगळे नेहमीचेच ट्रोप्स असल्यासारखे वाटतायत नव्या सीझनमध्ये. ॲक्टींग अर्थातच छान खास करून रुबी मस्त!)

तर त्याला सांगितलं की कधी कधी हा फेज असू शकतो, जास्त लोड न घ्यावा वगैरे. (लोड वरती ही पन इन्टेन्डेड हेहेहे :))

त्याला परेल व्हिलेजच्या अरुंद रस्त्यावर सोडला. 

हा तोच रस्ता जिकडे मी एकदा अनंत सामंतांसारख्या दिसणाऱ्या एका हँडसम माणसाला सोडलं होतं. 

टॅक्सी दिवस १४: ३ जानेवारी २०२१

उतरतानाही प्रवीणने बिचाऱ्याने आईस्क्रीम खाणार का विचारलं. 

भारी प्रेमळ होता. 

परेल व्हिलेज जवळच एका मुलाला उचलला. 

त्यानंही मन बरंच मोकळं केलं. ऑफीस-बॉय होता तो. 

"मालक पगार बरा देतो पण राब राब राबवतो", तो सांगत होता. 

"मग घरी जायला उशीर होतो नी चायनीज बांधून घ्यावं लागतं". रोज चायनीज खाऊन त्याच्या छातीत थोडं दुखूही लागलं होतं. 

मला पंकज भोसलेच्या कथेतील रोज चायनीज खाणारा (खावं लागणारा) तुकाराम आठवल्यासारखा झाला.   

एकंदरीत काय तर:

बारमधला काउंटर पुसत दारू भरणारा बारमन, चर्चमधला जाळीच्या अलीकडचा पाद्री आणि आम्ही टॅक्सीवाले ह्यांचा जॉब एकच आहे:

ऐकणं !!!


आजची कमाई:

(फार तर दोन तासांत ) ३७० रुपये (अजिबातच वाईट नाहीये)  


    


 



Friday, November 26, 2021

टॅक्सी दिवस २०: २४ ऑक्टोबर २०२१

आज सकाळी माझा टाइम्स ऑफ इंडियातर्फे टॅक्सीनामा प्रोजेक्टविषयी इंटरव्ह्यू झाला. 

Techie Taxiwala

बऱ्याच जणांनी ती लिंक पाहिली आणि प्रेमाने पाठ थोपली, शिवाय आणखी लोकांत आवर्जून पसरवली हे मस्तच. 

सगळ्यांचे आभार. 

इंटरव्ह्यूमध्ये तसा बराच वेळ गेला.  

मग थोडी फार भाडी मारून गाडी उभी करताना हे आमचे मलबार हिलच्या नाक्यावरचे नेहमीचे ड्रायव्हर रमण झा भेटले.

ह्यांच्याशी आज थोड्या गप्पा छाटल्या. 



त्यांच्याच टॅक्सीला टेकून हा फोटो काढलाय. 

हे टॅक्सीतच झोपतात रात्री. 

असे बरेचसे टॅक्सीवाले आहेत मुंबईत ज्यांचं बिऱ्हाड टॅक्सीतच आहे. 

त्यांच्या आणि रमण झांच्या आयुष्यात अजिबातच क्लटर नाहीये. 

आठवडाभर ते टॅक्सी चालवतात. 

प्रातर्विधी सुलभमध्ये पैसे देऊन.  

दुपारी बाहेरच काही मिळेल ते खातात.  

रात्रीचा त्यांनी डबा लावलाय. 

नऊ साडेनऊला गाडीतच जेवण करून ते सीट पाठी करून झोपतात. 

मलबार हिलचा हा शांत कोपरा त्यांच्या वर्षानुवर्षं ओळखीचा असल्याने कोणी त्यांना त्रास देत नाही. 

आजूबाजूला पॉश बिल्डिंगचे सिक्युरिटी असल्याने त्यांना सुरक्षितही वाटतं. 

रविवार थोड्याफार फरकाने असाच.  

फक्त रविवारी ते जास्त भाडी शोधत न बसता दुपारी चार-पाच वाजताच गाडी लावून निवांत बसतात किंवा उभे राहतात.    

फोनही साधाच आहे त्यांच्याकडे पण त्यांना मनोरंजन, सोशल मिडीया बिडीयाची फारशी गरज वाटत नाही बहुतेक. 

जगत रहाणं हेच त्यांचं नेटफ्लिक्स आणि ऍमेझॉन असं म्हणूया हवं तर. 

"पण त्यांना काही पैसे, महत्त्वाच्या वस्तू वगैरे ठेवायच्या असतील तर?",

मी विचारलं. 

अशावेळी त्यांची एक खोली असते तिकडे बरेच जण आपलं मोजकं महत्वाचं सामान ठेवतात. 

हेही खरं तर मुंबईला नवीन नाहीच. 

मिल्स बहरात असतानाही कोकण + घाटावरील प्रत्येक गावाच्या गिरणगावी खोल्या असत.  

तिकडे दहा एक जण झोपायला असत आणि आणखी दहाएक जणांच्या ट्रंका असत. 

तसंच हे.

उगीचच जी. के. ऐनापुरेंचं "रिबोट" आठवलं.   

कमोडवर बसून आरामात पेपर वाचता येणं, गरम शॉवर, निवांत बसून टेबलावर करता येणारा ब्रेकफास्ट ह्या गोष्टी आपण बिनदिक्कत गृहीत धरल्या तरी सगळ्यांना ही चैन परवडत नाही . 

आणि आपणही ह्या चैनीबद्दल कमीतकमी ग्रेटफुल तरी रहावं हेच बरं.   

मला थोडा फ्रान्सिस मकडॉर्मांचा "नोमॅड लँड"ही आठवला. 

पण ती तुलना अयोग्यच ठरेल सो क्षमस्व

एकतर तितकं चांगलं (हो तुलनेनी तिकडच्या भटक्यांनासुद्धा चांगलं इन्फ्रा मिळतं) इन्फ्रा रमण झांच्या नशिबी नाहीच 

शिवाय रमण झा नोमॅड लँडमधल्या फर्नएवढे कुटुंबापासून अलिप्त अजिबातच नाहीयेत. 

इकडे परिस्थितीवशात त्यांचं घर टॅक्सीत असलं तरी गावात त्यांचं आख्खं कुटुंब आहेच.  

उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या गावात त्यांचा हुशार आणि होतकरू मुलगा नुकताच जिल्हा परिषदेची निवडणूक अपक्ष राहून जिंकला. 

बाकीच्या नेहमी हमखास निवडून येणाऱ्या नेत्यांनी रडीचा डाव खेळून पुन्हा काउंटिंग करवलं. 

पठ्ठ्या त्यातही पुन्हा जिंकला.  

पुन्हा काउंटींग करून मात्र त्याला हरवलं गेलं. 

हे सगळं रमण झा थोडंसंच कडवट होऊन सांगतात,

आणि पुढच्या निवडणुकांत तो हमखास निवडून येणार हे ही. 

भारतीय लोकशाही हे रसायनच काही अजब आहे हेच खरं.  

निवडून येवोच रमण झांचा मुलगा. 

जय भारत! 

जय लोकशाही!!

जय टॅक्सी!!!

आजची कमाई: 

१८० रुपये. 


         

  

 

  

 


Tuesday, October 26, 2021

टॅक्सी दिवस १९: १९ सप्टेंबर २०२१

आज सोसायटीची मिटींग असल्यामुळे टॅक्सी उशीरा काढली. 

त्यात अनंत चतुर्दशी असल्यामुळे मुंबईत बऱ्यापैकी सामसूम होती. 

गव्हर्नमेंट कॉलनीतून चार यु. पी. चे मासेवाले घेतले.  

आता यु. पी. चे मासेवाले कोळणींइतकेच एफिशियंटली मासे विकतात. 

आणि त्यात यु. पी. चे मासेवाले, कोळणी किंवा आमच्या आई-बायकोसारखं मासेखाऊ पब्लीक ह्या कोणालाच प्रॉब्लेम नाहीये. 

सो फालतू गोष्टींबद्दल रायता फैलावणाऱ्या लोकांनी शांतीलालचा पकडावा हेच बरं. 

त्यांना दानाबंदर (मस्जिद बंदर) ला सोडायचं होतं. 

त्यांतला एक फंटर त्याची माशाची रिकामी टोपली घेऊन पुढेच बसला. 

एकदम अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु असा माशांचा वैस वास माझ्या नाकात शिरला. 

आता मासे किंवा पुसी किंवा काखेतील घामाचा गंध हे सगळे अक्वायर्ड स्मेल्स आहेत. 

तुम्ही मासेखाऊ मालवणी किंवा सोनार, कासार, सी के पी आहात का, तुम्हाला भूक लागलीय का,

ती योनीगंधा स्त्री किंवा घामेजलेला चिंब खाकांचा पुरुष तुमच्या आवडीचा आहे की नाही ह्यावर 

डिपेण्ड करतं की तुम्ही ह्या वासांकडे चुंबकासारखे ओढले जाताय की तिटकारून दूर पळताय. 

चिंब खाकांवरून आठवलं मंटोची अप्रतिम सेक्साट गोष्ट आहे बहुतेक "वास" नावाचीच.  

ती गोष्ट वाचूनच किती वेळा... 

कदाचित मंटोला दुसरं काही सांगायचं असेल पण माझ्यासाठी ती अजरामर इरॉटिका आहे.

असो... 

बाकी अजून काही भाडी मारली आणि अनंत चतुर्दशी असल्याने लवकर घरी पळालो. 

अवचित आलेल्या पावसात काढलेले हे काही फोटो. 








आजची कमाई:
३४० रुपये.